Login

तुझ्यात जीव गुंतला भाग ३

त्या मुलाच्या कानाखाली चांगली लावून दिली
तो जरा अडखळतच बोलला.
"मी केशव."

विलासने देखील संधी साधली आणि स्वतःची ओळख करून दिली.
"हॅलो, मी विलास."

"बरं केशव उद्यापासून डान्सची प्रॅक्टिस करूया का?"

तो तिच्याकडे बघत तर होता;पण त्याला  ती काय बोलतेय हे ऐकू येत नव्हतं.

विलासने त्याला हलकासा चिमटा काढला तसा, तो भानावर आला.

"हो हो चालले,पण मधुरा मी इतका एक्स्पर्ट नाही, म्हणजे आवड म्हणून डान्स करतो, डान्स क्लास कधी लावला नाही."

"इतकंच ना? आवड आहे ते पुरेसे आहे. आवड असेल तर माणूस काहीही करू शकतो."

विलास तिला म्हणाला,
"मधुरा, सकाळी त्या मुलाच्या कानाखाली चांगली लावून दिली."

"ओहह तुही होता का तिथे?"

"हो मी आणि केशवसुद्धा होतो."

"असा राग आला होता मला. त्याचा किळसवाणा स्पर्श झाला तसं मी त्याला मारलं. नालायक साला."

"अरे वा! तू तर शिव्या देखील देते."

"ओहह,सॉरी.पण काय करू डोक्यात बसला तो. वासनेने बरबटलेल्या नजरांचा सामना रोजच कारवा लागतो. रस्त्याने चालत असतांना, मुद्दाम काही पुरुष, मुलं  स्पर्श कारायला पाहतात. तळपायाची आग मास्तकात जाते रे. असं वाटतं ना त्यांचा हातच कापून टाकावा. खूप राग येतो मला.
शिक्षणासाठी, कामासाठी मुली बाहेर पडतातच. हे किळसवाणे अनुभव येत राहतात. मुलींनी चवताळून उठलं पाहिजे."

"हो जशी तू सकाळी चवताळली होती." विलास हसतच म्हणाला.

तितक्यात पाटील मॅडम आल्या.

मधुरा स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. इथे केशव मात्र तिच्या विचारांनी प्रभावित झाला.  तिचं रोखठोक आणि स्पष्टपणे बोलणं त्याला भावून गेलं. मुलींनी असंच असावं, स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना मागे पुढे पाहू नये.  स्वतःचं रक्षण स्वतःच करता यायला हवं.


मधुरा विषयी काही मुली चर्चा करत होत्या.  तिचं नाव तर घेत नव्हत्या ; पण तिच्याविषयी नको ते बोलत होत्या.

सीमा म्हणाली,
" ही जरा जास्तच फॉरवर्ड दिसतीये. बिनधास्त जाऊन मुलांशी बोलते. काहीच कसं वाटत नाही?  स्वतःला जरा जास्तच शहाणी समजते."

नीता  म्हणाली, " हो ना नको ते नखरे करते. फॅशनेबल राहायची नाटके करते. असल्या मुली अशाच असतात, मुलांना आकर्षित करायला त्यांना आवडतं. सतत पुढे पुढे करत राहते.  स्वतः किती हुशार आहे हे सर्वांना दाखवत सुटते. त्या दोघींचं बोलणं ऐकून मधुराला खरंतर राग आला होता; पण त्या दोघींनी तिचं नाव घेतलं नव्हतं आणि जर मधुरा त्यांना काही बोलली,  तर त्या नक्कीच पलटी मारतील हे तिला खात्री होती.  त्या क्षणाला ती  शांतच बसली. डोक्यातला राग तिने शांत केला;  पण मनाला मात्र त्या दोघींचे मागासलेले विचार टोचत  होते.  तिने मनोमन ठरवलं 'वेळ आली की, ह्या दोघींना चांगलं बोलून मोकळी होणार.'

मधुरा घाबरणारी मुलगी  नव्हती.  जे असेल ते तोंडावर बोलून मोकळी होणारी. गोसीपींग करायला तिला अजिबात आवडायचे नाही.  त्या प्रकारापासून ती खूप लांब होती. तिच्यासाठी आयुष्यात अभ्यास, स्वतःचे ध्येय आणि छंद हेच महत्वाचे होते. ती नेहमी स्वतःवर फोकस करायची. खरंतर  तिला कसलीच भीती वाटत नव्हती; कारण ती सरळममार्गी होती. वाईट गोष्टींचा कसलाच नाद नव्हता. चुकीच्या गोष्टींना कधीच ती सपोर्ट करायची नाही.   तरी देखील ती अभ्यासाकडेही तितकच लक्ष देत होती आणि कोणाशी कसं वागायचं बोलायचं हे तिला चांगलं ठाऊक होतं.

संपूर्ण वर्गात तिची एकच जिवाभावाची मैत्रीण होती ती म्हणजे अर्चना. अर्चनाने मनापासून मैत्री केली होती.

थोड्याच दिवसात दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या.
अर्चना आणि मधुरा दोघीही एकमेकींना सर्व सांगायच्या.

मधुरा शांत बसली हे पाहून तिने मधुराला विचारले.

"काय झालं? आता तर किती खुश होती ? डान्समध्ये भाग घेण्यासाठी किती आतुर झाली होती आणि आता काय झालं?  आता चेहरा पाडून का बसली आहे?

"काही नाही गं."

" मधुरा, गप्पपणे सांग काय झालं. मला माहितीये तू विनाकारण अशी शांत बसणाऱ्यांमधील नक्कीच नाही.  अर्चनाला सांगितल्याशिवाय  ती काही शांत बसणार नाही.  हे तिने ओळखलं "बरं सांगते."

ती हळू आवाजात म्हणाली, "अगं त्या सीमा आणि नीता माझ्याबद्दलच बोलत होत्या. म्हणत होत्या ही खूप पुढे पुढे करते आणि फॅशनेबल राहते असं काहीसं बोलत होत्या.  मुलांशी बोलायला काहीच वाटत नाही का?  मी डान्सच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी केशवसोबत बोलायला गेले होते. मला माहिती आहे त्या  मलाच बोलत होत्या. माझं नाव नाही घेतलं; पण तरीही मला शंभर टक्के खात्री आहे.  इतकं कसं काय कोणी कोणावर जळू शकतं?  आणि मी तर त्यांच्यामध्ये अशीही नसतेच, तरीही का कूचक्या सारख्या वागतता?  मला काही समजत नाही बघ.

"जळक्या आहेत त्या, तू चांगली दिसते, राहते हे त्या दोघींना बघवत नाही. तू आहेसच अशी की, वर्गातली सगळी मुलं तुलाच बघत असतात, त्यामुळे त्यांचा जळफळाट होतो. त्यांना कोणीही भाव देत नाही. जाऊ दे त्यांच्याकडे लक्ष देऊ नको."

क्रमशः
अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all