Login

तुला पाहते रे - भाग 12

Love story

तुला पाहते रे - भाग 12

" मिहीर........" म्हणून सई जोरात ओरडली. 

समोरून येणाऱ्या गाडीला चुकवण्यासाठी मिहिरने गाडीचं स्टेरिंग वळवलं आणि गाडी काही कळायच्या आतच बाजूच्या दरडीवर जाऊन जोरात धडकली. मिहीरचं डोकं स्टेरिंगवर जोरात आपटलं. तो बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहायला सुरवात झाली आणि सई......?? गाडीची धडक इतकी जोरात होती की ती बाहेर फेकली गेली. पण दुर्दैवाने तिचे पाय गाडीच्या सीट बेल्ट मध्ये अडकले गेले. ती अक्षरशः उलटी लटकत होती. तिचे गुडघ्यापासूनचे पाय आत गाडीत अडकले होते. तिच्याही डोक्याला हातापायांना जखम झाली होती. दोघेही कितीतरी वेळ तसेच पडून होते. कारण आता जवळपास रात्र झाली होती. त्यामुळे रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती.  रोडला एखादं वाहनही येताना दिसत नव्हतं. त्यामुळे कोणीतरी रोड वरून जाणाऱ्यांपैकी त्यांच्या मदतीला येईल अशी आशाच नव्हती. तिकडे सगळेजण मिहीर आणि सईची धाब्यावर वाट पाहत होते.राहुल , केदार आणि विश्वास मिहिरला सतत फोन लावायचा प्रयन्त करत होते. पण रिंग वाजूनही मिहीर फोन उचलत नव्हता. तो येतो म्हणून सांगूनही जवळजवळ एक दीड तास होऊन गेला. त्यामुळे आता त्यांनाही काळजी वाटू लागली. शेवटी राहुल आणि केदारने पुन्हा मागे जाऊन त्यांना बघायचं ठरवलं. राहुल आणि केदार गाडी घेऊन तिथून निघाले.  वाटेत कुठे रोडवरती किंवा दुकानात मिहीर किंवा त्यांची गाडी दिसतेय का ते बघत दोघेही अक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आले. राहुलने आधी गाडीचा नंबर बघितला. त्यावरून तरी मिहिरची गाडी आहे हे नक्की होतं होतं. आपल्या गाडीतून उतरून तसेच चालत ते पुढे आले. समोरचं दृश्य पाहून ते सुन्नचं झाले...!!!! राहुलने तर डोक्यालाच हात लावला. काय करावं त्यांना सुचेना. घाबरत घाबरतच त्यांनी दोघांच्या मानेला हात लावून चेक केले. दोघांचेही श्वास अगदी हळू चालू होते. राहुलने एक सुस्कारा सोडला . मग केदार आणि त्याने मिळून आधी मिहिरला बाहेर काढले. मिहिरला  गाडीत बसवून त्यांनी लोंबकळत असलेल्या सईला सोडवलं..त्या दोघांना बाहेर काढेपर्यंत जवळजवळ अर्धा पाऊण तास होऊन गेला. राहुलने फोन करून विश्वासला सगळं सांगितलं. बाकीच्या दोन फ्रेंड्सची फॅमिली सोबत होती...त्यामुळे मग राहुलने स्वाती , तिची दोन मुलं आणि ऋचा ,मेघना या सगळ्यांना घरी सोडायला विश्वासला सांगितलं. केदारची गाडी तिथेच धाब्याजवळ ठेवली आणि विश्वास सगळ्यांना घेऊन मुंबईकडे निघाला. राहुल आणि केदार मिहीर आणि सईला घेऊन सिटी पर्यँत आले. कारण वाटेत कोणतंच गाव किंवा वस्ती नव्हती जिथे त्या दोघांना शुद्धीवर आणण्या इतपत तरी प्रयन्त केले गेले असते. त्यामुळे साधारण एक तासाने ते वाटेतल्या सिटीत पोहचले. तिथे चौकशी करून त्यांनी मिहीर आणि सईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. दोघांनाही अति दक्षता विभागात हलवण्यात आलं. त्यांना ऍडमिट केल्यावर केदार आणि राहुल बाहेर येऊन बसले. राहुल तर अजूनही शॉक मध्ये होता. मिहीर आणि सईची अवस्था बघून मात्र इतका वेळ थांबवून ठेवलेले त्याचे अश्रू बाहेर पडले. केदारचीही काही वेगळी अवस्था नव्हती. आता प्रश्न होता तो मिहिरच्या घरी कसं कळवायचं याचा. पण बऱ्यापैकी रात्र झाली होती. त्यामुळे आत्ता सांगणं बरं नाही असं ठरवून त्यांनी सकाळी परिस्थिती बघून मिहिरच्या घरी कळवायचं ठरवलं. राहुल आणि केदार दोघेही ICU बाहेर बसून होते. राहुलला तर अजूनही या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता. मिहीर आणि तो खूप जुने मित्र होते त्यामुळे त्याला अशा अवस्थेत बघताना त्याला त्रास होत होता.

.............................

सकाळी डॉक्टरांनी मिहीर आणि सईला चेक केले आणि ते बाहेर आले. राहुल आणि मिहीर बाहेरच्या खुर्चीवर अवघडून झोपले होते. डॉक्टरनी त्यांना हाक मारून उठवलं. 

" Excuse me...." डॉक्टरनी राहुलला हात लावून जागं केलं. राहुलने डोळे चोळले आणि तो जागा झाला.

" अरे....डॉक्टर तुम्ही....??  कसा आहे मिहीर...I mean आत ICU मध्ये आहेत ते मिस्टर लिमये आणि त्यांची मिसेस कशा आहेत...??.." राहुलने त्यांना एका दमात विचारलं. 

" रिलॅक्स.....तुम्ही कोण त्यांचे....?? " डॉक्टरांनी विचारलं.

" आम्ही फ्रेंड्स आहोत त्यांचे....Actually आम्ही घरी निघालो होतो...." असं म्हणून राहुलने डॉक्टरना काय काय झालं ते सगळं सांगितलं.

" ok.... तुम्ही जरा फ्रेश व्हा...आणि माझ्या केबिन मध्ये या. मी बोलतो तुमच्याशी..." असं म्हणून डॉक्टरनी हलकेच राहुलच्या खांद्यावर थोपटलं आणि ते निघून गेले. 

थोड्या वेळाने राहुल आणि केदार डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले.

" डॉक्टर ....आत येऊ का....?? " राहुलने विचारलं .

" हो या.....बसा...." आत येणाऱ्या राहुल आणि केदारकडे बघत डॉक्टर म्हणाले.

" डॉक्टर कसे आहेत ते दोघे....?? " केदार

" आम्ही दोघांचीही ट्रीटमेंट सुरू केली आहे. मिहिरच्या डोक्याला मार लागलाय पण त्याच्या मेंदूला इजा झालेली नाही. तुम्ही त्यांना आणायला थोडा जरी उशीर केला असतात तर त्यांना वाचवणं शक्य नव्हतं. पण आता तो ठीक आहे. कदाचित उद्या सकाळपर्यंत तो शुद्धीवर येईल.."  एवढं बोलून डॉक्टर काहीसं थांबले. 

" आणि सई......??? ...ती कशी आहे...?? " राहुलने काळजीने विचारलं

" तिच्या डोक्याला फार मार लागला नाहीये. हाता पायांना जखम आहे थोडीफार.... पण तिच्या दोन्ही पायांची हाडं तुटली आहेत. म्हणून मग सध्या आम्ही दोन्ही पायांना प्लॅस्टर घातलं आहे. हाडं सांधायला कदाचित पायाचं ऑपरेशन करावं लागेल. पण ती शुध्दीवर आल्यावरच आपल्याला ठरवता येईल.." डॉक्टर म्हणाले.

" डॉक्टर काळजीचं काही कारण नाही ना.....?? " केदारने अगतिक होऊन विचारलं.

" सध्या तरी मी एवढंच सांगू शकतो. पण मला सांगा सईला तुम्ही जेव्हा इकडे घेऊन आलात त्या आधी तिच्या पायाला वगरे काही लागलं होतं किंवा गाडीखाली वगरे पाय होते का तिचे....? " डॉक्टरनी विचारलं.

" हो....म्हणजे ती गाडीच्या बाहेरच्या बाजूला विचित्र फेकली गेली होती आणि तिचे दोन्ही पाय सीट बेल्ट मध्ये अडकले होते. आम्ही गेलो तेव्हा ती उलटी लटकत होती..." राहुल हे सगळं सांगत असतानाही ते दृश्य आठवून त्याच्या अंगावर काटा आला. 

" ओहह.....आम्ही एक्स रे वगरे सगळं केलंय. सध्या तरी ऑपरेशनची गरज वाटत नाहीये. पण शुद्धीवर आल्यावर त्यांना कितपत त्रास होतोय त्यावरून ठरवावं लागेल..." डॉक्टर म्हणाले. 

" ok डॉक्टर....ती साधारण कधी पर्यंत शुद्धीवर येईल...?? " राहुलने खुर्चीतून उठत विचारलं. 

" बहुतेक आज संध्याकाळ पर्यंत शुद्धीवर येतील त्या..." डॉक्टर म्हणाले. तसे मग राहुल आणि केदार त्यांच्या केबिन मधून बाहेर जाऊ लागले. 

" एक मिनिट...." डॉक्टरांनी पुन्हा त्यांना हाक मारली तसे ते दोघे थांबले. " तुम्ही जरा त्यांच्या घरच्यांना बोलावून घ्या....मला जरा बोलायचं आहे त्यांच्याशी..." डॉक्टरनी सांगितलं. 

" हं....." एवढंच बोलून ते तिथून बाहेर आले. 

..............................................

राहुलने धीर करून मिहिरच्या घरी अक्सिडेंट बद्दल कळवलं. मधूकररावांच्या पाया खालची तर जमीनच सरकली. त्यांनी कसबस नलिनीताईना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. सईच्या आई बाबांनाही त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यांनाही मोठा धक्का बसला. सईचे बाबा देखील नलिनीताई आणि मधूकररावांसोबत यायला निघाले. तिघेही मग गाडी करून राहुलने कळवलेल्या हॉस्पिटलमध्ये आले. ते येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. तोपर्यंत सई शुद्धीवर आली होती. शुद्धीवर आल्या आल्या तिने मिहीर कुठाय म्हणून विचारलं. डॉक्टरनी तो बरा असल्याचं सांगितल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिच्या हाता पायांना झालेल्या जखमा दुखत होत्या. पायांना बँडेज असल्यामुळे तिला उठताही येत नव्हतं. सुभाषराव तिला भेटायला आत आले. लेकीला असं लागलेलं पाहून त्यांना रडू आलं. सईचे डोळयातही पाणी आलं होतं. मग नलिनीताई आणि मधूकररावही आत आले. नलिनीताईना तिची अवस्था बघवेना. त्यांनी हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ते दोघेही मग मिहिरच्या रूम मध्ये गेले. त्याला बघून नलिनीताईंना अश्रू अनावर झाले. कसंबसं स्वतःला सावरून त्या बाहेर आल्या. पाठोपाठ मधुकरराव ही बाहेर आले. त्यांना मिहिरची अवस्था बघवेना. थोड्या वेळाने त्यांना डॉक्टरनी भेटायला बोलावलं.

" काय झालं डॉक्टर......काही सिरीयस आहे का...?? " मधूकररावांनी काळजीने विचारलं.

" हो .....म्हणजे.....डॉक्टर म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगणं मला भाग आहे...." डॉक्टरांनाही कसं बोलावं सुचेना..

" काय झालंय.....? " नलिनीताईंनी विचारलं.

" तुम्हाला माहीत होतं का.....तुमची सून म्हणजे सई ह्या प्रेग्नंन्ट होत्या ते.....?? " डॉक्टरनी विचारलं तसं नलिनीताई आणि मधूकररावांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. 

" काय....??? ...नाही डॉक्टर.....आम्हाला याची काहीच कल्पना नाही.. आणि होत्या म्हणजे असं का म्हणताय तुम्ही...??? " मधूकररावांनी विचारलं. 

" Unfortunately......अक्सिडेंटमुळे त्यांचं मिक्सकरेज झालंय...... त्या बराच वेळ गाडीत अडकून पडल्यामुळे......" डॉक्टरांचं पुढचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच नलिनीताई चक्कर येऊन पडल्या. 

..................................

दुसऱ्या दिवशी सकाळी मिहीर शुद्धीवर आला. डोक्याची जखम दुखत असल्यामुळे डॉक्टरनी सध्या कोणीच त्याला भेटू नका म्हणून सांगितलं होतं. त्याला सईची काळजी वाटतं होती. कारण सई कशी आहे कळल्या शिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. रात्री सईला पायातून खुप कळा येऊ लागल्या त्यामुळे डॉक्टरनी तिच्या पायांच ऑपरेशन करायचं ठरवलं. सकाळी मिहिरला शुद्ध आली तेव्हा सई ऑपरेशन थेटर मध्येच होती. मिहिरच्या आई बाबांनी राहुल आणि केदारला घरी जायला सांगितलं. कारण गेले दोन दिवस दोघेही हॉस्पिटलमध्येच थांबले होते. शेवटी राहुलने केदारला घरी जायला सांगितलं. तोही जायला तयार नव्हता. पण सगळ्यांनीच इथे थांबून काय करायचं असं समजवून राहुलने त्याला घरी जायला सांगितलं. त्याची गाडी अजूनही त्या धाब्याजवळच ठेवलेली होती. राहुलने त्याला तिथपर्यंत सोडलं आणि पुन्हा तो हॉस्पिटलला आला. केदार मग आपली गाडी घेऊन मुंबईला गेला. राहूल परत आला तेव्हा दुपार झाली होती. सईला ऑपरेशन थेटर मधून बाहेर काढून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. साधारण चार पाच तासांनी सई शुद्धीवर आली. आता जरा तिला रिलॅक्स वाटतं होतं. हळुहळु भूल उतरू लागली तशा हाताच्या आणि जखमा पुन्हा दुखू लागल्या. थोड्या वेळाने नर्सने तिला गोळ्या देण्यासाठी उठून बसायला सांगितलं आणि तिने तिला आधारासाठी तिच्या कमरेत हात घालून तिला हळूच वरती खेचलं. पण सईला काहीतरी वेगळं वाटलं. एकदम अलगद वजन नसल्यासारखी ती उठून बसली. तिच्या पायांची काहीच हालचाल न होता ती वरती सरकली होती. सईने थोडंस वाकून आपले पाय चादरी वरूनच चाचपून पाहिले....आणि ती जोरात ओरडली...

" डॉक्टर.......!!!!! ...माझे पाय..........."

क्रमशः....

माझ्या सगळ्या वाचकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कथेचा पुढचा भाग लवकरच पोस्ट होईल. तोपर्यंत आपण तात्पुरतं कोरोनाला विसरून बाप्पाचं जल्लोषात स्वागत करूया आणि खूप मोदक खाऊया. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुमची गणपतीच्या या दिवसातली एखादी छान आठवण असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.

🎭 Series Post

View all