Login

तुला जपणार आहे भाग १

बालपण म्हणजे अत्तराची कुपी आयुष्यभर दरवळणारी
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

©®शुभांगी मस्के

तुला जपणार आहे
भाग १

"दुधापेक्षा दुधाच्या सायीवर जास्ती प्रेम असते." पण या पोरीला कोण सांगणार?"

"जगात ही एकटीच आई झालीय, हिने जन्माला घातलयं मुलं? आम्हाला लेकरं झालीच नाहीत? खोटं वाटेल पण सासू काय कारावास करेल तशी वागते ही पोर आजकाल. ऑफिसला जाते पण पोरीचं खाणंपिणं, झोपणं, तिचं हगणं मुतणं, तासातासाला कॉल करून मिनिटामिनिटांची विचारपूस करते.

"लहानपणी हीच नाही का, तासनतास शेजारच्यांच्या भरवशावर असायची? कुणीही पटकन उचलून खेळायला घेऊन जायचं? आणि हिला मात्र, शेजारी-पाजाऱ्यांनी तिच्या लेकीला हात लावलेला म्हणून खपत नाही. सतत चिडचिड चिडचिड करत असते. आता हिच्या पोरीला सांभाळायचं, हिच्या प्रश्नांना उत्तर द्यायची, म्हणजे?" मंदाताईंच्या कपाळावर आठ्यांचं जाळं दाट झालं.

"काय झालं? कसली एवढी चिडचिड? दे माझ्याकडे तिला!" मकरंदरावांनी छोट्या सईला जवळ घेतलं.

"तुमची लाडकी लेक अनन्या. लक्ष लागेना वाटतं तिचं ऑफिसमध्ये. सतत तिचे फोन, वैताग आलाय नुसता. सासूवर अविश्वास, एकदा समजू शकते पण जन्मदात्या आईवर विश्वास नाहीये म्हणजे? खरं वाटेल का कुणाला?"

"सासू गेली माझी पण हिच्या रुपात दुसरी सासू ठेवून गेलीय. या वयात सासुरवास सहन करावा लागतोय, असंच वाटायला लागलंय हल्ली." मंदाताई चिडल्या होत्या.

"अगं, आई आहे ती सईची. चिमुकल्या जीवाला सोडून जाताना, एका आईच्या मनाची घालमेल, वेगळी सांगायला हवी का तुला?" उगाच नाही म्हणत, "घार फिरते आकाशी आणि चित्त तिचे पिल्लापाशी."

"आजकाल मुलींसाठी नोकरी म्हणजे त्यांचा स्वाभिमान आणि लेकरू म्हणजे तीच आईपण. काळजाच्या तुकड्याला असं दुसऱ्यांच्या भरवशावर सोपवून जाणं, सोप्प नाहीये. आपल्या लेकीला, आपण नाही समजून घ्यायचं तर मग तिने कोणाकडे बघायचं?" मकरंदराव शांतपणे बोलले.

"दुसऱ्यांच्या भरवशावर म्हणजे? परके आहोत का आपण तिच्यासाठी?"

"तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तिला आणि दुधावरच्या या सायीसाठी किती नवस केले माझं मला माहिती.. हो ना गं सई बाळा" मंदाताईंनी सईच्या गालाचे पापे घेतले, आजी आजोबांच्या बोलण्याला प्रतिसाद देत सईसुद्धा छान हुंकार देत होती.

"असो.... तुम्हाला तुमच्या अनु विरुद्ध शब्दही पचणार नाहीये! बलोबल (बरोबर) ना गं सई." तोतरे बोल पुटपुटत, मंदाताईं स्वयंपाक घरात निघून गेल्या. त्यांनी दूध कोमट केलं, बाटलीत ओतलं आणि दुधाची बाटली, मकरंदरावांचा हातात आणून दिली.

अंगणात पोर्चमध्ये खुर्चीवर बसणार तोच, मोबाईलची पुन्हा रिंग वाजली.

"हे बघा, निवांत बुड टेकवलं सुद्धा नाहीये. आला लगेच कॉल, तिचाच असणार?" मंदाताई झटक्यातच उठल्या.

"अगं बाई, तू होय!" क्षणात मंदाताईंच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली, छोट्या बहिणीचा कॉल त्यांनी उत्साहात उचलला.

"अहो, मी आहे रूममध्ये, काही लागलं तर बोलवा. सईचं दूध पिऊन झालं की, दुधाची बाटली तोंडातून आठवणीने बाहेर काढा तिच्या." एवढं बोलून, मंदाताई रूममध्ये निघून गेल्या.

"सई बाळा, आता तुम्ही आणि आम्ही. निदान तासभर तरी.. आपण दोघेच. तेवढीच डोक्याला शांती. नाहीतर या मायलेकी म्हणजे ना!" मकरंदराव बोलता बोलता थांबले.

त्यांनी सईच्या तोंडाला दुधाची बाटली लावली, झोपाळ्यावर हलके हलके झोके घेत, तिच्याशी गप्पा सुरू झाल्या. आठ दहा महिन्याची सई, मकरंद रावांच्या मांडीवर चुळबूळ करत बाटलीने दूध पित होती. डोळ्यात झोप आली आणि लगेच डोळे मिटून शांत झोपी गेली.

साडे सहा वाजले होते. धाडकन गेट आपटल्याचा आवाज आला, तशी गेट उघडून अनन्या तावातावात आत आली.

"बाबा, अहो मोबाईल कुठे आहे तुमचा? आई कुठे आहे? किती कॉल केले मी तुम्हा दोघांना?" तनतन करत अनन्या घरात गेली.

गेटचा आवाज आला तशा, मंदाताई बाहेर आल्या.

"आई, अगं किती कॉल करायचे तुला? कॉल का उचलत नव्हतीस? बघ जरा मोबाईलमध्ये? एवढं काय गं महत्वाचं बोलायचं असतं, तासतासभर?" आल्याआल्या अनन्याची चिडचिड सुरू झाली.

खांद्यावरची बॅग तिने सोफ्यावर जोरात आपटली, टेबलावरची बाटली उचलून घटाघटा पाणी प्यायली.

थोडी शांत झाली तशी हळूच बोलली. "बाबांना पण कॉल केला मी, त्यांनी पण उचलला नाही. तुझा मोबाईल पहिले बिझी आणि नंतर रिंग गेली पण तू उचलला नाही. घाबरले ना मी!" अनन्या बोलता बोलता थांबली.

"गच्चीवर गेले होते, कपडे आणायला" सईच्या कपड्यांच्या घड्या घालत मंदाताई बोलल्या.

"अरे, तू मला कॉल केलास का? आवाज कसा नाही आला मला." मकरंदराव घरात आले, त्यांनी चार्जिंगला लावलेला फोन हातात घेतला.

"बाबा, अहो.. सई! एकटीला सोडलं का तिला पोर्चमध्ये? झोपाळ्यावरून पडली म्हणजे? एकटीला नका सोडत जावू असं." अनन्या धावतच बाहेर आली आणि झोपलेल्या सईला तिने पटकन कडेवर उचलून घेतलं. घरात आणलं आणि पलंगावर झोपवलं.

"अगं, मी बसलो होतो तिच्याजवळ. गाढ झोपली होती ती, एवढ्यात नाही उठायची म्हणून मोबाईल घ्यायला आलो, जाणारंच होतो बघ."

"बरं केलंस घेऊन आलीस तिला घरात. संध्याकाळ झालीच आहे तशीही. लेकी जवळ बस जरा वेळ, दम घे जरा." मकरंदराव शांतपणे बोलले.

"चहा टाकतेस?" त्यांनी मंदाताईंना सांगितलं.

मंदाताई स्वयंपाक घरातून, चहा घेऊन बाहेर आल्या. मकरंदरावांना आणि अनन्याला त्यांनी चहा दिला. "मावशीचा कॉल आलेला, बऱ्याच दिवसात बोलणं झालं नव्हतं. गप्पा रंगल्या, भान राहिलं नाही. महत्वाचं म्हणजे, तुझा कॉल येतोय कळलं नाही, म्हणून कॉल मिस झाले असतील." मंदाताई घडल्या नडल्या प्रकरणाची सारवासारव करत बोलल्या.

"आई अगं कोणती वेळ कशी येते, सांगता येतं का? बाबांनी पण कॉल उचलला नाही. इथे जीवाला घोर लागून राहतो नुसता" सईच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत ती बोलत होती, बोलताना तिचं मन भरून आलं होतं.
क्रमशः
शुभांगी मस्के...


0

🎭 Series Post

View all