Login

तुला जपणार आहे भाग ३ अंतिम

बालपण म्हणजे अत्तराची कुपी आयुष्यभर दरवळणारी
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

©®शुभांगी मस्के

तुला जपणार आहे

भाग 3


"नकोच होतं मला बाळ. आठ वर्ष सुख तेवढं दुःख, अनेक प्रश्न आणि लग्नानंतर आठ वर्षांनी चाहूल लागली, सईच्या येण्याने माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलं."

"स्वतःपेक्षा तुला जास्ती जपेन, मी तिला वचन दिलं. माझ्या वाट्याला जे आलं ते माझ्या लेकीच्या वाट्याला येऊ नये. मी सहन केलं ते माझ्या लेकीला सहन करावं लागू नये."

मी ठरवलं, "कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी असेन मी तिच्या पाठीशी. क्षणाक्षणाला सुरक्षित आहे असं वाटायला हवंय तिला."

"सहा आठ महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि मला, ऑफिस जॉइन करावं लागलं. मी नाहीये ना गं आता तिच्यासोबत, तिला सोडून मला बाहेर जावं लागलं. हतबल आहे गं मी." सईचा हात तिने घट्ट हातात पकडला.

"सासूआई सांभाळतात तिला, काळजाचा तुकडा आहे ती त्यांच्या पण मागच्या आठवड्यात मी सायंकाळी ऑफिसमधून घरी आले. भाचा आला होता घरी, सई त्याच्या मांडीवर खूप आनंदात खेळत होती. ननंदेचा मुलगा, लाडका भाचा आहे गं तो माझा. एवढी वर्ष बघतेय त्याला, चांगला आहे खूप. पण का कुणास ठाऊक? सईला त्याच्या सोबत एकटं बघून, काय काय विचार आले, कसं सांगू? कुणाला सांगू? असुरक्षितता वाटली खूप."

"त्याक्षणी हिसकावून, घ्यावं वाटलं तिला त्याच्याकडून. विचारावं वाटलं, का हात लावलास माझ्या सईला." बोलता बोलता तिचे डोळे पुन्हा भरून वाहू लागले.

"आजकाल सहा आठ महिन्याच्या, मुला - मुलींवर? तिच्याच हक्काच्या माणसांकडून अत्याचार होतो. नाजूक कळ्या कशा कुस्करल्या जातात. पेपरमध्ये वाचतो, ऐकतो तेव्हा भीती वाटते खूप."

"आई, अगं मी मोठी होताना, तू मला स्कर्ट टॉप घालू दिले नाहीस. छातीचे उंचवटे लपवता यावे म्हणून, ताठ उभे राहू दिले नाही. ढिले डगले, लांब लचक कपडे घेऊन दिले. पण त्या सहा आठ महिन्याच्या, मुलींनी काय करावं गं?"

"आई कसं गं जपू माझ्या सईला. सुरक्षिततेचं कोणतं कवचं तिच्या भोवताली तयार करू की शिंपल्यातल्या मोत्यासारखी माझी सई सुरक्षित राहील." अनन्या बोलता बोलता स्तब्ध झाली होती. आज पहिल्यांदाच, मनातली आग ओकली होती जणू काही तिने.

"हे एवढं घडलं?" मकरंद रावांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं होतं. खिशातला रुमाल काढून त्यांनी डोळे पुसले.

"मी माझ्या इच्छा, आकांक्षा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात एवढा व्यस्त होतो की...." मकरंदरावांनी बोलता बोलता आवंढा गिळला

"जबाबदारीच्या ओझ्यात, घरट्यातल्या पिल्लाच्या भवितव्यासाठी भटकत राहिलो. फिरतीची नोकरी, या सगळ्यात, लेक लवकर मोठी झाली एवढाच विचार ह्या सामान्य बापाने केला. पण तिच्या सुरक्षिततेचं काय?"

"माझ्या मुलीवर पण वाईट नजरेचा डाका पडलाच होता." बोलता बोलता, मकरंदराव गप्प झाले.

"नाही हो, तुम्ही तर आमच्यासाठी दिवसरात्र झटलात. मी चुकले, या सगळ्याला पूर्णतः मी जबाबदार आहे."

"लोक काय म्हणतील?"

"असं काही होत असेल, ह्यावर विश्वास तरी कोणी ठेवला असता?"

"आपली एकटी मुलगी का वयात येतेय?" अशा अनेक प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. मंदाताईंनी लांब उसासा घेतला.

"मुलीवर विश्वास ठेवून, आवाज उठवण्याचं धाडस कधी झालंच नाही. योग्य वेळी योग्य निर्णय मला घेता आलेच नाही."

"अनन्या बाळा, तू सांगितला आणि प्रत्येक वेळी मी तुला गप्प बसवलं. मुलीच्या जातीला सहन करावं लागतं, तेच सांगत राहिले तुला. तुझ्या बाबांना सांगून विषय वाढायला नको, त्यांना उगाच चिंता नको म्हणून त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहचूच दिल्या नाही."

"चुकले मी...!" मंदाताईंनी पदरात तोंड खुपसून, रडून घेतलं.

"आई अगं, शरीरावर झालेल्या जखमा भरून निघतात ही पण मनावर झालेल्या जखमांचं काय? ते घाव तर चिघळत राहिले ना गं आयुष्यभर!"

"आईवडील म्हणून, आपल्या लेकरांच्या पाठीशी उभं असणं, हा प्रत्येक मुलीचा हक्क असावा. आईवडीलच तर मुलांची ताकद असतात जे त्यांना कोणत्याही परिस्थितीत लढण्याची बळ देतात." अनन्या शांतपणे बोलत होती.

"सई बाळा, मी तुला जपणार आहे."
"परिस्थिती कुठली का असेना, मी तुझ्या नेहमी सोबत असेल." अनन्याने डोळे पुसले आणि छोट्या सईच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत राहिली.

दारात उभा, उमेश.... कधी आला कळलंच नव्हतं. बाहेर उभा राहून तो सगळं ऐकत होता.

एका कार्यक्रमात, अनन्याला बघितलं आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. ओळख मैत्रीत बदलली आणि एक दिवस त्याने प्रेमाची कबुली दिली. त्या नात्यासाठी मात्र तिने वेळ मागितला होता.

अखेर प्रेम जिंकलं. अनन्या आणि उमेशच लग्न ठरलं. देवाब्राम्हणांच्या साक्षीने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने अनन्या उंबरठा ओलांडून उमेशच्या आयुष्यात आली. लग्नानंतर दोन वर्ष लागले होते, तिला मला स्वीकारायला. का एवढी दूर पळायची, त्या स्पर्शापासून.. आज त्याला त्याचं खरं कारण कळलं होतं. एखाद्या चित्रपटासारखं सगळं त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं.

'किती किती आणि काय काय, दडवून ठेवलं होत मनात!' सईच्या निमित्ताने का होईना पण बऱ्याच वर्षानंतर आज ती मोकळी झाली होती.

तो घरात आला, अनन्याचा हात त्याने हातात घेतला... "अनु, शरीरावर उमटलेल्या त्या घाणेरड्या स्पर्शाचे ओरखडे आणि मनावर झालेल्या जखमा... कदाचित कधीच मिटणार नाहीत पण मी तुझ्या प्रत्येक लढाईत तुझ्यासोबत आहे, हे वचन आज मी तुला देतो."

"बालपण अत्तराच्या कुपीसारखं असावं, आठवणीरुपात तो सुगंध सईच्या आयुष्यात आयुष्यभर दरवळत राहिलं, असं बालपण तिला देण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू."

"सईची काळजी असणं म्हणजे क्षणाक्षणाला आपण भीतीत रहावं, असा नाही गं होतं... आजवर मनात दडवून ठेवलेली भीती काढून टाक. ती भीती घालवण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली तरी चालेल, पण तुला ह्या भीतीतून बाहेर निघावं लागेल."

"तुला मी तुझं बालपण परत मिळवून देऊ शकत नाही पण सईच बालपण मात्र भरभरून जगायचयं आपल्याला, ते मात्र हरवता कामा नये."

"तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी फक्त तुझी नाही तर ती माझी सुद्धा आहे. आता तू एकटी नाहीये... माझ्या लेकीसारखं आता यापुढे मी, "तुला जपणार आहे" कळलं." उमेशने अनन्याचा हात हातात घेत तिला वचन दिलं.

आज अनेक वर्षानंतर अनन्याला मोकळं वाटलं होतं.
समाप्त
शुभांगी मस्के...