Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 55

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 55


अनिकेत, मामा, अशोक, आजोबा…
सगळे मिळून विक्रमच्या घरी पोहोचले.

घर साधं, नीटनेटके…
दारातच विक्रमची आई हसतमुखाने उभ्या होत्या.

“या या… या सगळे,” त्या आपुलकीने म्हणाल्या.

अनिकेत पुढे झाला.
“नमस्कार मावशी,” तो आदराने म्हणाला.

मामा आणि अशोकांनीही नमस्कार केला.
आजोबांनी तर नेहमीसारखं हसून आशीर्वाद दिला.

विक्रम आतून बाहेर आला. थोडा संकोच, पण चेहऱ्यावर समाधान होतं.

सगळे सोफ्यावर बसले.
पाणी, चहा आला… क्षणभर औपचारिक शांतता पसरली.

ती शांतता अनिकेतनेच तोडली.

“काल थोडा गोंधळ होता मावशी…
आज नीट बसून सगळं बोलावं म्हणून आलोय,”
तो सरळपणे म्हणाला.

विक्रमची आई मान डोलावून म्हणाल्या,
“हो बाळा, काल खरंच सगळं घाईघाईत झालं.”

मामा थोडे पुढे झुकले.
“आम्हालाही तुम्हाला भेटायचंच होतं.
तृप्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे…”

“आमच्याही दृष्टीने तोच आहे,”
विक्रमची आई शांतपणे म्हणाल्या.

आजोबांनी हलकं हसत म्हटलं,
“मग नीट बोलू या…
जिथे मन जुळतं, तिथे नातं टिकतं.”

विक्रम शांतपणे सगळं ऐकत होता.
त्याची नजर जमिनीवर होती,
पण मन मात्र पुढच्या आयुष्याकडे वळलेलं.

चहाचा घोट घेतbअनिकेत म्हणाला

“मग लग्न कसं, कुठे… हे सगळं आज ठरवू या.”

वातावरण आता निवळलं होतं. कालचा गोंधळ मागे पडत होता… आणि नव्या नात्याची चर्चा हळूहळू आकार घेत होती.


---

मामा थोडा वेळ शांत बसले. जणू काही ठरवत होते…
मग हळूच बोलायला लागले

“एक गोष्ट आहे माझ्या मनात…”

सगळ्यांची नजर त्यांच्याकडे वळली.

“तृप्तीच्या आईचं एक स्वप्न होतं,”
मामांचा आवाज जड झाला.
“आपल्या अंगणात… आपल्या घरच्या मातीवर
तिच्या मुलीचं लग्न झालं पाहिजे.”

क्षणभर शांतता पसरली.

“म्हणूनच,” मामा पुढे म्हणाले,
“लग्न गावालाच करायचं आहे.
मोठा थाट नको…
पण आपल्या लोकांत, आपल्या घरात.”

विक्रमची आई क्षणभर विचारात पडल्या.
मग हलकेच हसल्या

“हे ऐकून बरं वाटलं. अंगणातलं लग्न…
आजकाल फार कमी पाहायला मिळतं.”

अशोकांनी मान डोलावली.
“परंपरा जपली पाहिजे. आम्हालाही हरकत नाही.”

आजोबांनी तर लगेच आशीर्वाद दिला
“घरच्या अंगणात झालेलं लग्न सुखी संसाराचं लक्षण असतं.”

अनिकेत आनंदाने म्हणाला,
“मग ठरलं तर. लग्न गावाला.”

विक्रमने पहिल्यांदाच स्पष्टपणे मान हलवली.
“मला चालेल. तृप्ती जिथे खुश, तिथे मी खुश.”

विक्रमची आई पुढे म्हणाल्या
“शॉपिंग, कपडे, दागिने… हे सगळं आपण मिळून ठरवू.
मुलीच्या बाजूला कमी पडू देणार नाही.”

मामांच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
“तिच्या आईचं स्वप्न… आज पूर्ण होतंय,”
ते हळूच म्हणाले.

घरात पुन्हा एकदा
शांत, समाधानाचं वातावरण पसरलं.
तृप्तीच्या आयुष्याचा नवा अध्याय
आता ठरून गेला होता.


---

मामा थोडे संकोचतच म्हणाले
“खरेदीचं आपण ठरवायचं का? उद्या करून घेणार का?”

सगळे त्यांच्या कडे पाहू लागले.

“मी थोड्या दिवसांनी पुन्हा येईन,”
मामा पुढे म्हणाले.
“शेती आहे… गुरं-ढोरं आहेत.
त्यांना चारा-पाणी द्यावं लागतं.
जास्त दिवस कोणी सगळं नीट बघत नाही.
म्हणून मला निघावं लागेल,
म्हणून विचारलं.”

त्यांच्या बोलण्यात जबाबदारी होती,
ओढ होती…
पण लेकीची काळजी त्याहून जास्त.

विक्रमची आई क्षणभर शांत राहिल्या.
मग ठामपणे म्हणाल्या

“एक दिवस थांबा.”

सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.

“उद्या आपण शॉपिंग करून घेऊ.
लग्नाच्या खरेदीत
वडील उपस्थित असायलाच हवेत.”

मामांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान पसरलं.

“बाकी थोडीफार काही राहिली,”
विक्रमची आई हसत म्हणाल्या,
“तर मुलं बघून घेतील.
त्यासाठी काळजी करू नका.”

अशोकांनीही साथ दिली
“हो, एक दिवस काढाच. हे क्षण परत येत नाहीत.”

मामांनी हलकेच मान डोलावली. “बरं… मग उद्या शॉपिंग.”

त्या एका वाक्यात
तृप्तीच्या लग्नाची तयारी खऱ्या अर्थाने सुरू झाली होती.


---

“चला… आता आम्ही निघतो,” अनिकेत म्हणाला.

त्याच्या शब्दांसोबतच घरात थोडीशी शांतता पसरली.

विक्रमची आई पुढे आली.
“आज येऊन फार बरं वाटलं,”
ती म्हणाली.
“सगळं नीट ठरलं… मनावरचं ओझं हलकं झालं.”

मामांनी नम्रपणे मान हलवली.
“तृप्तीच्या आईचं स्वप्न पूर्ण होणार,
याचाच आनंद आहे.”

विक्रम पुढे आला.
“मामा, काळजी करू नका. तृप्तीला आम्ही खूप जपून ठेवू.”

तो बोलताना थोडा अडखळला,
पण डोळ्यांत प्रामाणिकपणा होता.

मामांनी त्याच्या खांद्यावर
हळूच हात ठेवला. “मला तुझ्यावर विश्वास आहे.”

आजोबांनी सगळ्यांना
आशीर्वाद दिला. “घरात लक्ष्मी येते आहे.
सगळं मंगल होऊ दे.”

सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
दारापर्यंत येऊन विक्रमची आई थांबल्या.

“उद्या शॉपिंगला भेटू,”
त्या हसत म्हणाल्या.

अनिकेतने मान हलवली. “नक्की.”

गाडी हळूच पुढे सरकली… आणि मागे राहिला
नवा नात्याचा ठाम निर्णय आणि पुढच्या दिवसाची
उत्सुकता होती.


---

गाडी रस्त्यावर आली… बाहेर उन्हं कोमट होती,
आत मात्र वातावरण निवांत झालं होतं.

आजोबा पुढच्या सीटवर
खिडकीतून बाहेर बघत म्हणाले, “आज सगळं छान झालं बघा.
कालच्या गोंधळानंतर आज मन शांत झालं.”

अशोकांनी खोल श्वास घेतला.
“हो बाबा…
काल काहीच नीट बोलता येत नव्हतं. आज सगळे समजूतदारपणे बोलले.”

मामांनी मान हलवली.
“मला एक भीती होती, आपल्याला ऐकून घेतील का नाही.
पण विक्रमची आई फार समंजस आहे.”

अनिकेत गाडी चालवत म्हणाला,
“सगळं एकमेकांशी बोलूनच सुटतं.
आज कुणीही आवाज चढवला नाही, हेच खूप आहे.”

आजोबा हसले. “लग्न ठरवताना
घर नव्हे तर माणसं महत्त्वाची असतात. आज तेच दिसलं.”

अशोक थोडा भावूक झाला.
“तृप्तीचं भविष्य चांगल्या हातात जाणार
याची खात्री वाटते.”

मामा शांतपणे म्हणाले,
“तिची आई असती ना… आज फार आनंदी झाली असती.”

गाडीत पुन्हा थोडा वेळ
शांतता पसरली… पण ती शांतता जड नव्हती,
ती समाधानाची होती.

अनिकेत हलकं हसत म्हणाला,
“घरी गेल्यावरन अनघाला सगळं सांगायचं आहे.
तिला पण बरं वाटेल.”

आजोबा म्हणाले,
“ती समजूतदार आहे. ती ऐकून आनंदीच होईल.”

गाडी पुढे सरकत होती…
आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती आज खरंच सगळं छान झालं.


---

गाडीचा आवाज ऐकू आला तशी अनघा दारात आली.

अनिकेत, अशोक, आजोबा घरात आले.
मोनिका आणि तृप्तीही बाहेर आल्या.

“कसं झालं?”
अनघाने डोळ्यांत प्रश्न घेऊन विचारलं.

अनिकेत हसत म्हणाला,
“छान… खूप छान झालं सगळं.”

तेवढ्यात मामा हळूच पुढे आले.
“अनघा… थोडं बोलायचं आहे तुझ्याशी.”

अनघा शांतपणे म्हणाली,
“या मामा, बसा.”

दोघे बाजूला बसले.
घरात बाकीच्यांचा आवाज हळूहळू दूर झाला.

मामा क्षणभर गप्प राहिले.
मग जड आवाजात म्हणाले, “आज तिकडे गेल्यावर
मला एक गोष्ट फार जाणवली.”

अनघा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती.

“तू खूप सहन केलं आहेस अनघा…”
मामांचे डोळे भरून आले.
“ललिताने जे बोललं,
ते ऐकूनही तू शांत राहिलीस.”

अनघा हलकं हसली.
“मामा… आई आहे ती.
तिला उत्तर देऊन परिस्थिती अजून बिघडवायची नव्हती.”

“पण तू चुकीची नाहीस,”
मामा ठामपणे म्हणाले. “हे आज मला पुन्हा कळलं.”

अनघा थोडी भावूक झाली.
“मला एवढंच हवं होतं मामा… कोणीतरी तरी माझ्यावर विश्वास ठेवावा.”

मामांनी तिचा हात हातात घेतला.
“तो विश्वास मी देतो. आणि कायम देत राहीन.”

अनघाचे डोळे पाणावले.
“आजपर्यंत मी कधीच तुमच्यापुढे काही बोलले नाही.
पण आज… मला बरं वाटतंय.”

मामा हळूच म्हणाले,
“तू माझ्यासाठी फक्त सून नाहीस अनघा…
तू माझं मूल आहेस.”

अनघाने मान खाली घातली. डोळ्यांतून अश्रू ओघळले.

तेवढ्यात तृप्ती आणि मोनिका जवळ आल्या.
मोनिकाने अनघाला मिठी मारली.
“आता सगळं छान होईल.”

तृप्ती म्हणाली,
“वहिनी , आज तुम्ही खूप स्ट्राँग वाटताय.”

अनघा हलकं हसली…
आज पहिल्यांदा ती मनापासून हलकी झाली होती.


---



क्रमश

ललिताला समजले तर, त्यापर्यत  गोधळ घालतील का?  शॉपिंग कशी होईल, .....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all