Login

तूच दुर्गा

ओळखा आपल्यातल्या दुर्गेला


तूच दुर्गा..


गोष्ट छोटी डोंगराएवढी..


" पियु, एवढा धडा वाचून झाला की झोपायला जायचे. रात्रीचे दहा वाजले आहेत. उद्या सकाळी परत ऑनलाईन शाळा आहे ना?"

" आई, कसलं शांत वाटतं आहे ना आता.. नाहीतर रात्री दहा वाजता आपल्याकडे कसला आरडाओरडा असतो. गाड्यांचा, माणसांचा. "

" हो ना.. लॉकडाऊनचे परिणाम.. बरं झालं तुझा दहावीचा अभ्यास तरी शांततेत होईल असे धरून चालू. "

" आई, तुला रडण्याचा आवाज ऐकू येतोय?"

" तुझे कान वाजत असतील.. रडायला आपल्या बिल्डींगमध्ये कोणी लहान आहे का?"

"आई, नीट ऐक.. कोणीतरी वेगळ्याच भाषेत रडत आहे.. " सुमेधाने खिडकीच्या काचा उघडल्या. खरंच कोणीतरी हेल काढून रडत होते. मध्येच "मत मारो " अशा अर्थाचे काहीतरी ऐकू येत होते..

" आई कोणी मुलगी रडते आहे.."

" थांब.. मी बाबांना बोलावते.." सुमेधाने आतल्या खोलीत काम करत असलेल्या राघवला उठवले..

" राघव, आवाज ऐक.."

" हा आवाज बहुतेक बाजूच्या त्या नवीन बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमधून येतो आहे.."

" बाबा, चला ना बघून येऊ."

" नको.. पोलिसांनी बघितले खाली तर ओरडतील."

" पण बाबा.. ती जी कोणी आहे ती संकटात आहे.. तिला वाचवायला नको का?" सुमेधाने राघवकडे पाहिले.

" चल.. आपण दोघे जाऊन बघू या.."

" काय?"
" हो.. बाई माणूस सोबत असल्यावर तुला कोणी काही बोलणार नाही. चल बघून तर येऊ.."

" आई. मी??"

" तू घरातच थांब आजीसोबत. आम्ही आलोच.."

" सुमेधा, जायलाच पाहिजे का?" राघवने विचारले..
" हो.. या अशा परिस्थितीत कोण कुठे अडकली असेल तर तिला मदत करायला नको का?" दोघे खाली आले. त्यांचे एक शेजारी अजय आणि सोसायटीचा वॉचमन त्यांना बघून जरा घाबरले..

" काय रे? एवढ्या रात्री? सगळे ओके ना?"

" हो.. अरे हिला रडण्याचा आवाज येतो आहे.. म्हणून खाली उतरलो.." राघवने स्पष्टीकरण दिले. तो बोलेपर्यंत तोच आवाज जोरात आला. कोणीतरी कळवळून रडत होते. चौघेही आवाजाच्या दिशेने धावले. बाजूला अर्धवट बांधत असलेली इमारत होती. आवाज तिथूनच येत होता. ते आत जाणार तोच तिकडच्या वॉचमनने अडवले.

" ओ साहेब.. कुठे चाललात?"

" कोण रडते आहे इथे? कधीपासून आवाज येतो आहे.." राघव त्याच्या अंगावर ओरडला.. त्याचा आवेश बघून तो घाबरला.

" साहेब.. जाऊ द्या ना.. वर सगळे मजूर लोक आहेत.. गावापासून दूर राहतात.. त्यांनी आणली असेल बाई.. तुम्ही कशाला टेन्शन घेता.." हे ऐकून सुमेधा चिडली.

" लाज नाही वाटत हे बोलायला. कोण कुठली मुलगी कधीची रडते आहे आणि तुम्ही म्हणता टेन्शन का घेता? काही दयामाया आहे का तुम्हाला?"

सुमेधाचे हे रूप बघून तो वॉचमन दुसर्‍याच्या कानात काहितरी बोलला.. त्याने मान हलवली आणि तो अजयच्या कानाशी लागला. अजयने मान हलवली..

"राघव, चल निघूया.."

" भावजी त्या मुलीला सोडेपर्यंत मी जाणार नाही.." सुमेधा रागाने बघत होती.

" ओ ताई.. जा ना घरी.. मी करतो तिचा आवाज बंद.." तो वॉचमन म्हणाला.

" कसली ही अरेरावी? " सुमेधा अजून काही बोलणार तोच राघवने तिला पाठी खेचले.

" ते बघतील बोलले ना.. तू चल आता." जवळजवळ खेचतच त्याने तिला बाहेर आणले. तिने त्याचा हात रागाने झटकला.

" का नाही सोडवले त्या मुलीला?"

" वहिनी, शांतपणे ऐका.. त्या मुली धंदेवाईक असतात. आम्ही सोडवायला गेलो आणि आमच्यावरच आळ आला तर?" अजयने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला..

" अरे पण.. ती रडते आहे.. तिच्यावर काही अत्याचार होत असतील तर?"

" तू चल वर.. " राघव म्हणाला..

" काय हे राघव?" सुमेधाने जिन्यात विचारले..

" अग त्यांचे हे असेच धंदे असतात. तो वॉचमन तेच सांगत होता. सोड.. आपण या भानगडीत पडणार नाही.."

" म्हणजे ती धंदेवाली आहे म्हणून तिने हे सगळे अत्याचार सहन करायचे?" सुमेधाने रागाने विचारले..

"तू ऐकलेस ना, अजय काय म्हणाला. या अशा बायका जे सोडवायला जातात त्यांनाच अडकवतात.. आणि मी तुझ्या शब्दाखातर आलो ना खाली.. याच्यापुढे मला नाही जमणार.." राघवने निर्वाणीचे सांगितले. सुमेधा हताश झाली. ती वर आल्यावर पियुने तिला खुणेने विचारले. तिने नकारार्थी मान हलवली. परत तोच किंचाळण्याचा आवाज आला. पियुने पटकन मोबाईल घेतला.. १०० वर फोन लावला..

" हॅलो, पोलीस स्टेशन?" राघव फोन घ्यायला धावला तोवर समोरून फोन उचलला गेला होता..

" आमच्या इथे एक बाई कधीपासून रडते आहे. बहुतेक तिला मारझोड होत असावी." पियुने बोलायला सुरुवात केली.
" पत्ता ना? लिहून घ्या.." पियुने पत्ता सांगितला. रडण्याचा आवाज वाढतच चालला होता. सगळेच अस्वस्थ झाले होते. सुमेधाला आश्चर्य वाटत होते की बाकी कोणालाच कसा हा आवाज ऐकू जात नाही. थोड्या वेळाने पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. खाली कोणीतरी जोरजोरात बोलत होते. सुमेधा आणि पियुला खाली जायचे होते पण राघवने त्यांना अडवले. काही वेळातच मोबाईलवर एक फोन आला..

" पियु बोलते आहे का?"

" हो.. "

" आम्ही पोलीसचौकीतून बोलत आहोत.. तुच आत्ता फोन केला होतास ना?"

" हो.."

" तुला धन्यवाद द्यायचे होते. त्या मुलीला दारू पिऊन काही लोक त्रास देत होते. सध्यातरी आम्ही तिला सोडवले आहे. बघू तिचे पुढे काय करता येईल. हा असाच धीटपणा नेहमी दाखवत जा.." एका मुलीची आपण सुटका करू शकलो या आनंदात सुमेधा आणि पियु झोपायला गेल्या. पण सुमेधाच्या डोक्यात विचार सुरू झाले होते.. तिने ही घटना लिहून फेसबुकवर पोस्ट केली.. ती वाचून अनेकजणांचे तिला मॅसेज, फोन आले. त्यातल्या एकीने तिला प्रश्न विचारला.

" हे सगळे करताना तुम्हाला भिती नाही का वाटली? आणि त्या पियुनेही लगेच फोन लावला ते पोलिसांना?"
सुमेधा हसली.. तिने उत्तर द्यायला सुरूवात केली..

" का घाबरायचे? आणि कोणाला? आजकाल जिथे तिथे हे असे राक्षस उभे असतात कोणत्या न कोणत्या रूपात.. त्यांना जर घाबरून राहिलो तर त्यांची संख्या वाढतच जाणार.. आपल्या आतल्या दुर्गेला जर जागवले तर घाबरायचीच काय त्यांचा संहार करायची ही शक्ती येते आपल्यामध्ये.. राहिली गोष्ट पियुने फोन करायची.. आपण जसे आपल्या मुलींना अभ्यासासाठी सरस्वतीची उपासना करायला लावतो, संपत्तीसाठी लक्ष्मीची उपासना करायला लावतो तसेच या अशा अन्यायाविरुद्ध मग तो कोणावरही झालेला असो त्यांच्यामध्ये दुर्गेची लढण्याची शक्ती यावी हे मात्र शिकवायला विसरतो.. खरेतर जसे देवीमाता आपल्यावरच नाही तर इतरांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध सुद्धा शस्त्र उगारते तसे आपणही जर उगारले तर कोणीच स्त्रीला अबला म्हणायची हिंमत करणार नाही.. बरोबर ना?


वरील कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे. आजूबाजूला अन्याय होत असताना बर्‍याच वेळा बायका फक्त बघत असतात स्वतःला अबला समजून. मात्र त्या हे विसरतात की जेव्हा देव राक्षसाशी लढू शकत नव्हते तेव्हा देवीच नऊ दिवस नऊ रात्री लढत होती.. त्याच देवीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि आपल्यातल्या दुर्गेला ओळखावे..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर दादर मुंबई