Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 37

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं   भाग - 37


अनिकेत हॉस्पिटलची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करत होता.
डिस्चार्जचे कागद, डॉक्टरांच्या सूचना, औषधांची यादी…
सगळं तो शांतपणे करत होता, पण मन मात्र अनघाकडेच अडकलं होतं.

डॉक्टरांनी परत एकदा सांगितलं,
“तिला आता पुरेसा आराम हवा आहे. मानसिक शांतता खूप गरजेची आहे.”

अनिकेतने मान हलवली,
“हो डॉक्टर, सगळं लक्ष देतो.”

तेवढ्यात आरती आणि संजय अनघाजवळ आले.
अनघा त्यांच्या मध्ये उभी होती.
आई-बाबांचा आधार मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसत होती.

आरतीने अनघाचा हात हातात घेत म्हणाल्या,
“चल बाळा, आता घरी जाऊ. तिथे तुला निवांतपणा मिळेल.”

संजय हळूच म्हणाले,
“आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासोबत. काहीच काळजी करू नकोस.”

अनघाने दोघांकडे पाहिलं.
डोळे भरले होते, पण यावेळी ते आनंदाचे होते.

“हो बाबा… आई…”
इतकंच ती म्हणू शकली.

तेवढ्यात अनिकेत सगळे कागद हातात घेऊन तिथे आला.
अनघाकडे पाहून म्हणाला,
“सगळं झालं आहे. तू निवांत घरी जा.”

अनघाने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं.
त्या नजरेत प्रश्नही होता… आणि विश्वासही.

अनघा आई-बाबांसोबत त्यांच्या बरोबर निघाली.
जाताना तिने मागे वळून पाहिलं.

अनिकेत तिथेच उभा होता…
डोळ्यांत काळजी, मनात अपराधभाव आणि
मनाच्या एका कोपऱ्यात एकच संकल्प
तिला पुन्हा कधीही एकटी पडू देणार नाही…


---


अनिकेत अनघाला सोडून घरी आला.

घराचं दार उघडताच त्याला सगळं घर अनोळखी वाटलं.
तोच हॉल… तीच सोफासेट… पण आज सगळं रिकामं.
अनघाचा आवाज नाही, तिची चाहूल नाही.

तो हळूच दार बंद करतो.
चावीचा आवाज घरभर घुमतो…
जसं त्याच्या मनातली शांतता तोडतो.

अनिकेत सोफ्यावर बसतो.
काही क्षण फक्त समोर बघत राहतो.
डोळे उघडे आहेत… पण विचार मात्र खूप दूर गेलेले.

“मी बरोबर केलं का…?”
तो स्वतःशीच पुटपुटतो.

त्याची नजर टेबलावर जाते.
अनघाची पाण्याची बाटली तिथेच ठेवलेली.
तो ती हातात घेतो…
क्षणात आठवणींचा पूर येतो.

“तू नीट पाणी पीत जा ना…”
अनघाचा आवाज कानात घुमतो.

अनिकेतचे डोळे भरून येतात.
तो बाटली हळूच खाली ठेवतो.

उठून बेडरूममध्ये जातो.
बेडचा एक बाजू रिकामी आहे.
तो तिथे बसतो… हातांनी उशी दाबतो.

“मी असं असहाय्य कधीच नव्हतो…”
त्याचा आवाज थरथरतो.

डोळ्यांतून अश्रू ओघळतात.
पहिल्यांदाच तो स्वतःला मोकळं रडू देतो.

“अनघा… मी तुला दुखावलं…
पण माझ्या प्रत्येक श्वासात तूच आहेस…”

तो हळूच डोळे पुसतो.
खिडकीतून बाहेर पाहतो.
बाहेर अंधार पसरलेला…
आतही तसाच.

“तू लवकर बरी हो…
आणि परत ये…
हे घर पुन्हा घर होऊ दे…”

तो दिवा बंद करतो.
अंधारातही त्याच्या डोळ्यांत फक्त अनघाचं अस्तित्व उजळलेलं असतं.


---


अनघाची आठवण मनात गर्दी करू लागली.
तिचा चेहरा, तिचे डोळे… हॉस्पिटलमधली ती असहाय नजर…

त्यांचे डोळे पाणावले.

तेवढ्यात आजोबा हळूच त्याच्या जवळ येऊन बसले.

“अनिकेत…” आजोबा म्हणाले.

अनिकेत काही बोलला नाही.
फक्त खाली मान घातली.

आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं,
“तिला सोडून आलास ना?”

“हो आजोबा…”
आवाज थरथरत होता.

“मन लागलंय तिकडेच, नाही का?” आजोबा म्हणाले.

अनिकेतचे डोळे भरून आले.
“आजोबा… तिला तिथे सोडून येताना… छातीत कळ आली.
माझ्यामुळेच हे सगळं झालं असं वाटतंय.”

आजोबा थोडावेळ शांत राहिले.
मग हळू आवाजात म्हणाले, “आयुष्यात कधी कधी चुकतं आपलं…
पण खरी परीक्षा असते ती त्या चुका सुधारायची.”

अनिकेतने डोळे पुसले.
“मी तिला खूप त्रास दिला आजोबा…
आता ती माझ्यावर विश्वास ठेवेल का?”

आजोबा त्याच्याकडे पाहत म्हणाले,
“जर तुझं मन खरं असेल ना…
तर वेळ लागेल, पण विश्वास परत येतो.”

अनिकेतने दीर्घ श्वास घेतला.
“मी तिच्यासाठी स्ट्रॉंग होईन.
तिला पुन्हा कधीही एकटी वाटू देणार नाही.”

आजोबा हसले… डोळ्यांत अभिमान होता.
“हेच मला ऐकायचं होतं.
आता जा, थोडा आराम कर.
उद्या नव्याने सुरुवात करायची आहे.”

अनिकेत मान हलवून उठला.
आजोबांच्या पायाला हात लावला.

आजोबा म्हणाले,
“देव तुझ्या मनातली ताकद कमी पडू देणार नाही.”

अनिकेत खोलीत गेला…
मन अजूनही जड होतं,
पण आज पहिल्यांदा
त्याला स्वतःला सावरायची दिशा मिळाली होती.

आजोबा तिथून निघून गेले.

त्यांना अनिकेतला असे बघवत नव्हते.

---

मोनिकाने अनिकेतला कॉल केला.

“अनिकेत, मी आणि तृप्ती ताई तुझ्याकडे येतोय. अनघाला सांगून ठेव,” मोनिका म्हणाली.

“अनघा घरी नाही आहे… ती माहेरी गेली आहे,” अनिकेत म्हणाला.

“काय? तू तिला माहेरी कसं जाऊ दिलंस?” मोनिका थोडी चिडून म्हणाली.

अनिकेत शांतपणे म्हणाला,
“मोनिका, तिची तब्येत अजून नीट नाही. हॉस्पिटलमधून सुटल्यावर तिच्या आई-बाबांनी तिला काही दिवस घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिला जास्त आराम मिळेल, माणसं जवळ असतील… म्हणून मी काहीच आडवे गेलो नाही.”

“पण तू एकटाच कसा राहणार?” मोनिकाने काळजीने विचारले.

“ती ठीक व्हावी, हेच महत्त्वाचं आहे. माझा एकटेपणा चालेल,” अनिकेत म्हणाला.

हे ऐकून मोनिका थोडी शांत झाली.
“ठीक आहे अनिकेत… तू खूप समजूतदारपणा दाखवतोयस. आम्ही येतोच, तुझी भेट घ्यायलाच हवी,” मोनिका म्हणाली.

“या… मला बरं वाटेल,” अनिकेत हलक्या आवाजात म्हणाला.


---


मोनिका घरातून बाहेर निघत होती.

“कुठे जात आहेस?” अशोक म्हणाले.

“दादाकडे जात आहे. अनघा माहेरी आली आहे. आम्ही दादाला भेटून येतो,” मोनिका म्हणाली.

“अनघा माहेरी का आली आहे?” अशोक काळजीने म्हणाले.

मग मोनिकाने अशोकला सगळं सविस्तर सांगितलं.

“अरे देवा… अनघासोबत असं झालं म्हणून ती माहेरी गेली. तू अनिकेतला इथे घेऊन ये,” अशोक म्हणाले.

“हो बाबा, घेऊन येते,” मोनिका म्हणाली.

तृप्ती आणी मोनिका अनिकेतकडे जायला निघाल्या.

हे सगळं बोलणं ललिताने ऐकलं होतं.
त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान पसरलं.

“अनिकेत एकटा घरी येणार आहे… तृप्ती पण आहे. दोघांना जोडायला पाहिजे,” ललिता मनात म्हणाल्या.

आता माझ्या मनासारखे होईल, अनघा आणी अनिकेतचे भांडण झाले असणार, म्हणून अनघा निघून गेली असेल. आता मी अनिकेतला अनघा जवळ जाऊ देणार नाही. सख्याला बोलवून घेईल, तृप्ती आणी अनिकेतचे लग्न लावून देईल, ललिता मनात आनंदी होत म्हणाल्या.


---

मोनिका आणी तृप्ती अनिकेतच्या घरी आल्या.

अनिकेत शांत बसला होता.


मोनिका अनिकेतकडे पाहत थोडी थांबली.
अनिकेतचा चेहरा थकलेला, डोळ्यांत काळजी स्पष्ट दिसत होती.

मोनिका म्हणाली..
दादा… बाबांनी तुला घरी बोलावलं आहे.

अनिकेत थोडा आश्चर्याने म्हणाला..
मला? अचानक का?

मोनिका हळू आवाजात म्हणाली..
अनघा माहेरी आली आहे हे कळल्यावर बाबा खूप अस्वस्थ झाले.
ते म्हणाले, “अनिकेत एकटा कसा राहील? त्याला इथे घेऊन या.” तिला तिथून अनघाला पण भेटता येईल,

अनिकेतचा आवाज भरला..
मोनिका… मला वाटलं नव्हतं ते मला बोलावतील.

मोनिका म्हणाली..
दादा, ते तुला आपल्या घरचाच मानतात.
आता या सगळ्या परिस्थितीत तू एकटा राहू नकोस, हेच त्यांना वाटतं. बाबा चांगले आहे. आईचे माहिती नाही

अनिकेत थोडा वेळ गप्प राहिला.
डोळे खाली घातले… खोल श्वास घेतला.

अनिकेत म्हणाला..
ठीक आहे… येतो मी. कदाचित थोडा आधार मिळेल. अनघाला पण तिथून बघता येईल,

मोनिकाने समाधानाने मान हलवली. त्या क्षणी अनिकेतला पहिल्यांदा वाटलं… तो खरंच एकटा नाही.

अनिकेतने बॅग भरली दोघीसोबत घरी गेला.
---


क्रमश


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all