Login

तुळस

रुढी आणि परंपरा
तुळस

©® सौ.हेमा पाटील.

रांजणामागली तुळस पाची पानांनी फुलली |
डोरल्याच्या भारोभार आमची गौराई लवली |
गौराई लवली |
महिला मंडळाचा गौरीचे कान उघडण्याचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता .गौरी जेवतात त्या दिवशी म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्या दिवशी रात्री गौरीचे कान उघडण्याचा कार्यक्रम असतो. गौरी समोर बसून महिला अशी गाणी गात पालथ्या घातलेल्या काटवटावर लाकडी डाव आणि पळी घेऊन त्याची टोकाकडील बाजू घासत असतात. घर्षणाने ते गरम झालेले टोक सर्व गाणी म्हणून झाल्यावर गौरीच्या कानांना लावत असतात.

हे मी बालपणापासून पहात आलो आहे. आज मात्र हे पाहिल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
" अरे हे गौरीचे कान उघडणे म्हणजे माहेरवाशीण आलेल्या लेकीला सासरी कसे वागावे हे सांगणेच नव्हे का?"
आपले सणवार काहीतरी संदेश देत असतात. त्याप्रमाणेच सासरी नांदून माहेरी आलेल्या मुलीला तिच्या तक्रारी ऐकून घेऊन चार उपदेशाचे डोस द्यावेत असाच संदेश यामागे दिसतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी गौराई परत जाणार असतात.
‌मुलगी सासरहून माहेरी आल्यानंतर तिला काय करून खायला घालू आणि काय नको असे आईला होते. दोघींच्या गप्पा एरव्ही ही चालूच असतात, पण जायचा दिवस जसा जवळ येईल तसे दोघींचे हितगुज सुरू होते. लेक नांदायला गेल्यावर परत कधी येईल कुणास ठाऊक असे आईला वाटत असते.
माहेरचे आपलेपण, माया इथेच सोडून कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपण जाणार आहोत याची जाणीव लेकीला झालेली असते. त्यामुळे जेवढा वेळ हातात असेल तेवढे क्षण आईच्या अवतीभवती ती वेचत असते. आल्यापासून मुलीची चिवचिव सुरूच असते.
" आमच्या घरी असे, आमच्या घरी तसे !" हे ऐकत असताना मुलगी हळूहळू सासरच्या घरी रुळते आहे हे आईच्या लक्षात येते. आणि तिला समाधान वाटते. मुलीच्या काही तक्रारी ऐकून त्याबाबतीत लेकीची कानउघाडणी केली पाहिजे हे आईच्या लक्षात येते. पटकन काही बोलले तर तिला वाईट वाटेल. आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून तोडताना आईला आधीच खूप दुःख झालेले असते. त्यात आपल्या मुलीने दुःखी व्हावे असे आईला अजिबात वाटत नाही. त्यामुळे ज्यावेळी जायचा दिवस उजाडतो त्याची आतली रात्र मायलेकी दोघीजणी हितगुज करत अख्खी रात्र जागरण करतात. त्यावेळी आई मुलीला समजावून सांगते. तिने ज्या तक्रारी केलेल्या असतात त्यावर समजुतीने मार्ग कसा काढावा हे सांगते. आणि आपले घर आणि आपली माणसे कशी जपावीत याचे मार्गदर्शन करते.

हे आईनेही बहुधा आपल्या सणांमधूनच शिकलेले असावे. पूर्वीच्या काळी आईने सांगितलेले किंवा शिकवलेले मुली सहसा टाळत नसत. आज काल मात्र वेगळेच चित्र दिसते. आजकालच्या मुलींना एकत्र कुटुंबात राहण्याची इच्छा नसते असेच बहुतांश चित्र दिसते. ते गरजेपोटी सर्वांनी स्वीकारलेही आहे.एकत्र कुटुंबापासून मुले विभक्त झाली.हम दो हमारा एक असे वातावरण निर्माण झाले. तेही ठीक होते, सणावाराला, कार्यक्रमाच्या वेळी सगळे कुटुंब एकत्र येते. आनंदात, दुःखात सहभागी होतात हेही नसे थोडके !

काळानुसार बदल हा घडतच असतो आणि तो स्वीकारावा लागतो. परंतु सध्या अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे की ,पती आणि पत्नी या दोघांचे विचार आणि निर्णय एकमेकांना पटत नाहीत. आणि दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटते. कुणालाच नमते घ्यायचे नसते, कारण आर्थिक बाबतीत दोघेही सक्षम असतात. परंतु संसार जर टिकवायचा असेल तर थोडे तरी कॉम्प्रमाईज करावे लागते. तडजोड करावीच लागते यात दुमत नाही.

दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे कायमस्वरूपी जेव्हा एकत्र राहतात त्यावेळी स्वभाव जुळणे शक्य नसते. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात राहण्याची सवय होती. त्यामुळे एकमेकांना ॲडजस्ट करणे किंवा समजून घेणे बालपणापासून अंगवळणी पडत असे. त्यामुळे सासरी विशेष अडचणी येत नसत. परंतु आता विभक्त कुटुंबात रहात असल्याने कुणालाच अजिबात ॲडजस्टमेंट करायची नसते. त्यामुळे पती-पत्नी सुद्धा एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत ही शोकांतिका आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समर्पण ही वृत्ती नाहीशी होत चालली आहे. मी आणि माझे या भोवती सर्वजण फिरताना दिसतात. त्याग नकोसा वाटतो. त्यात आयुष्यही अतिशय धकाधकीचे झाले आहे. स्वतःसाठी थोडा तरी वेळ मला मिळायला हवा.माझी स्पेस इतरांनी ही जपायला हवी ही वृत्ती सध्या कुटुंबात प्रामुख्याने जाणवते. त्यामुळे एकाच घरात राहूनही पती-पत्नी ,मुलगा, मुलगी यांचे काय चालले आहे याबाबत कुणालाच नीटशी माहिती नसते.

"पुन्हा एकदा वेळ आली आहे आपले सण आणि त्या मागील परंपरा जाणून घेण्याची. आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीला जवळ करण्याची!" असा विचार माझ्या मनात आला. अन् मी स्वतःशीच हसलो.

या महिला किती तन्मयतेने गाणी म्हणत आहेत.यांच्यात किती ऊर्जा आहे.दिवसभर राबूनही या दमल्या नाहीत.किती उत्स्फूर्तपणे गात आहेत.यांनी कुटुंबासाठी आपले श़ंभर टक्के योगदान दिले आहे.आजही देत आहेत.आता योगदान देण्याची आपली वेळ आली आहे. स्त्री पुरुष समानता असे आपण नोकरीच्या ठिकाणी मानतो.तसेच कुटुंबातही ही समानता राबवली पाहिजे.

कामावरुन दमून आल्यावर पत्नीने हातपाय धुवून लगेच चहाचे आधण गॅसवर चढवायचे.कुकरची तयारी करायची.आणि पतीने फ्रेश होऊन सोफ्यावर बसायचे. हातात आयत्या आलेल्या चहाच्या कपाचा आस्वाद घेत बातम्या पहायच्या.ही समानता आहे? कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पूर्णतः तिच्या झोळीत टाकून आपण चार कामे केली तर तिच्यावर किती उपकार करत आहोत अशी आपली भावना असते.जणूकाही संसार तिचा एकटीचाच असतो.

महिलांचीच कानउघाडणी का करायची? ही पुरुषसत्ताक पद्धती बंद तर होणार नाही.परंतु यात थोडा बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करु शकतो.सुरवात नेहमी आपल्यापासून करावी.
"आता मी कुटुंबाची जबाबदारी दोघांचीही आहे याची जाणीव ठेवून वागेन.शक्य तितकी पत्नीला मदत करेन"असे गौरीमातेला पटकन वचन दिले."आणि काय सांगू तुम्हांला! गौरी माता चक्क हसली राव माझ्याकडे पाहून!"

तेव्हा आता आपले तर बाबा ठरलेय. संसाराच्या दोन्ही चाकांनी सोबत चालायचे.स्त्री पुरुष या भेदभावाला आजपासून खरी खुरी सुट्टी!
"काय मग तुम्ही काय करताय? येताय ना सोबत?"
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक १८/१०/२०२४
काटवट - लाकडी परात
डाव - लाकडी चमचा
डोरले - मंगळसुत्राच्या वाट्या
लवली - भाराने वाकणे.
रांजण - पाणी साठवण्याचे मातीचे मोठे भांडे