Login

तुझ्यात जीव गुंतला भाग ६

स्वराज जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. केशवच्या अंगाचा तिळपापड होत होता.
तुझ्यात जीव गुंतला भाग ६


मधुरा, अर्चना,केशव आणि विलास ह्या चौघांची चांगली मैत्री झाली. जिथे तिथे एकत्रच असायचे. सहवासाने केशव मधुराला चांगल्या पद्धतीने ओळखू लागला होता. मधुरासाठी ही मैत्री होती; पण केशवसाठी मैत्रीच्या पुढे हे नातं होतं. वेळ आली की तो सांगणार होता. आता मात्र तिची सोबतच त्याला सुखावत होती.

मधुरा अशी होती की, कोणीही तिच्याकडे सहज आकर्षित व्ह्यायचे. तिच्या वर्गातला एक मुलगा स्वराज तिच्याकडे आकर्षित झाला होता. स्वराज दिसायला हॅन्डसम होता. चार चौघात उठून दिसायचा. त्याच्यातही बराच आत्मविश्वास होता. मधुरा ज्या दिवशी कॉलेजेला यायची नाही तेव्हा स्वराजचा मूड ऑफ व्हायचा. तिची एक झलक पाहण्यासाठी स्वराज वेडापिसा व्हायचा, होतीच मधुरा अशी. ब्रेन विथ ब्युटी होती ती. जेव्हापासून कॉलेजे सुरू झालं तेव्हापासून त्याचेही तिच्याकडे लक्ष होतं.

कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. स्वराजने मनोमन ठरवलं आता काहीही करून मधुराला मनातलं सांगायचे. मधुरा तर केवळ केशव,विलास आणि अर्चना सोबत राहायची. तिच्याशी त्याचं इतकं बोलणं नव्हतंच. कधी तरी हाय हॅलो इतकंच व्ह्यायचे.

त्याने विचार केला
'पहिला मैत्रीचा हात पुढे करतो आणि मग मनात प्रेम आहे हे सांगून मोकळा होतो. मधुराचा जो देखील रिस्पॉन्स असेल तो मला मान्य असेल. तो फार क्लिअर होता.'


फ्रेंडशिप डे होता.

मधुरा, अर्चना, केशव आणि विलास चौघेही केम्पसमध्ये बसले होते.

स्वराज मधुराजवळ गेला.

"हाय मधुरा." त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि डोळ्यात वेगळी चमक.

"हाय स्वराज."

केशव,विलास आणि अर्चना स्वराजला बघत होते.

"हॅप्पी फ्रेंडशिप डे." त्याने तिच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधला.

मधुराने देखील त्याला बँड बांधला. मधुराने मैत्रीचा स्वीकार केल्यामुळे तो भलताच खुश झाला.

मधुरासाठी त्याने लाल रंगाचे स्पेशल फ्रेंडशिप बँड घेतला होता. केशवच्या नजरेतून ते सुटलं नाही.

स्वराजने अर्चना, केशव आणि विलासला देखील बँड बांधला; पण तो साधा होता. त्याला स्वराजचा खूप राग आला.

'माझ्या मधुरावर लाईन मारतो आहे. बघतोच.'

त्याच्या अंगाचा तितळपापड झाला.

"मधुरा, आज काही प्लॅन आहे का?"

"हो, आम्ही चौपाटीवर फिरायला जाणार आहोत." मधुराने सांगितले.

" इफ यू डोन्ट माईंड. मी तुम्हाला जॉईन होऊ शकतो का? आणि असेही आता मी तुझा मित्र झालो आहे, सॉरी आय मिन तुमचा मित्र झालो आहे."

"व्हाय नोट." मधुराने होकार कळवला.

स्वराज तिच्याच बाजूला बसला. केशवला हे सगळं सहन होत नव्हतं.

'हा इतका जवळ काय येण्याचा प्रयत्न करतो आहे? त्याला कळत होतं. त्याला असं वाटत होतं मधुराने त्याच्याशी फ्री वागू नये.'

पण तो कोणत्या तोंडाने बोलणार? अर्चना, विलास दोघांनाही तो खटकत होता; कारण इतके वर्ष चौघांची मैत्री होती आणि हा असा अचानक इतका जवळ येऊ पहात होता.

स्वराजला कोणीतरी आवाज दिला.

" मधुरा दोन मिनिटं मी आलोच."

स्वराज त्याच्या मित्राजवळ प्रथमेशजवळ गेला. प्रथमेश त्याचा खास मित्र होता. स्वराज प्रथमेशला सारं काही सांगायचा. त्याला माहीत होतं की, त्याला मधुरा किती आवडते. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून त्याने मनातलं प्रथमेशला सांगितलं होतं.

"स्वराज, प्रेमाची पहिली पायरी,मैत्री स्वीकारली का?"

स्वराज खूप खुश होता.

तो म्हणाला, "हो प्रथमेश मधुराने माझी मैत्री स्वीकारली आहे आणि आज आम्ही चौपाटीला फिरायला जाणार आहोत."

"अरे वा! चांगली सुरुवात आहे. मस्त एन्जॉय कर आणि लवकरच प्रेमाची ही कबुली दे."


"प्रथमेश जरा भीती वाटते रे. मैत्री तर केली; पण प्रेम.. कसं बोलू मी मधुराशी?"


"हे तू बोलतोय? स्वराज तुझ्यासारखा कॉन्फिडंट मुलगा आहे का आपल्या वर्गात. डोन्ट वरी. सगळं ठीक होईल. गो विथ फ्लो."


इथे अर्चना चिडली होती. ती मोठ्यानेच म्हणाली,

"मधुरा, हा काय इतका आपल्याला चिकटतोय? आपल्या चौघांचा ग्रुप आहे ना. मग हा कशाला आपल्या सोबत येतोय? फ्रेंडशिप वगैरे ठीक आहे; पण आपल्या सोबत कशाला हा?"


अर्चना केशवच्या मनातलं बोलली होती. त्यालाही तेच वाटत होतं. स्वराज नकोच होता. विलासही बोलता झाला.

"हो ना आपल्या ग्रुपमध्ये हा कशाला? त्याचा ऑलरेडी ग्रुप आहे ना? त्याने त्याच्या ग्रुप सोबत जावं. मध्येच कशाला इथे आला काय माहित? हा जरा जास्तच इन्व्हॉल होतोय."

खरंतर सगळेच नाराज झाले होते. चौघेजण एकमेकांसोबत कम्फर्टेबल होते आणि हा असा अचानक आल्यामुळे कोणालाही पटलं नाही. मधुराला त्याचं मन नाराज करायचं नव्हतं. खरं तर ती असं फटकळपणे वागणारी नव्हतीच. आता तो स्वतःहून आला होता, तर त्याला नाही तरी कसं म्हणायचं?

तिने अर्चनाला आणि विलासला समजावलं "ठीक आहे ना. एक दिवस आपल्या सोबत आला तर काय फरक पडतोय आणि असेही फ्रेंडशिप डे आहे, आपण एन्जॉय करणार आहोत आणि आपल्या आनंदात एखाद्याला सामील करून घेतल्याने काही होत नाही. अर्चना इतकं डोकं गरम करू नको आणि तो चांगला मुलगा आहे, हुशारही आहे. तो काही वाईट मुलगा नाही. सो जस्ट चिल."


"मधुरा, हे तू बोलतेय? असेल तो चांगला पण आपल्या ग्रुपमध्ये नको ना. तू सांग त्याला नको येऊ म्हणून." ती तोंड फुगवत म्हणाली.


"अगं अर्चना असं काय बोलते? त्याची ईच्छा आहे आपल्यासोबत यायची. तो स्वतःहून बोलला. त्याला नाही बोलायला बरं नाही वाटत आणि मैत्री केली आहे, तर इतकं तर आपण करूच शकतो. इट्स ओके."

तो चांगला मुलगा आहे. हे मधुराच्या तोंडातून ऐकून केशवला अजूनच वाईट वाटलं. आता त्याला भीती वाटू लागली, स्वराज मधुराशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता; पण तिला वाटत होतं की, ती फक्त मैत्री आहे. केशव फक्त शांतपणे बसून हे ऐकत होता. अबोल केशवला विलास आणि अर्चनाप्रमाणे बोलता तर येत नव्हतं; पण तो देखील नाखुश होता. मधुराला स्वराजच्या मनात काय चाललं आहे हे कळेल का? आता हा तर लव ट्रँगल झाला होता. काय होईल पुढे? वाचत रहा तुझ्यात जीव गुंतला.
(क्रमशः)
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये सांगा. मला जरूर फॉलो करा.