Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 45

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 45



दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत आणि अनघा हॉस्पिटलमध्ये जायला निघाले.

अनघा शांत होती…
चेहऱ्यावर भीती नव्हती, पण मनात हजार प्रश्न होते.
अनिकेत तिच्या शेजारी चालत होता. तिचा हात घट्ट पकडून.

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अनिकेतने सगळी चौकशी केली.
रजिस्ट्रेशन, फाइल, नंबर… सगळं तोच करत होता.

अनघा खुर्चीवर बसली होती.
तिची नजर समोर होती, पण मन मागे गेलेलं.

अनिकेत म्हणाला:
घाबरू नकोस अनघा. आपण इथे उत्तर घ्यायला आलोय…
आणि ते मिळाल्यावर पुढचा मार्ग ठरवू.

थोड्यावेळाने त्यांचा नंबर लागला.

डॉक्टरांनी अनघाची तपासणी केली. सगळे रिपोर्ट्स पाहिले.
अनघा शांतपणे सगळं ऐकत होती.

डॉक्टर म्हणाले तुम्ही शारीरिकदृष्ट्या आता बऱ्यापैकी ठीक आहात. पण मानसिक धक्का अजून गेलेला नाही.
थोडा वेळ स्वतःसाठी द्या.
ताण टाळा… काम नाही, जड काम तर अजिबात नाही.

अनघाने मान हलवली.

डॉक्टर पुढे म्हणाले
पुढचे काही महिने काळजी घ्या.
सगळं पुन्हा नॉर्मल होईल.
घाई नको.

डॉक्टरांचा आवाज शांत होता, पण ठाम.

हॉस्पिटलमधून बाहेर येताना
अनघाच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं.

अनघा म्हणाली
अनिकेत…
डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मला थोडं बळ मिळालं.

अनिकेत हसत म्हणाला: मग आता आपण पुढे बघायचं.
मागे नाही.

अनघाने पहिल्यांदाच मनापासून त्याच्याकडे पाहिलं.
डोळ्यांत पाणी होतं…
पण त्या पाण्यामागे आशा होती.


---

हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दोघेही थोडेसे शांत होते…
डॉक्टरांचे शब्द कानात घुमत होते, पण त्यात भीतीपेक्षा आशेचा सूर अधिक होता.

अनघा हळूच पायऱ्या उतरली. हातातली फाईल घट्ट पकडलेली… डोळ्यांत विचारांची गर्दी, पण ओठांवर हलकेसं समाधान होते.

अनिकेतने गाडीचा दरवाजा उघडला.
“बस…” म्हणत त्याने नजर तिच्यावर स्थिरावली.
त्या नजरेत काळजी होती, पण विश्वासही होता.

गाडी सुरू झाली.
काही क्षण शांतता.

रस्त्याच्या कडेला झाडं मागे सरकत होती…
जसं आयुष्यातले कठीण दिवस हळूहळू मागे पडत आहेत, तसं.

अनघाने खिडकीबाहेर पाहिलं.
मनात विचार आला
सगळं लगेच ठीक होणार नाही, पण आपण एकटे नाही आहोत…

अनिकेतने हलकेच विचारलं,
“काय विचार करतेस?”

ती हसली, अगदी शांत हसू…
“घरी जायचंय… आज पहिल्यांदा घरी जायचं वाटतंय, भीती न वाटता.”

अनिकेतच्या मनात कुठेतरी हलकं झालं.
त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला…
जणू हा क्षण जपायचा होता.

घर जवळ येत होतं.
आणि त्या घरासोबत एक नवीन सुरुवात…
ज्यात काळजी होती, पण त्याहून जास्त साथ होती.


गाडी हळूहळू पुढे सरकत होती…
संध्याकाळची थंड हवा खिडकीतून आत येत होती.

अनघा थोडा वेळ शांत होती.
मग अचानक तिने मनाशी ठरवलेलं बोलून टाकलं

“आपण उद्या आपल्या घरी जाऊया…
पंधरा–वीस दिवसांनी मी जॉब जॉईन करेन.”

अनिकेतने तिच्याकडे पाहिलं.
त्या शब्दांत घाई नव्हती, हट्ट नव्हता…
फक्त ठामपणा होता.

तो क्षणभर थांबला,
मग अगदी सहज, पण मनापासून म्हणाला

“तुला मनापासून करायचाय ना?
मग कर.” अनिकेत म्हणाला.

त्या दोन शब्दांत परवानगी नव्हती…
पाठिंबा होता.

अनघाच्या डोळ्यांत हलकीशी चमक आली.
तिला जाणवलं
हा विश्वासच तर सगळ्यात मोठी ताकद आहे.

गाडी पुढे जात राहिली…


अनघा आणि अनिकेत घरी आले.
आईने दोघांनाही बसायला सांगितलं. चेहऱ्यावर प्रश्नांची रांग होती.

“काय गं अनघा… सगळं नीट आहे ना?
डॉक्टर काय म्हणाले?
तुला आता बरं वाटतंय ना?” आरतीने काळजीने विचारलं.

अनघाने शांतपणे आईकडे पाहिलं आणि
आजवर मनात साठवलेलं सगळं हळूहळू सांगितलं
हॉस्पिटल, डॉक्टर,… सगळं. सांगितले.

थोड्या वेळानंतर ती म्हणाली,
“आई… आता सगळं चांगलं आहे.
उद्या मी माझ्या घरी जायचं ठरवलं आहे.”

आरती चकित झाली.

“अजून थांबली असतीस गं.
तू अजून पूर्ण बरी झाली नाहीस. थोडे दिवस तरी इथेच राहा,”
आरतीच्या आवाजात मायेची ओल होती.

अनघा हळूच हसली.

“आई, खूप आराम केला मी.
इथे असो किंवा तिथे,
घरी तरी काही काम नसतं.
पण आजोबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ना…
ती मला निभवायची आहे.
मन लावून, पूर्ण ताकदीने काम करायचं आहे.”

त्या शब्दांत आत्मविश्वास होता.
पूर्वीसारखी घाबरलेली अनघा नव्हती ती.

आरती काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली.
तोंड उघडलं… पण शब्द बाहेर आलेच नाहीत.
डोळ्यांत काळजी होती, पण त्यापेक्षा जास्त अभिमान.

थोड्यावेळाने अनिकेत उठला.

“मी निघतो आई,” तो शांतपणे म्हणाला.

आरतीने फक्त मान हलवली.

अनिकेत निघून गेला… आणि अनघा खोलीत उभी राहून
स्वतःलाच मनात म्हणाली

आता मागे वळायचं नाही.
जे आहे, ते ठामपणे सामोरं जायचं आहे.

अनिकेत घरी पोहोचला.
घरात शांतता होती… बाहेर कोणीच नव्हतं.
तो सरळ आपल्या रूममध्ये गेला. थोडावेळ पलंगावर बसून राहिला मनात अनेक विचारांची गर्दी होती.

थोड्या वेळाने तो उठला आणि बॅग उघडून सामान भरायला लागला.

तेवढ्यात ललिता दारात उभ्या राहिल्या. त्यांची नजर थेट बॅगेवर गेली.

“अनिकेत… बॅग का भरतोयस?”
आवाज थंड होता, पण आत दडलेला ताण स्पष्ट जाणवत होता.

अनिकेत न थांबता म्हणाला, “उद्या मी माझ्या घरी जात आहे.”

“एकटा तिथे काय करशील?” ललितांनी लगेच प्रश्न टाकला.

अनिकेत थोडा थांबला,
मग ठामपणे म्हणाला,
“अनघाला घेऊन जाणार आहे.”

“ती बरी झाली आहे,” तो पुढे म्हणाला, जणू निर्णयावर शिक्कामोर्तब करत होत्या.

ललिता काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या.
चेहऱ्यावर राग, निराशा, असहाय्यता
सगळं एकाच वेळी उमटलं.

पण एकही शब्द न बोलता
त्या वळल्या…
आणि रागाच्या भरात आपल्या रूममध्ये निघून गेल्या.

अनिकेत मात्र शांत होता.
बॅग भरत राहिला, या वेळी त्याच्या मनात गोंधळ नव्हता,
फक्त एक ठाम निर्णय होता.

ललिता रागाच्या भरात म्हणाल्या,
“आता अनिकेत घरी निघून जाईल.”

अशोक शांतपणे विचारले, “तुला त्याने तसं बोलून दाखवलं का?”

“हो,” ललिता चिडून म्हणाल्या,
“मला त्याचं लग्न तृप्तीसोबतच करायचं आहे.”

तेवढ्यात दाराशी उभा असलेला अनिकेत हे सगळं ऐकत होता.
तो पुढे आला… आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते.

“आई… तू काय बोलत आहेस?”
अनिकेत म्हणाला.

ललिता क्षणभर गप्प झाल्या. अशोकने मान खाली घातली.

“माझं लग्न झालं आहे,” अनिकेत पुढे म्हणाला,
“अनघा माझी बायको आहे. ती आजारी असताना मी तिला का सोडू?”

ललितांचा राग आता उघडपणे समोर आला.
“तीच सगळी अडचण आहे,” त्या म्हणाल्या,
“घरात शांतता उरली नाही तिच्यामुळे!”

अनिकेतचा आवाज कठोर झाला.
“घरात शांतता नसली,
तर त्याला जबाबदार मी आणि माझी पत्नी नाही
तर आमचं दुःख न समजून घेणारी मानसिकता आहे.”

अशोकने मध्येच म्हटलं, “बस… दोघंही शांत व्हा.”

पण अनिकेत थांबला नाही.
“आई, तृप्ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे.
तिच्या नावाचा सुद्धा विचार माझ्या आयुष्यात कधीच नव्हता.”

ललिता काहीच बोलू शकल्या नाहीत.
त्या परत वळल्या,
डोळ्यांत राग आणि अपमान दाटलेला.

अनिकेत मात्र निर्णयात ठाम होता.
तो जाणार होता… पण पळून नाही
तर आपल्या बायकोला, आपल्या नात्याला आणि स्वतःच्या जबाबदारीला न्याय द्यायला.

अनिकेत जोरात बोलत होता.
त्याचा आवाज घरभर घुमत होता.

“अनघा माझी बायको आहे… आणि तीच माझं कुटुंब आहे!”

हे शब्द तृप्तीच्या कानावर पडले.
ती तिथेच थबकली.
मनात कुठेतरी चटका बसला… रागाचा नाही, तर अस्वस्थतेचा.

हे इतकं वाढत चाललं आहे…
आता गप्प बसणं योग्य नाही,
तृप्ती मनात म्हणाली.

तिला अनिकेतबद्दल वेगळं काही वाटत नव्हतं,
पण घरात पेटलेली आग तिला स्पष्ट दिसत होती.
ललिताच्या नजरेतला कट, अनिकेतची घुसमट,
आणि अनघाचं नाजूक अस्तित्व, हे सगळं तिला अस्वस्थ करत होतं.

आता विक्रमला सांगायलाच हवं… उद्या नाही, नंतर नाही… आत्ताच, तृप्तीने ठाम विचार केला.

तिने फोन हातात घेतला.
नंबर डायल करताना हात थोडा थरथरत होता,
पण मन मात्र ठाम होतं.

जर वेळेत पाऊल उचललं नाही,
तर हे सगळं अजून बिघडेल…

तृप्तीला हे चांगलंच जाणवत होतं
आणि यावेळी ती गप्प बसणार नव्हती.



क्रमश
तृप्ती आणी विक्रमसोबत  बोलणे  काय  होईल? अनघा आणी अनिकेत  त्यांच्या घरी   निघून  जाईल,  पुढे काय  होईल? ....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all