Login

तू तेव्हा तसा.. भाग २

कथा त्या दोघांची


तू तेव्हा तसा.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की समीराला अनिश रस्त्यात भेटतो आणि तिला कॉलेजचे जुने दिवस आठवतात.
आता बघू पुढे काय होते ते.



" समीरा, तू ग्रेट आहेस. कसलं हरवलंस तू त्या टीमला. मला वाटलं नव्हतं तुझ्याकडे बघून." अनिश खूपच इंप्रेस्ड झाला होता.

" दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं." समीरा हसत म्हणाली. भेटल्यापासून पहिल्यांदाच अनिशला तिचे सौंदर्य जाणवले. त्याने तिच्यासमोर हात केला.

" फ्रेंड्स?" समीरा आधी थोडी घाबरली. पण नंतर तिने आत्मविश्वासाने त्याच्या हातात हात दिला. नेहमी सुंदर आणि श्रीमंत मुलींच्या सोबत दिसणारा अनिश आता सतत समीरासोबत दिसू लागला. समीराचे बोलणे, वागणे त्याला आवडू लागले होते. समीराच्या मनातही त्याच्याबद्दल हळूवार भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. ती आजकाल खास त्याच्यासाठी तयार होऊन यायला लागली होती. समीराचे हळूहळू अभ्यासातले लक्ष कमी व्हायला लागले होते. अनिश तिच्यासोबत असायचा पण त्याने स्वतःहून कधीही तू आवडतेस असे म्हटले नव्हते. नाही म्हटले तरी ही गोष्ट समीराला खटकत होती. प्रेम जबरदस्तीने होत नाही हे तिला माहित होते. एकाबाजूला अनिशचे प्रेमाने बोलणे आणि दुसरीकडे प्रेम आहे हे ही न सांगणे तिला कोड्यात पाडत होते. एक दिवस अचानक तिला मनातलं बोलायची संधी मिळाली. समीरा कॉलेजला आली होती. पण चालता चालता अचानक तिचा पाय मुरगळला. एवढा सुजला की तिला चालणे अशक्य झाले. शेवटी अनिश तिला घरी सोडायला निघाला. त्याच्यासोबत त्याच्या बाईकवर पहिल्यांदाच बसताना समीरा नाही म्हटलं तरी मोहरली होती. दोघे तिच्या घरापर्यंत पोहोचले. समीरा गाडीवरून उतरली. अनिश निघाला.

" घरी चल ना.. आईशी ओळख करून देते." समीरा लाजत म्हणाली.

" घरी? कशाला?"

" कशाला म्हणजे? कधीना कधी ते सांगायला लागणारच ना.."

" काय सांगायचे?" अनिशला खूप आश्चर्य वाटत होते.

" तेच म्हणजे. आपण एकमेकांना आवडतो ते."

" समीरा.. आर यू ओके? आपण फक्त मित्रमैत्रिणी आहोत. त्यात घरी सांगण्यासारखे काहीच नाही." अनिशचे शब्द ऐकून समीराला धक्का बसला.

" तू कॉलेजमध्ये माझ्यासोबत फिरत होतास ते काय होतं मग?"

" चिल बेब्स.. तू ज्याप्रकारे ती कॉम्पिटिशन जिंकलीस , मला ते आवडलं. तू दिसतेस ही छान.. मला वाटलं तुझ्यासोबत वेळ घालवावा." अनिश बेफिकिरीने बोलला.

" मी.. मला असं वाटत होतं की तुझे माझ्यावर प्रेम आहे." समीरा चाचरत बोलली.

" प्रेम.. तुझ्यावर? माझे एम फार मोठे आहे. तुला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. फ्रेंडशिप पर्यंतच ठीक आहे. बाकी काही नाही." अनिश कुत्सितपणे हसला. बाईकवरून निघून गेला. समीरा मात्र तिथेच उभी राहिली.. दुखरा पाय आणि मन सांभाळत.

त्या दिवसानंतर अनिश तिला टाळू लागला. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो तिच्यासमोर यायचाच नाही. पहिल्या कोवळ्या प्रेमाचा झालेला प्रेमभंग तिला सहन होत नव्हता. त्याच दरम्यान अनिश एका नवीन मुलीसोबत फिरताना दिसला आणि तो तिच्याकडे परत येण्याची आशा मावळून गेली. त्या दिवसानंतर मात्र समीराने स्वतःला सावरले. तिने परत जोमाने अभ्यास सुरू केला. ती कॉलेजमधून पहिली आली. त्यानंतर अनिशचे काय झाले ते मात्र तिला समजले नव्हते. तिने आयुष्यातले ते पानच बंद करून टाकले होते. आणि आज अचानक कितीतरी वर्षांनी तो समोर आला होता. त्याचा स्वभाव मात्र अजिबात बदलला नव्हता. कसे झेलत असेल याची बायको याला.. समीरा स्वतःशीच बोलली.


अनिशने केलेल्या अपमानानंतरही समीरा भेटेल का त्याला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all