" ए.. हाय.. समीरा.. ओळखलंस का?" बसस्टॉपवर उभ्या असलेल्या समीराला समोरच्या गाडीतून कोणीतरी बोलावलं. तिने आवाजाच्या दिशेने बघितले. गाडीत अनिश बसला होता. तिने त्याच्याकडे बघून स्मितहास्य केले. ते बघून त्याने गाडी बसस्टॉपच्या थोडी पुढे उभी केली आणि तो गाडीतून खाली उतरला. नाईलाजाने समीरा पुढे झाली.
"तू इथे कुठे?" अनिशने विचारले.
" मी इथे कामासाठी आले आहे. आणि तू?"
"मी इथेच असतो गेली कितीतरी वर्ष. तू काय करतेस?" त्याने उत्सुकतेने विचारले. बोलताना त्याची नजर तिच्यावरून फिरली. अंगावर साडी, कानात छोटेसेच चमकणारे कानातले, हातात त्याला मॅचिंग बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र.. त्यात पण तसेच ते चमकणारे, हिरे असावेत का? त्याने मनात विचार केला.. हिला परवडणार तरी आहेत का? तीच केसांची साधीशी वेणी, तोच गजरा, कपाळावर टिकली. आम्ही मध्यमवर्गीय बाणा. तो स्वतःशीच हसला. तिने काही उत्तर देण्याआधी त्याने परत विचारले,
" काय चालू आहे? नोकरी वगैरे ठीक आहे ना?" समीराला हसू आले.. इतक्यातच वर्षानंतरही हा अजिबात बदललेला नाही.
" चालू आहे देवाच्या दयेने." ती सुस्कारा टाकत म्हणाली.
"ओह्ह.. लग्न झाले ना तुझे? मागे कोणीतरी सांगितले मला. काय करतो नवरा?"
" हो. झाले ना लग्न. दहा वर्ष झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी कुटुंब आहे माझे." समीराने नवर्याबद्दल सांगणे टाळले हे अनिशला समजले. एक सूक्ष्मसा आनंद त्याला झाला.
"ओह्ह.. साऊंड्स ग्रेट. किती दिवस आहेस इथे? एकदा भेटूया का, जुन्या आठवणी ताज्या करायला. हे माझे कार्ड आहे. कधीही फोन कर. तुझ्यासाठी नेहमीच असेन मी. चल निघतो. तुला कुठे सोडू का? म्हणजे सोडलं असतं पण माझी एक महत्वाची मिटिंग आहे. थोडी घाई आहे. पण फोन कर नक्की." अनिश गाडीत बसून गेला. समीरा बघतच राहिली. त्यावेळेस जे घडले ते किती योग्य होते. समीराला आठवले तिचे कॉलेजमधले दिवस.
समीरा..एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. घरातली परिस्थिती अगदीच ओढगस्तीची नसली तरी खाऊनपिऊन सुखी कुटुंब. हुशारी आणि कष्टाळू वृत्ती याच काय त्या तिच्या जमेच्या गोष्टी. समीरा दिसायला सुंदर होतीच.. पण सौंदर्य मिरवण्यासाठी नसते यावर विश्वास असणारी. त्यामुळे कॉलेजमध्ये ती बरी आणि तिचा अभ्यास बरा हीच तिची वृत्ती होती. तिचा मैत्रिणींचा ग्रुप होता तो ही तिच्यासारखाच अभ्यासू मुलींचा. तिची हुशारी हेरली तिच्या कॉलेजच्या मॅडमने आणि त्यांनी तिला आग्रह केला इंटरकॉलेज वादविवाद स्पर्धेत भाग घेण्यासाठी. तिथे तिच्यासोबत होता कॉलेजचा दुसरा स्पर्धक अनिश.
" हाय.. मी अनिश.. ओळखत तर असशीलच मला." आल्या आल्या अनिशने विचारले.
" नाही.. मी नाही ओळखत तुम्हाला." अपराधी स्वरात समीरा बोलली.
" तू याच कॉलेजला आहेस ना?" अनिशने आश्चर्याने विचारले.
" हो.. मग?"
" काही नाही.. बर्याचशा कॉलेजमधल्या मुली मला ओळखतात म्हणून.. जाऊ दे. सो रेडी फॉर डिबेट?" अनिश विषय बदलत म्हणाला. " तसंही आत्तापर्यंत मी कधीच हरलो नाही."
" अच्छा. मी पहिल्यांदाच भाग घेते आहे. मी सुद्धा काही पॉईंट्स लिहून आणले आहेत."
" ते ठेवून दे. बघ मी कशी जादू करतो ते."
चालेल का अनिशची जादू समीरावर? बघू पुढील भागात.तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा