Login

तुझ्यात जीव गुंतला भाग २

Marathi Story
तुझ्यात जीव गुंतला भाग २

"केशव, चल ना पटकन. उशीर झाला आहे." विलास घड्याळाकडे पहात म्हणाला.

"दोन मिनिटं आलोच." बॅगमध्ये वह्या पुस्तक ठेवत तो म्हणाला.

"आई, मी जातो."

"कितीवेळा सांगितले आहे जातो नाही येतो म्हणावं." त्याची आई कमल त्याला दटावतच म्हणाली.

"सॉरी आई.येतो."
कमलच्या पाया पडला आणि निघाला.

"केशव, मला वाटतं ट्रेन सुटेल. लेक्चर गेलं आपलं आणि आपण त्या मधुरासारखं नाही. पहिल्या दिवशी काय एन्ट्री घेतली होती. कमाल आहे पोरगी. इतर मुलींपेक्षा वेगळी आहे ती. नाही का?"

"हो ते आहे."

प्लॅटफॉर्मवर गेले. बघतात तर काय ट्रेन सुटली होती.

"म्हणालो होतो मी उशीर होईल. बघ गेली ट्रेन." विलास

"सॉरी यार."

"तुझ्या सॉरीने परत येणार आहे का ट्रेन?"

केशवने तोंड पाडलं.

"चल आता तोंड पाडू नको. दुसरी ट्रेन येईपर्यंत इथेच थांबुया."

केशवची नजर एका ठिकाणी स्थिरावली.
समोरून मधुरा येत होती.
ती देखील ट्रेनची वाट पाहण्यासाठी थांबली.

काय गोड दिसत होती. गुलाबी रंगाचा ड्रेस त्याला शोभेल असे नाजूक कानातले. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही कपड्यामध्ये ती सुंदरच दिसायची.

विलासने तिला पाहिले तसं त्याच्या तोंडातून शब्द निघाला.
" ब्युटीफूल."

"केशव, काय दिसते ही मधुरा. एक नंबर पर्सनॅलिटी आहे. तिच्याकडे बघतच बसावं अशीच आहे."

ट्रेन यायला बराच वेळ होता.  मधुरा  वाट पाहत होती. काय झालं माहित नाही, तिने  एका मुलाला जोरात कानाखाली लगावली. तो गाल चोळत उभा होता. तिचे डोळे प्रचंड लाल झाले होते. राग अनावर झाला होता. तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं ती किती संतापली आहे.

" नालायक मुला. लाज वाटत नाही हे काम करताना."

तिच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमले. केशव आणि विलास  जवळ जाऊन उभे राहिले. नक्की काय घडलं आहे कळत नव्हतं. गर्दीतल्या एकाने विचारले, "काय झालं? का मारलं त्या मुलाला"

ती अजूनच चवताळली.  दात ओठ खात  त्याच्याकडे बघतच म्हणाली, " किती घाणेरड्या नजरेने पाहत होता मला आणि मुद्दाम मला स्पर्श करत होता. ह्याच लायकीचा आहे हा."

काय रे लाज वाटत नाही का मुलीला छेडताना? आजूबाजूचे लोक आता आपल्याला मारतील या भीतीने, तो मुलगा नरमला. मान खाली घालून तो निघून गेला.

"पुन्हा जर कोणत्या मुलीला त्रास दिलास ना तर याद राख तुझे हात पाय तोडेल."
ती जमेल तितक्या मोठ्या आवाजात त्याला म्हणाली.

मधुरा सुंदर आणि कॉन्फिडंट होती, त्याचबरोबर अन्यायाविरोधात आवाज उठवणारी होती.  निर्भीड होती.  विलास आणि केशवला तिचं  कौतुक वाटलं.

" खरंच डेरिंगबाज आहे ही पोरगी. काय जबरदस्त कानाखाली वाजवली." विलास.

मधुराच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू पाहून केशव खरंच प्रभावीत झाला होता.  याआधी कधीच कोणत्याही मुलीसाठी असं वाटलं नव्हतं. मधुरासाठी जी फिलिंग होती ती वेगळीच होती.


तितक्यात ट्रेन आली.
मधुरा ट्रेनमध्ये चढली. केशव जाणूनबुजून तिच्या बाजूच्याच डब्यात चढला. ती कानात हेडफोन लावून मस्त गाणी ऐकत होती. वाऱ्याने उडणाऱ्या तिच्या केसाला अलगद बाजूला करत होती. तिच्या बोलक्या डोळ्यातून ती बाहेरचं सौंदर्य टिपत होती.

तितक्यात एक लहान मुलगी भीक मागायला आली. तिने हेडफोन बाजूला काढला. बॅगमधून बिस्किटचा पुडा स्मितहास्य करत दिला. त्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

पुन्हा गाणी ऐकण्यात व्यस्त झाली.
स्टेशन आलं ती उतरली.
केशव आणि सुहास दोघेही उतरले.

ती झपझप पावलं टाकत निघाली. केशव उगाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मंद मंद हसत होता. विलासच्या तोंडाचा पट्टा सुरू होता आणि हा नुसता हं, हो करत त्याला रिस्पॉन्स देत होता.

"केशव, काय हे लक्ष कुठे आहे? आज काहीच बोलत नाहीये."

"हम्म."

"अरे गाढवा हम्म काय? कोणत्या खोल विचारात गुंतला आहेस."

"नाही रे कसला विचार. बोल ना."

"राहू दे नाही बोलत." तोंड फुगवत विलास म्हणाला.

केशवने त्याच्या गळ्यात हात घातला.

"हल्ली खूप रागवायला लागला आहेस तू?"
त्याच्या पोटात गुदगुली करत म्हणाला.

दोघांची मज्जा मस्ती चालली होती.

वर्गात गेल्यावर पाहिले तर सर नव्हते आले, 'नशीब ओरडा भेटण्यापासून वाचलो.'

असा विचार करत केशव बेंचवर बसला.

थोड्यावेळाने सर आले.
लेक्चर संपलं आणि त्यांनी सूचना दिली.


"आपल्या कॉलेजचं डान्स कॉम्पिटिशन होणार आहे तर कोण कोण भाग घेणार आहे?"

मुलींच्या रॉमध्ये केवळ मधुराने हात वर केला होता.
मुलांच्या रॉमध्ये कोणीच नाही.
तितक्यात विलासच्या लक्षात आलं की, केशव छान डान्स करतो.
त्याने केशवचा हात पकडून वर केला.


"ओके,आपल्या क्लासमधून केशव आणि मधुरा. दोघांनी मिळून छान डान्स बसवा." सर निघून गेले.

"विलास, काय केलं हे?"

"काय केलं काय? मला माहीत आहे, तू चांगला डान्स करतो. बघ आणि मधुरासोबत डान्स करायची ही संधी आहे." तो त्याला डोळा मारत म्हणाला.

"तुझं तर काहीतरीच." मनात तर लाडू फुटत होते.

तितक्यात मधुरा केशवसमोर येऊन उभी राहिली.

"हाय मी मधुरा." असं म्हणत हात मिळवण्यासाठी तिने हात पुढे केला.

केशवला तर विश्वास बसेना.

विलासने त्याला चिमटा काढला.

केशव पटकन उभा राहिला आणि त्याने तिचा हात अलगद धरला.

"मी केशव."

तर अशीही गोड सुरवात होती मैत्रीची की प्रेमाची, हे तुम्हीच ठरवा.
बघू.

केशव मात्र प्रचंड खुश होता. ज्या मुलीसोबत मैत्री करायला घाबरत होता आज चक्क ती समोर होती आणि तिचा हात त्याच्या हातात होता.

(क्रमशः)
अश्विनी ओगले.
आजचा भाग आवडला असेल तर कंमेंटमध्ये जरूर सांगा. मला जरूर फॉलो करा.