तुझ्यात जीव गुंतला भाग १४
विलास निघून गेला आणि केशव शांत डोक्याने विचार करू लागला.
'मी असं नाही वागू शकत. विलास बरोबर बोलतोय. भावनिक होऊन चालणार नाही. मधुरा मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या प्रेमाचा शेवट असा होईल. किती विचित्र मन आहे हे काही केल्या गुंता सुटत नाहीये. इतकं सोप्प नाही मधुराच्या विचारातून बाहेर येणं. मी तिला विसरू शकत नाही, कधीच नाही. पहिलं प्रेम विसरता येत नाही. अशक्य आहे.'
विचारांनी डोकं सुन्न झालं होतं.
केशव कॉलेजला यायचा; पण आधिसारखा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये थांबत नव्हता.
लेक्चर झालं की लगेच निघून जायचा.
सर्वांना त्याच्यातील बदल लक्षात येत होता.
मधुराला देखील तो बदल लक्षात आला.
एक दिवस असाच तो निघू लागला.
मधुराने आवाज दिला.
तो थांबला.
"केशव, खूप दिवस झाले पाहते आहे हल्ली तू लगेच निघून जातो. सगळं ठीक आहे ना?"
"हो सगळं ठीक आहे."
"बरं."
ती काही बोलणार तितक्यात म्हणाला,
"मधुरा, निघतो आज जरा काम आहे."
तो निघून गेला. विलास देखील त्याच्यासोबत निघून गेला.
मधुराला समजेना. हा असा का वागतोय?
आधी तर तास न तास बसायचा.
"मधुरा, काय गं काय झालं?" स्वराज.
"हल्ली केशव आपल्यासोबत थांबत नाही. निघून जातो."
"माझ्याही लक्षात आलं आहे. असेल काही तरी काम."
"रोजच ?"
तितक्यात अर्चना आली.
"विलास आणि केशव कुठे आहेत?" अर्चना.
"गेले घरी." स्वराज..
"काय हे दोघेही असे निघून जातात. रोजचं झालं आहे. आज मस्त बाहेर फिरायचा मूड होता." अर्चना तोंड पाडत म्हणाली.
"चल मग जाऊया." स्वराज..
"काय जाऊया, तुम्ही दोघे लव्ह बर्ड सोबतीने फिरता आणि मी एकटी पडते."
ती पटकन बोलून गेली.
"सॉरी,मला तसं म्हणायचं नव्हतं."
"मग कसं म्हणायचं होतं?" स्वराज चिडवत म्हणाला.
"खरंच तसं म्हणायचे नव्हते."
"इट्स ओके डिअर." स्वराज शांतपणे म्हणाला.
"बरं आपण निघुया का?" मधुरा.
________________________________
"विलास, तू का थांबला नाहीस?" थांबायचे होते." केशव.
"मी माझ्या मित्राला सोडून राहू?"
"माझं कारण वेगळं आहे रे. विलास, मी जर मधुराच्या अवतीभोवती असलो, तर मला अजून त्रास होईल. म्हणून मी लगेच निघून येतो. कनेक्टेड राहायला नको वाटतं. प्रयत्न करतोय तिच्यापासून आणि तिच्या विचारापासून दूर जाण्याचा."
"मला इतकं डिटेल मध्ये सांगायची खरंच गरज नाही. मला माहितीये."
"तू त्यांच्यासोबत थांबत जा."
"केशव, जिथे तू तिथे मी. बस."
"तू ऐकणार नाहीस ना?"
"मी कधी ऐकतो का?" डोळा मिचकावत म्हणाला.
केशव प्रेमात नाही पण मैत्रीत जिंकला होता.
विलास सारखा सावलीप्रमाणे मित्र जो सोबतीला होता.
तो क्षणोक्षणी आधार देत होता. त्याला त्याच्या मनाची अवस्था माहीत होती. केशवला एकट्याला सोडत नव्हता.
खरं प्रेम आणि मैत्री ही नशिबानेच लाभते.
बरोबर ना?
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.