Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 42

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 42



अनिकेतने अनघाला कॉल केला.

हॅलो… अनघा म्हणाली.

हॅलो… कशी आहेस आता? अनिकेत म्हणाला.

बरी आहे. अजून थोडी कमजोरी आहे, पण चालेल. अनघा म्हणाली.

डॉक्टरांनी औषधं वेळेवर घ्यायला सांगितली ना? अनिकेत म्हणाला.

हो. आई लक्ष देते आहे. तू जेवण केलंस का? अनघा म्हणाली

हो, ऑफिसमधून आलो. थोडा थकवा आहे, पण ठीक आहे. अनिकेत म्हणाली

नीट आराम कर. उगाच जास्त ताण घेऊ नकोस. अनघा म्हणाली.

तू सांगतेस ते ऐकतोय… अनिकेत म्हणाला
(थोडा थांबून)
आज बाबा आणि तृप्ती तुला भेटायला आले होते म्हणालीस ना?

हो. बरं वाटलं मला. त्यांनी खूप समजावलं. तृप्ती तर नेहमीसारखीच बोलत होती. अनघा म्हणाली

छान. तुला बरं वाटलं असेल तर मला पण बरं वाटतं. अनिकेत म्हणाला.

तू काळजी करू नकोस. मी हळूहळू बरी होते आहे. अनघा म्हणाली

हो… तू बरी झालीस की मी स्वतः येऊन तुला घेऊन जाईन.
अनिकेत म्हणाली

ठीक आहे. तू स्वतःची काळजी घे. अनघा म्हणाली

तूही. औषधं, खाणं, आराम… सगळं नीट कर. अनिकेत म्हणाला

करते. अनघा म्हणाली.
(हसत)
आता फोन ठेव. तुला थकवा असेल.


हो. उद्या परत कॉल करतो. अनिकेत म्हणाला

चालेल. गुड नाईट. अनघा म्हणाली.

गुड नाईट… अनिकेत म्हणाला

फोन ठेवला,
दोघांच्याही मनात वेगळीच शांतता होती
दुःख होतं…
पण नातं अजून तुटलेलं नव्हतं.


---


अनिकेतने फोन ठेवला.

थोडा वेळ तो तसाच हातात मोबाईल धरून बसून राहिला.

तिचा आवाज…
नेहमीसारखाच होता, पण त्यातली हसू आता कमी झाली होती.

“ती म्हणते बरी आहे… पण खरंच बरी आहे का?”
तो मनातच विचार करत होता.

तिला किती त्रास झाला असेल…
शरीराचा, मनाचा, आणि माझ्यामुळेही…

“माझं बाळ…”
तो विचार मनात येताच छातीत कळ आली.

डोळे आपोआप भरून आले, पण अश्रू खाली येऊ दिले नाहीत.

“मी तिथे असायला हवं होतं.”
“मी तिला थांबवायला हवं होतं… काम, धावपळ, सगळं.”

घराकडे नजर गेली.
तेच घर…
जिथे अनघाला आराम मिळायला हवा होता,
पण तिला फक्त जबाबदाऱ्या मिळाल्या.

आईने एकदाही विचारलं नाही
‘कशी आहेस?’ ‘थकलीस का?’

फक्त काम…
आणि शांत राहण्याची अपेक्षा.

“आता तिला इथे परत आणायचं नाही…
पूर्ण बरी होईपर्यंत नाही.”

त्याने खोल श्वास घेतला.

“मला मजबूत राहायलाच हवं…
अनघासाठी, आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नासाठी.”

मोबाईल बाजूला ठेवला.
डोळे मिटले.

मनात एकच ठाम विचार होता

“मी तिचा आहे…
आणि तिच्यासोबतच राहणार.”


---


अनघाने फोन ठेवला.

मोबाईल तिच्या हातातच होता,
पण नजर एका बिंदूवर स्थिर झाली होती.

अनिकेतचा आवाज ऐकून थोडं बरं वाटलं…
पण फोन ठेवताच पुन्हा एकटेपण दाटून आलं.

“तो किती शांत बोलतोय…
पण त्यालाही तितकंच दुखत असणार.”

तिने हलकेच पोटावर हात ठेवला.

आता तिथे काहीच नव्हतं… पण आठवण मात्र होती.

“आपलं बाळ…”

डोळ्यांत पाणी आलं,
पण आईसमोर रडायचं नाही, असं तिने स्वतःलाच बजावलं.

“माझ्यामुळे त्याचं आयुष्य विस्कळीत झालं का?”
“तो माझ्यामुळे या घरात एकटा पडलाय…”

मनात अपराधीपणाची भावना दाटली.

तिला आठवलं
घरातले दिवस,
सकाळपासून रात्रीपर्यंतची कामं,
थकलेलं शरीर… आणि मन.

“मी तेव्हा थांबायला हवं होतं.”
“मला सांगायला हवं होतं,  मला त्रास होतोय.”

पण ती गप्प राहिली.

कारण तिला वाटलं
“सून आहे… सहन करायलाच हवं.”

खिडकीतून बाहेर पाहिलं.
आकाश मोकळं होतं.

“माझं बाळ इथे नाही…
पण ते कुठेतरी सुरक्षित असेल ना?”

हळूच पोटावर हात ठेवत तिने मनात म्हटलं

“मी तुला जपू शकले नाही…
माफ कर.”

डोळे पुसले.

“आता मला मजबूत व्हायलाच हवं…
स्वतःसाठी, अनिकेतसाठी…
आणि पुन्हा एकदा आई होण्याच्या आशेसाठी.”

हळूच उठली.

मन दुखलेलं होतं…
पण तुटलेलं नव्हतं.


---


तृप्तीने अनिकेतला रडताना पाहिलं होतं…
तो क्षण तिच्या मनावर खोल कोरला गेला.

अनिकेतसारखा शांत, स्वतःत सगळं गिळून टाकणारा माणूस
असा अश्रूंना मोकळं करून देतोय
हे तिला बघवत नव्हतं.

“तो किती तुटला आहे…”
“कोणी तरी त्याच्याशी बोलायला हवं… त्याला आधार द्यायला हवा…”

पण ती स्वतः त्याच्याशी बोलायला जाऊ शकत नव्हती.
नात्याची मर्यादा, घरातलं वातावरण…
सगळं तिला अडवत होतं.

“मी काय करू?”
हा एकच प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला.

शेवटी काहीही न बोलता ती आपल्या रूममध्ये निघून गेली.

मोबाईल हातात घेतला,
विक्रमचे काही मेसेज आलेले दिसले.

क्षणाचाही विचार न करता तिने विक्रमला कॉल केला.

रिंग वाजायच्या आतच कॉल उचलला गेला.

“हॅलो तृप्ती…” विक्रम म्हणाला.

“हॅलो विक्रम,” तृप्तीचा आवाज थरथरत होता.

“काय झालं? तुझा आवाज वेगळाच वाटतोय…
तू रडली आहेस का?” विक्रमने काळजीने विचारलं.

“अनिकेतला खूप त्रास होत आहे…
तो रडत होता…” तृप्ती म्हणाली.

“काय? त्याला काय झालं?
अनघा वहिनी कुठे आहे?
तो घरी का आहे?” विक्रम एकामागोमाग प्रश्न विचारत होता.

तेव्हाच तृप्तीने सगळं सांगितलं…

आत्तापर्यंत अनिकेत अनघाचा विषय त्यांच्या घरात कधीच आला नव्हता.
तृप्ती गप्प राहिली होती.
पण आज अनिकेतला रडताना पाहून
तिच्याकडून ते सहन झालं नाही.

“तू आधी का सांगितलं नाहीस?” विक्रम म्हणाला.
“मी आत्ताच त्याला भेटतो… घरीच येतो.”

“नको,” तृप्ती पटकन म्हणाली.
“आत्या आहे ना… ती नीट काही बोलणार नाही.
तू त्याला बाहेर घेऊन जा.
त्याने नीट जेवणही केलेलं नाही.
थोडं खाऊ घाल… त्याला सध्या फक्त माणूस हवा आहे.”

“ठीक आहे,” विक्रम म्हणाला.
“मी त्याला कॉल करतो.”

“चालेल,” तृप्ती म्हणाली
आणि कॉल कट केला.

विक्रमने लगेच अनिकेतला कॉल केला.

अनिकेतनेही क्षणाचाही विलंब न करता कॉल उचलला.

“हॅलो विक्रम,” अनिकेत म्हणाला.

“हॅलो अनिकेत.” विक्रम म्हणाला.

“आज माझी आठवण कशी काय आली?”
अनिकेत हलकंसं हसत म्हणाला.

“तू स्वतः येत नाहीस म्हणून
आज तुझी आठवण आली,” विक्रम म्हणाला.

“आठवण येते… पण…”
अनिकेत बोलता बोलता थांबला.

विक्रमने पुढे काही विचारलं नाही.
पण शांतपणे म्हणाला

“पाच मिनिटांत येतोय. तू बाहेर ये.”

अनिकेत काही बोलणार तोच कॉल कट झाला.

अनिकेत मोबाईलकडे पाहत राहिला.

“मला विचारलंच नाही… पण तरीही… मला जायचंच आहे.”

तो स्वतःशीच पुटपुटला

“कदाचित आज कोणी तरी
माझं ऐकून घेणार आहे…”

तो उठला
आणि तयार व्हायला गेला.

---

विक्रम गाडी थांबवतो.
अनिकेत आधीच बाहेर उभा असतो.

दोघे एकमेकांकडे पाहतात.
काही क्षण… कुणीच काही बोलत नाही.

विक्रम गाडीचा दरवाजा उघडतो.
“चल,” तो फक्त एवढंच म्हणतो.

अनिकेत गाडीत बसतो.

गाडी पुढे निघते.
रस्त्यावर दिवे लागलेले असतात.
शांतता… पण ती जड असते.

“काय खाणार आहेस?” विक्रम सहज विचारतो.

“काही नको,” अनिकेत म्हणतो.

विक्रम गाडी बाजूला लावतो.
“हेच तू करतोस.
दुखतंय पण म्हणायचं नाही,
भूक आहे पण नको म्हणायचं.”

अनिकेत खिडकीकडे पाहत राहतो.

“अनिकेत…”
विक्रमचा आवाज थोडा मऊ होतो.
“मी तुला ऐकायला आलोय.
सल्ला द्यायला नाही.”

तो एकच वाक्य
अनिकेतच्या बांधलेल्या भावना ढवळून काढतो.

अनिकेत खोल श्वास घेतो.

“मी खूप थकलोय, विक्रम…” तो हळूच म्हणतो.

विक्रम काही बोलत नाही.

“सगळे म्हणतात वेळ सगळं बरे करतो…
पण वेळ जातोय, आणि मी तिथेच अडकलोय.”

त्याचा आवाज भरून येतो.

“अनघा…
ती समोर नाहीये, पण प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे.”

डोळ्यांत पाणी येतं.

“मी रडू नये असं वाटतं.
घरात कोणी बघायला नको असं वाटतं.
पण आज… माझ्याकडून आवरलं गेलं नाही.”

विक्रम गाडी थांबवतो. अनिकेतकडे पाहतो.

“रडणं कमजोरी नाही, अनिकेत.
दुखणं म्हणजे जिवंत असणं आहे.”

अनिकेत हसण्याचा प्रयत्न करतो…
पण अश्रू गालावरून खाली ओघळतात.

“मी ते सगळे विसरू शकत नाही… आणि लोक म्हणतात पुढे बघ.”

विक्रम शांतपणे म्हणतो,
“जखम भरून येते… आठवण नाहीशी होत नाही.”

ते एका छोट्या हॉटेलमध्ये थांबतात.

विक्रम त्याच्यासमोर प्लेट ठेवतो.
“थोडं तरी खा. दुःख उपाशीपोटी जास्त टोचतं.”

अनिकेत हळूच दोन घास घेतो.

“तृप्तीने सांगितलं का तुला?” तो अचानक विचारतो.

विक्रम मान हलवतो “ती काळजीने फोन केला होता.”

अनिकेत खाली पाहतो.

“तिला अडचणीत टाकलं मी…”

“नाही,” विक्रम म्हणतो.
“तिला फक्त माणूस दिसला होता.
नात्यापलीकडचा.”

अनिकेत डोळे मिटतो.

किमान कोणी तरी मला समजून घेतंय…
हा विचारच त्याला थोडासा हलका करतो.

विक्रम खांद्यावर हात ठेवतो.
“तू एकटा नाहीस.”

त्या वाक्यात
अनिकेतला आजचा श्वास मिळतो.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all