Login

तू माझे काळीज भाग-1

आशुतोष भूतकाळातील प्रेमाच्या आठवणीत हरवलेला असतो, पण अनुगत त्याला जगायला बळ मिळतं.शोधाच्या प्रवासात त्याला धक्कादायक सत्य कळतं
तू माझे काळीज – भाग १

(चॅम्पियन्स ट्रॉफी 2025)

आशुतोष एक बंद खोलीत बसला होता. त्याला एकांत खूप आवडायला लागला होता. खूप चिडका पण झाला होता. त्याच्या मनांत एकच प्रश्न येत होता,
' ती मला का सोडून गेली?माझ्यामध्ये असं काय कमी आहे? माझ्याकडे सगळं आहे. गाड्या आहेत, छान घर आहे, चांगलं कुटुंब आहे. मला जे हवं आहे, ते माझ्या जवळ का नाही? 'तो विचार करत होता.

“चाचू… चाचू… तू रोज इथे कायं करतोस? आजी तुला बोलावत आहे.”
अनु त्याला बोलवायला आली.

अनुश्री पाच वर्षांची मुलगी होती.
(आशुतोष फक्त तिचंच ऐकत होता. बाकी कोणाचच तो ऐकत नव्हता. अनुश्री ही त्याच्या भावाची मुलगी होती.)

त्याने अनुला उचलून घेतलं. तो हॉलमध्ये आला. सगळे त्याची वाट बघत होते. त्याने सगळ्यांना “गुड मॉर्निंग” म्हटलं.
त्यांनीही त्याला “गुड मॉर्निंग” म्हटलं.

“आशु, असा किती दिवस एकटा राहणार आहेस? आपण चांगली मुलगी बघू, तुझं लग्न लावून टाकू,” आशुतोषची आई काळजीने म्हणाली.

“आई, मी तुला सांगितलं आहे. मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. मी तिलाच शोधून काढीन,” आशुतोष म्हणाला.

“अरे, किती वर्षं तिची वाट बघणार आहेस? आम्ही तुझ्यासोबत किती राहणार? कधी तरी आम्ही जाणारच. तुला सोबत नको का? आपल्याला साथीदार लागतो,” आशुतोषची आई म्हणाली.

“आजी, मी चाचूसोबत राहीन,” अनु म्हणाली.

आशुतोष हसायला लागला. आईने मात्र त्यांच्याकडे रागाने पाहिलं.

थोड्याच वेळात आशुतोषचं जेवण झालं. अनुचाही नाश्ता झाला. तिला शाळेत जायचं होतं, म्हणून तिची आई तिला तयार करायला घेऊन गेली.

आशुतोष ऑफिसमध्ये जायला निघाला. त्याचे बाबा पण त्याच्यासोबत निघाले.गाडीत दोघेच होते.
“आशु, किती दिवस तिची वाट बघत बसणार आहेस?” आशुतोषचे बाबा काळजीने बोलले.

“बाबा, मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. दुसऱ्या मुलीकडे बघावंसं वाटत नाही. दुसऱ्या मुलीत तिलाच शोधेन. त्यापेक्षा तिलाच शोधून तिच्यासोबत लग्न करीन,” आशुतोष ठामपणे म्हणाला.

“तू कॉलेजमधून तिचा पत्ता शोधून काढ. तिला कोणी मैत्रीण असेल ना? तिच्याशी बोलून बघ,” आशुतोषचे बाबा म्हणाले.

“तिच्या मैत्रिणींना विचारून झालं आहे. त्यांना काहीच माहिती नाही,” आशुतोष म्हणाला.

थोड्याच वेळात ऑफिस आलं. दोघेही गाडीतून उतरले. आत शिरताच सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग म्हणाला. त्यांनीही परत गुड मॉर्निंग म्हटलं आणि आपल्या-आपल्या केबिनकडे गेले.

आशुतोषची केबिन मोठी आणि आकर्षक होती. काचेच्या भिंतींतून बाहेरचं शहर दिसत होतं. उंच इमारती, सतत धावपळ करणारे लोक, आणि रस्त्यावरची वर्दळ. एका कोपऱ्यात मऊ लेदरची काळी खुर्ची आणि मोठं लाकडी टेबल होतं. टेबलावर व्यवस्थित ठेवलेल्या फाईल्स, लॅपटॉप आणि एक छोटासा फोटो असलेली फ्रेम होती.

आशुतोषने लॅपटॉप उघडला आणि कामाला लागला. त्याची सेक्रेटरी आत आली, शेड्युल देऊन गेली.

ती नेहमीच त्याने स्वतःकडे पहावं म्हणून खूप मेकअप करून, छोटे कपडे घालून यायची पण आशुतोष तिच्याकडे बघतही नसे. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सेक्रेटरीला त्याच्यावर खूप राग यायचा.

काही वेळाने आशुतोषची मिटिंग होती. तो मिटिंगसाठी बाहेर निघून गेला.