Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 71

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल, त्यासाठी कथा वाचत राहा.
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 71


मोनिका सकाळी लवकर उठली. घरात अजून शांतता होती, पण ललिता आधीच उठून किचनमध्ये कामाला लागल्या होत्या. त्यांनी तिच्यासाठी प्रेमाने डब्बा बनवला होता. गरमागरम नाश्ता तयार करून ठेवला होता. मोनिकाने पटकन आवरलं, नाश्ता केला, आणि तयार झाली. ललिताने तिचा डब्बा काळजीपूर्वक बॅगमध्ये ठेवला, “वेळेवर जेव गं,” असं मायेने सांगितलं.

अशोक सगळं शांतपणे बघत होते. मुलींसाठी ललिता किती धावपळ करतेय, किती काम करतेय, हे पाहून त्यांच्या मनात आपसूकच प्रेम आणि अभिमान दाटून आला. “खरंच, मुलींसाठी आईचं मन किती झिजतं…” ते मनातच म्हणाले. मोनिकाने दोघांना बाय केलं आणि हलक्या हसऱ्या चेहऱ्याने निघून गेली.

अनघा पण तिकडे आवरत होती. आज मोनिकाचा पहिला दिवस होता म्हणून तिच्यासाठी खास शिरा बनवला होता. अनिकेत आणि आजोबांनाही तिने प्रेमाने वाढला. घरभर गोड सुगंध पसरला होता. सगळे निवांत बसून खात होते.

तेवढ्यात अनिकेत म्हणाला, “अनघा, आपण गावाला कधी जायचं? मामा सगळं काम एकटाच करतो आहे. विक्रम आणि मावशी चार दिवस आधी जाणार आहेत.”

अनघा शांतपणे म्हणाली, “तू ठरव आणि मला सांग. मी रोनकसोबत बोलून घेईन.”

त्यावर आजोबा हसत म्हणाले, “अनघा, सुटीचं टेन्शन घेऊ नको. मी दिली तुला सुट्टी! मी पण गावाला येणार आहे. अनिकेत, माझी पण तिकीट काढ. आणि मला वाटतं आई-बाबा आणि मोनिकाचं पण काढ. अशोकसोबत बोलून घे, ते तुझं काम आहे.”

“हो आजोबा, मी बाबांसोबत बोलून घेईन,” अनिकेत म्हणाला.

थोडावेळ सगळे गप्पा मारत बसले. घरात हसू, बोलणं, आणि आपलेपणाचं वातावरण होतं. मग अनघा आणि अनिकेत दोघांनीही आपापली तयारी पूर्ण केली आणि ऑफिसला जायला निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं… एक नवीन दिवस, नवीन सुरुवात घेऊन त्यांची वाट पाहत होता.


मोनिका ऑफिसला पोहोचली तेव्हा अजून सकाळचीच वेळ होती. ऑफिसमध्ये हलकीशी गडबड सुरू होती. ती शांतपणे आत आली, बॅग जागेवर ठेवली आणि तिच्या डेस्कवर बसली. तेवढ्यात रोनकही ऑफिसमध्ये आला. नेहमीसारखाच निवांत मूडमध्ये… कुणाशी तरी मस्ती, कुणाला चिडवणं, हसत-खेळत सगळ्यांशी बोलणं सुरू होतं. त्याचा आवाज पूर्ण फ्लोअरवर घुमत होता. स्टाफही त्याच्यासोबत हसत होता.

मोनिकाला ते सगळं बघून हसू येत होतं, पण ती स्वतःला आवरत होती. कालच जॉब लागला होता… पहिलाच आठवडा… आणि तोच बॉस समोर. “जरा जपूनच राहिलेलं बरं,” ती मनातच म्हणाली. त्याच्यासोबत मस्ती करावी, असं वाटत होतं… पण धाडस होत नव्हतं. “काय माहिती, काही चुकीचं बोलले तर? जॉबवरून काढून टाकलं तर?” त्या विचारानेच ती थोडी गप्प बसली.

रोनक दूरूनच तिच्याकडे पाहून हसत होता… आणि मोनिका मात्र कामात डोकं खुपसून बसली होती, पण तिचं मन मात्र त्याच्याकडेच अडकून पडलं होतं.

थोड्याच वेळात अनघाही ऑफिसमध्ये आली. नेहमीसारखी टापटीप, चेहऱ्यावर हलकंसं स्मित… कामाचा उत्साह तर तिच्या चालण्यातच दिसत होता. आत येताच तिने सगळ्यांकडे नजर टाकली आणि मोनिकाला तिच्या डेस्कवर बसलेलं पाहिलं.

ती लगेच तिच्याजवळ गेली. “गुड मॉर्निंग, मोनिका…” अनघा हसत म्हणाली.

“गुड मॉर्निंग…” मोनिका पण हसतच म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थोडी घाई, थोडी उत्सुकता आणि थोडी टेन्शन सगळंच एकत्र दिसत होतं.

“काय मग? पहिला दिवस… तयार आहेस ना?” अनघा हळूच विचारत म्हणाली.

“हों… थोडी घाबरलेय, पण जमेल,” मोनिका म्हणाली.

“काही टेन्शन घेऊ नकोस. काही लागलं तर लगेच मला सांग,” अनघा तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवत म्हणाली.

दोघी थोडं अजून बोलल्या, हसल्या… आणि मग अनघा “ओके, मी केबिनमध्ये जाते… काम सुरू करते,” असं म्हणत तिच्या केबिनकडे निघून गेली. मोनिका तिच्याकडे बघत राहिली… मनात थोडा आत्मविश्वास आला होता. आता तिलाही कामाला सुरुवात करायची होती.


अनिकेत ऑफिसला पोहोचला, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. डोक्यात सतत आजोबांचंच बोलणं फिरत होतं, गावाला जाण्याची तिकीटं, सगळ्यांची व्यवस्था, बाबांना विचारायचं… हेच सगळं त्याच्या मनात चालू होतं. “आधी हे काम करू, मग निवांत कामाला बसू,” तो स्वतःशीच म्हणाला.

केबिनमध्ये जाऊन बॅग ठेवली आणि खुर्चीत बसताच त्याने मोबाईल काढला. वेळ न घालवता त्याने लगेच अशोकला कॉल लावला.

“हॅलो बाबा…” अनिकेत म्हणाला.

“हॅलो अनिकेत, ऑफिसला पोहोचलास का?” अशोकने विचारलं.

“हों बाबा. आजोबा म्हणत होते तिकीट बदलचे, ते विचारून घे. गावाला सगळे एकत्र जायचं म्हणत आहेत. तुमचं आणि आईचं, आणि मोनिकाचं पण तिकीट काढायचं आहे. तुम्हाला कोणत्या दिवशी सोयीचं आहे?” अनिकेत शांतपणे सगळं विचारत होता.

अशोक थोडा विचार करून म्हणाले, “हो, सगळे एकत्र गेलो तर मजा येईल. तू तिकीट काढ. आम्ही तयार आहोत.”

हे ऐकून अनिकेतच्या चेहऱ्यावर हसू आलं. “ठीक आहे बाबा, मग मी सगळी बुकिंग करून टाकतो,” तो म्हणाला.

कॉल संपल्यावर त्याचं मन हलकं झालं. “एक मोठं काम संपलं,” तो मनात म्हणाला आणि मग निवांतपणे लॅपटॉप उघडून कामाला लागला.

अशोकने अनिकेतसोबत फोनवर सगळी बोलणी करून घेतली आणि कॉल ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. “सगळे एकत्र गावाला जाणार… किती दिवसांनी घरात पुन्हा गडबड होईल,” ते मनात म्हणाले.

.....

ते हॉलमध्ये आले. ललिता किचनमध्ये काम आवरत होत्या. भाजीला फोडणी देत होत्या. अशोक दाराला टेकून उभे राहिले.

“ललिता… जरा ऐक ना,” ते शांतपणे म्हणाले.

“काय झालं?” ललिता वळून म्हणाल्या.

“अनिकेतचा फोन आला होता. सगळे गावाला जायचं ठरवत आहेत. आपलं, तुझं, मोनिकाचं तिकीट काढणार आहे म्हणतोय. तू तयार आहेस ना?” अशोक विचारत म्हणाले.

क्षणभर ललिता थांबल्या… आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

“अरे वा! किती दिवसांनी गावाला जाणार… मस्तच आहे. मी तयार आहे हो. मोनिकालाही बरं वाटेल. सगळे एकत्र गेलो की मजा येईल,” त्या हसत म्हणाल्या.

“हों, मलाही तसंच वाटतं,” अशोक म्हणाले.

ललिता परत कामाला लागल्या, पण आता त्यांच्या हाताला वेगच आला होता. मनात आधीच गावची आठवण, घर, नातेवाईक, लग्नाची लगबग… सगळं डोळ्यांसमोर फिरत होतं. घरात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती.

अशोक हॉलमध्ये खुर्चीवर बसले होते. ललिता किचनमधून हात पुसत बाहेर आल्या. गावाला जाण्याच्या विचाराने दोघांच्याही चेहऱ्यावर हलकासा आनंद होता, पण मनात काही जुन्या गोष्टींची काळजीही होती.

अशोक शांतपणे म्हणाले, “ललिता… आपल्यासोबत अनघा पण असणार आहे. तिच्यासोबत भांडण बसू नको हं. सख्याला बरं वाटेल. जास्त काही बोलू नकोस.”

ललिताने क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं. मग सुस्कारा टाकत म्हणाल्या, “मी तिच्यापासून दूरच राहीन. काही वाद नको मला. तृप्तीचं लग्न आहे… सगळं चांगलं झालं पाहिजे. त्या आनंदात काहीच बिघडायला नको.”

अशोक हलकंसं हसले. “बस, मला हेच ऐकायचं होतं. आपण सगळे मिळून गेलो की घरात आनंदच आनंद राहिला पाहिजे.”

ललिताही हसल्या. “हों… आता फक्त लग्नाची तयारी आणि आनंद. बाकी काही नाही.”

घरात पुन्हा शांत, समाधानाचं वातावरण पसरलं. दोघांच्याही मनात एकच इच्छा होती, यावेळी सगळं सुरळीत आणि आनंदात व्हावं.



रोनक सतत मोनिकाकडे बघत होता. ती कामात गुंतलेली होती, पण त्याचं लक्ष मात्र वारंवार तिच्याकडेच जात होतं. कधी ही माझ्याशी नीट बोलेल… मला तिच्याशी बोलायला पाहिजे… मैत्री करायला पाहिजे… तो मनातच विचार करत होता. तिच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, बोलण्यातली थोडीशी चिडचिड… सगळंच त्याला वेगळं आणि आवडणारं वाटत होतं.

“पण तिच्याशी बोलू तरी कसं…? तिचा नंबर कुठे शोधू…?” तो स्वतःशीच पुटपुटला.

अचानक त्याला काहीतरी आठवलं. “अरे हो… तिने इंटरव्ह्यूवेळी दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये तिचा नंबर असणारच!”

असं म्हणत रोनक लगेच उठला. टेबलवरच्या फाईल्स चाळायला लागला. एकामागून एक फाईल उघडत तो मोनिकाची फाईल शोधू लागला… चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं आणि मनात एक वेगळीच उत्सुकता.


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all