Login

तुला जपणार आहे भाग २

बालपणीच्या कटू आठवणी पिच्छा सोडत नाही तेव्हा
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

©®शुभांगी मस्के

तुला जपणार आहे

भाग २

"अनन्या बाळा, शांत हो"
"आजकाल, जरा जास्तीच चिडचिड करायला लागलीय असं नाही का वाटतं तुला? महत्वाचं म्हणजे, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं नाहीये ते."

"सईची आई, नात्याने तुला तिची काळजी, आम्ही समजू शकतो पण तू खूप जास्ती पझेसीव्ह होतेय असं नाही का वाटतं तुला?" मकरंदराव समजवण्याचा सुरात बोलले.

"आजकालच्या पोरी तुम्ही. तुम्हालाच काय ती लेकरं झाली? आम्हाला लेकरं झालीच नाहीत जशी!"

"एवढे उन्हाळे पावसाळे बघून झालेत आमचे. आता तुम्ही शिकवणार, आम्हाला? लहान लेकरांना, कसं सांभाळायचं? नात आहे ती आमची, जीवापलीकडे जपतो आम्ही तिला. तरी कसली गं काळजी तुला." मंदाताई थोड्या चिडूनच बोलल्या.

"तुझा प्रॉब्लेम तरी काय, कळू तरी दे आम्हाला. दिवा घेऊन शोधू तरी, असं घराणं सापडणार नाही; असं सासर आहे तुझं. सोन्यासारखा जावई आहे समजदार. सासू सासरे पण वाईट नाहीयेत. लग्नाला आठ वर्ष झालीत. लेकीसारखं जपतात तुला. पदरात बाळ नव्हतं एवढी वर्ष, शब्दाने बोलले नसतील तुला काही. सासूबाई आई सारख्याच आहेत म्हणालीस आणि बाळंतपण सासरी केलंस. आजवर एकही तक्रार नाही कधी, मग आताच असं काय झालं? ऑफीसला जायला लागली आणि तुझा आमच्या सगळ्यांवरचा विश्वासच उडला."

"पोस्टपार्टम, मूड स्विंग्ज, तुझी चिडचिड वगैरे ठीक आहे पण आता जरा अतीच होतंय बरं का!"

"बरं, आता सईला इथे आणून ठेवतेस. त्याबद्दल आमचं काही म्हणणंच नाहीये पण प्रॉब्लेम तुलाच. खूपच, धावपळ होत असेल आणि नसेलच सोसत तर घे सुट्ट्या, नाहीतर सोडून टाक सरळ ती नोकरी." मंदाताई फटकळपणे बोलल्या.

अनन्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. डोळ्यातली आसवे लपवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला तरी बांध फुटलाच. बराच वेळ ती फक्त सईकडे बघत तिला हळूवार थोपटत होती. रडून मोकळ होऊन जाण्याची, मकरंदराव वाट बघत तिथेच तिच्या शेजारी बसले होते.

अनन्या शांत झाली तसं त्यांनी तिला, "काय झालं?" म्हणून पुन्हा विचारलं. तिने फक्त नकारार्थी मान हलवली.

"एक आई म्हणून तुझी काळजी, आम्ही समजूच शकतो पण आमची ती कुणीच नसल्यासारखी, तू का वागतेस हल्ली. तुला विश्वास नाहीये का आमच्यावर!" मकरंदरावांनी स्पष्टच विचारलं.

"तुला सांभाळलं, लहानाची मोठी तू अशीच झाली का?" मंदाताईं पुटपुटल्या.

"आई अगं मोठं व्हायला काय लागतं? आपोआप मोठी होतात मुलं. मी ही तशीच झाली मोठी.. पण ..." आणि बोलता बोलता अनन्या मध्येच थांबली.

"पण काय पण?बोलता बोलता थांबू नको!...... स्पष्ट बोल काय ते?" मंदाताई जाब विचारण्याच्या सुरात बोलल्या.

"मुली लवकर मोठ्या होतात, आईवडिलांना कळत देखील नाही, असं म्हणतेस ना तू!" अनन्या, बोलली तशी मंदा ताईंनी होकारार्थी मान डोलावली.

"आई तुला आठवतेय... मी दुसरीत असेन. आपल्या जुन्या घराशेजारी राहणाऱ्या काकांना मी खूप घाबरायचे. तू बाहेर जाताना मला त्यांच्या घरीच ठेवून जायचीस. काका, मला मांडीवर बसवायचे आणि कुठे कुठे हात लावायचे? मला नको वाटायचा तो स्पर्श."

"तू सतत मला काही तरी खाण्यापिण्याचं सामान घेऊन त्यांच्या घरी पाठवायचीस. एकदा भाजीची वाटी नेऊन दे म्हणून सांगितलंस."

"मी नाही नेऊन देणारं, भीती वाटते मला त्या काकांची." मी म्हटलं.

"तोंडावर उलट उत्तर द्यायला कुठून शिकलीस." तू खूप चिडली होतीस, मारलं होतं तू मला."

"काका मला आवडत नाही, काकांची भीती वाटते" मी तुला म्हटलं.

"लहान आहेस तू, काका लाड करतात तुझे." उलट तू मलाच समजावलं होतं.

"पाचवी सहावीत असेल मी. मॅथ्स, सायन्सच्या ट्युशनला जायचे. कॉलनीत राहणाऱ्या एका दादासोबत पाठवायचीस तू मला. येता जाता तो दादा, मला खूप घाण घाण प्रश्न विचारायचा. सायन्सच्या पुस्तकात माझ्या अभ्यासाचा विषय आहे म्हणायचा. माझ्या शरीरात होणाऱ्या बदलांवर प्रश्न विचारायचा. एकदा तर त्याने माझ्या छातीला हात लावला... दुखलं होतं मला खूप? मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं तेव्हा, मी घरी आल्यावर, तुला सांगितलं. तू त्याला काहीच बोलली नाहीस. तू माझी ट्युशन सोडलीस आणि कुणाला यातलं काही सांगू नकोस म्हणून ही बजावलं होतं."

" लहानपणापासूनच मी जरा अंगाने गुबगुबीत होते. शरीरात बदल जरा लवकर दिसू लागले होते. एक दिवस, शेजारच्या काकू म्हणाल्या, अनन्या लवकर मोठी होणार, लवकर वयात येणार."

"त्या दिवशीपासून, तू मला ढिले डगले कपडे घालायला सांगितलेस. माझ्या शरीरात होणाऱ्या बदलांना, स्वीकारणं अवघड झालं होतं मला. अपराधी झाल्यासारखं वाटायचं."

"एक दिवस, आपण शोभायात्रा बघायला गेलेलो. मिरवणुकीच्या गर्दीत, एक माणूस मला जास्तीच खेटून उभा राहिला. त्याच्या हाताचा त्याने मुद्दाम केलेला स्पर्श, केलेली लगट...."

"मी तुला सांगितलं. त्या घाणेरड्या माणसावर ओरडायचं, त्याला दम द्यायचा सोडून तू मला फरफटत घरी घेऊन आली होतीस."

"प्रवास करताना, आजोबांच्या वयाच्या एका माणसाने... शीSS नकोच त्या आठवणी"

"आई अगं, माझ्या सईला छातीशी कवटाळलं की ते घाणेरडे स्पर्श, मला विचारात पाडतात. तिचं शरीर, तिचं मन असं कुस्करल्या तर जाणार नाही, क्षणोक्षणी भीती वाटत राहते."

"रस्त्यावरच्या त्या अघोरी घाणेरड्या, गलिच्छ नजरा माझा पिच्छा सोडत नाही. कशी गं सामोरे जाईल माझी सई या सगळ्याला." अनन्या फुसंडून फुसंडून रडायला लागली.

"लोकांच्या घाणेरड्या नजरा माझ्या शरीरावर फिरायच्या तेव्हा, संपूर्ण पुरुष जातीचाच तिरस्कार वाटायला लागला होता मला?"

"मी कामाव्यतिरिक्त बाहेर जायचेच नाही. घरात बसून रहायचे, मला घरघुशी, एकलकोंडी म्हणून हिणवलं सर्वांनी. आपल्या कामाशी काम ठेवायचे तर, मी घमेंडी. फार मित्र मैत्रिणी नव्हते तर माझ्यात आत्मविश्वासाची कमी वगैरे... टोमणे मारले लोकांनी." अनन्याच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.
क्रमशः
शुभांगी मस्के...


0

🎭 Series Post

View all