Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 67

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 67


सकाळीच ललिता उठल्या.
घरात सगळीकडे शांतता होती.
पण त्यांच्या मनात मात्र वादळ सुरू होतं…
त्या पटपट काम करायला लागल्या.
झाडू… भांडी… स्वयंपाक…
सगळं नेहमीपेक्षा जास्त वेगात करत होत्या.

भांड्यांचा आवाज जरा जास्तच येत होता.
काल मोनिका रडत आली होती…
तो चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता.

“इतकी हुशार मुलगी… तरी नोकरी नाही लागली… आणि ती अनघा… लगेच जॉबला लागली…”
त्या स्वतःशीच पुटपुटल्या.

“अनघाने एकदा तरी विचारायला हवं होतं…
‘मोनिका तू पण चल माझ्यासोबत’ असं म्हणायला काय झालं असतं?”

चहा ठेवताना हात थोडा जोरातच आदळला.

“तिला तर फक्त स्वतःचाच फायदा दिसतो…
घरात गोड गोड बोलते… पण स्वतःचं काम आधी…”

मनात राग, चीड, अस्वस्थता सगळं एकत्र होतं.

“माझी मुलगी रडत बसली… आणि ती ऑफिसला खुशीत जाते…”

क्षणभर थांबल्या.
मोनिकाचा चेहरा आठवला…
डोळ्यात पाणी आलं.

“नाही… असं चालणार नाही…  आजच जाऊन बोलते तिच्याशी.  तिला सांगते, मोनिकाला पण सोबत घेऊन जा.”

पण आत कुठेतरी छोटासा आवाज म्हणत होता…

“कदाचित अनघाचा दोष नसेल…”
पण आईचं मन ऐकतं कुठे…
त्यांनी पदर खांद्यावर घेतला.

दरवाजा लावत म्हणाल्या,
“आज जाऊनच बोलते… स्पष्ट.”
आणि त्या अनघाला भेटायला निघाल्या…

मनात राग… काळजी… आणि थोडा गैरसमज…


सकाळचं ऊन हलकंसं पसरलं होतं…

रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू होती…

पण ललिताच्या मनात मात्र वादळ घोंघावत होतं.
त्या कोणालाही काही न सांगता घरातून निघाल्या.

ना अशोकला सांगितलं… ना मोनिकाला सांगितले…

फक्त पदर घट्ट खांद्यावर टाकली आणि सरळ चालत निघाल्या.

त्यांच्या पावलांचा वेगच राग सांगत होता.
“आज बोलायचंच… सरळ तोंडावर.”
मनात विचारांची गर्दी…

“माझी मुलगी रडत बसली…
आणि ही ऑफिसला खुशीत जाते…  एकदा तरी विचारायचं नव्हतं का?”

“खूप चांगली बनते सगळ्यांसमोर…”

त्या पुटपुटत होत्या.
थोड्याच वेळात अनघाच्या घरासमोर आल्या.

दार अर्धवट उघडं होतं.

आतून भांड्यांचा आवाज येत होता.
अनघा किचनमध्ये काम करत होती…

गाणं गुणगुणत…
चेहऱ्यावर शांत हसू होते…

ललिताच्या डोळ्यात पुन्हा चीड चमकली.

“ही एवढी खुश कशी?”
त्या जोरात दार ढकलून आत आल्या.

दाराचा आवाज झाला.
अनघा दचकली.

“आई…? तुम्ही? या ना…”
ती हसत पुढे आली.

पण ललिताचा चेहरा बघून तिचं हसू हळूहळू थांबलं.

ललिता थेट तिच्यासमोर उभ्या राहिल्या.

कटाक्ष टाकत म्हणाल्या
“खूप आनंदात दिसतेस… नोकरी लागली ना म्हणून?”

अनघा थोडी गोंधळली.
“हो… म्हणजे… हो आई…”

“स्वतःचं सगळं बघितलंस… पण एकदा तरी मोनिकाचा विचार आला का?”

अनघा स्तब्ध.
“क-काय?”

“तिला सोबत घेऊन जायचं सुचलं नाही?
ती किती दिवसांपासून नोकरीसाठी धावत आहे माहिती आहे का तुला?”

अनघाच्या हातातून पळीच खाली पडली.

घरात अचानक शांतता…
हवेतील ताण स्पष्ट जाणवत होता…


---


अनिकेत बोलून झाला…
घरात क्षणभर शांतता पसरली.

सगळ्यांना वाटलं,  आता ललिता गप्प बसतील.
पण नाही…

त्यांच्या मनातली चीड अजूनही जिवंत होती.
त्या पुन्हा सरळ अनघाकडे वळल्या.
“तरी पण… मला एक सांग.”  त्या  म्हणाल्या

अनघाने हळूच वर बघितलं.

“मोनिका तुझी मैत्रीण नाही का?
घरात रोज भेटतेस… बोलतेस… हसतेस…”

त्यांचा आवाज टोचणारा झाला.

“एकदा तरी विचारायचं नव्हतं का
‘चल तू पण माझ्यासोबत’?”

अनघा स्तब्ध.

“काय झालं असतं विचारलं असतंस तर?”
ललिता पुढे म्हणाल्या
“पण तुलाच पुढे जायचं होतं…
तुलाच नोकरी हवी होती…
तिला घेऊन कशाला जाशील ना?”

हे शब्द थेट अनघाच्या मनाला लागले.

तिच्या डोळ्यात पाणी दाटलं.

“आई तसं नाहीये… मी विचारले होते. तिला तिच्या मेहनतीवर जॉब शोधायचा होता” ती हलक्या आवाजात म्हणाली.

“मग कसं आहे? सांग!” ललिता म्हणाल्या.

अनिकेतला आता राग आला.
“आई बस करा ना! किती वेळा तेच तेच बोलणार?”

पण अनघाने हाताने त्याला थांबवलं.

ती शांतपणे पुढे आली.

आवाज थरथरत होता… पण प्रामाणिक होता.

“आई … खरंच सांगते…
माझ्या डोक्यात असं काही आलंच नाही… मला स्वतःलाच खात्री नव्हती की मला जॉब मिळेल…”

तिचे डोळे भरले.

“मला वाटलं आधी मी लागते का ते बघू…
मग मोनिकाला पण सांगते… मी तिला कधीच मागे ठेवणार नाही…”

घरात पूर्ण शांतता.

तिच्या शब्दांत खोटेपणा नव्हता.

अनिकेत तिच्याकडे अभिमानाने बघत होता.

ललिता काही क्षण काहीच बोलल्या नाहीत…

त्यांच्या मनातली चीड आणि सत्य, दोघांची लढाई सुरू होती.

पण अहंकार अजूनही थोडा शिल्लक…
त्या फक्त एवढंच म्हणाल्या
“हं… बघू पुढे…”

आणि तिथून वळून बसल्या.

पण त्यांच्या डोळ्यातलं कडकपण थोडंसं मऊ झालं होतं…


---

ललिताचे शब्द अजूनही हवेत घुटमळत होते…

अनघा शांत उभी…
अनिकेतचा चेहरा रागाने लाल होता…
घरात ताण पसरलेला.

तेवढ्यात बाहेरून घाईघाईने पावलांचा आवाज आला.
“आई… आई…!”
मोनिका धापा टाकत आत आली.

तिने तिघांकडे पाहिलं.

अनघाचे पाणावलेले डोळे…
अनिकेतचा राग… ललिताचा कडक चेहरा…

तिला सगळं एका क्षणात समजलं.

“आई… तू इथे काय करताय?” मोनिका म्हणाली

ललिता काही बोलणार इतक्यात तीच पुढे आली.

“मला माहितीय… तू अनघाला बोलायला आली आहे ना?”
मोनिका म्हणाली.

ललिता थोड्या चिडून
“हो… मग? मी बोलू नये का ?”

मोनिकाने शांत पण ठाम आवाजात म्हटलं
“पण कशासाठी? माझ्यासाठी?”

घरात शांतता.

ती अनघाकडे बघून हलकंसं हसली.

“अनघाने काहीच चुकीचं केलं नाहीये.” मोनिका म्हणाली

ललिता थबकल्या.

“आई… जॉब मला मिळाला नाही, त्यात अनघाचा काय दोष?
मी स्वतः प्रयत्न करतेय… माझी लढाई मी लढेन.” मोनिका म्हणाली.

अनघाच्या डोळ्यात आश्चर्य होते.

मोनिका पुढे म्हणाली
“तू असं तिच्यावर राग काढू नको… ती आधीच खूप काही सहन केलंय…”

अनिकेतच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं.

ललिता गप्प.

पहिल्यांदाच मोनिका इतक्या ठामपणे बोलत होती.

ती ललिताचा हात धरते.

“चल ना आई… घरी जाऊ.
सगळ्यांसमोर असं बोलू नकोस… मला वाईट वाटतं.”

ललिताच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू विरघळत गेला.

त्या काही न बोलता उठल्या.

दारातून जाताना एक क्षण अनघाकडे पाहिलं…

त्या नजरेत अजूनही हट्ट होता…
पण थोडी माया पण होती.

मोनिका हलकंसं म्हणाली

“सॉरी अनघा…”

अनघा लगेच म्हणाली
“अगं वेडी आहेस का… सॉरी कशाला?”

दोघी हलकंसं हसल्या.

ललिता आणि मोनिका निघून गेल्या.

घरात पुन्हा शांतता…

अनिकेत हळूच म्हणाला

“बघितलंस? तुझी टीम वाढतेय आता.”

अनघा हसली…

डोळ्यातलं पाणी पुसत.


---


ललिता आणि मोनिका घरी पोहोचल्या.

दार जोरात उघडून ललिता आत गेल्या.
पर्स सोफ्यावर आपटली.
चेहऱ्यावर अजूनही राग.

मोनिका शांतपणे त्यांच्या मागे आली.

घरात काही क्षण शांतता…

पण ललिताच्या मनातलं वादळ थांबत नव्हतं.
त्या अचानक वळल्या.
“तू का आलीस मला घेण्यासाठी?” ललिता म्हणाल्या.

मोनिका दचकली.

“आई… मी फक्त”

“फक्त काय? अजून थोडं बोलू दिलं असतंस ना मला!
आता तर मी तिला नीट सुनावणार होते!” ललिता म्हणाल्या

मोनिका हळूच म्हणाली
“आई… सगळ्यांसमोर का बोलत होतीस?”

“मग काय करू?
सगळं तिच्याच मनासारखं चाललंय घरात! कोणी मला विचारत तरी का?” ललिता म्हणाल्या

त्यांचा आवाज कापत होता.
रागात… पण आतून दुखावलेल्या.

“तुझी नोकरी नाही लागली… मला वाईट नाही वाटत का?
आई आहे मी तुझी!” ललिता म्हणाल्या

मोनिका त्यांच्या जवळ बसली.

“माहितीय ना आई… पण त्यात अनघाचा दोष नाही.” मोनिका म्हणाली.

“तरी पण! तू तिची मैत्रीण आहेस…
ती एकदा तरी म्हणाली असती ‘चल सोबत’…”
त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
“माझ्या मुलीला कोणी मागे टाकलं की मला सहन होत नाही गं…”

हे ऐकून मोनिकाचं मन मऊ झालं.

तिने त्यांचा हात हातात घेतला.

“आई… मला कुणी मागे टाकलं नाहीये…
मी स्वतः पुढे जाईन… तू फक्त माझ्या बाजूला उभी रहा… भांडू नकोस.”

ललिता शांत झाल्या.
पण तोंड मात्र थांबत नव्हतं

“हं… बघते मी… पण ती अनघा ना… खूप सरळ दिसते… मला काहीतरी खटकतं…”

मोनिका हसली.

“आई… तू ना जास्त सीरियल बघतेस म्हणून संशय जास्त येतो तुला.”

ललिताच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं.

“चल जा… जास्त शहाणी होऊ नकोस.”

त्या उठल्या… पण मनातली आग थोडी कमी झाली होती.


---



क्रमश
अनघा मोनिकासाठी काही करेल का? ......

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all