तु तु मै मै भाग1

सासु सुनेची तु तु मै मै
तू तू में में भाग 1




मुक्ता (सून) - " हिचं असेच असते." मनातल्या मनात रागात पुटपुटली..


उषाताई ( सासुबाई ) - " दोन महिने भर उन्हाळ्यात माहेरी जाऊन आली हौस फिटली का? तिकडून आल्यापासून माझा नातू दिपक बारीक झाला आहे. काळा पडला आहे नुसता. तुझ्या माहेरी ऊन म्हणजे मी. निरांजनाला माझ्या नातीला सर्दी किती झाली. पाण्यात बदल, वातावरणात बदल. इतक्या लांब जाणे येणे. लेकरांना सोसवत नाही. मी बोलले की राग येतो."


शुभमन ( मुक्ताचा नवरा ) - " खरे आहे तुझे आई. काय खजिना आहे त्या माहेरी ठेवलेला. पोरं अशक्त होतात आजारी पडतात. दवाखान्याचा खर्च देणार आहेत का ते?"


मुक्ता - " त्यांनी का खर्च द्यायचा ? त्यांनी काय केले..लगेच सासूबाईंच्या सुरात सूर मिसळला नवऱ्याने. एका माळेचे मणी आहेत सगळे."



मुक्ता - " तिथे आजी, आजोबा आणि मामा यांनी किती लाड केले पोरांचे. रोज सेंद्रिय हापूस आंब्याचा रस, पुरी, पोळी हवे ते. कुरड्या, खारोड्या.. निरांजनाला मँगो आईस्क्रीम, कपडे घेतले पोरांसाठी त्यांच्या आवडीचे. शूज, सँडल दोघांना भारीतले घेतले. एवढे लाड कौडकौतुक केले ते गेले कुठल्या कुठे.... तेवढाच बदल हवा पोरांना. सुट्टीत मामाचा गाव मजा काही औरच असते. त्या आजी-आजोबांचा अधिकार नाही का नातवांवर ?"

मुक्ता गाणे म्हणते. शांत रहाण्याचा प्रयत्न करत असते.

" झुक् झुक् आगीन गाडी..
धुराच्या रेषा हवेत काडी..

पळती झाडे पाहूया..
मामाच्या गावाला जाऊ. या...."


" हो खजिनाचं ठेवला आहे. माझे आई वडील माझ्यासाठी खजिनाचं आहेत."

शुभमन - " जास्तच शहाणी होऊन आली का माहेरून ? माहेरी शिकवलेले दिसतंय तुला.."

उषाताई - "आईच शिकवते पोरीला.."

मुक्ता. ( मनातल्या मनात रागात ) - ' नाव मुक्ता आणि माहेरी जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. सून म्हणजे बंधने, सून म्हणजे बोलणी. सून होणे गृहिणी होणे बिनपगारी आणि बिनाअधिकारी.. कामे करा.. बोलणी खा.'

मुक्ता मनातल्या मनात - ' तेच यांची मुलगी यांना माहेरी यावी, रहावी वाटते. अगदी महिनाभर. मग मुक्ता आहेच शालिनी वन्सांना आवडते म्हणून पुरणपोळी करायला... सोबत मोठा डब्बा भरभरून पुरण द्या, वेलदोडे, जायफळ पूड घालून चांगले गोड करा. चटका पुरणाला चांगला द्या. साजूक तूपाची बदाबदा धार घाला पुरणपोळी वर. वन्सांना जाताना भारीची साडी मग कसा भेदभाव लेकी मध्ये सूने मध्ये... सासू कधीच आई होत नाही, म्हणून सून कधी मुलगीचं होऊ शकत नाही.

मुक्ता मनातच - ' सून मुलगी आहे कोणाची तिलाही आई आणि बाबा आहे तिलाही माहेरी जावे वाटते. आई आणि बाबांकडून कोडकौतुक करून घ्यावे वाटते. माहेरी जाण्याचा तिचा आनंद का असा हिरावून घ्यायचा. आई आणि बाबा आता म्हातारे झाले आहेत. त्यांना तरी कुठे होते काही. आहे तोपर्यंत माहेर त्यांची विचारपूस करायची. भेट झाली की त्यांना आणि मला आनंद मिळतो यात सासरच्यांना का पोटात दुखंत असतं ?'


शुभमन - ( बेडरूम मध्ये आल्यावर ) " मुक्ता तू गेलीस की करमत नाही मला. दोन पोरांची आठवण येते मला."


मुक्ता - " आत एक बोलायचे. बाहेर आईच्या समोर वेगळं बोलायचं सगळे महिती आहे मला. मला घ्यायला आले नाही मग माहेरी. मी माझी गेले माझी माझी आले."


शुभमन - " अग सुट्टी मिळत नाही मला. पोरं झोपली बघ दोन्ही."


मुक्ता - " शुभमन तुझ्याकडे कारणे खूप असतात. रंग सरड्यासारखा पटकन बदलतो तू.. हे घे. तुझ्या सासूसासऱ्यांनी जावयाला ब्रँडेड टिशर्ट आणि जिन्स तुला दरवर्षी प्रमाणे पाठवले आहेत. ही साडी माझ्या सासुबाईंसाठी दिली त्यांच्या आवडीच्या रंगाची."

शुभमनला नवीन कपडे घालून पहायचे असतात. मुक्ता कपड्यांना कुंकू लावून शुभमनला देते. शुभमनला कपडे आवडतात. व्यवस्थित येतात फिटींगला.


दूसऱ्या दिवशी सकाळी निरांजनाला ताप आला. लेक वडीलांची शुभमनची अतिशय लाडकी. लहान शेंडेफळ. लेकीच्या तापामुळे आता मुक्ताच्या डोक्याचा ताप वाढला.


क्रमशः

🎭 Series Post

View all