Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 44

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं भाग -  44



अनिकेत आजही सकाळी लवकरच घरातून निघून गेला.
नेहमीसारखाच… आधी अनघाला भेटायला,
आणि मग नंतर ऑफिसला निघून गेला.

असेच दोन–तीन दिवस झाले होते.

दररोज अनिकेत अनघाला भेटत होता.
घरी फारसा थांबत नव्हता. येत होता…
आणि निघून जात होता.

हे सगळं ललिता लक्ष ठेवून पाहत होत्या.
आणि त्यांच्या मनातला राग दिवसेंदिवस वाढत चालला होता.

अशोक खुर्चीत शांत बसले होते.

ललिता बोलू लागल्या

“तुम्ही अनिकेतशी कधी बोलणार आहात?
किती दिवस असं चालणार आहे? तो कोणाशी काहीच बोलत नाही. फक्त येतो आणि जातो. काही खातही नाही.”

अशोकांनी शांतपणे विचारलं
“त्याने काय करावं असं तुला वाटतं?”

ललिता लगेच म्हणाल्या
“तृप्ती इथे आहे… आणि अनिकेतही इथेच राहतो.
हे सगळं दिसत नाही का तुम्हाला?”

अशोकांचा सूर थोडा कठोर झाला
“अनिकेत का दुसरं लग्न करेल? त्याचं लग्न झालं आहे.
आणि तृप्तीच्या मनात काय आहे, हे तुला माहिती आहे का?”

ललिता थोड्या चिडून म्हणाल्या
“तृप्ती तर शब्दाबाहेर नाही. अनिकेतला आपण समजावून सांगू.”

अशोक ठामपणे म्हणाले
“माझ्याकडून हे होणार नाही. तुला जे करायचं आहे,
ते तू कर.”

“तुम्ही काहीच करत नाही,” ललिता रागाने म्हणाल्या.
“असं राहिलं तर अनिकेत कायम आपल्या हातातून जाईल, तो पूर्ण अनघाचा होईल”

अशोक काहीच बोलले नाहीत. ते शांतच बसून राहिले.

पण त्यांच्या मनात एकच विचार चालू होता

हे सगळं चुकीच्या दिशेने चाललं आहे… आणि ललिताला ते अजूनही समजत नाही.


---


ललिता शांत बसल्या होत्या… पण तो शांतपणा फक्त वरवरचा होता.

मनात मात्र विचारांचा वणवा पेटलेला होता.

“अशोक काहीच करत नाही… अनिकेत माझं ऐकत नाही…
तो रोज त्या अनघाकडे जातोय… माझ्या घराकडे पाठ फिरवून!”
.ललितांचे डोळे रागाने लाल झाले.

“ही अनघा परत या घरात आली, तर माझं काहीच चालणार नाही. ती पुन्हा आजारी पडली, तर सगळे दोष माझ्यावर येतील.”

थोडा वेळ त्या गप्प राहिल्या…
आणि मग मनात अजूनच विषारी विचार उगवले.

“तृप्ती शांत आहे… सगळं ऐकते, सगळं सहन करते…
अनिकेतसमोर जाते, चहा देते…
त्याला समजून घेते…”

ललितांच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली.

“तिला थोडं पुढे केलं, तर अनिकेतचं लक्ष बदलू शकतं.”

मग लगेच दुसरा विचार
“अनघा आई होऊ शकली नाही तर… हेच तर खरं कारण आहे.
लोक काय म्हणतील? वंश कसा चालेल?”

त्यांनी मनातच स्वतःला समजावलं

“मी वाईट नाहीये… मी फक्त माझ्या मुलाचं भलं पाहते.”

पण आत कुठेतरी एक आवाज कुजबुजत होता

“हे भलं नाही… हा स्वार्थ आहे.”
तो आवाज त्यांनी लगेच दाबून टाकला.

“अनिकेतला थोडं दूर ठेवायचं… अनघाशी त्याचं नातं सैल करायचं…आणि वेळ आली की, योग्य निर्णय घ्यायचा.”

ललिता खुर्चीतून उठल्या.

मनात ठाम निर्णय झाला होता

“आता सगळं माझ्या हातात नसेल, तर मी ते माझ्या हातात आणणारच.”


---

आजोबा अनघाला भेटायला आले होते.

आजोबा हळूहळू अनघाच्या घराच्या पायऱ्या चढत होते.
वयाचा थकवा पायात होता, पण मनात फक्त एकच ओढ होती  अनघा.

दार उघडलं गेलं…

आजोबांना पाहताच अनघा क्षणभर थांबली.
डोळ्यांत पाणी तरळलं.

“आजोबा…”
एवढंच शब्द बाहेर पडला.

आजोबा पुढे आले, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

“कशी आहेस माझ्या बाळा?” आजोबा हळू आवाजात म्हणाले.

अनघा काही बोलू शकली नाही.
फक्त मान हलवली.

आजोबा सोफ्यावर बसले.
अनघा त्यांच्या समोर येऊन बसली.

“अनघा… दुःख सांगायचं नसतं का मोठ्यांना?”
“आपण एकटे नाही आहोत हे लक्षात ठेवायचं,” आजोबा म्हणाले.

“मी मजबूत आहे आजोबा…”
“पण कधी कधी आतून खूप थकते,” अनघा म्हणाली.

आजोबांचे डोळे भरून आले.

“थकणं वाईट नाही बाळा,” “पण हार मानणं वाईट आहे.”
“आणि तू हार मानणारी नाहीस,” आजोबा म्हणाले.

अनघाने नजर खाली घातली.

“अनिकेत रोज येतो…”
“त्याच्या डोळ्यांत वेदना दिसतात,” अनघा म्हणाली.

“तो माझा नातू आहे,” “त्याचं प्रेम खरं आहे,”
“पण त्याला पण मजबूत राहायला तूच हवीस,” आजोबा म्हणाले.

ते थोडा वेळ गप्प राहिले…
मग म्हणाले

“ही वेळ जाईल अनघा.”
“देवाने घेतलं, पण देणं थांबवलं नाही.” “तुझं आयुष्य इथे संपत नाही.”

अनघा आजोबांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली.

त्या क्षणी तिला पहिल्यांदाच
मनापासून आधार मिळाल्यासारखं वाटलं.

“आजोबा…”
“तुम्ही आलात, म्हणून मला खूप बरं वाटलं,” अनघा हळूच म्हणाली.

आजोबा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले

“मी कायम तुझ्या पाठीशी आहे.” “हे घर, हे नातं… कधीच तुटणार नाही.”

अनघाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले… पण आज ते अश्रू वेदनेचे नव्हते ते आधाराचे होते.


---


आजोबा थोडावेळ अजून बसले. अनघाशी साध्या गप्पा मारल्या. कधी जुन्या आठवणी, कधी अनिकेतची लहानपणाची खोड… अनघाच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.

“मी निघतो बाळा,” आजोबा म्हणाले.

अनघा उठली. त्यांच्या पाया पडली.

“आशीर्वाद दे आजोबा,” ती म्हणाली.

आजोबांनी दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले.

“खूप मजबूत होशील तू,” “आणि एक दिवस हे सगळं मागे वळून पाहशील,” “तेव्हा अभिमान वाटेल,” आजोबा म्हणाले.

दार बंद झालं… घरात पुन्हा शांतता पसरली.

अनघा काही क्षण तिथेच उभी राहिली.

मनात आजोबांचे शब्द घुमत होते

‘थकणं वाईट नाही, हार मानणं वाईट आहे…’

ती हळूच खोलीत गेली. खिडकीतून बाहेर पाहिलं.

सूर्य मावळत होता… पण आकाशात अजून उजेड होता.

“माझं आयुष्य इथे थांबणार नाही,” “मी फक्त जखमी आहे… संपलेली नाही,” अनघा मनात म्हणाली.

तिने आरशात स्वतःकडे पाहिलं.

डोळ्यांत वेदना होत्या…
पण त्यामागे एक नवी ठिणगी दिसत होती.

“मी स्वतःसाठी उभी राहीन,” “अनिकेतसाठी नाही, समाजासाठी नाही माझ्यासाठी,” ती ठामपणे म्हणाली.

तिने फोन उचलला. डॉक्टरांचा नंबर शोधला.

फॉलो-अप अपॉइंटमेंट, डाएट, विश्रांती

एकेक गोष्ट स्वतःच लिहून काढली.

“आज रडले,” “पण उद्या स्वतःला सावरून उभी राहीन,”
अनघा मनात म्हणाली.

किचनमध्ये गेली. आईला हाक मारली.

“आई… आज मी तुला मदत करणार आहे,” ती म्हणाली.

आरती क्षणभर थांबल्या… आणि हसल्या.

त्या हसण्यात आशा होती.

त्या रात्री अनघा लवकर झोपली.
डोळ्यांत अजून ओल होती…
पण मनात एक नवा निर्धार जन्माला आला होता.

आजोबा निघून गेले होते…
पण त्यांच्या शब्दांनी अनघाला पुन्हा उभं केलं होतं.


---


अनघा आणि अनिकेत कॉलवर बोलत होते.

अनघा म्हणाली:
अनिकेत, मला आता घरी जायचं आहे. आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊया. डॉक्टर काय म्हणतात ते स्वतः ऐकून घ्यायचं आहे.
ती क्षणभर थांबली.

आजोबांनी पण ऐकते पडले आहेत. ते सारखे माझी चौकशी करतायत. माझ्यामुळे त्यांना पण त्रास होत आहे असं मला वाटतं

अनिकेत थोडा काळ शांत राहिला.

अनिकेत म्हणाला:
अनघा, आजोबा काळजीपोटी विचारतायत. त्यांचं मन मोठं आहे… आणी तू घरी यायचं म्हणतेयस, हे ऐकून त्यांना खूप बरं वाटेल.

अनघा हळू आवाजात म्हणाली:
मी तयार आहे अनिकेत. आता पळायचं नाही, घाबरायचं नाही.
डॉक्टर जे सांगतील ते ऐकू. आणि जे होईल… ते आपण दोघं मिळून पाहू.

अनिकेतचा आवाज भरला.

अनिकेत म्हणाला:
मी तुझ्यासोबत आहे अनघा. हॉस्पिटलला आपण दोघं जाऊ. आणि घरी येऊ… पण फक्त तुझी तब्येत ठीक असल्यावरच.

अनघा म्हणाली:
मला तुझा आधार हवा होता… आज तो मिळाला.

कॉल ठेवताना दोघांच्याही मनात एकच भावना होती
दुखं संपलेली नव्हती, पण एकमेकांचा विश्वास परत मिळू लागला होता.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all