Login

तुझं माझं ब्रेकअप

प्रेम करणे आणि ते निभावणं यात एकमेकांना मनातले सांगायलाच हवे.
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
लघू कथा
लेखन:- कृतिका कांबळे

तुझं माझं ब्रेकअप 



" खरंच तुझं ठरलं आहे का? म्हणजे, नक्की विचार केलास ना सगळ्या गोष्टींचा?" तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले.

" हो... असं नाही की मी तडफडकी असा अचानक निर्णय घेतला आहे. मी खूप प्रयत्न केला पण... नाही वर्क होत आहे माझ्याकडून. प्लिज नित्या, माझा निर्णय फायनल झाला आहे. कुठलाच प्रश्न न विचारता, इमोशनल ब्लॅकमेल न करता प्लिज मला समजून घे. एवढी तर मी नक्कीच अपेक्षा तुझ्याकडून करू शकतो ना. हा?" त्याने त्याचा निर्णय ऐकवला. 

तो म्हणजे अलक... अलक पटनाईक. एका नामांकित कंपनीमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत असणारा अलक थोडा गोंधळला होता. प्रश्न त्याच्या भविष्याचा होता. काय बरोबर काय चूक यापेक्षा त्याला सध्या त्याची मनस्थिती त्रास देत होती. एकतर कामातली परिस्थिती त्याची बिकट त्यात त्याचे नित्या सोबतचे रिलेशन काही महिन्यापासून फार बिघडले होते. त्या दोघांचे प्रेम गेल्या दोन वर्षात घट्ट होण्याऐवजी हातातून निसटूनच जात होते. आणि त्याला कारणीभूत होते अलकचे नेहमी गोंधळून जाणे, एका मतावर कधीच ठाम न राहणे. त्याला बांधिलकी अशी नको हवी होती. सुरुवातीला प्रेमाचे नवे दिवस अगदी छान जात होते. अर्थात, त्यावेळी एकमेकांना समजून घेणे आणि पहिलाच आयुष्यात आलेला हा गुलाबी अनुभव जगणे हाच उद्देश होता. परंतु, जस जसे दिवस पुढे जाऊ लागले तसं एकमेकांच्या उणिवा देखील जाणवू लागल्या. नित्या तिच्या परीने त्याला सांभाळून घेत होती. असं नाही की त्याचे प्रेम नव्हते नित्यावर. पण ते त्याला दाखवता येत नव्हते. दोघांचा खूप जीव होता एकमेकांवर. होता नाही अजूनही आहे. फक्त हा प्रेमाचा टॅग जो त्यांच्या नात्याला लागला होता तो हल्ली अलकला त्रासदायक वाटत होता. नात्याच्या जबाबदारीमध्ये त्याचा जीव गुदमरू लागला होता.

" नाही अलक. मी कुठलाही प्रश्न विचारणार नाही आता तुला आणि नाही तुला इमोशनल करून या नात्यात अडकवून ठेवणार. तुला हवं ना आपण इथेच थांबावे. तर मग ठीक आहे. आपण इथेच थांबूया. प्रियकर म्हणून नाहीस तर एक मित्र म्हणून तरी जोडीला असशील ना तू माझ्या?" तिच्या या प्रश्नावर तो किंचित हसला.

" नक्कीच... नात्याचे नाव बदलले तरी नात्याच्या भावना त्याच राहणार आहेत नित्या. हा... फक्त थोड्या मर्यादा येतील. बोलताना, वागताना काही करताना भान ठेवावे लागेल इतकंच. परंतु, नेहमी होणाऱ्या वादविवादापेक्षा ते केव्हाही चांगलेच असेल ना. आणि मी आहे सोबत तुझ्या कायम. नेहमीच असेल तुझ्याच अवतीभवती. तुला एक विचारू? नाही म्हणजे. वेगळे होण्याचा निर्णय माझा चुकीचा जरी असला तरी तुला असं नाही ना वाटत की मी घाई केली." अलक आज देखील गोंधळलेला होता.

" हम्म... घाई असं नाही म्हणणार. अशी घाई तर तू मला प्रपोज करताना देखील केलीच होती की. परंतु, जो निर्णय आपण घेतला आहे. तो निभावणे खूप कठीण आहे. एकवेळ प्रेमाची शपथ सोपी असते. परंतु जवळ राहून दूर असणे आणि एकमेकांचा जीव असताना देखील अनोळखी असण्यासारखे वागणे खूप कठीण. पण... आता घेतलाच आहे ना निर्णय तर ठाम राहू त्यावर आपण. जसं इतकी वर्ष प्रेम जपले तसं आता आयुष्यभर मैत्रीचे नातं देखील सांभाळून घेऊ." नित्या त्याला दिलासा देत होती की स्वतःला बळ देत होती तेच कळत नव्हते. परंतु, आज नित्याने देखील मनोमन निर्णय पक्का केला होता. 

" थँक्स... मला याही वेळेला समजून घेण्यासाठी." अलकने तिच्या हातावर हात ठेवला.

" हम्म. चल जाऊ या. उशीर होतोय मला." नित्याने तिची हॅन्डबॅग उचलली.

" हो. चल मी सोडतो तुला." अलकने खिशातून बाईकची चावी काढली.

" अरे नको... मी जाईन ऑटोने. तसं ही तुला देखील उशीर होत असणार ना ऑफिसला जायला. तू जा. मी जाते माझी माझी. ठीक आहे. चल बाय." नित्या पटकन बोलून निघून गेली. अलकला काही बोलायला तिने चान्सच दिला नाही. 

अलक तिला पाठमोरी जाताना पाहत होता.

" सॉरी नित्या. मी नाही तुझ्या लायक. माझ्या एवढ्या छोट्या पगारात आणि दहा बाय दहाच्या खोलीत नाही तुला खुश ठेऊ शकत मी. माहितेय मला, तू सगळं करशील माझ्यासाठी. मी ठेवीन तिथे आणि तशीच राहशील. परंतु, आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ना त्याला असं त्रासात नाही बघता येत. पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा, एकत्र राहण्याच्या निर्णयावर पच्छाताप करण्यापेक्षा आताच थांबलेलं बरं. होईल काही दिवस त्रास परंतु, त्या त्रासापेक्षा हा काहीच नाही. माझ्यापेक्षा चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात हवी." तिला दूर जाताना पाहून त्याला अश्रू अनावर झाले.

नित्या एकदाही मागे वळली नाही. त्याच्या समोर कितीही स्वतःला सावरले जरी असले तिने तरी अखेरीस तिचा भावनावरील ताबा सुटत होता. म्हणूनच तिने पटकन त्याच्या समोरून निघण्याचा निर्णय घेतला. डोळ्यात पाणी काठोकाठ भरले होते. अशा पाणावलेल्या डोळ्यांनी परत जाताना एकदा जरी त्याला पाहिले असते तर तिचा स्वतःवरील ताबा सुटला असता.

" का... का अलक असा निर्णय घेतलास तू? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर ते कसं नाही कळत तुला? किती स्वप्न पाहिली होती मी. तुझ्यासोबत आपला संसार असेल. छोटंसं आपलं घरकुल असेल. छोटंसं आपलं ते घर आपल्या प्रेमाने त्याच गोकुळ केले असते आपण... पण... आता ते फक्त एक स्वप्नच बनून राहील. असो... काही नसण्यापेक्षा काहीतरी हातात असणे महत्वाचे. तुझं प्रेम नसलं तरी तुझी मैत्री आजन्म मी माझ्या सोबत ठेवीन. जरी मनाने तुझी प्रेमिका असली तरी मनाचं नातं कधीच तुझ्या समोर व्यक्त न करता एक मैत्रीण म्हणून तुझ्या सोबतीला कायम राहीन मी."

नित्या मनात बोलत तशीच निघून जाते. अलक देखील निघून जातो.

एकमेकांवर जीवापाड प्रेम असले तरी जोडीदाराच्या सुखासाठी त्याग करणे म्हणजे खरं प्रेम असते. परंतु, प्रत्येक वेळी ते सुख जपताना स्वतःच्या मनातले सांगायचे राहूनच जाते.