Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 63

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं   भाग - 63



सकाळ अजून पूर्ण उजाडलीही नव्हती…

अनघा मात्र लवकरच उठली होती.

तिने शांतपणे सगळं आवरायला सुरुवात केली.
किचनमध्ये चहा ठेवला, नाश्ता बनवला, डब्बे भरले…
घरभर तिच्या हालचालींचा हलकासा आवाज घुमत होता.

सगळं आवरून ती रूममध्ये आली.

“अनिकेत… उठ ना… उशीर होईल…” ती अलगद म्हणाली.

अनिकेतने डोळे चोळत उठला…
आणि समोर अनघाला पाहून थबकला.

आज ती हलक्या रंगाच्या साडीमध्ये, नीट केस बांधलेले, कपाळावर छोटीशी टिकली… खरंच खूप सुंदर दिसत होती.

तो काही क्षण फक्त तिच्याकडे बघतच राहिला.

“काय बघतोयस असं?” अनघा म्हणाली

अचानक अनिकेत उठून तिच्याजवळ आला…
आणि तिला अलगद मिठीत घेतलं.

“अरे… अनिकेत… उशीर होईल… आता सोड ना…” ती लाजत म्हणाली.

तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत हसला,
“थोडावेळ गप बस… मला तुला नीट बघू तरी दे… रोज असं बघायला मिळत नाही.”

अनघा काही बोलली नाही… फक्त हलकेच हसली.

त्या मिठीत दोघांनाही एक वेगळीच शांतता मिळाली होती.


---


“मोनिका, तू आज पण इंटरव्ह्युला जाणार आहे का?” तृप्तीने विचारलं.

“हो… आज जी कंपनी आहे ना… खूप चांगली आहे. तिथे माझा नंबर लागायलाच हवा,” मोनिका उत्साहात म्हणाली.

“लागेल गं. नीट इंटरव्ह्यू दे,” तृप्ती हसत म्हणाली.

“प्रयत्न तर करेलच,” मोनिका म्हणाली.

अशोक म्हणाले,
“मी ऐकलं… अनघा ज्या कंपनीत जाते, तिथे पण चांगल्या पोस्ट आहेत. तू तिथे जाऊन बघ. नंतर अनघाला कॉल करून विचार.”

तेवढ्यात ललिताने ते ऐकलं.

त्यांचा चेहरा लगेच चिडचिडा झाला.

“आता ती जॉब करणार का? मग माझ्या मुलांचं काय? नीट वेळेवर खायला देते की नाही कोण जाणे… त्याला बोलते इथे राहा, तर तो राहत नाही…”

अशोक शांतपणे म्हणाले,
“तू किती प्रेम देतेस, म्हणून तर तो राहत नाही.”

“तुम्ही मलाच बोला… तिला काहीच बोलत जाऊ नका,” ललिता नाराज होऊन म्हणाली.

घरात क्षणभर शांतता पसरली.

“तृप्ती, मी निघते… उशीर होतोय,” मोनिका म्हणाली आणि पटकन बाहेर पडली.

तृप्तीही हळूच तिच्या रूममध्ये गेली.


---


अनिकेत अजूनही अनघाला सोडत नव्हता.

“अनिकेत… आता खरंच सोड ना… खूप वेळ झाला,” ती हसत म्हणाली.

“ठीक आहे… पण एक अट.” अनिकेत म्हणाला.

“काय?” अनघा म्हणाली..

“संध्याकाळी परत असंच हसत घरी ये. थकलेली नाही… समजलं?” अनिकेत म्हणाला.

अनघा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, “तुझ्यासाठी नेहमी हसतच येईल.”

तो तिच्या कपाळावर हलकंसं किस करतो.

“ऑल द बेस्ट, मिस असिस्टंट मॅनेजर.”

ती लाजत बॅग घेते… आणि नव्या दिवसासाठी बाहेर पडते.


---

घरात सगळे आपापल्या कामाला निघून गेले…

दरवाजा बंद झाला…
आणि घरात अचानक शांतता पसरली.

क्षणभरापूर्वी गडबड, आवाज, बोलणं होतं…
आता फक्त घड्याळाची टिक-टिक.

ललिता हॉलमध्ये एकटीच उभी होती.

तिने आजूबाजूला नजर फिरवली.

रिकाम्या खुर्च्या… टेबलवर ठेवलेले कप… आणि शांत घर…

“हंss… सगळ्यांना आपापलं आयुष्य मिळालं…” ती मनातच पुटपुटली.

ती हळूच सोफ्यावर बसली.

तृप्तीचं लग्न ठरलं…
मोनिका नोकरी शोधतेय… अनघा ऑफिसला जातेय… अनिकेत तिच्याच मागे फिरतो…

“मग मी कोण…?”
हा प्रश्न अचानक मनात उठला.
तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं.
“माझ्या भाचीचं लग्न… आणि मला काहीच विचारलं नाही…
भाऊ आला… आणि मला भेटायलाही वेळ नाही…
सगळं ठरवून टाकलं… मी या घरात फक्त नावापुरती आहे का?”

तिचा आवाज कडवट झाला.

ती उठली… कपाट उघडलं…
तृप्तीसाठी आणलेली साडी बाहेर काढली.

साडी हातात घेताच तिचा राग थोडा मऊ झाला.

“किती सुंदर आहे… अनिकेतने घेतली म्हणे…”
तिने साडीवरून हात फिरवला.

क्षणभर तिला तृप्ती लहानपणीची आठवली…
तिच्या मागे मागे फिरणारी… “आत्या… आत्या…” म्हणणारी…

डोळे भरून आले.
“मीच तर वाढवलं तिला… आईसारखं…”
पण लगेच मनात टोचलं
“आता मोठी झाली… तिच्या आयुष्यात माझी गरजच उरली नाही…”
ती पुन्हा साडी दुमडते… पण यावेळी हात थरथरत होते.
राग, प्रेम, काळजी, असूया… सगळं एकत्र झालं होतं.
खिडकीतून बाहेर बघत ती मनात म्हणाली

“सगळे पुढे जातायत…
फक्त मीच मागे राहतेय का…? माझ्याशिवाय सगळं नीट चालतंय… मग माझं अस्तित्व तरी काय…?”
घरातली शांतता आणखी बोचरी वाटायला लागली.
ललिता पहिल्यांदाच स्वतःला खूप एकटी वाटत होती…
रागापेक्षा जास्त… दुखावलेली.


---


अनघा ऑफिससमोर उतरली…

मोठी काचांची बिल्डिंग…
गेटवर सिक्युरिटी…
आत-बाहेर धावपळ करणारी माणसं होती.

तिच्या पायांनी क्षणभर थांब घेतला.
हातात बॅग घट्ट पकडली.
“आज खरंच सुरुवात आहे…” ती मनात म्हणाली.

हलकीशी धडधड वाढली.
ती आत गेली.

रिसेप्शनजवळ काहीजण हसत-गप्पा मारत उभे होते…
कोणी लॅपटॉप घेऊन धावत होते… कोणी फोनवर बोलत होते…

सगळ्यांना आपलं काम माहीत होतं.
फक्त तीच नवीन… अनोळखी वाटतं आहे..

तिला कुणीच ओळखत नव्हतं… आणि तिलाही कुणी ओळखीचं नव्हतं.

क्षणभर तिला एकटं वाटलं.

“मी जमवू शकेन ना…?” मनात विचार आला.

पण लगेच आजोबांचे शब्द आठवले
“तू सगळं करू शकतेस ग… मला तुझ्यावर विश्वास आहे.”

अनिकेतचा हसरा चेहरा आठवला.

तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली.

ती शांतपणे कॉरिडॉरने चालत तिच्या केबिनकडे गेली.

केबिनवर नावाची प्लेट होती

Anagha – Assistant Manager
ती दोन सेकंद तिथेच थांबली…
नावाकडे बघतच राहिली.
डोळ्यांत अभिमान चमकला.
“ही माझी जागा आहे…”
तिने दरवाजा हलकेच उघडला.

आत स्वच्छ टेबल… लॅपटॉप… खुर्ची… खिडकीतून येणारा सकाळचा उजेड…

सगळं अगदी नवीन… तिच्यासारखंच.

ती हळूच खुर्चीत बसली.
हात टेबलावर ठेवले…
एक खोल श्वास घेतला.
थोडी भीती…
थोडा उत्साह…
थोडा आत्मविश्वास…
आणि खूप साऱ्या स्वप्नांची सुरुवात

“चल अनघा… आता स्वतःसाठी जगायचं…” ती स्वतःलाच म्हणाली.

लॅपटॉप ऑन केला…
आणि तिच्या नवीन प्रवासाची पहिली पायरी सुरू झाली…

---


अनघा लॅपटॉप ऑन करून काम पाहत बसली होती…

तेवढ्यात केबिनच्या दारावर हलकंसं नॉक झालं.

टकटक…

ती दचकलीच थोडी.
“येऊ का?” बाहेरून आवाज आला.

“हो… या…” अनघा म्हणाली.

रोनक आत आला.

चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसतं स्वागत.

“काय मॅडम… पहिला दिवस… टेन्शन तर नाही ना?” तो हसत म्हणाला.

अनघा पण हलकंसं हसली.
“थोडंसं आहे… पण जमेल हळूहळू.”

“अगदी जमेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजोबांनी तुमच्याबद्दल खूप सांगितलं आहे… तुम्ही खूप प्रामाणिक आहात म्हणे.”

हे ऐकून अनघाला छान वाटलं.

“चला… मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देतो. टीम माहित असली की काम अजून सोपं होतं.”

ती उठली.

दोघे बाहेर आले.

ऑफिसमध्ये सगळे आपापल्या डेस्कवर काम करत होते.

रोनक मोठ्याने म्हणाला,
“Guys… एक मिनिट प्लीज.”

सगळ्यांनी वर बघितलं.

“ही अनघा… आपली नवीन Assistant Manager.”

सगळ्यांनी हसून “हाय”, “वेलकम” म्हणायला सुरुवात केली.

अनघा थोडी संकोचली… पण तिनेही हसून प्रतिसाद दिला.

तेवढ्यात दोन मुली तिच्याजवळ आल्या.

“हाय… मी सीमा,” एकीने हात पुढे केला.

“आणि मी करिष्मा,” दुसरी म्हणाली.

अनघाने हात मिळवला. “हाय… मी अनघा.”

“तुम्ही नवीन आहात ना… काही help लागली तर आम्हाला सांगा. आम्ही दोघी पण इथेच आहोत,” सीमा म्हणाली.

“हो… आणि आमच्या team मध्ये खूप gossip पण चालतं बरं का,” करिष्मा डोळा मारत म्हणाली.

तिघीही हसायला लागल्या.

अनघाचं टेन्शन हळूहळू कमी झालं.

“Thank you… खरंच मला खूप बरं वाटतंय,” अनघा म्हणाली.

“Relax… दोन दिवसात तुम्ही आमच्यातलीच व्हाल,” सीमा म्हणाली.

रोनक हसत म्हणाला,
“चला… आता सगळे कामाला लागा… नाहीतर मी ओरडेल.”

सगळे हसले.

अनघा तिच्या केबिनमध्ये परत आली.

मन हलकं झालं होतं.

आता ऑफिस अनोळखी वाटत नव्हतं…

इथे लोकं चांगली होती… आपली होती…

तिने स्वतःशीच हळूच म्हटलं
“हो… मी हे सगळं नक्की जमवेन.”

आणि नव्या आत्मविश्वासाने कामाला लागली…


---




.क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all