Login

तुच माझी आई

तुच माझी आई


कथेचे नाव: तूच माझी आई

कॅटेगरी : राज्यस्तरीय साहित्य करंडक

सबकॅटेगरी : आणि ती हसली.


सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस प्रीतीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज सुधीर उशिराच घरी येणार होता. अन कीर्ती तिच्या मैत्रिणीकडेच रहाणार होती अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघीना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत प्रीती घरी एकटीच होती. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला. स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

गरमगरम वाफ़ाळत्या कॉफ़ीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली.

\"आता या वेळी कोण आलं असेल बरं?\" मनाशी नवल करतच ती उठली. बघते तर दारात कीर्ती उभी होती.
"काय ग , काय झालं? लवकरच आलीस."

"अग नेत्राच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. म्हणून ती अन तिची आई त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत. मग घरीच आले. बाबाही उशिरा येणार आहेत ना ग?"

"हो ना आणि बरं झालं तू घरीच आलीस ते. अगदी बोअर झाले होते बघ मी." प्रीती म्हणाली.

कीर्ती अगदी गोड हसली. गव्हाळ वर्णाची नि भरपूर उंच आणि सडपातळ बांध्याची लेक अशी गोड हसली की प्रीती अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. "मातृमुखी अन सदा सुखी" असं आई म्हणायची तेव्हा हटकून अशावेळी तिला \"तिची\" आठवण येई.

"आई, आज मस्त कांदाभजी कर ग..! आज वातावरण अगदी मस्त झालंय पाऊस पडल्याने..! आणि बाबांना ही आवडतात खूप."

"अरे लबाड आहेस अगदी, बाबांचं नाव कशाला सांगतेस? तुला हवीत म्हण ना.."

"एकही बात है मदर इंडिया...!"

अन दोघीही अगदी खळखळून हसल्या.

फ्रेश होऊन किर्ती हॉल मध्ये आली आणि टीव्ही लावून सोफ्यावर बसली. तोवर परत पाऊस पडायला सुरुवात झाली होती. प्रीतीनं आधी सुधीरची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्यांचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश्श आवाज पुन्हा घुमला.

" किट्टू..! आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात. बघ बर, दरवाजा उघड." प्रीती किचनमधूनच म्हणाली.

प्रीतीचं वाक्य पूर्ण व्हायच्याआधीच कीर्तीने दार उघडलंही होतं.

पण दारात सुधीर नव्हताच. एक गौरवर्णी,मध्यम वयाची सुडोल बांध्याची पाश्चात्य पेहराव केलेली, डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा नि किंचितसे घारे डोळे... अंगावरचे कपडे थोडे भिजलेले. कदाचित गाडीतून उतरल्या नंतर भिजली असावी.

" येस.? "

प्रीतीनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं.

अन बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश,कष्टानं आल्यासारखे शब्द आले.

"हें हाय..!आय एम युवर मॉम..!"

" मॅम, यू आर मिस्टेकन ऑर यू आर इन द रॉन्ग हाऊस." असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेली कीर्ती एकदम गप्प झाली.

बाहेर आलेल्या प्रीतीचा चेहरा पांढराफ़टक पडला होता.एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती. कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी.

"आई..!"
गोंधळलेली कीर्ती आळीपाळीनं एकदा प्रीतीकडे नि एकदा त्या दरवाज्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघत होती.

"कोण आहे ही बाई ? खुशाल आपली आई आहे म्हणून सांगतेय अन आई तिला बघून इतकी सैरभैर का बरं झालीय?"

तिला काहीच कळत नव्हतं. या द्विधा मनस्थितीतून तिची सुटका त्या बाईनेच केली.

" आय एम सॉरी. मी फ़ोन करायला हवा होता आधी. कल्पना द्यायला हवी होती. प्रीतीला फ़ारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघते मी."

तिने जाताच मागे धाडकन दार लावून घेत कीर्ती वळली . प्रीतीला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं.

" आई , हें काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस का त्या बाईला? ती मला माझी आई आहे असं का सांगत होती..!"

सतरा अठरा वर्षांच्या, अजून तारुण्य अन बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलीच्या स्वरातली धार प्रीतीला असह्य झाली.

" तू थोड शांत बस पाहू. मला एकटीला राहू दे जरावेळ."

सोफ़्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले.सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद, जणूकाही कोणीतरी काढून घेतलय असं तिला वाटत होतं. कीर्तीवर खोलीत निघून गेली अन बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाडधाड उडत होतं तिचं. कोसळणार्‍या पावसाच्या धारांचा आवाज अन मनातलं वादळ या दोन्हींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅच की सरकवल्याचा आवाज आला अन ती उठून बसली.

आज ती पुन्हा एकदा हरली होती, पंख तुटलेल्या पाखरासारखे तडफडत होती. आज मला सगळंच सोडून जायचं होत. वाळवंटात पडलेल्या निवडुंगासारखे एकटीच पडून होती, हे असे अचानकच का घडले.? ह्याचा विचार करण्या व्यतिरिक्त काही पर्यायच नव्हता.

श्वास घ्यायला  जड  जायला लागलं. पाय थरथरत होते. पूर्ण अंगात थरथर, जणू थंडीने कापत आहे, पण घामाघूम देखील झाली होती. मध्ये मध्ये ठसकाही लागत  होता. तिची तब्येत आणखीनच बिघडायला  लागली. डोळ्यांपुढे  अंधाऱ्या यायला  लागल्या. हात पाय अजूनच थरथरायला लागले.अडखळत आणि स्वतःला सावरत तश्याच  हालत  मध्ये प्रीती पार्किंगमध्ये असलेल्या तिच्या गाडी  कडे  जात होती. त्यात तिची पर्स होती आणि त्यात अस्थमा पंप (इनहेलर :- जो अस्थमा अटॅक आल्यावर व्यवस्थित श्वास घ्यायला मदत करतो.) ती गाडी उघडून  पर्स मध्ये पंप शोधते. पण तिला काही तो सापडत  नव्हता. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं होत. हात थरथरत होते . पर्सवर पकड नीट ठेवता येत नव्हती. प्रीतीला आता काहीच सुचेना झालं  होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. स्वतःवरचा ताबा सुटतोय असं जाणवतं होत. एवढं हतबल..!एवढं हतबल तिला या आधी कधीच वाटलं नव्हतं.

तिला सुधीरची आठवण झाली, पटकन तीने कॉल करायला फोन काढते  आणि थरथरणाऱ्या  हातांनी  तो खाली पडून बंद पडला. शीट्ट्...! हा एकच तर सहारा होता.

हात पाय गळाले, डोळ्यापुढे अंधाऱ्या आल्या आणि ती..! ती तशीच  जमिनीवर  कोसळणार...!तर तोच त्यानी तिला ￰￰कमरेला घट्ट पकडलं. आधार..! मजबूत आधार...."त्याचा"

तिचे डोळे आणखी बंदच  होते. श्वास चढलेला, श्वास घ्यायला तिला जमत नव्हतं, जीवाची तडफड होत होती. ती तडफडत होती,जशी पाण्याविना मासोळी..! प्रीती जोरजोरात श्वास घ्यायच्या  प्रयत्नात  होती. कसबस सुधीरने तिला सावरले आणि घरात घेऊन आला. तिचं इन्हेंलर सापडेना म्हणून पटकन ड्रावरमधून बॉक्स काढून त्यातून डेरीफिलीन गोळी दिली आणि पाणी पाजलं.

नक्की काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज सुधीरला आला पण प्रीतीचा काही प्रतिसादच येईन तेव्हा तिच्याभोवती हात घालून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं.

"मला सांगणार नाहीस?"

दुसर्‍याच क्षणी सारा बांध फ़ुटला तिचा.सुधीरच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला.

" किमया...आली होती आज. सुधीर मला खूप भीती वाटतेय रे..!"

एकदम धसकून जात सुधीर मागे झाला. जणू प्रीतीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं.

पण पुढच्याच क्षणी तो शांत, गंभीर झाला.

"काय झालं? काय म्हणाली ती?"

" लगेच निघून गेली . पण किट्टूला भेटली ती.. किट्टू ने दार उघडलं अन ती तिची आई असल्याचंही बोलली तिला.. "

" किट्टू कुठे आहे?"
सुधीर पटकन उठून उभा राहिला.

" तिला आधी सावरायला हवं राणी. ती किती बावरलेली असेल. तू जेवणाची तयारी कर. मी आलो तिला घेऊन."

खरतर सुधीर स्वतःच कोलमडला होता पण आता त्याला गरज होती आपल्या कुटुंबाला सावरायची. पण \"ती\" तिच्यावर ही कधीकाळी जीव ओवाळून टाकायचा पण तिला मात्र उंच उडायचं होत. पण ह्यावेळी त्याला मुलीला सांभाळण जास्त महत्वाचं वाटत होत.

प्रीतीच्या तोंडाची चवच गेली होती. कीर्तीही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा सुधीर मात्र कमालीच्या शांतपणे जेवत होता.

जेवणं उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीच तडतडत होता. प्रीतीला तो नेहेमीपेक्षाही नकोसा वाटत होता.

"बस किट्टू . आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय..."

कीर्तीनं एक तीव्र दृष्टीक्षेप प्रीतीकडे टाकला.

" ती कोण होती ते स्पष्ट सांगा मला आधी.. इज शी रिअली माय मदर?\"
एका दमात, धाप लागल्यासारखा कीर्ती बोलू लागली.

" हो, ती खरंच बोलली. शी इज युवर मदर..! नीट ऐकून घे. मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी..."

" तुम्ही मला हें सगळं आधी का नही सांगितले.!" कीर्ती जवळजवळ किंचाळलीच.

पापभीरू प्रीती मात्र तिच्या अशा ओरडन्याने दचकली आणि अनाहुत पणे थोपवून ठेवलेले अश्रू ओघाळु लागले.

" जरा शांतपणे ऐकून घे मग जे बोलायचं ते बोल. तिची अवस्था बघ काय झालीय. " आता मात्र सुधीरच्या आवाजात जरब होती.

"ह्म्म्म." वडिलांचा चढलेला परत बघून कीर्ती निमूटपणे बंद असलेल्या खिडकीत काळभोर खडखडनारा पाऊस बघू लागली.

" तुझी जन्म देणारी आई, किमया आणि प्रीती दोघी बहिणी..!किमयासोबत माझ देवाब्राम्हणांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली होती. पण मुळातच अभ्यासात हुशार आणि ऍक्टिव्ह असलेली ती, तिला तिचं करिअर घेऊन उंच उडायचं होत आणि हें लग्न तिला मान्य नव्हतं पण वडिलांच्या हट्टपुढे तिचं काही चालायचं नाही. मी तिला लग्नानंतर तशी करिअरची संधी आणि साथ दोन्हीही दिली. तिचे वडील वारले आणि त्यात तुझा जन्म झाला. दोन वर्षांनी कळलं कि तुला ऐकू येत नाही म्हणून तु रिऍक्ट होत नाहीस. मग आणखीनच तिची चिडचिड सुरु झाली. रात्र रात्र घरी उशिरा येई. आणि तु देखील सगळ्या टेस्ट करून ही काहीच रिस्पॉन्ड करत नव्हती.

किमयाला तिच्या ऑफिस मधून परदेशी जाण्याची संधी मिळाली पण मी तुझ्याकडे बघून तिला साथ दिली नाही आणि आई आणि प्रीती देखील तिला विरोध करत होत्या पण कुणाचं काहीही न ऐकता ती निघून गेली. माझ तस ह्या जगात आई आणि प्रीती सोडून कुणीच नव्हतं म्हणून तुला सांभाळण्यासाठी त्या दोघीना आपल्या घरी बोलवून घेतलं. पण किमयाच्या अश्या वागण्याने आई आतून अगदी पोखरली होती. आईने जातेवेळी प्रीतीचा हात माझ्या हाती दिला. "

एकदिवस किमयाची तार आली कि तिने अमेरिकेत लग्न केलंय. माझा संसार तर तसा ही उध्वस्थ झाला होता. पण प्रीती माझी जबाबदारी होती त्यामुळे मी देखील प्रीती साठी स्थळ शोधू लागलो पण आई बापाविना पोर बहिणीच्या घरी ओलीस म्हणून सगळे नकार देऊ लागले. शेवटी माझ्या मित्र मंदारने पुढाकार घेऊन मला प्रीतीसोबत लग्नासाठी सुचवलं आणि ते मला पटल देखील पण प्रीतीची परवानगी पण गरजेची होती. ती तुला भरवत असताना सहज विचारलं, कि कीर्तीला तु गेली तीन वर्षे सांभाळतेय तर तुझं लग्न झाल्यावर तिच्याशिवाय करमेल का..? तिने लगेच तुला मिठीत घेऊन ठरवलं कि मी लग्नच करणार नाही दाजी... माझ्या किट्टूला मी कुणाच्याही भरोशावर असं सोडणार नाही."

त्याक्षणी तिने मिठीत घेतल्यावर तुला जे हसु फुटलं ते बघून आम्ही दोघेही खूप खुश झालो. कारण तु पहिल्यांदा हसली होती आणि तु नॉर्मल होऊ शकते ह्यावर प्रीती मात्र ठाम होती. दुसऱ्याच दिवशी सगळ्या टेस्ट केल्या आणि तुला ऐकू येतंय आणि तु काही दिवसांनी बोलू लागशील असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आम्ही दोघेही खूप आनंदी झालो. आनंदाच्या भरात दोघांनी अनाहुतपणे एकमेकांना मिठी मारली आणि त्या स्पर्शाने माझ्यात थोडं धाडस आलं. त्याच दिवशी घरी आल्यावर प्रीतीला लग्नासाठी विचारलं आधी तिने आढेवेढे घेतले पण तुझ्यासाठी ती तयार झाली. ते ही एका अटीवर कि ती आधी तुझी आई असेल मग माझी बायको आणि आम्ही मुलबाळ होऊ देणार नाहीत. मी देखील मान्य केल. शेवटी माझ्या लेकीला तिची हक्काची आई मिळणार होती. किमयाने इतक्या वर्षात कधीही आमची आठवण केली नाही. आम्ही ही तिच्या सुखी आयुष्यात ढवळा ढवळ न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तु आमचं विश्व झाली. "

हें सगळं ऐकून कीर्ती मात्र काहीही न बोलता मुसमसत तिच्या रूम मध्ये निघून गेली. प्रीती मात्र आता तिचं सर विश्व् हरवल्यागत हरवून गेली. सुधीरही काहीसा त्याच परिस्थितीत होता. कीर्ती आता अठरा पूर्ण असल्याने तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते ह्याची कल्पना होती आणि जर तिने किमयाला निवडले तर... ह्या चिंतेने त्याच्या काळजात चररर होई. पण काहीही झालं तरी तो प्रीतीची साथ सोडणार नाही हें मनोमन ठरवलं होत.

गेला संपूर्ण आठवडा कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. एकदिवस नाश्ता करताना कीर्तीने विचारलं.

" बाबा, मी आईला... म्हणजे त्या किमया मॅडमला भेटायचं आहे."

कीर्तीच्या तोंडून किमयासाठी \"आई\" हा शब्द ऐकून प्रीतीच्या काळजात धस्स्स झालं. सुधीरने प्रीतीच्या हातावर हात ठेवला आणि आधार दिला.

" हो चालेल ना बेटा, तु सांग आपण कधी भेटायचं. " कीर्ती हातातल्या पराठा गोल गोल बोट फिरवत म्हणाली.

" आज सायंकाळी, आणि आपण नाही, मी..!"

" बर, तिच्या हॉटेलचा पत्ता आहे माझ्याकडे देतो तुला. "

" पत्ता नको, मला सोडवा फक्त तिकडे. "

तिचा हॉटेलचा पत्ता सुधीरकडे आहे म्हणल्यावर तो नक्कीच किमयाला भेटला असणार, आणि दोन वेळा कीर्ती आणि सुधीर घरी नसताना किमया तिला घरातून निघून जाण्यासाठी धमकावून देखील गेली होती. पण ह्याची तिने कुठेही वाच्यता केली नव्हती. तिने निमूटपणे सगळी काम उरकती घेतली आणि तिच्या रूममध्ये गेली.

सायंकाळी चार वाजता सुधीर आणि कीर्ती दोघे ही घराबाहेर पडले. सुधीरने कीर्तीला सोडवून तिथेच बागेत मोकळ्या हवेत बसला. कीर्ती आत आली तर एक मोठ्या सोफ्यावर डाव्या पायावर उजवा पाय ठेवून अगदी ऐटीत किमया बसली होती.

" ये बस कीर्ती. काय घेणार तू? "

आई कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. किर्तीच्या मनानं नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमधे गेलो की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवते. अन मग,

" काय किट्टू, कुणाला डेट करतेय कि नाही, कुणी आवडलं असेल तर सांग मी स्वतः तुझं प्रपोजल घेऊन जाईन मुलाकडे, तो पण लक्षात ठेवेल कि मुलीला त्रास झाला तर सासूबाईशी गाठ आहे." असं काहीसं मिष्कील बोलून आधी हसवते बाबाला नि आपल्याला. पण पुढच्याच क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला.

" यांना अजून आपली काहीच तर माहिती नाहीय. मग कसं बरं कळणार त्यांना?"

"अं, नको मला काहीच. नुसत्या गप्पाच मारू या..!"

" अरे असं कसं? थांब मी कॉफ़ी मागवते . मला या वेळी कॉफ़ीशिवाय होत नाही."

खरं म्हणजे कीर्तीला कॉफ़ी अजिबात आवडत नसे. पण आयुष्यात बर्‍याच नावडत्या गोष्टी असतात.

एक सुस्कारा सोडून ती सावरून बसली . कॉफ़ी येईपर्यंत किमया स्वत बद्दल बरंच काही बोलत होती . सवयी, आवडीनिवडी... कीर्तीलाजरासा कंटाळाच यायला लागला होता .

" पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला. आता यापुढे ही \" आई \" देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे."

कॉफ़ी आली, तरीही किमया बोलतच होती. पण किर्तीच लक्ष त्या बोलण्याकडे फ़ारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफ़ीच्या चवीसारखाच,मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळी झाली ती.

"आज, इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही? याआधी कधीच यावसं नाही वाटलं तुम्हाला?"

तिच्या त्या प्रश्नाने दुसर्‍याच क्षणी तिच्या घार्‍या डोळ्यात काहीशी गुर्मीची, काहीशी रागाची छटा उमटली.

" ते खरंच इतकं महत्वाचं आहे का? मी आली, आपली भेट झाली,हे महत्वाचं नाही का?आणि तु मला एकेरी बोल, मी आई आहे तुझी. "

" महत्वाचं कसं नाही? या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. इतकी वर्षं तुम्हाला आपल्याला कोणी मुलगी आहे याची आठवणही झाली नाही. अन अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय... हे सारं इतकं सहज वाटतंय तुम्हाला?"

"किर्ती , मी तुझा राग समजू शकते. पण त्याला.. थॉमसला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. त्याने तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून."

"वचन?"

एक प्रकारचा सुन्नपणा आला होता किर्तीच्या मनाला. "कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती?"

"अन मग आताच इतक्या वर्षांनी का आलात?" कुतुहलानं रागावर विजय मिळवला होता.

" अं..म्हणजे काय आहे की... थॉमसचा नि माझा घटस्फ़ोट झाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी. मुलांचा ताबाही तो तेथील रहिवासी असल्यामुळे त्याच्याकडे गेला. तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की.......!"

" की आपली अजून एक मुलगी आहे, एक संसार आहे जो आपल्या मनात आलं तसा आपण टाकून दिलाय. आता मनात येईल तेव्हा आपण जाऊन भेटू शकतो. तिथं मुलीवर नवऱ्यावर हक्क गाजवू शकतो."

भावनातिरेकानं कीर्तीचा आवाज इतका चढला की तिला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघताहेत ही जाणीव झाली तशी ति पुन्हा खाली बसली.

" आज, आयुष्याच्या मध्यावर, तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होतात तुम्ही इतकी वर्षं? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा..! मी पहिल्यांदा हसली तेव्हा..! मला पहिल्यांदा ऐकू येऊ लागलं तेव्हा..! मी पहिल्यांदा बोलली तेव्हा..! माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी..! मला मांडीवर बसवून घास भरवताना? तेव्हा माझे आईबाबा होते माझ्याजवळ. तुम्ही..! तुमचा काहीही हक्क नाहीय माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला आई मानत नाही. मुळीच नाही."

पालथ्या हाताने डोळ्यात दाटू पाहणारं पाणी पुसत तिरीमिरीतच किर्ती बाहेर येऊन, बघते तर बाबा बाहेरच उभे होते. दोघेही पार्किंग मध्ये येऊन गाडीत बसले. कुणीच बोलत नव्हतं.

मघाशी किती निरभ्र होतं आकाश. नि आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात.

घरी पोचताच, कीर्तीने दारावरची बेल जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. पण दरवाज्याला लॉक बघून ती अजूनच बिथरली. प्रीतीला घरात न बघून सुधीर देखील घाबरला होता.

दोघेही प्रीतीला शोधायला निघाले आणि महादेवाच्या मंदिराजवळच्या गार्डन मध्ये प्रीती तिची बॅग घेऊन बसली होती. जिथे किर्ती लहान असताना प्रीती रोज घेऊन यायची खेळायला.

कीर्तीने धावतं जाऊन प्रीतीला बिलगून हमसून हमसून रडू लागली. तिच्या हातातली बॅग बघून तर अजूनच स्वतःला दोष देऊ लागली. सुधीरचे मात्र हा प्रेम मिलन सोहळा बघून डोळे भरून आले होते.

" किट्टू, बाळा काय झालं...? तु प्लिज रडू नकोस. कुणी काही बोलल का..? बाबा ओरडले का, कि ताई काही बोलली. "

" आई..! तु कुठं चालली मला सोडून..! ती बाई मला किर्ती म्हणाली. मला कॉफ़ी आवडत नाही हें सुद्धा तिला माहिती नाही आणि तु अशा बाईच्या हाती देऊन मला सोडून चालली. तूच फक्त माझी आई आहे..!"

आणि दोघींचं हसत रडत हितगुज सुरु झालं. सुधीरकडे हें बघण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नव्हता. किंबहुना त्या दोघींचा अतुट बंधनाचा त्याला हेवा वाटला.

" अरे चला आता घरी, मी खूप दिवस झाले कांदाभजी खाल्ली नाहीत. "

" आज तुम्ही बनवायची बाबा, मी आणि आई टीव्ही बघत फक्त गरमागरम हदडणार आहोत. "

" हें भगवंता , बघतोय ना, ह्या बायकांच्या मनात नेमक कधी काय चालत काहीच कळतं नाही मला, चला घरी जाऊन कांदाभजीची तयारी करतो." आणि सुधीर आपला घराच्या वाटेने निघाला.

किर्तीने तिच्या नावाप्रमांणेच उजळून निघाली.
प्रीतीची प्रीत नियतीने निभावली. सुधीर नेहमीच धीराने राहिला त्यामुळे आज तिघे ही सुखी होते. मात्र किमयाला तिच्या कर्माची किमया भगवंताने दाखवली होती.

एक झाडामागून मात्र किमया डोकावली आणि मनातच म्हणाली, "मी हें स्वर्गसुखं सोडून निघून गेली नाहीतर आज माझी मुलगी माझ्या मिठीत आणि नवरा मुठीत असता. " डोळ्यांच्या कडा ओल्या असूनही किंचित ओठांच्या कोपऱ्यातुन ती हसली. तिच्या नशिबावर...!


©संध्या भगत
नाशिक टीम.