Login

तूच दुर्गा तू भवानी (भाग १)

स्वतःसाठी स्वतःच लढले पाहिजे अशी एक कथा.
"श्रावणी अगं ऐ श्रावणी ऊठ लवकर "
आई घाईघाईत घरातली कामं आवरत होती आणि सोबतच लेकीला म्हणजेच श्रावणीला आवाज देत होती. मात्र श्रावणी गाढ झोपेत होती, ती काहीच बोलली नाही म्हणून आई हातातलं काम सोडून तिच्या रूममधे गेली.
आईने तिच्या अंगावरच पांघरून ओढलं आणि म्हणाली,
"ऐ बाई....ऊठ ना, तू उशिरा उठली तर मला ऑफिसला जायला उशीर होईल."


"आई, अगं मी नाही जात आज कॉलेजला."

"का?  सुटी आहे का आज?"

"नाही गं."

"मग?"

श्रावणी रागातच उठली आणि ओरडली,

"तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आताच द्यायला हवी का?"

"हो ..आताच आणि रुमच्या बाहेर ये म्हणजे मी पटकन माझे आवरते आणि तुझ्याशी बोलते पण."


श्रावणी रूमच्या बाहेर आली , ब्रश केला. आईने तिला चहा दिला आणि  आईने पटापट पोळ्या लाटायला सुरुवात केली.


"आई... अगं मला नको वाटते बाहेर निघायला."


"अगं पण काय झाले ते तरी सांगशील का नाही?"

श्रावणी आईकडे बघत होती पण ती काही बोलली नाही.

"बरं बाई नको सांगू काय झाले, फक्त आवर आणि चल पटकन मला उशीर व्हायला नको."

श्रावणीने हातातला कप टेबलावर आदळला

"ऐ बाई...कप फुटला असता, आता..."

आईचं काहीही न ऐकता ती आत निघून गेली.

आईने पटापट दोघींचे डबे भरले.श्रावणी पण रेडी होवून बाहेर आली. आईने श्रावणीला मिठी मारली आणि कपाळावर एक गोड पप्पी घेतली.

श्रावणीचा राग एकदम शांत झाला आणि तिने एक हलकीशी स्माईल दिली आणि दोघी निघून गेल्या.

श्रावणी नेहमी प्रमाणे कॉलेजात गेली आणि आई तिच्या ऑफिस मध्ये गेली. रोजच्या सारखे आईने बरोबर जेवायच्या वेळी श्रावणीला फोन केला.


"हॅलो.... श्रावणी"


"हॅलो... आई बोल गं."

"अगं, जेवलीस का बाळा?"


"नाही गं...भूक नाही मला."


"का गं काय झालं?"

"काही नाही गं."


"बरं ते जावू दे...तू दुपारी घरी जाशील ना तेव्हा.."


"आई एक ना, आज तू हाफ डे घे ना."

"का? कुठे जायचे आहे का?"

"नाही.... पण.."

"पण काय... जरा सविस्तर सांग."

"काही नाही, चल जेव तू."

"अगं श्रावणी सांग तरी काय झालं?"

श्रावणीने फोन ठेवला.


आईला वाटलं की काहीतरी झाले पण श्रावणी आपल्याला सांगत नाही. काही असं घडलं आहे की ती लपवून ठेवते आहे. पण नेमक काय हे आईला कळत नव्हतं.


श्रावणी नेहमीप्रमाणे दुपारी कॉलेज संपल्यावर घरी निघून गेली.

आईला आज नेमका उशीर होणार होता. तिचे काम साधारण आठ वाजता संपले. आज आईला खुप काम असल्यामुळे तिने श्रावणीला ती घरी पोहचली का नाही? काय करते? काहीही विचारपूस केलेली नव्हती.

आईने हातात फोन घेतला मात्र आता खूप उशीर झाल्यामुळे ती सरळ गाडी घेवून घरी निघाली. रोज सहा वाजता पोहचणारी आई आज नऊ वाजले तरी रस्त्याने होती.आता घरी जावून स्वयंपाक केला तर फार उशीर होईल आणि नेमक दुसऱ्या दिवशी तिला ऑफिसचे काम असल्यामुळे बाहेर गावी जायचं होत म्हणून रस्त्याने जाताना तिने दोघींसाठी पार्सल घेतलं.

साधारण अर्धा तासात आई घरी पोहचली. आईने घराचा दरवाजा उघडला तर श्रावणी एकटी सोफ्यावर बसली होती. तिचा मोबाईल तिच्या बाजूला पडला होता तर समोर पुस्तक ठेवली होती मात्र तीच कशाकडे लक्ष नव्हते ती एकसारखी  घरात असणाऱ्या कृष्णाच्या मूर्तीकडे बघत होती.

आईने हातातली बॅग समोर असलेल्या टेबलावर ठेवली आणि गाडीची चाबी टिव्ही जवळ लटकवली.

मात्र श्रावणीचे आईकडे अजिबात लक्ष नव्हते. आई तिच्या जवळ आली आणि तिला हलवलं ती एकदम घाबरली, क्षणात उठली आणि आईला घट्ट मीठी मारली.

आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आईला तिच्या मिठीत कुठेतरी, कशाला तरी  ती घाबरली असे वाटले. 
आईने तिला खाली बसवलं आणि तिच्याजवळ बसली. आई काही विचारणार त्याच्या आताच श्रावणी म्हणाली,

"आई, अगं खूप भूक लागली आहे."

"अगं हो विसरलेच, मी फ्रेश होवून येते तू जा आणि गाडीच्या डिकीत पार्सल ठेवलं आहे ते घेवून ये."

"आई प्लिज तू जा ना...."


"अरे काय झालं बाळा? या आधी तू अशी वागली नाही,  तू तर धावतच जायची काय आणलं आईने खायला म्हणून."


"आई आता मी लहान आहे का ?"

"हो माझ्यासाठी लहान आहे बाळा तू आणि नेहमीच राहशील. तुम्हाला वाटते गं आपण मोठे झालो, आपल्याला काही गरज नाही कुणाची मात्र आई काही साथ सोडत नाही लेकरांची."

"आई...आई....कळलं मला..."


काय घडलं असेल श्रावणीसोबत? जाईल का ती पार्सल आणायला  खाली?
वाचूया पुढच्या भागात
©® कल्पना सावळे