"स्वराज, माझं काय चुकलं? मी कुठे कमी पडले? प्लिज तू तिचा नाद सोड. आपल्या अथर्वकडे बघ. आपला संसार आहे. प्लिज प्लिज असं करू नको." ती गयावया करत होती.
तो मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता.
"मला घटस्फोट हवा आहे."
"माझं आणि अथर्वचं काय?"
"तुला हवा तितका पैसा मी देईन. तू भविष्याची चिंता करू नको."
"पैसाच सगळं काही असतो?" नेहा म्हणाली.
"बघ नेहा मी तिच्यावर प्रेम करतो. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मला इतकंच माहित आहे."
"आणि माझ्यावर कधी प्रेम केलं नाही का?" ती फार आशेने त्याच्या उत्तराची वाट बघत होती.
तो काहीच न बोलता निघून गेला.
ती शून्यात कुठेतरी हरवली.
डोळ्यातुन अश्रू येत होते. ईवल्याश्या हाताने अथर्व तिचे अश्रू पुसत होता.
तिला तर असं वाटत होतं जीव देऊन सगळं संपवून टाकावं. हा मानसिक त्रास सहन होत नाहीये.
अथर्व जोरजोरात रडू लागला. ती भानावर आली.
तिच्या अंतर्मनाने साद घातली.
'नेहा, काय अभद्र विचार करतेय ? तुझ्या मुलाकडे बघ. तुझ्याशिवाय त्याचं आहे तरी कोण? आणि तुझं आयुष्य इतकं कवडीमोल आहे का? जीव देऊन सगळं संपवते म्हणे. पुन्हा असा विचार करू नको आणि कोणत्या माणसासाठी रडतेय? ज्याने कधी तुला आपलं मानलं नाही. त्याच्या आयुष्यात तुझं स्थान कधीच नव्हतं. तुझ्या भावनांची किंमत केली नाही. हे असं कमजोर बनून अश्रू गाळण्यापेक्षा सांग त्याला मलाच तुझ्यासोबत संसार करायचा नाही. जा खुशाल जिथे जायचं आहे.
तू माझ्या आयुष्यातून निघून गेला तर माझं आयुष्य थांबणार नाही. नेहा, तुझ्याविना मी सुंदर आयुष्य जगू शकते. उलट ह्या नात्यात आल्यापासून तू जगणं विसरली आहे. मानसिकरित्या खचून गेली आहे. हुशार,कर्तृत्ववान नेहा चार भिंतीत स्वतःचं अस्तित्व हरवून बसली आहे. तू अशी नव्हतीच. शिकलेली मुलगी आहेस. तुझ्या आयुष्याची दोर तुझ्या हाती राहू दे.
ते नातं तुटलेलंच बरं ज्या नात्यात केवळ आणि केवळ घुसमट आहे.
ह्या नात्यात राहिलीस तर रोज मरशील. तुझा जन्म ह्यासाठी आहे का? सावर स्वतःला, धीर दे. नवं क्षितिज तुझी वाट पाहतय. तुला उंच आकाशात भरारी घ्यायची आहे, तुझ्या पिल्लाच्या पंखात तूच ताकद भरायची आहे. आई म्हणून कणखर व्हायचं आहे. एक जीव तुझ्यावर विसंबून आहे नेहा. त्याला कोणत्या प्रकारचं आयुष्य द्यायचं आहे हे ठरवणे तुझ्या हातात आहे. असं पाऊल उचल की तुझ्या मुलाला तुझा अभिमान वाटला पाहिजे. तू त्याचा आदर्श आहे. हो तूच त्याचा आदर्श आहे."
समाप्त.
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे. You tube किंवा इतर ठिकाणी कथेचा वापर केला तर कारवाई करण्यात येईल..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा