Login

तू ही आधी मुलगा होतास.. (भाग:-२)

स्वतःच्या मुलाला आरसा दाखवणाऱ्या सुधाकर आणि अजित यांची कथा

ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५

जलद लेखन कथा स्पर्धा

शीर्षक:- तू ही आधी मुलगा होतास..

भाग:-२

आता त्या व्यक्तीने अजितकडे मोर्चा वळवला.

ती व्यक्ती म्हणजे अजितचे वडील सुधाकर होते.

ते अजितला करड्या आवाजात म्हणाले," तू हात का उचललास समूवर ?"

"मग काय त्याची आरती करू ? आज त्याच्यामुळे सर्वांसमोर मला मान खाली घालण्याची वेळ आली. किती ऐकून घ्यावं लागलं मला, ते ही या नालायक गधड्यामुळे." अजित थोड्या चढ्या आवाजात म्हणाला.

"काय केलं असं त्याने की तुला मान खाली घालावी लागली. काय ऐकून घेतलंस तू की तू त्याला असे मारत होतास ? आणि हो जरा हळू आवाजात बोल ऐकायला येत मला." ते आवाजात जरब आणत म्हणाले.

"कोणत्याही विषयात त्याला चांगले मार्क्स नाहीत. अभ्यास पूर्ण करत नाही. वर्गात लक्ष देत नाही. अजून बरेच काही सांगितले आहेत त्याच्या टिचरांनी." अजित रागात श्वास घेत म्हणाला.

"म्हणून तू त्याला मारत होतास. चार पाच मार्क्स कमी पडले तर ते चांगले मार्क्स नाहीत का? आणखी किती चांगले मार्क्स पाहिजेत रे? बरं नाही पडले तर नंतर पडतील ना, त्यात काय एवढं ? अरे तो लहान नाही आता, किशोर अवस्थेत आहे तो. समजावून सांगितले असते तर तो ऐकला नसता का ?" सुधाकर म्हणाले.

"समजावून सांगितले असते ऐकला असता तो? मलाही काही हौस नाही हो बाबा, त्याला मारायची.
आताच त्याला नाही वठणीवर आणले तर पुढे दहावी, बारावीत काय दिवे लावेल तो ? काय कमी आहे त्याला ? सगळ्या विषयांसाठी क्लासेस आहेत, पाहिजे ते पुरवतो, मागेल ते ती वस्तू पुढ्यात देतो. जीभेचे चोचलेही पुरवतो की. त्याच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा मी पूर्ण करतो तर मग त्या बदल्यात मी त्याच्याकडून चांगल्या मार्कांची अपेक्षा केली तर बिघडले कुठे? एवढेही तो पूर्ण करू शकत नाही का?" अजितचा आवाजात थोडा कातर झाला होता.

"तुला जशा अपेक्षा असतात तशा त्याच्याही काही अपेक्षा असतीलच ना? नुसते पाहिजे ते पुरवलं, मागेल ते दिलं म्हणजे झालं का? तू म्हणतोस क्लासेस लावलेस ; पण तू कधी त्याला विचारलंस का त्याला तिथलं कळतं का? अरे, आता त्याचे नववीचे वर्षे आहे. आताच तू त्याला एवढं दडपण देशील तर पुढे कसं होणार त्याचं? दिवसभर शाळा नंतर क्लासेस, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी अवस्था करून टाकलीस तू त्याची? त्या लेकराने खेळायचे, बागडायचे कधी? तुझ्या अपेक्षेच्या ओझ्याने तो दडपून गेलाय."

"पण बाबा, आता हे युग स्पर्धेचे आहे त्यात टिकून राहायचे म्हणजे क्लासेसची गरज आहे आणि त्याच्या काय अपेक्षा असणार ? सगळे तर मी देतो की त्याला. " अजित म्हणाला तसे ते चमकून त्याच्याकडे पाहू लागले.

क्रमशः