सगळे त्याला बघत बसले.
त्याच्या बाबांनी आणि आईने त्याला बाजूला नेहले आणि समजावले.
"काय हे असे आता तू आधी सारखा राहू शकत नाही.तुझी बायको देवाघरी गेली आहे .लोकं काय म्हणतील?"
तो:"आई,बाबा हा शर्ट मला तिने फार प्रेमाने दिला होता.तिला खूप आवडायचा.हे घड्याळ देखील तिनेच दिले होते. तिच्या आठवणीत मी हे घालतो"
आई रागातच म्हणाली."तुला समजतंय का ?काय बोलतो आहेस?तू आत्ताच्या आता जा आणि साधेसुधे कपडे घाल. असे रंगीबेरंगी कपडे घालायचा आता तुला अधिकार नाही.हो आणि आता तुझ्या अंगावर कोणताही दागिना नको आजपासून. ही गळ्यातली सोन्याची चेन काढ. ह्यापुढे असे काहीच घालू नको.
आम्ही म्हणतोय तसेच वागायचे. हो आणि केसांची हेअरस्टाईल आता करत बसू नको.अगदी बारीक केस काप.हो आणि पांढरे केस आहेत त्यांना रंग अजिबात लावू नको.आता हे सगळे करणे बंद.
त्याला राग आला. आई बाबाच असे म्हणतात.दुसऱ्यांसाठी आई बाबा मला का बोलतात.बायको गेली तर तिच्या आठवणी मी नाही जपू शकत? माझं राहणीमान मी बदलायचे.?
प्रचंड अस्वस्थ वाटले त्याला.जीव घुसमटला.चौकट समाजाने बांधली होती ,समाजावर.
त्याला प्रचंड चीड आली.
त्याच्या लहान भावाचे लग्न होते. त्याची खूप इच्छा होती छान शेरवानी घालायची ,पण आता त्याची बायको देवाघरी गेली होती .तर आई बाबांनी त्याला हलक्या रंगाचा शर्ट घ्यायला लावला.कारण बायको देवाघरी गेली होती.त्याला हक्क नव्हता आता असे राहण्याचा.
बँड बाजा सुरू झाला.हा नाचू लागला.
सगळे लोक त्याला बघायला लागले.नावं ठेवू लागले.
आईने लगेच त्या गर्दीतून त्याला खेचले आणि म्हणाली."आमचं नाक कापतो का तू आता?तुझी बायको आता नाही ..तुला आता हे केलेलं चालणार नाही".
तो निराश होऊन निघून गेला.
तो निराश होऊन निघून गेला.
हॉलमध्ये आला. स्टेजवर पूजा चालू होती.लग्नकार्यात मोठा भाऊ म्हणून हा धावपळ करत होता.तोच बाबा आले.
"तू काय करतो आहे असे,शुभ कार्य चालू आहे.तू जाऊन पाठी खुर्चीवर बस. मध्ये मध्ये करू नको."
तो स्टेजवरून उतरला आणि पाठी जाऊन बसला.
बायको गेल्यापासून सर्व मान ह्याच्याकडून हिरावून घेतला होता.
त्याचा काय गुन्हा होता?बायको देवाघरी गेली होती .आधीसारखे काहीच राहिले नव्हते.लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता.
मनाची समजूत काढली.
लहान भावाची बायकोसुद्धा घरच्यांची वागणूक बघून त्यालाही तशीच वागणूक देऊ लागली.
वर्ष सरले.भावाच्या बायकोला बाळ झाले.
बारसे होते घरी.
कार्यक्रम सुरू होता.
घरचा कार्यक्रम होता ,तरीही हा कोपऱ्यात उभा.आईने आणि बाबाने बजावले होते .शुभ कार्यात पुढेपुढे यायचे नाही कारण आता तुझी बायको नाही जगात.
दुसऱ्या दिवशी बाजूच्या घरात पूजा होती.सगळे पूजेला गेले ह्याला पूजेला कोणी घेऊन गेलेच नाही .कारण ? कारण तर तुम्हाला कळलेच असेल.त्याची बायको जगात नव्हती.
रात्री बायकोच्या आठवणीत झोपून गेला.
तो झोपेतच ओरडला .का गेली सोडून मला,का गेलीस?
तोच त्याच्या बायकोने त्याला गदागदा हलवून जागे केले.
"अहो, काय झाले ?इथेच आहे की मी"
त्याने डोळे उघडले. अरे हे सर्व स्वप्न होते.
त्याच्या जीवात जीव आला.
रडतच त्याने बायकोला मिठी मारली आणि म्हणाला.
"उद्या जरी मी नसलो तरी देखील माझ्या नावाचे मंगळसूत्र आणि कुंकू लावून तु मला नेहमी जपायचे आहे,आज जे आयुष्य जगते आहेस तसेच आयुष्य मी नसतानाही जगायचे आहेस"
तिला रडू कोसळले.
"असे काही बोलू नका, तुम्ही नेहमी मला सोबतीला हवा आहात" बायको.
"मी नेहमीच सोबतीला आहे तुझ्या, पण हे वचन दे मला" तो.
तिने होरार्थक मान हलवली.त्याच्या मिठीत विसावली.
वर्षांनुर्ष जी चौकट स्त्रियांसाठी बांधून ठेवली आहे ,त्या चौकटीत स्वप्नात सुद्धा तो राहू शकला नाही.मग स्त्रिया तर वास्तवात जगतात त्यांचे काय? त्याला जाणीव झाली ती चौकट मोडायची गरज आहे"
अश्विनी ओगले.
कशी वाटली कथा नक्की कंमेंट मध्ये कळवा.कथा आवडल्यास लाईक, कंमेंट,शेअर जरूर करा.