तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 70
मोनिका घाईघाईने घरी आली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवताच येत नव्हता. डोळ्यांत चमक, ओठांवर हसू… आज ती अक्षरशः हवेत चालत होती.
दार उघडून ती आत आली. ललिता किचनमध्ये काम करत होत्या आणि अशोक हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते.
“आई… बाबा…!” मोनिका मोठ्याने हाक मारत म्हणाली.
दोघेही तिच्याकडे बघायला लागले.
“काय गं, एवढी आनंदात दिसते आहेस?” अशोक हसत म्हणाले.
मोनिका धावतच आईजवळ गेली. “आई… मला जॉब मिळाला!”
क्षणभर ललिता थबकल्या. हातातला चमचा तसाच हवेतच थांबला. “खरंच…?”
“हो आई! इंटरव्ह्यू झाला… आणि त्यांनी लगेच select केलं. उद्यापासून जॉईन करायला सांगितलं!”
ललिताच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी लगेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. “माझी मुलगी आहेच हुशार… मला माहित होतं तुला नक्की लागेल.”
मोनिका त्यांच्या मिठीत शिरली. “आई, तुझ्यामुळेच झालं सगळं… तू रोज धीर दिलास ना…”
अशोकही उठून आले. “वा! मग आज गोड खायला पाहिजे. आपल्या घरातली कमावती मुलगी तयार झाली!” ते अभिमानाने म्हणाले.
मोनिका हसली. “हो बाबा… आता मी पण तुम्हाला मदत करणार.”
घरातला सगळा वातावरण बदलून गेला. सकाळचा ताण, चिंता सगळं गायब झालं. फक्त आनंद, हसू आणि समाधान पसरलं.
ललिता मात्र तिच्याकडे बघत मनात म्हणाल्या, “माझी मुलगी आता स्वतःच्या पायावर उभी राहणार… देव तिचं सगळं चांगलं करो…”
त्या संध्याकाळी घरात वेगळीच प्रसन्नता होती… जणू काही छोटासा सणच साजरा होत होता.
---
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर अनघा हलक्या पावलांनी घरी निघाली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. दिवसभराचा थकवा होता, पण मन मात्र खूप आनंदी होतं. मोनिकाचा इंटरव्ह्यू, तिचं सिलेक्शन… सगळं आठवून ती स्वतःशीच हसत होती.
घरी पोहोचल्यावर तिने दार उघडलं. अनिकेत आधीच आला होता. सोफ्यावर बसून तिची वाट बघत होता.
“आलीस? आज खूप खुश दिसते आहेस,” तो हसत म्हणाला.
अनघाने बॅग बाजूला ठेवली आणि त्याच्या शेजारी बसली. “आज ना खूप मोठी खुशखबर आहे!”
“काय?” अनिकेत उत्सुकतेने पुढे सरकला.
“मोनिकाला जॉब लागला! रोनकने इंटरव्ह्यू घेतला… आणि लगेच select केलं. उद्यापासून जॉईन करणार आहे.”
“खरंच?” अनिकेतच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला. “वा! मस्तच की मग!”
“हो… ती किती खुश झाली होती माहित आहे? मला तर स्वतःचा जॉब लागल्यासारखं वाटलं,” अनघा हसत म्हणाली.
अनिकेत तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला, “तू अशीच आहेस… स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतेस. म्हणूनच सगळ्यांना तू आवडतेस.”
अनघा हलकंसं हसली. “आपलं माणूस आहे ना… तिचं चांगलं झालं की आपोआप आनंद होतो.”
अनिकेतने तिचा हात हातात घेतला. “मला तुझा खूप अभिमान वाटतो, अनघा. खरंच… तू खूप चांगली आहेस.”
त्या शब्दांनी अनघाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दिवसभराचा सगळा थकवा त्या एका क्षणात नाहीसा झाला.
दोघेही तसंच शांत बसले… घरात एक उबदार, समाधानाचा क्षण पसरला होता.
---
अनघा आणि अनिकेत दोघं हॉलमध्ये बसून बोलत होते. मोनिकाच्या जॉबची बातमी सांगताना अनघाच्या चेहऱ्यावरचं समाधान अजूनही ओसरलं नव्हतं. तेवढ्यात आजोबा बाहेरून आले. पाणी घेत घेत ते दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत उभे होते.
“म्हणजे मोनिकाला जॉब लागला तर,” आजोबा हसत म्हणाले.
“हो आजोबा,” अनघा आनंदाने म्हणाली, “उद्यापासून जॉईन करणार आहे.”
आजोबा तिच्याकडे थोडं नाराजीने बघत म्हणाले, “अनघा, तू मला सांगितलं असतंस तर मी आधीच रोनकसोबत बोललो असतो. एवढा इंटरव्ह्यू वगैरे घेण्याची गरजच नव्हती. सरळ कामाला घेतलं असतं.”
अनघा हलकंसं हसली. ती त्यांच्या जवळ जाऊन बसली.
“आजोबा… तिला असाच जॉब मिळाला असता ना, तर तिला चांगलं वाटलं नसतं,” ती शांतपणे म्हणाली.
“म्हणजे?” आजोबा विचारत म्हणाले.
“स्वतःच्या मेहनतीने मिळालेलं यश वेगळंच असतं. आज ती किती खुश होती माहित आहे? ‘मी स्वतः इंटरव्ह्यू देऊन select झाले’ असं अभिमानाने सांगत होती. जर तुम्ही सांगून घेतलं असतं ना… तर तिला कायम वाटलं असतं की शिफारशीने जॉब मिळाला.”
आजोबा तिच्याकडे प्रेमाने बघत राहिले.
“प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ना आजोबा… तेव्हाच आत्मविश्वास येतो,” अनघा हळू आवाजात म्हणाली.
क्षणभर शांतता पसरली.
आजोबांच्या डोळ्यात अभिमान चमकला. “खरं आहे गं… तू खूप मोठं विचार करतेस. म्हणूनच मला तुझा अभिमान वाटतो.”
ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, “देव तुला नेहमी आनंदात ठेवो.”
अनिकेत बाजूला उभा राहून हे सगळं बघत होता. त्याच्या मनातही एकच विचार होता ‘माझी बायको खरंच सोन्यासारखी आहे.’
घरात त्या क्षणी एक वेगळीच ऊब पसरली होती… समाधानाची… आपल्या माणसांच्या यशाची होती
---
थोड्या वेळाने सगळ्यांचं बोलणं शांत झालं. घरात एक प्रसन्न, हलकंसं वातावरण पसरलं होतं. अनघा उठली.
“मी चहा ठेवते… सगळे थोडावेळ बोलत बसू,” ती हसत म्हणाली.
ती किचनमध्ये गेली. गॅस पेटवला. भांड्यात पाणी टाकलं. त्यात चहा पावडर, साखर, थोडं आलं कुटून टाकलं. स्वयंपाकघरभर लगेच गरम चहाचा सुगंध दरवळायला लागला.
अनघा काम करतानाही गुणगुणत होती. आज तिचं मन खूप हलकं झालं होतं. मोनिकाला जॉब मिळाला, आजोबा खुश, अनिकेत खुश… सगळं छान चाललं होतं.
दूध टाकून तिने चहा छान उकळू दिला. वर फेस आला तसं तिने गॅस कमी केला.
हॉलमध्ये बसलेले आजोबा म्हणाले, “अगं अनघा, चहाचा वास तर भारीच येतोय!”
“आता येते आजोबा,” ती हसत म्हणाली.
ती ट्रेमध्ये तीन कप ठेवून चहा ओतला. बिस्किटांची प्लेटही ठेवली. हळूच ट्रे घेऊन बाहेर आली.
“घ्या… गरमागरम चहा,” ती सगळ्यांसमोर कप ठेवत म्हणाली.
अनिकेतने कप घेतला आणि पहिला घोट घेत म्हणाला, “वा… तुझ्या हातचा चहा म्हणजे दिवसाचा सगळा थकवा गायब.”
आजोबाही हसले. “हो गं, तुझ्या हातात जादू आहे.”
अनघा लाजली. “असं काही नाही… साधाच चहा आहे.”
पण त्या क्षणी तो साधा चहा नव्हता… तो घरातल्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि समाधानाचा स्वाद होता.
तिघंही निवांत बसून चहा पित गप्पा मारत होते… संध्याकाळ अजूनच सुंदर झाली होती.
---
मोनिका इंटरव्ह्यूची बातमी सांगून तिच्या रूममध्ये गेली, पण ललिता मात्र किचनमध्ये उभ्याच राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं होतं.
“माझ्या मुलीला जॉब लागणार…” त्या मनातच पुटपुटल्या.
आज त्यांनी नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने स्वयंपाकाला सुरुवात केली. गॅसवर कढई ठेवली. तुपात जिरं-लसूण फोडणी दिली तसा संपूर्ण घरभर छान वास दरवळला.
मोनिकाला आवडणारी बटाट्याची भाजी, गरमागरम वरण-भात, फुलक्या, आणि खास तिच्यासाठी शेवयांची खीर… सगळं प्रेमाने बनवत होत्या.
भाजी ढवळताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
“किती दिवसांनी हसत आली आज… देव करो, आता तिचं सगळं छान होऊ दे,” त्या मनात म्हणाल्या.
“किती दिवसांनी हसत आली आज… देव करो, आता तिचं सगळं छान होऊ दे,” त्या मनात म्हणाल्या.
अशोक किचनमध्ये डोकावून म्हणाले, “आज काय स्पेशल? एवढं सगळं?”
ललिता लगेच म्हणाल्या, “काही नाही… तसंही मुलगी दिवसभर बाहेर फिरते… नीट जेवली पाहिजे.”
पण त्यांच्या आवाजातली माया लपली नाही.
थोड्या वेळाने त्यांनी टेबल छान लावलं. “मोनिका… ये जेवायला!” त्यांनी हाक मारली.
मोनिका बाहेर आली. टेबलवर एवढं सगळं बघून थोडी थबकली.
“आई… हे सगळं माझ्यासाठी?”
“आई… हे सगळं माझ्यासाठी?”
“हो मग… उद्या पासून ऑफिसला जॉईन व्हायचे आहे ना, ताकद हवी,” ललिता साधं बोलल्या, पण डोळ्यात प्रेम होतं.
मोनिका हसली. “थँक्यू आई…”
ती त्यांच्या गळ्यात पडली.
ललिता थोडं कुरकुरल्या, “अगं जा… गरम आहे जेवण,” पण हात मात्र तिच्या डोक्यावरून फिरत होते.
त्या क्षणी राग, तक्रारी, सगळं विसरून… फक्त आई-मुलीचं नातं उरलं होतं.
---
क्रमश
ललिताला समजेल का? अनघामुळेच मोनिका जॉब लागला....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा