Login

तूच माझी राधा भाग ३०

लग्न जुळताना निर्माण होणाऱ्या भावना
तूच माझी राधा

भाग ३०

मागील भागात आपण पहिले कि,

" अमोघ, काय रे तूला काय वाटतं तिचं काय मत असेल ?"

" काय माहित, उद्या फिरायला गेल्यावर कळेल. चला आपल्याला मावशी कडे जायचय. आता रात्रीचा विचार करं. मग पुढचं... "

" हो आता असलेला क्षण जगून घेऊ. " असं म्हणून निघाले.

दोघेही मावशीकडे आले . ते येईपर्यंत प्रिया आणि राधा मनमोकळ्या गप्पा मारत होते . आणि मावशी, आई आणि राधाची आई गप्पा मारत स्वयंपाक करत होत्या . रोहन आणि बाबा निवांत बसले होते .

नंदन आल्या आल्या काकांच्या पायापडून त्यांच्या शेजारी बसला . तर इकडे रोहन आणि अमोघ दोघे शेजारी बसून हळू हळू बोलत होते .


" रोहन , बघितलं का काकंवर कसे प्रभाव पाडणं चालू आहे . हा काय तुझ्या बहिणीला सोडत नसतो . " असं म्हटल्यावर दोघेही हसायला लागले . नंदन ने लगेच त्याच्याकडे बघितले .

सगळे नंतर वेगवेगळ्या गोष्टीवर गप्पा मारत होते . मध्ये मध्ये नंदनचं लक्ष सगळ्या घरात फिरत होतं पण त्याला काही राधा दिसत नव्हती . स्वयंपाक झाला म्हणनून आई आणि सगळया जणी बाहेर येऊन बसल्या . सगळे छान एकत्र गप्पा मारत होते तर आतून हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता . हा आवाज ऐकून आईच्या मनात विचार येऊन गेला 'चला घर यामुळे हसायला लागले . पण राधा आणि नंदन तयार होतील का ?"

सगळे जेवायला बसले . गप्पा, जेवण  कमी पण अमोघ , रोहन  आणि प्रिया यांची मस्ती चालू होती. मध्ये मध्ये दोघांना चिडवणं चालूच होता . या चिडवण्याची मज्जा नंदन घेत होता पण राधा ला ते ऐकून जेवणाचं जात नव्हतं . म्हणून ती माझं झालं म्हणत उठून गेली . आई, बाबा तिच्याकडे बघत होते . लगेच मावशी म्हणाली , " अहो ताई , ती अशी का उठून गेली ? जेवलीच नाही काही ?"

" अहो , आम्ही मगाशी थोडं खाल्लं होतं त्यामुळे भूक नसेल बहुतेक . तुम्ही जेवा सगळे . मी बघते तिच्याकडे . "

हे बोलणं चालू होत तोपर्यंत नंदनने प्रिया ला मेसेज केला  तो मेसेज बघून प्रिया म्हणाली , " काकू तुम्ही थांबा  मी जाते . तुम्ही जेवा . "

सगळ्यांचं जेवण झाल्यावर प्रियाचा मेसेज आला तसा तो खीर वाटीत घेऊन त्या झोपाळ्यावर बसल्या होत्या तिकडे आला . त्याची चाहूल लागली तसं प्रिया मी आलेच असं म्हणून तिथून सटकली.

राधा परत आपल्याच विचारात गुंग झाली. नंदनने तिच्यासमोर वाटी केली . तेव्हा ती भानावर आली. तीने एकदा वाटी कडे तर एकदा नंदन कडे बघत होती.

नंदनने तिला डोळ्यांची सांगितले वाटी घे म्हणून तीने पण लगेच ती वाटी घेतली.  नंदन हळूच म्हणाला, " मी इथे बसू शकतो का ? "

तीने मानेने होकार दर्शविला.  काय बोलायच?कसं बोलायच? याचा विचार करत दोघेही शांत बसले होते.

शेवटी वाट बघत नंदन म्हणाला, " तू एवढी शांत का आहेस ? तू अशी नाहीयेस ?तू तुझा मूळ स्वभाव बदलू नको आणि एक मी म्हणतोय म्हणून होकार द्यायची घाई करू नकोस . नीट वेळ घेऊन विचार कर. "

हे ऐकून राधा मूळ रूपात प्रगट झाली अन् म्हणाली, " पण मी होकार च देईन हे कस काय तूम्ही ठरवता. माझ्यावर जबरदस्ती करणार ? माझ्या भावाला सांगून त्याला तुमच्या बाजूने केलं म्हणजे लगेच होकार देईल असं नका समजू. " तिचा अवतार बघून नंदन हसू लागला.

ती लगेच म्हणाली, " हासताय काय ?"

" हसू नाहीतर काय करू? मी कुठं म्हटलं तू  होकारच देणार आहे. मी फक्त मी म्हटलं म्हणून हो देऊ नकोस एवढंच म्हटलं"

राधा थोडी शांत होत म्हणाली, " मग तुम्ही हासलात का ?"

" तू मूळ रूपात आलेली पाहून. "

ह्या दोघांच बोलण चालू होतं  तर झाडाच्या मागे उभे राहून रोहन, अमोघ आणि प्रिया त्यांच्याकडे बघत होते. प्रियाने लगेच एक दोन फोटो काढून घेतले.

" मूळ रूपात म्हणजे ?"

" आज दिवसभर तुला असं  शांत बघवत नव्हतं. हा तुझा स्वभाव नाही . तू कायम तुझा मूळ स्वभावात राहा कारण तो तुला शोभतो पण आणि पुढे तू ज्या क्षेत्रात उतरणार आहे त्याला पण "

" तुम्हाला एक विचारू ?"

" विचार कि . मला तू बोलणंच अपेक्षित आहे . "

" समजा मी तुम्हाला नकार दिला तर .. "

" आपण चांगले मित्र मैत्रीण राहू.  आणि मुळात नवरा बायको व्हायच्या आधी चांगले मित्र मैत्रीण होणार त्यांचाच संसार सुखाचा होता असं आई म्हणते . "

" अच्छा . आई म्हणते . "

" आणि एक उद्या तू फिरायला म्हणून बाहेर पडणारेस तर मोकळ्या मनाने फिर . सगळ्याचा आनंद घे . मी आहे म्हणून कोणतंही दडपण घेऊ नको . "

" हो पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल . "

आता हि मला नको येऊ म्हणते कि काय असा विचार त्याच्या मनात आला . म्हणून  त्याने भीतभीतच विचारले , " काय करावे लागेल ?"

तिने हात पुढे करत म्हणाली , " मित्र ?"

त्याने पण आनंदाने हात पुढे करत म्हणाला, "  मित्र "

तेवढ्यात प्रिया आवाज देत आली , " दादा , ए दादा तुम्हाला आत बोलवलय . "

" हो चला तुम्ही पुढे मी आलोच . "


आता बघूया पुढच्या भागात फिरायला गेल्यावर काय होतंय ? तुम्हाला कशी वाटली ती सांगा .