तू तुझ्यासाठी उभ रहा भाग 4 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
आसावरी दुसर्या दिवशी मावशीच्या मुलाच्या ओळखीने क्लासच्या इंटरव्ह्यू साठी गेली. तिचा इंटरव्ह्यू झाला. क्लास घ्यायचा डेमो झाला. ती पास झाली. दुपारी एक ते सहा काम होत. पैसे पण चांगल्या पैकी देणार होते.
तिने आराध्यला फोन करून तिने सांगितल.
"चांगल झाल आई तू खूप हुशार आहेस. सगळं कस जमत ग तुला? घरी पण नीट काम बाहेर पण नंबर वन." आराध्या खुश होती.
"काही नाही ग बाई. अस फक्त तुला वाटत. बाकी कोणाला कौतुक नाही. घरी कसे आहेत सगळे?" आसावरी बोलली.
" जेमतेम सुरू आहे."
"मी येवू का?"
" नाही अजून दोन तीन दिवस नको येवू. बाबा बर्या पैकी नमत घेत आहेत."
मुकेशची खूप धावपळ होत होती. आजी आजोबांना आराध्याने सांगून ठेवल होत. आईसाठी तुम्ही बाबांना मदत करायची नाही.
मुकेश संध्याकाळी मावशी कडे आले. आसावरी थोड्या वेळाने क्लास हून आली. चहा पाणी झाल." घरी चल आसावरी."
तिने बॅग घेतली ती घरी आली. तिला बघून आजी आजोबा खुश होते. ती पण खूप खुश होती.
आसावरी चार दिवसांनी आली होती. ती पुढे बसलेली होती समोर. मुकेश, आराध्या समोर बसलेले होते.
"काय करायच आहे आई. तू इथे रहाणार आहेस का?" आराध्याने विचारल.
"नाही मला इथे रहायच नाही. उगीच मावशी कडे वाद नको म्हणून मी आली. या पुढे मी तुझ्या मावशी सोबत राहिल तिकडे छान वाटत. प्रेमळ लोक आहेत. थोड्या वेळाने मी जाणार आहे." तिने उगीच धमकी दिली.
"आसावरी सॉरी. तुला माझा स्वभाव माहिती नाही का? मी सहज बोललो. तू निघून गेलीस. या पुढे अस व्हायला नको." मुकेश बोलले.
"बदला तुमचा त्रासदायक स्वभाव .मला ही मन आहे. वाटेल ते ऐकुन घेते फक्त हे घर टिकवण्यासाठी. तुमच्या साठी. तुम्ही मला गृहीत धरले. मी करते सगळ बरोबर. तुम्ही अति करू नका. " आसावरी हिम्मत करून बोलली.
मुकेश शांत बसुन ऐकत होते. आराध्या आश्चर्याने बघत होती बाबा कसे काय एवढे शांत.
" आणि आजी आजोबांच नीट होत. रोज तेच बोलायची गरज नाही. एकदम इमर्जन्सी असल्या सारखं करू नका. मी क्लास जॉईन केला आहे. तिकडे रोज शिकवायला जाणार आहे. चोवीस तास घरात नसेल. ज्याने त्याने आपले आपले काम थोडे तरी करा. आणि नसेल जमत तर कामाला बाई लावा. या पुढे मला काही बोलायच नाही. "
" तू म्हणशील तस."
" तुमचे आई बाबा खूप चांगले आहेत, मला प्रिय आहेत तरी ते काही माझी एकटीची जबाबदारी नाही. त्यांना काही होईल या भीतीने मला खूप त्रास होतो. मुकेश या पुढे तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या. मी एक सेपरेट व्यक्ति आहे निदान मला माझे निर्णय तरी घेवू द्या. उगीच स्वतः खूप हुशार मी मठ्ठ अस करु नका. "
मुकेशने सगळं मान्य केल. त्या दिवसा पासुन बर्यापैकी सुरळीत गोष्टी सुरु होत्या. मुकेशला समजल होत आसावरी ऐकुन घेत नाही. व्यवस्थित काम आहे तिच. आराध्या, आई, बाबा सगळे तिच्या बाजूने होते.
ती आता हल्ली मुकेश कडे लक्ष देत नव्हती. आराध्या सोबत रमली होती. मुकेश एकटे पडले होते. जावू दे थोडे दिवस. त्यांना ही समजू दे. स्वभाव बदलला तर ठीक. नाही तर यांच्याशी न बोलता मी राहू शकते. आसावरीने ठरवल होत.
ट्रीपला जायचा दिवस आला. सगळे तयार होते मुकेशने त्यांची बॅग भरली. आसावरीने लक्ष दिल नाही. ती ट्रिप खूप छान झाली पदमा ताई, आसावरी आणि आराध्याने खूप मजा केली, बिंदास फिरल्या, हवं ते खाल्लं, स्वतःसाठी जगायला किती छान वाटतं हे आसावरीला कळलं, ट्रीप मध्ये खूप खरेदी झाली तिने स्वतःचे आवडीचे अजुन सलवार सूट घेतले, पदमा ताईंनी सुद्धा सलवार सूट घेतला.
फिरायला जाताना आसावरीने मस्त गुलाबी सलवार सूट घातला होता. माफक मेकअप, अतिशय सुरेख दिसत होती ती. मुकेश बघत होते. "तू अशीच राहत जा आसावरी. खुप छान दिसते आहेस आज आणि मी जर काही तुला बोललो असेल आणि तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. मला नव्हत समजत की तुला त्रास होतो माझ्या वागण्याचा." मुकेश हळूच बोलले
"ठीक आहे काही हरकत नाही."
"आपण आधी सारखे नीट सोबत राहू शकत नाही का? "
"राहु शकतो ना. पण दोघांना समान वागणूक हवी. एक श्रेष्ठ एक कनिष्ठ अस नको. मी पण कशात कमी नाही. उगीच हाड तुडु करण. घराबाहेर काढण. प्रत्येक गोष्टीसाठी, कामावरून बोलण सहन करणार नाही."
"मान्य माझ चुकलं. माझ्यातला बदल तुला लक्ष्यात आला असेल. या पुढे अस होणार नाही. "
ते घरी आले. रविवारची प्रसन्न सकाळ होती. एकीकडे चहा तयार होत होता. पोहे ही तयार होते. सगळ्यांना पोहे वाढल्यानंतर आसावरीने स्वतःसाठी आणि सासुबाईं साठी सांजा वेगळ्या प्लेटमध्ये घेतला आणि दोघीजणी टेबलावर येऊन बसल्या. आराध्या दोघींकडे बघून छान हसत होती. आसावरीने स्वतःचा आवडता नाश्ता स्वतःसाठी बनवला होता. तसं तिला अडवणार कोणी नव्हतं घरात.
"आराध्या आमच्या क्लासच्या टीचरची ट्रीप जात आहे. पावसाळी सहल. आपण दोघी जायच का?"
"हो आई पण पैसे?"
"माझा पगार आहे ना."
"चालेल. दोघी एक दिवस फिरून आल्या."
कधी कधी स्वतःसाठी छोटे छोटे निर्णय घ्यायला खूप उशीर होऊन जातो. यापुढे ती स्वतःसाठी आवडते पदार्थ करणार होती. स्वतःची आवड जपणार होती. स्वतःसाठीही जगणार होती. गाण गुणगुणत ती कामाला लागली.
आराध्य उठून आली." आई मग खुश."
" हो फक्त तुझ्यामुळे शक्य झाल. नाहीतर माझ्यात कुठे एवढी हिम्मत. देवाचे आभार एवढी गोड मुलगी दिली."
मुकेश तयार होवुन आले. "बाबा तुम्ही कुठे चालले?"
"आजी आजोबांना देवळात घेवून जातो. आसावरी काही आणायच का?"
"हो भाजी आणा." तिच्या चेहर्यावर समाधान होत. मुकेश व्यवस्थित वागत होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा