तुला पाहते रे - भाग 8
" काय...?? " म्हणून मिहीर जोरात ओरडला.
सईने त्याला सगळं सांगितलं. दोन क्षण आपण काय ऐकतोय हेच त्याला कळेना. त्याने लवकरच येतो सांगून फोन कट केला.. पण तरीही त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. ऑफीसमधून घरी एमर्जन्सी आहे सांगून तो बाहेर पडला आणि हॉस्पिटलच्या दिशेने आपली गाडी वळवली. रिसेप्शनच्या इथे चौकशी करून तो ICU असणाऱ्या दिशेने निघाला. त्यानं पाहिलं तर सई ICU च्या बाहेर रडत बसली होती. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.
" सई...." त्याने तिला हाक मारली. तशी ती भानावर आली समोर आलेल्या मिहिरला मिठी मारून ती रडू लागली.
" सई काय झालंय मला नीट सांगशील का...?? " मिहिरने विचारलं. ती अजूनही रडत होती. खरंतर त्यालाही धक्का बसला होता. पण तिच्यासमोर त्याने स्वतःला सावरलं.
सईने सांगायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे घरातलं सगळं दोघींनी मिळून आटपल होतं. मिहीर रोजच्या सारखा ऑफिसला निघून गेला. सईचे सासरे त्यांच्या क्लबच्या मित्रांसोबत बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी या दोघीच होत्या. सई खरंतर आज एके ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू साठी जाणार होती. मिहिरला सरप्राईज द्यायचं म्हणून तिनं आधी त्याला काहीच सांगितलं नाही. नलिनीताईंना मात्र तिने सगळं सांगितलं होतं. त्याप्रमाणे ती आवरून बाहेर पडत होती. बाहेर ती गाडीपाशी आली आणि सईच्या लक्षात आलं की आपण गाडीची चावी वरती रूम मध्येच विसरलोय. ती पुन्हा आत आली.
" काय झालं गं....?? काही राहील का...? " नलिनीताईंनी विचारलं.
" हो ....म्हणजे ते ....चावी राहिलेय वरतीच. " ती सँडल काढता काढता म्हणाली.
" अग मग तू थांब मुद्दाम आत नको येऊ मी देते आणून..." त्या वरती जिन्याकडे जात म्हणाल्या.
" अहो आई कशाला....मी आणते थांबा तुम्ही.." सई म्हणाली. पण तोपर्यंत त्या खोलीत जाऊन पोहचल्या होत्या.
" हीच ना ग किल्ली...? " त्यांनी वरूनच किचन दाखवून तिला विचारलं.
" हो तीच तीच...." सई
" हा....गाडी सावकाश चालव...मला पोहचल्यावर फोन कर .." त्या जिन्यातून येता येता तिला सूचना देत होत्या.
" हो आई.... करेन..." ती छान हसून म्हणाली.
तेवढ्यात खाली येता येता नलिनीताईंचा पाय सटकला आणि त्यांचा तोल गेला. त्या अर्ध्या जिन्यातून खाली गडगडत आल्या.
" आई........" म्हणून सई जोरात ओरडली आणि धावतच त्यांच्या जवळ गेली.
नलिनीताईंच्या डोक्याला मार बसला होता. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. सईला काय करावं सुचेना. तिचे तर हातपायच गळाले होते. तिने मग बाजूच्या काकूंना बोलावून आणलं. काकूंना त्यांच्यापाशी ठेऊन ती मेनरोडवर येऊन रिक्षा बघू लागली. ती खूप घाबरली होती. रिक्षाला ती हात करत होती पण कोणीही रिक्षावाला थांबायला तयार नव्हता. ती फार सैरभैर झाली होती. तेवढ्यात कशीबशी एक रिक्षा थांबली. ती घेऊन ती घरी आली. तिने आणि काकूंनी धरून नलिनीताईंना कसंबसं रिक्षापर्यंत आणलं. त्या रिक्षावल्यानेही त्यांना मदत केली. सईने त्यांना आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हे सगळं इतकं अचानक झालं होतं की तिला विचार करायलाच वेळ नव्हता. बाबाही घरी नव्हते त्यामुळे अशा वेळी काय करावं तिला कळेना. ती अजूनही रडत होती. आपल्यामुळेच हे सगळं झालंय असं वाटून ती स्वतःलाच दोष देत होती. हे सगळं ऐकून मिहिरलाही धक्का बसला.
" माझ्यामुळेच झालंय सगळं....." ती अजूनही स्वतःलाच दोष देत होती.
" सई शांत हो.... काही होणार नाही आईला.. तू प्लिज स्वतःला दोष देऊ नको.." तो तिला समजवत म्हणाला. पण तोही आईला असं बघू शकत नव्हता.
......................................
दोन दिवसांनी नलिनीताई शुध्दीवर आल्या. जिन्यातुन पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला खोक पडली होती आणि पायाचं हाड मोडल्यामुळे पायाला प्लॅस्टर घातलं होतं. तोपर्यन्त बाबा देखील घरी परतले होते. आल्यावर मिहिरने त्यांना सगळं सांगितलं . त्याही परिस्तिथीत सईने एकटीने सगळं निभावलं याचं त्यांना कौतुकही वाटलं. दोन दिवस सईने घरातलं सांभाळून हॉस्पिटलमध्येही खेपा घातल्या. घरी सगळं जेवण वगरे आटपून ती दुपारी हॉस्पिटलमध्ये जायची. बाबांना जेवायला पाठवून ती दुपारपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबायची आणि सकाळी घरी यायची. बाबा किंवा मिहीर रात्री हॉस्पिटलमध्ये आईसोबत थांबायला यायचे पण त्यांनाही ती परत पाठवायची. नलिनीताई शुद्धीवर येईपर्यंत सईचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. त्या शुद्धीवर आल्यावर बाबांनी त्यांना सगळं सांगितलं. पण सईला नलिनीताईंसमोर जावसं वाटत नव्हतं. अजूनही तिला झाल्या प्रकाराबद्दल अपराधी वाटतं होतं.
" काय मग नलु..... कशाला इतक्या उड्या मारायच्या म्हणतो मी..." मधुकरराव नलिनीताईंना म्हणत होते. त्यावर त्या जराशा विषादाने हसल्या. सई मात्र दारातूनच त्यांना लपून पाहत होती. पण तेवढ्यात नलिनीताईंचं तिच्याकडे लक्ष गेलं.
" सई......." त्यांनी अगदी हळू हाक मारली. बोलताना डोक्यावरची जखम जरा दुखायची त्यामुळे त्या सावकाश बोलत होत्या.
" अहो.... सई आलेय ना ती...मग ती आत का येत नाहीये..? " त्यांनी विचारलं.
" हे सगळं झालं ते तिच्यामुळेच झालंय असं वाटतंय तिला...म्हणून तुझ्यासमोर यायला कसतरी वाटतंय तिला..." बाबांनी सांगितलं.
" अहो ....काहीतरीच काय... माझंच लक्ष नव्हतं. ती का स्वतःला दोष लावतेय. तुम्ही बोलवा ना तिला आत.." त्या म्हणाल्या. तसं मधुकररावानी सई नको नको म्हणत असताना तिला आत आणलं. नलिनीताईंच्या डोक्याला पट्टी , पायाला घातलेलं प्लास्टर बघून सईला रडूच आलं.
" अग.... रडतेस का वेडाबाई...मी बरी होणारे. इथेच नाही राहणारे..." त्या म्हणाल्या.
" आई.......पण हे सगळं माझ्यामुळे....." तिला पुढे बोलवेना.
" तुझ्यामुळे नाही झालेलं बाळा काहीच...तू रडू नको.. अग माझंच लक्ष नव्हतं. शांत हो बघू...." त्यांनी तिला समजावलं. तशी ती शांत झाली.
थोड्याच दिवसात नलिनीताई हॉस्पिटलमधून घरी आल्या. पण पायाच्या प्लॅस्टरमुळे त्या चालू शकत नव्हत्या. त्यांना व्हीलचेअर वरून त्यांच्या खोलीत आणून ठेवलं. या सगळ्या प्रकारामुळे घराची सगळी जबाबदारी सईवर पडली. सकाळी उठल्यापासून मिहिरला डबा देणं, नलिनीताईंना वेळेवर नाश्ता, औषधं देणं ती सगळं व्यवस्थित करायची. त्यांना ती धरून बाथरूमला नेणं... त्यांना अंघोळ घालणं हे सगळं मनापासून करायची. एकदाही तिने कुरकुर केली नाही. त्यांचं पथ्य पाणी सगळं ती जपायची. त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून पुस्तकं वाचून दाखवायची.. आठवड्यातून एकदा त्यांच्या मंडळातल्या बायकांना ती त्यांच्याशी गप्पा मारायला घरी बोलवायची. एखाद्या दिवशी जेवणाचा वेगळा बेत करून त्यांना खाऊ घालायची. कारण आजारपणात त्या पथ्याने तोंडाची चव जाते तिला माहीत होतं. त्याच्यासाठी तिने त्यांच्या रूममध्ये टीव्ही शिफ्ट करून घेतला. त्यावर त्यांना ती नवीन नवीन मुव्हीजच्या सीडी लावून द्यायची.. जेणेकरून त्यांना कंटाळवाणं आणि एकटं वाटणार नाही.. मदतीला बाबा होतेच. सईचे आई बाबा देखील नलिनीताईंच्या तब्येतीची चौकशी करून गेले. घरातली कामं आणि नलिनीताईंचं औषध पाणी बघणं या सगळ्यात सईने तात्पुरता नोकरीचा विषय बाजूलाच ठेवला होता. बाबांना आणि मिहिरला सईचं कौतुक होतं. कधीही तिने कोणत्याच गोष्टीवरून घरात कुरबुर केली नाही. आपली आई समजून तिने नलिनीताईंची सेवा करायची.
....................................
नलिनीताईंची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. जवळजवळ सहा महिने त्या बेड्रेसवर होत्या. त्यांच्या डोक्याची जखम कधीच भरली होती. आता त्या हळुहळु हिंडायला फिरायला लागल्या होत्या. त्या आजारी असताना सईने केलेली धावपळ त्या बघत होत्या. आपल्याला एवढी चांगली सून मिळाली याचं त्यांना समाधान होतं. एवढ्या दिवसात ती कुठेही बाहेर गेली नव्हती. मिहिरलाही कामाचा खूप पसारा होता त्यामुळे त्याला वाटत असूनही तो तिच्यासाठी वेळ देऊ शकत नव्हता. लवकरच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येणार होता. त्यावेळी तिला छानसं सरप्राईज द्यायचं असं सगळ्यानी ठरवलं...!!!!
क्रमशः.....