Login

तू तर चाफेकळी - भाग 24

Love Story


तू तर चाफेकळी - भाग 24

अबिरने तो बॉक्स उघडला त्यात छान ब्रोछ होतं. कोटावर लावायचं. तो बघुनच खुश झाला. पण त्याला अंजु कुठे दिसेना.

" अंजली....... अंजली....... " तो उठून ती कुठे दिसतेय का ते बघु लागला. इतक्यात त्याला मागुन आवाज आला.

खट्टी मिठी आहे रे...
आपुली लढाई
Am sorry......

त्याने मागे वळून पाहिलं तर अंजु व्हाइट गुलाबाचं फुल घेऊन त्याला सॉरी म्हणत होती. तो तिच्याजवळ आला. तिने त्याला फुल दिल.


" आता तरी गेला का राग.... अँग्री मॅनचा.... " ती हसली


" हो...... " तोही हसुन म्हणाला

" मला वाटलं होतं आता तू कधी बोलणारच नाही माझ्याशी...." अंजु


" असं कसं... इतकं छान सरप्राईज मिळाल्यावर कोणाचा राग जाणार नाही....थॅंक्यु.... " अबिर


" पण किती कष्ट घ्यावे लागले मला हे सगळं करायला...?? माहितेय का...?? " अंजु दमल्याची ऍक्टिग करत म्हणाली.


" हो का..... " तो किंचित हसला.


" चला आता पार्टीला जाऊया. सगळे वाट बघत असतील. "


" हो चल... " अंजु बराच वेळ कुठे दिसली नाही. त्यामुळे राकेश तिला शोधत त्या गार्डनपाशी आला होता. मगाशी अंजुने अबिरला सरप्राईज दिलं ते त्याने सर्व पाहिलं होतं. त्याला अबिरचा खूप राग येत होता. कानामागून आला नि तिखट झाला. असं व्हायला नको. त्यामुळे वेळीच काहीतरी हालचाल करायला हवी असं त्याने मनाशी पक्कं ठरवलं आणि तो त्यांच्या पाठोपाठ पार्टीच्या इथे आला.

.................…........

" pay attention please......" मॅनेजर सर स्टेजवर आले. तसं म्युझिक कमी करण्यात आलं. नाचणारे पाय थांबले. सगळेच जण ते काय बोलतायत त्याकडे लक्ष देऊ लागले.


" first up all..... आज आपण ज्या कारणासाठी इथे जमलो आहोत ते म्हणजे आपल्या कंपनीजला प्रोजेक्ट मिळाल्याबद्दल... तर त्यासाठी give big hands for Mr. Abir , Miss Anjali & Miss Kavya.... "


सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवुन त्यांचं अभिनंदन केलं.

" आता आपण एक गेम खेळणार आहोत. खूप वर्षांनी आपल्या ऑफिसकडून अशी पार्टी ऑर्गनाईज झाली आहे. त्यामुळे कुछ तो स्पेशल होना ही चाहीये.. क्यू गाईज...?? " मॅनेजर सरांनी विचारलं आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला.


" हेहेहे हेहे..... हुउर्यो..... " करत त्यांनी प्रतिसाद दिला.


" तर तर.... गेम असा आहे की इथे एक व्हील दिसतंय त्यावर काही टास्क लिहिलेले आहेत आणि त्यावर काही फुगे लावलेले आहेत आणि इथे काही चिठया ठेवल्या आहेत. आपले मॅनेजर सर यातली एक चिट्ठी काढतील त्यावर ज्याचं नाव असेल त्याने पुढे येऊन यातला एक फुगा फोडायचा. त्यामध्ये जे टास्क येईल ते त्याने इथे स्टेजवर येऊन परफॉर्म करायचं आहे... ok clear सगळ्यांना.... "


सगळे उत्साहाने मॅनेजर सरांचं बोलणं ऐकत होते. काहीतरी नवीन आणि धमाल करायला मिळणार सो सगळे खुश झाले.


" चला सुरू करूया....... " दुसऱ्या मॅनेजर सरांकडे माईक देत ते खाली उतरले.

चिठ्यांचा बाउल आणण्यात आला.

" चला आता पाहिलं नाव कोणाचं आहे बघुया..... " सरांनी बाउल मधल्या चिठया नीट उलट सुलट करून फिरवल्या आणि एक चिठी उचलली.


" निषाद राणे....." त्यांनी नाव घेतलं.


" आयला मलाच जावं लागतंय ओपनिंग बॅट्समन म्हणून..... " तो पुटपुटला. बाजूला असलेल्या त्याच्या कलीग्सनी त्याला जवळजवळ स्टेजवर ढकललंच..


निषादने टाचणी मारून त्यातला एक फुगा फोडला. त्यावर लिहिलं होतं बैलाचं चित्र काढून दाखवायचं. वाचूनच त्याला घाम फुटला. कारण चित्रकला फक्त शाळेच्या मार्कलिस्ट पुरतीच मर्यादित होती. बोर्ड आणला गेला. तिथेच असलेलं मार्कर त्याने कसबस उचललं आणि चित्र काढायला सुरवात केली. सगळे त्याला चेअर करत होते मस्त. त्याने कसंबसं चित्र काढलं. पण तो बैल कमी आणि गाढव जास्त वाटत होतं... सगळ्यांची हसुन हसुन पुरेवाट झाली. निषाद पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला.


मग काव्याच्या कंपनीमध्ये असलेल्या रोहितचं नाव आलं त्याला तर जिलेबी खायचा टास्क मिळाला. एका मिनिटात जास्तीत जास्त जिलब्या खायच्या होत्या.. तरी त्याने जवळजवळ 30 जिलब्या खाल्ल्या.. मिनिट संपलं आणि तो उठला तेव्हा चार जिलब्या त्याच्या तोंडात कशीतरी जागा करून घेत होत्या...


त्यानंतर राकेशच नाव आलं.. प्रत्येक वेळी फुगे फोडताना व्हील फिरवण्यात येई. त्यामुळे फुगे फोडताना दोन तीनदा तरी प्रयत्न करायला लागत असे. राकेशला तर अळूच्या भाजीची रेसिपी सांगायचं टास्क आला. त्याने कसंतरी सांगायला सुरुवात केली.


" अळूची भाजी घ्यायची. मग ती बारीक बारीक ...
बारीक.... बारीक.... चिरायची..... "


" अरे ती बारीक होऊनच मरेल... शिजताना काहीतरी ठेव तिला..... " कोणतरी म्हणाल आणि एकच हशा पिकला.


" हा तर मी कुठे होतो....?? " राकेश

" साधारण तू अळूच्या भाजीचे हाल करत होतास बारीक बारीक बारीक चिरून..... "


" हा तर ती चिरून झाली की... त्यात पाणी घालायचं... आणि ती उकळवायची.... आणि गप खायची.... " राकेशची रेसिपी ऐकून सगळ्यांची हसुन हसुन मुरकुटी वळली.


त्यानंतर सीमाचं नाव आलं. ती स्टेजवर गेली. किती वेळ गेला पण एक फुगा फुटेना... ती नुसत्या टाचण्या मारत होती. शेवटी एकदाचा फुगा फुटला. त्यावर लिहिलं होतं. शिक्षकांची ऍक्टिंग करा. सीमाला आपल्या शाळेतल्या एकेक बाई आठवू लागल्या. मग तिने कोणाकडून तरी एक चष्मा आणि एक पट्टी मिळवली.


" हा तर मुलांनो... काल सांगितलेला अभ्यास केलात का....?? "


" हो..... " बसलेले सगळे एका सुरात ओरडले.


सगळ्यांची मजा मस्ती चालू होती. अबिर आणि अंजु एकेमेकांपासून काही अंतरावरच बसले होते. अंजुने अबिरकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. जो या आधी तिने कधीच पाहिला नव्हता. अबिर ऑफिसला आल्यापासून कोणाच्यातही फार मिक्स होत नसे. फक्त आपलं काम नि आपण हेच जग होतं त्याचं. पण आता हळूहळू अबिर बदलत होता. त्याचा मूळचा रागीट स्वभाव... गप्प गप्प राहणं. Attitude दाखवणं या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत होत्या. अबिरच्या वागण्या बोलण्यातला हा फरक आज अजून एक व्यक्ती नोटीस करत होती. पार्टीपासून दूर राहून...!!!