Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 40

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 40


मी अनघाला भेटायला जाऊ का?
तिला बरं वाटेल… ललिताला तर काही घेणं-देणं नाहीच आहे.
मीच जाऊन तिला भेटून येतो.
नारळपाणी, काही फळंही सोबत घेऊन जाईन…
तिला थोडं छान वाटेल. अशोक मनात विचार करत होते.

तेवढ्यात तृप्ती घरातली कामं करत असताना अशोकांच्या जवळ आली.

“मामा, मला अनघाला भेटायचं आहे. आपण तिच्या घरी जाऊया का? इथेच जवळ आहे ना. मला नेमकं ठिकाण माहिती नाही… पण आपण जाऊ. आत्या काही येणार नाही. आलीच तरी तिथे काहीतरी बोलेल,” तृप्ती म्हणाली.

“मीसुद्धा तोच विचार करत होतो. थोड्या वेळाने आपण अनघाच्या घरी जाऊ,”  अशोक म्हणाले.

“हो चालेल. मी आधी काम करून घेते,” तृप्ती म्हणाली.

“हो, चालेल,”  अशोक म्हणाले.

तृप्ती परत तिचं काम करायला निघून गेली.

तृप्तीने घरातली सगळी कामं आवरली.
ललिताने तिला काही कामं सांगायला सुरुवात केली; पण थोड्याच वेळात त्या स्वतःच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या.
तृप्ती तयार होण्यासाठी आत गेली आणि लगेचच बाहेर आली.

“मामा, चला आपण जाऊया. अनघासाठी काही घेऊन जायचं का? फळं… आणि अजून काही,”
तृप्ती म्हणाली.

“हो, घेऊन जाऊया,”
अशोक म्हणाले.

“आत्याला सांगायचं का?” तृप्ती हळूच विचारलं.

“तुझी आत्या येणार आहे का? तिला घरीच राहू दे. आपण जाऊन येऊ,”
अशोक ठामपणे म्हणाले.

तृप्ती काहीच बोलली नाही.

दोघंही अनघाच्या घरी जायला निघाले.
अशोकांनी अनघासाठी फळं आणि अजून बऱ्याच गरजेच्या गोष्टी घेतल्या.

थोड्याच वेळात ते अनघाच्या घरी पोहोचले.
अशोकांनी दरवाजाची घंटा वाजवली.

आरतीने दरवाजा उघडला.
अशोकांना पाहताच त्या थबकल्या. काही क्षण त्यांना काहीच बोलता आलं नाही; त्या फक्त पाहत राहिल्या.

“कोण आलंय?” मधूनच अनघाचा आवाज आला.

तेव्हा आरती भानावर आल्या.
त्यांनी अशोक आणि तृप्तीला आत घेतलं आणि पाणी आणायला किचनमध्ये गेल्या.

तृप्ती लगेच अनघाजवळ गेली. अशोकही तिच्या शेजारी बसले.

“कसं वाटतंय आता?” तृप्तीने विचारलं.

अनघाचे डोळे भरून आले.
अशोक समोर होते म्हणून तिने अश्रूंना आवर घातला.

“असं रडून कसं चालेल, अनघा? तुला स्ट्रॉंग व्हायला हवं. जे झालं, ते आपल्या हातात नव्हतं. आमचंही चुकलं आहे. ललिता तुला सतत काम सांगत होती, आणि तू ते करत होतीस… मी तिला वेळेत बोलायला हवं होतं,” अशोक दुःखी स्वरात म्हणाले.

“मलाही काही समजलं नाही बाबा. एवढं काम मी कधीच केलं नव्हतं. जेवण बनवायची सवय होती, पण दिवसा थोडा वेळसुद्धा आराम मिळत नव्हता,”
अनघा हळू आवाजात म्हणाली.

“आता ते सगळं विचारात घेऊ नकोस. तू नीट आराम कर, मस्त खा. तुझी तब्येत सुधारणं सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे,”
अशोक म्हणाले.

“अनघा, लवकर बरी हो. मला पण फिरायला जायचंय. मोनिकाने सांगितलं, तुम्ही पाणीपुरी खायला गेले होते. मला पण खायची आहे,”
तृप्ती हसत म्हणाली.

अनघाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.

“नक्की जाऊ. आम्ही घरी गेलो की तू पण आमच्यासोबत चल. बाबा, मला जॉब लागला आहे. मी जॉइन करणार होते, पण हे सगळं झालं. आता बरी झाल्यावर लगेच जॉइन करेन. घरी राहून तरी काय करू?”
अनघा म्हणाली.

“हो, नक्की कर. घरी बसून राहू नकोस,”
अशोक म्हणाले.
“अनिकेतने काही खाल्लं होतं का? त्याने घरी काहीच खाल्लं नव्हतं.”

“हो, इथे नाश्ता केला होता. मी त्याला डब्बाही दिला,”
आरती म्हणाल्या.

“बरं झालं,” अशोक म्हणाले.

अनघाने अशोकांकडे पाहिलं आणि हळूच विचारलं,
“बाबा… तुम्ही आलात… आईला याची माहिती नाही आहे ना?”

अशोक थोडा थांबले.
“नाही… तुझ्या सासूबाईंना सांगितलं नाही. तिला सांगून काही फायदा नाही असं वाटलं. तू बरं व्हावीस, एवढंच महत्त्वाचं आहे,”
अशोक शांतपणे म्हणाले.

अनघा काही क्षण गप्प राहिली.
“तुम्ही आलात, हेच माझ्यासाठी खूप आहे बाबा,”
ती डोळे पुसत म्हणाली.

तृप्तीने तिचा हात घट्ट पकडला.
“आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तू एकटी नाही आहेस. आणि पाणीपुरीचा प्लॅन पक्का आहे हं,”
ती हसत म्हणाली.

अनघाच्या ओठांवर हलकीशी हसू उमटले.

आरती पाणी घेऊन आली.
“बसा… काही खा. तुम्ही अचानक आलात, पण मनाला खूप बरं वाटलं,”
त्या भावूक स्वरात म्हणाल्या.

“हे सगळं अनघासाठी आहे. तिला थोडं बळ मिळावं म्हणून आलो,”
अशोक म्हणाले.

“तुम्ही आलात, एवढंच खूप आहे. अनघा आता थोडी सावरतेय,”
आरती म्हणाल्या.

अशोकांनी अनघाकडे पाहिलं.
“बघ, सगळं पुन्हा नीट होईल. वेळ लागेल… पण होईल. स्वतःला दोष देऊ नकोस. आणि हो, अनिकेतला आम्ही समजावू. त्यालाही तुझी खूप काळजी आहे.”

अनघाने मान हलवली.
“मला माहिती आहे बाबा… फक्त सध्या मन खूप थकलं आहे.”

“म्हणूनच आराम कर. बाकीचं आम्ही पाहतो,”
अशोक म्हणाले.

त्या क्षणी अनघाला पहिल्यांदाच थोडं हलकं वाटलं.
दुःख तसंच होतं…
पण आधार जवळ होता.


अशोक आणि तृप्ती काही वेळ अनघाजवळ बसले.
हलकेफुलके बोलून, तिचं मन थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न केला.

“आता आम्ही निघतो. तू काळजी घे. काहीही लागलं तर फोन कर,”
अशोक म्हणाले.

“हो बाबा,”
अनघा हळूच म्हणाली.

तृप्तीने अनघाला घट्ट मिठी मारली.
“लवकर बरी हो. मग आपली पाणीपुरी पक्की,”
ती हसत म्हणाली.

अशोक आणि तृप्ती आरती-संजय यांचा निरोप घेऊन घरी निघून गेले.

घर पुन्हा शांत झालं.

अनघा आपल्या रूममध्ये येऊन पलंगावर बसली.
मनात विचारांची गर्दी होती, घडलेल्या सगळ्या घटनांची, शब्दांची, आठवणींची…

तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.

अनिकेतचा कॉल होता.

अनघाने स्क्रीनकडे पाहिलं.
क्षणभर थांबली… आणि मग कॉल उचलला.


अनिकेत म्हणाला
हॅलो… अनघा… कशी आहेस आता?

अनघा म्हणाली.
हॅलो… मी ठीक आहे… थोडं बरं वाटतंय.

अनिकेत म्हणाला
आवाज ऐकूनच कळतंय… तू थकलेली आहेस.
आज नीट आराम केलास ना?

अनघा म्हणाली
हो… आई लक्ष देतेय.
आणि… आज बाबा आणि तृप्ती मला भेटायला आले होते.

अनिकेत (थोडा थांबून) म्हणाला
बाबा आले होते?

अनघा म्हणाली
हो. खूप वेळ बसले.माझ्याशी शांतपणे बोलले.
म्हणाले, “जे झालं ते आपल्या हातात नव्हतं… आता स्वतःची काळजी घे.”

अनिकेत म्हणाला,
बरं झालं… खरंच बरं झालं.
मला वाटत होतं, त्यांनी यावं… पण मी सांगावं का नाही कळत नव्हतं.

अनघा म्हणाली
ते स्वतःहून आले. आणि तृप्ती… तिने तर मला हसवायचाच प्रयत्न केला. पाणीपुरीची आठवण काढली.

अनिकेत (हळू हसत) म्हणाला,
ती तशीच आहे…
तुझ्या जवळ कोणी तरी आहे, हे ऐकून मला थोडं हलकं वाटलं.

अनघा म्हणाली,
तू कसा आहेस अनिकेत? आज ऑफिसमध्ये लक्ष लागलं का?

अनिकेत म्हणाला
कुठे लक्ष लागतंय… सतत तूच डोळ्यांसमोर असतेस.

अनघा (भावूक होत) म्हणाली
मलाही…
पण थोडा वेळ वेगळं राहणं गरजेचं आहे ना… बरे होण्यासाठी.

अनिकेत म्हणाला
हो… पण लक्षात ठेव, मी तुझ्यापासून दूर नाही…
फक्त थोडं अंतर आहे.

अनघा म्हणाली.
मला माहीत आहे. आणि तुझा हा विश्वासच मला स्ट्रॉंग ठेवतो.

अनिकेत म्हणाला
नीट आराम कर… आणि काहीही वाटलं, तर लगेच फोन कर.
मी आहे.

अनघा म्हणाली
हो…
आणि… थँक यू… मला समजून घेतल्याबद्दल.

अनिकेत म्हणाला
तू माझी अनघा आहेस…
मला वेगळं काही करावंच लागत नाही.


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all