Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 58

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 58

अशोकसोबत तृप्ती आणि मोनिकाही निघून गेल्या. सगळ्यांनी एकमेकांना हलकं हसत निरोप दिला.

दार बंद झाल्यावर घरात अचानक शांतता पसरली.

अनिकेत आणि अनघा हॉलमध्ये बसले होते. थोडा वेळ दोघेही काही न बोलता बसून राहिले.

“काल खूप गोंधळ झाला ना?” अनिकेत हळूच म्हणाला.

अनघा मान हलवून म्हणाली,
“हो… पण सगळं नीट होतंय, हेच महत्त्वाचं आहे.”

अनिकेत तिला पाहत म्हणाला,
“तू सगळं किती शांतपणे सांभाळलंस.
कोणी कितीही बोललं तरी…”

अनघा थोडं हसली. “घर टिकवायचं असेल तर कधी कधी शांत राहावंच लागतं.”

दोघांमधला तो क्षण शांत, समजूतदार होता. शब्द कमी… भाव जास्त होता.


---

इकडे अशोक, मोनिका आणि तृप्ती घरी पोहोचले.

दार उघडताच घरात परिचित शांतता पसरली होती.
तृप्तीने आजूबाजूला नजर फिरवली.


मोनिकाने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“सगळं चांगलंच होईल,” ती म्हणाली.

अशोक काहीच न बोलता उभे राहिले.
पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं.

घरात परतले होते ते तिघे…
पण प्रत्येकाच्या मनात एक नवीन सुरुवात आकार घेत होती.


---


ललिता सगळ्यांकडे एकटक पाहत उभ्या होत्या.

“तुम्हाला सांगून जाता येत नाही का? फोन तरी करता आला नसता? माझा विचार येतो का तुम्हाला?”
त्या संतापून म्हणाल्या.

मग त्या मोनिकाकडे वळल्या.
“मोनिका, तुला आई आहे हे विसरलीस का? हे सगळं असं करायचं?”

तृप्तीकडे त्यांनी नजर टाकली, पण काहीच बोलल्या नाहीत.

अशोक पुढे झाले.
“ही साडी घे. अनिकेतने घेतली आहे… आणि पुढच्या महिन्यात तृप्तीचं लग्न आहे,” ते शांतपणे म्हणाले.

ललिता अजूनच चिडल्या.
“ज्या दिवशी लग्न आहे, त्याच दिवशी सांगायचं होतं ना!
महिनाभर आधी सांगून काय उपयोग? साडी आणली म्हणजे शॉपिंगही झाली, मग माझं काय काम आहे?” त्या रागात म्हणाल्या.

“अचानक ठरलं म्हणून शॉपिंग करून घेतली,”
अशोक म्हणाले.

मग त्यांनी मोनिका आणि तृप्तीला आत जायची खूण केली.

दोघीही काही न बोलता रूममध्ये गेल्या. अशोकही शांतपणे बाहेर निघून गेले.

ललिताने साडी उघडून पाहिली. साडी त्यांना आवडली होती…
कारण ती अनिकेतने घेतली होती.

पण तृप्तीचं लग्न ठरणं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं.

त्या साडी परत नीट घडी घालून
पिशवीत ठेवली. आणि रूममध्ये जाऊन कपाटात ठेवून दिली.

मन मात्र अजूनही अस्वस्थच होतं.


---

अनघा एकटीच बसली होती. घरात आता कोणीच नव्हतं.

सगळे निघून गेले होते. अनिकेत ऑफिसला गेला होता.
आजोबाही त्यांच्या घरी गेले होते.

घर शांत होतं… आणि आज अनघाला कुठलाही त्रास वाटत नव्हता.

ती स्वतःशीच विचार करत होती

“मी ऑफिस जॉइन करू का? इतके दिवस झाले.
आजोबांनी लेटर दिलं आहे. काहीतरी कामात राहिलं तर बरं वाटेल.

आता लग्न आहे… पण त्याला अजून वेळ आहे.
लग्नाच्या वेळी सुट्टी घेता येईल.

अनिकेतसोबत बोलून घेईन. उद्या पासून ऑफिसला जाईन…”

तो विचार करतानाच तिच्या चेहऱ्यावर हलकं समाधान उमटलं.

नव्या निर्णयाची हळूच सुरुवात झाली होती…


---

ललिता एकटीच खोलीत बसली होती. घरात शांतता होती… पण तिच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ होता.

“माझ्या भाचीचं लग्न आहे…” हा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात घुमत होता.

“मला काहीच विचारलं नाही. कसलं लग्न, कधी, कुठे… काहीच नाही.” तिच्या ओठांवर कडू हसू आलं.

तिच्या डोळ्यांसमोर सगळे प्रसंग तरळून गेले.
सगळं ठरलं… तारीख, स्थळ, सगळे निर्णय. आणि मी?
जणू या घराची, या नात्यांची काहीच नाही.

क्षणभर ती उठली, खिडकीतून बाहेर पाहिलं.
रस्ता रिकामा होता… अगदी तिच्या मनासारखा होता.

“माझा भाऊ…”
हृदयात चीड अजून खोल गेली.

“तो घरी निघून गेला.
मला भेटायला पण आला नाही. एक शब्द… एक नजर तरी?”

तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं, पण ती पटकन पुसलं.
रडायचं नाही, असं तिने स्वतःलाच बजावलं.

“सगळ्यांना मीच वाईट वाटते.
पण माझं मन कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का कुणी?”

मनातली चीड आता दुःखात बदलत होती.
राग होता… पण त्याहून जास्त उपेक्षेची जखम होती.

ललिता हळूच खुर्चीत बसली.
डोळे मिटले…
आणि मनात एकच विचार घोळत राहिला

“नात्यांमध्ये एवढी दूर कधी झाली कळलंच नाही…”


---

तृप्ती हळूच ललिताच्या खोलीच्या दारात आली.
ती थांबली… आणि दबक्या आवाजात म्हणाली,

“आत्या… येऊ का?”

ललिता काहीच बोलल्या नाहीत.
त्या खिडकीकडे तोंड करून बसल्या होत्या.
चेहऱ्यावर राग, दुखः आणि उपेक्षेचं मिश्र सावट होतं.

तृप्ती आत आली. थोडा वेळ गप्प राहिली. मग ती जवळ जाऊन हळूच म्हणाली

“आत्या… राग सोड ना.
तुझ्याशिवाय माझं लग्न कसं होईल सांग?
आई गेल्यानंतर तूच मला आईसारखं प्रेम दिलंस.
जीव लावला, माया केलीस… आज जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे.”

ललिताच्या डोळ्यांत पाणी तरळलं… पण त्या अजूनही गप्पच होत्या.

तृप्तीचा आवाज थरथरला.

“आत्या, मला अनिकेत दादा होता ग…
मी कधीच त्याच्यासोबत लग्नाचा विचार केला नव्हता.
माझं मन दुसऱ्याच्यावर होतं…
मी विक्रमवर प्रेम करत होते.”

ती थांबली.
डोळे खाली झुकवून म्हणाली

“तुला सांगायचं राहून गेलं…
किंवा कदाचित… सांगायची हिंमतच झाली नाही.”

खोलीत जड शांतता होती.
तृप्तीचं बोलणं ऐकूनही ललिता काही क्षण तशीच बसून राहिली. डोळे ओले झाले होते… पण अहंकार अजून विरघळला नव्हता.

थोड्या वेळाने ललिता हळूच म्हणाल्या

ललिता म्हणाल्या.
“मग मला का सांगितलं नाहीस, तृप्ती?
आई गेल्यावर मी तुला पोटाशी धरलं…
लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, याची पर्वा न करता.
आणि आज… माझ्याशी एक शब्दही नाही?”

तृप्ती पुढे येऊन तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली

तृप्ती म्हणाली
“आत्या, भीती वाटली ग.
तू दुखावशील, रागावशील…
अनिकेत दादाचं नाव निघालं, सगळ्यांना तेच योग्य वाटलं.
मीच गप्प राहिले… तीच माझी चूक.”

ललिताचा संयम तुटला.

ललिता (थोड्या कडक आवाजात) म्हणाल्या
“चूक नाही, तृप्ती… हा माझ्यावरचा अन्याय आहे.
माझा भाऊ घर सोडून गेला,
माझी भाची लग्न ठरवते… आणि मला पाहुण्यासारखं वागवतात!”

तृप्तीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

तृप्ती म्हणाली
“तू पाहुणी नाहीस आत्या… तू माझी आई आहेस.
आजही… आणि कायम. विक्रमवर माझं प्रेम आहे, पण
तुझ्या आशीर्वादाशिवाय मी एक पाऊलही टाकणार नाही.”

हे ऐकताच ललिताच्या डोळ्यातला राग विरघळू लागला.
ती उठली… आणि तृप्तीला घट्ट मिठी मारली.

ललिता (ओक्साबोक्शी रडत) म्हणाल्या
“मूर्ख आहेस तू… आईला कोण रागावून ठेवतं का?
फक्त एवढंच हवं होतं ‘आत्या, माझं ऐक’ एवढं.”

तृप्ती रडतच हसली.

तृप्ती म्हणाली
“माफ कर ना… आता सगळं तुलाच ठरवायचं आहे.”

ललिता तिचं कपाळ चुम्बन घेत म्हणाल्या

ललिता म्हणाल्या.
“मग ठीक आहे.
माझ्या भाचीचं लग्न मीच करणार… आणि तिला आनंदात ठेवणं हीच माझी शपथ.”

खोलीत पुन्हा शांतता होती… पण यावेळी ती समाधानाची होती.


---

बाहेर उभे असलेले मोनिका आणि अशोक हे सगळं न बोलताच पाहत होते.
खोलीत आत मात्र वातावरण हळूहळू बदलत होतं.

ललिताच्या चेहऱ्यावरची ती कडक चीड आता विरघळत होती.
डोळ्यांत रागाऐवजी थकवा उतरला होता… आणि त्यामागे दडलेली काळजी स्पष्ट दिसत होती.

तृप्तीचं बोलणं तिच्या मनाला भिडलं होतं.
आई गेल्यानंतर ज्याला तिनं मायेने वाढवलं,
जिच्यासाठी तिनं स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं
तीच तृप्ती आज इतक्या प्रेमानं समजावत होती.

ललिता खोल श्वास घेत म्हणाल्या,
नाहीत काही…
पण तृप्तीवरचा राग नक्कीच ओसरला होता.

क्षणभर शांतता पसरली.

पण त्या शांततेत एक प्रश्न मात्र मनात ठाण मांडून बसला होता…

“अनघाचं काय होईल?”

तिचं आयुष्य… तिच्या भावना… कोणी विचार केला आहे का?

मोनिकाने अशोककडे पाहिलं.  अशोकच्या डोळ्यांतही तीच चिंता होती.
घरात वाद शांत होत होते,
पण नात्यांचे गुंते अजून सुटायचे बाकी होते…
आणि त्या गुंत्याच्या मध्यभागी उभी होती  अनघा.



क्रमश

तृप्तीच्या लग्नात अनघाचे काय होते? ...

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all