तू तुझ्यासाठी उभ रहा भाग 2
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
आसावरी आराध्या सोबत खरेदीला गेली. छान कॉटनचे ड्रेस घेतले.
"आई तू पण घे ना."
"अग पण आपल्या कडे चालत नाही ड्रेस. काय करू घेवून."
"आई आपण फिरायला जातो आहोत. घे." तिने दोन तीन ड्रेस घेतले. पाणी पुरी खाल्ली. दोघी घरी आल्या. आजी आजोबांना खरेदी दाखवली. मुकेश घरी नसले की आनंदी असायची ती. ते आल्यावर एक दडपण यायच.
आसावरी खूप साधी गृहिणी होती. नेहमी एकत्र कुटुंबात राहिलेली. सासू सासरे चांगले होते. पण घरात नेहमी मुकेशचा खुप धाक होता. ते जास्त करत होते. आई बाबांच वेळेवर व्हायला हव. आलेले गेलेले त्यांच नीट करत जा. कोणी नाव ठेवायला नको. एकही काम चुकायच नाही. ती काही यंत्र नव्हती ना. तिला ही मन होत. मुकेश सगळ्यांची काळजी करायची तिची सोडून.
आसावरी शिकलेली होती. आधी टीचर म्हणून काम करायची. बरेच वर्ष झाले आता घरी होती. घर काम पूर्ण घरी होत. साडी नेसायची. का तर कोणी ही येत पटकन. सगळे सण व्यवस्थित व्हायला हवे. कोणी प्रेमाने बोलल.. वागल तर अवघड काम सोप होत लगेच संपत. पण धाक असला की नको नको होत.
आधी पासून भिडस्त स्वभावाची आसावरी कोणी थोड जरी मोठ्याने बोलाल तर घाबरून जायची. वाद नको मी करते तुमच्या मनाप्रमाणे अस तीच होत. आराध्या होती तिच्या सोबत तीच खूप सपोर्ट करत होती पण तरी ही अजूनही आसावरी मुकेशच्या शब्दाबाहेर नव्हती.
पूर्वी एक दोन दा तिने कशा तरी साठी विरोध केला होता. तेव्हा किती गोंधळ घातला होता मुकेशने. अगदी तिच्या माहेरच्या लोकांची मीटिंग भरवली होती. कसतरी हात पाय पडून तिने ते भांडण मिटवल होत. या गोष्टी नको वाटतात. होऊ द्या तुमच्या मनाप्रमाणे म्हणून ती शांत असायची
"झाली का ग तुझी बॅग भरून मम्मी?" आराध्या नुकतीच कॉलेज हून आली होती
"हो भरते. अजून पंधरा दिवस आहेत " आसावरीने तिला जेवायला दील.
"अग पण ठरलं ते सामान हळू हळू बॅग मधे टाकून ठेव. काम बाजूला ठेव ग, चल मी तुला मदत करते. काय भरायचं आहे. " आराध्या
"थांब तुझ्या बाबांना येऊ दे मग ठरवते ." आसावरी नेहमीप्रमाणे बोलली.
" काय झालं बॅग वरतून काढायची आहे का? ती काय खाली आहे, बॅग बघू काय काय घेतल आहे त्यात, सगळ्या साड्या निवडल्या आहेत, तुझे ते कॉटनचे सूट कुठे आहेत आपण घेतलेले." आराध्या बोलली.
आराध्याने कपाट उघडलं नवीन घेतलेले सुट बॅगेत भरले.
आराध्याने कॉटनचे सूट टाकले खरे बॅगेत. पण मुकेश खरंच तिला घालू देणार आहेत का? आसावरी विचार करत होती. तिची आवड निवड चालत नव्हती त्यांना. तेच ठरवायचे सगळ. आता आसावरीने हे मान्य केल होत. काही अपेक्षा ठेवत नव्हती.
आणि झालंही तसंच मुकेश ऑफिसहून आले. आसावरीची बॅग दिसली. त्याने ती उघडून बघितली.
"हे काय तू आता हे सलवार सूट सोबत घेणार आहे का? तुला माहितीये ना आपण आई बाबांसोबत चाललो आहोत फिरायला. सलवार सूट काढून छान साड्या सोबत घे." मुकेशने सांगितल.
"ठीक आहे." आसावरीने नेहमीप्रमाणे पडती बाजू घेतली. सूट बाहेर काढून ठेवले आणि ताट वाढायला घेतले. जेवण झाल.
आराध्या परत रूम मध्ये आली. बघते तर सलवार सूट परत कॉटवर काढून ठेवलेले होते.
" हे काय तू परत हे सुट का बाहेर काढून ठेवले आई?" आराध्या बोलली.
तस आसावरीने दाराकडे बघितलं कोणी येते की नाही आणि मग हळूच आराध्याला सांगितलं की, "तुझे बाबा म्हणतात आहे की आजी आजोबा सोबत आहेत तर ड्रेस घालू नको फक्त साड्या नेस."
"तुला काय वाटतं आहे आई? बाबाचं सोड, तुला ड्रेस कम्फर्टेबल आहेत का?" आराध्या जोरात बोलत होती.
"हो मला ड्रेस खूप कम्फर्टेबल आहेत. "आसावरी.
" मग ठीक आहे, तु ड्रेस बरोबर घेणार आहेस आणि घालणार आहेस. आता तू काय घालशील हे बाबा ठरवतील का? आणि हे जरा बंद कर. तुझे मत मुद्दे मांडत जा. " आराध्या
आराध्याच्या आवाज ऐकुन मुकेश खोलीत आले.
"काय चालल आहे? काय झालं? "
"काय चालल आहे? काय झालं? "
आसावरीचे ड्रेस आराध्याच्या हातात होते." या ड्रेस वरुन चालल आहे. "
" होना, तरीच मी बोललो होतो की हे ड्रेस सोबत घेऊ नकोस. छान साड्या नेस. पण आसावरी कधीच कोणाच ऐकत नाही." मुकेश परत टोचून बोलले.
" नाही. आईला हे ड्रेस सोबत घ्यायचे आहेत आणि ते घेण्याविषयी आम्ही ठरवतो आहेत म्हणजे हेच की आई तिला जे आवडेल तेच घालेल, पुरे झाला आता बाबा. तुमच्या लग्नाला पंचवीस वर्षे झाले आहेत आणि बाबा तुम्ही हे कसं कसं ठरवू शकता दुसऱ्यासाठी काय घालायचं ते, आज जर आई बोलली की तुम्ही लुंगी धोतर घालत जा दिवसभर तुम्ही घालणार आहेत का? ऐकणार आहात का तीच? तिलाही जगायचा हक्क आहे. मोकळ राहू द्या तिला." आराध्या आज खूप बोलली.
या सगळ्यांची गडबड ऐकून पदमा ताई ही आत आल्या,
" काय चाललं आहे? आसावरी तू तुला आवडत तसंच रहा. आवडतं तेच करत जा. मुकेशच ऐकू नको, स्वतः साठी जग जरा."
आसावरी नाराज होती. ट्रीप ला जावसं वाटत नाही. जेव्हा बघाव तेव्हा कटकट. कधी कुठलीही गोष्ट मनासारखी करू देत नाही. अर्ध आयुष्य गेल. काय राहील आता. मी जर यांच ऐकल नाही तर किती भांडण होतील. पण आता बास थोडी हिम्मत दाखवावी लागेल. हे मला अगदी गृहीत धरतात.
