Login

तुझ्यात जीव गुंतला भाग ४

प्रेम स्वतःचं अस्तित्व विसरायला लावणारी गोष्ट
तुझ्यात जीव गुंतला भाग ४

स्वतःच्या खोलीत तो अभ्यास करत बसला होता. अभ्यास कमी आणि मधुराचे विचार डोक्यात फेर धरत होते.
'काय कमाल आहे ही मधुरा.  सहजता आहे हिच्या बोलण्यात.  नक्कीच काहीतरी खास आहे तिच्यात. वाटलं देखील नव्हतं की, मधुराशी इतक्या सहज बोलू शकेल. मधुरामध्ये जादू आहे. छान वाटतंय मी तिच्यासोबत डान्स करणार. अजूनही विश्वास बसत नाहीये. थँक्स टू विलास त्यानेच मला प्रोत्साहन दिले. नाही तर माझ्यात ते धाडस कुठे. त्या निमित्ताने का होईना, जे घडतंय ते मनासारखं घडतंय."'
केशव मधुराबद्दल विचार करत होता.

त्याच्या मनात केवळ मधुरा भरली होती.

मधुरा जरा नाराजच होती.
कॉलेजवरून आली की, ती तिच्या आईशी मंदाशी  गप्पा मारण्यात व्यस्त होत असे.
आज मात्र तसे काहीच झाले नाही. ती शांतपणे अभ्यास करत बसली होती.

मंदाला तिच्यातील बदल जाणवला.

मधुराला जशी कॉफी आवडते अगदी तशीच कॉफी बनवून आणली.  तिच्या पुढ्यात ठेवली.

तिचं लक्षच नव्हतं.

"मधू, काय गं तुझी फेव्हरेट कॉफी तुझ्यासमोर आहे आणि तरी तुझं लक्ष नाही?"

"ओहह, आई तू. सॉरी अभ्यासात मग्न होते."

"खरं सांगतेय?"

"आई, तुझ्याशी खोटं बोलायला जमणार नाही."  ती पुस्तक बंद करत म्हणाली.

"सांग मग काय झालं? आल्यापासून बघतेय उदास आहेस तू."

"आई, माझा मूड खरंच ऑफ आहे. आज सरांनी सांगितले की, डान्स कॉम्पिटिशन आहे. वर्गात मी आणि केशव नावाचा मुलगा आहे त्याने हात वर केला. सर म्हणाले की तुम्ही दोघे डान्स बसवा. मी केशवसोबत बोलायला गेले तर मागे दोन जणी कुजबुज करत होत्या. माझं नाव घेतलं नाही; पण म्हणत होत्या बिनधास्त मुलांशी बोलते वैगेरे, पुढेपुढे करते. मला ते अजिबात आवडलं नाही. तेव्हापासून मन नाराज आहे आणि खरं सांगू का? रागही येत आहे."

"बरं तर हे कारण आहे. मधू, लोकं देवाला नावं ठेवतात तर आपण सामान्य मनुष्य आहोत. हे असं केवळ तुझ्याबाबतीत होतं असं नाही, हे सर्वांच्या बाबतीत होतं. पाय खेचणारे,जळणारे  आपल्या अवतीभोवती असतात. मुद्दाम असं बोलतात की, आपल्याला वाईट वाटेल. आपल्यातील वेगळेपण हे त्यांना खुपते. आपण जे करू शकतो, ते नाही करू शकत ही न्यूनगंडाची भावना त्यांना असं बोलायला प्रवृत्त करते. खरी परीक्षा तर हीच असते, अश्या लोकांच्या  बोलण्याला बळी पडायचे का त्यांना काडीची किंमत द्यायची नाही.
आपली एनर्जी,वेळ अश्या जळक्या लोकांच्या विचारात वाया घालवायची की,  छान काहीतरी करण्यात अर्थात यशस्वी होण्यात खर्ची घालायची हे सर्वस्वी तू ठरवायचे आहे."

"आई, बरोबर बोलतेय तू. मी का अश्या लोकांसाठी वेळ आणि एनर्जी वाया घालवू? मी माझं काम करणार. जे मला आवडतं ते करणार. थँक्स आई. किती छान समजावून सांगितले."

"ऑल द बेस्ट मधू, छान प्रॅक्टिस कर. नक्कीच तू जिंकशील." ती डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

मंदासाठी मधूरा सर्वस्व होती आणि मधुरासाठी मंदा सर्वस्व होती.
त्या दोघींचे एक विश्व होते.
मधुराचे वडील मनोहर ती चार वर्षांची असतांना देवाघरी गेले होते.

मंदा तेव्हापासून मधुराचे संगोपन करत होती.
ह्या जमान्यात आत्मविश्वास असणं खूप महत्वाचे आहे हे ती नेहमीच सांगत.

मंदाने समाजाचे चेहरे फार जवळून पाहिले होते, त्यामुळेच ती मधुराला सक्षम बनवत होती.
कोणावरही अवलंबून राहायचे नाही हे तिला नेहमी सांगत. आयुष्य बदलायला एक क्षण पुरेसा असतो. मनोहर गेला आणि तिचं आयुष्य बदललं.

चांगल्यापेक्षा वाईट अनुभव तिच्या पदरी आल्याने ती मधुराला कणखर बनवत होती. रडण्यापेक्षा स्वतःच्या मनगटात जोर आणून लढणं महत्वाचे हे तिने जाणले होते.

म्हणूनच तर त्यादिवशी तिने त्या मुलाच्या कानाखाली मारली होती.
ती अश्या आईची मुलगी होती जिने दुःखाचे चटके सोसले होते,त्याला सामोरे गेली होती. आयुष्याचे धडे गिरवले होते.

(क्रमशः)
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.