डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ४०
©अनुप्रिया
©अनुप्रिया
अधिरा आणि स्वराज कॉफी घेण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडले. संध्याकाळ उतरायला लागली होती. आकाशात हलकीशी केशरी छटा पसरली होती. दोघेही जवळच्या कॅफेकडे चालू लागले. दोघेही शांतपणे चालत होते. पण त्या शांततेतही काही न बोलता काहीतरी बोललं जात होतं. कॉफी ऑर्डर करून ते समोरासमोर बसले. टेबलावर ठेवलेले दोन कप, त्यातून येणारा उबदार वास आणि त्या वाफेत विरघळलेली त्यांची न बोललेली भावना.. थोडा वेळ शांततेत गेल्यावर अधीरा म्हणाली,
“बघता बघता दिवस कसे संपले कळलंच नाही. तुमच्याबरोबर प्रोजेक्टवर काम करताना मज्जा आली. किती शिकले तुमच्याकडून.. आता उद्यापासून मी येणार नाही. इतके दिवस मी तुम्हाला खूप त्रास दिला ना?”
“नाही.. उलट फार छान वाटलं तुझ्यासोबत.. आय मीन तुमच्यासोबत..”
अरे सर.. फॉर्मिलिटीज नकोत ना.. अरेतुरे केलं तरी चालेल मला किंबहुना आवडेल.”
अधिरा हसून म्हणाली.
“मग तू ही अहोजावो न करता अरेतुरे कर.. तसं केलं तर मी पण करेन.”
तो गालातल्या गालात हसला आणि तिनेही होकारार्थी मान हलवली.
“आज काहीतरी वेगळंच वाटतंय.”
अधिरा हलकंसं हसत म्हणाली.
“वेगळं कसं?”
स्वराजने विचारलं; पण त्याचा आवाज थोडा अडखळलेला होता.
“म्हणजे इतके दिवस रोज इथे येणं, तुम्हाला.. सॉरी सॉरी.. तुला भेटणं, प्रोजेक्टची घाई आणि अचानक सगळं संपतंय असं वाटतंय.”
ती कॉफीकडे पाहत हिरमसून बोलत होती. डोळे वर करण्याची तिची हिंमत होत नव्हती. स्वराजने कप हातात घेतला; पण घोट घेतला नाही.
“कधी कधी काही गोष्टी संपत नाहीत अधिरा… त्या फक्त वेगळ्या वळणावर जातात.”
तो हळूच म्हणाला. ती पहिल्यांदाच थेट त्याच्याकडे पाहू लागली. त्या नजरेत प्रश्न होते आणि थोडी अपेक्षाही. स्वराजच्या मनात गोंधळ सुरू होता.
“आत्ता नाही बोललो तर कधीच नाही…”
त्याने खोल श्वास घेतला.
“अधिरा… एक गोष्ट विचारू?”
“हो… विचार ना.”
ती शांतपणे म्हणाली.
“तुला या महिन्याभरात कधी असं वाटलं का की, आपली मैत्री फक्त मैत्री राहिलेली नाही?”
तिला क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. कॅफेतील आवाज, लोकांची वर्दळ, सगळं जणू तिच्यापासून दूर गेलं होतं! अधिराच्या हातातला कप थोडासा थरथरला.
“असं का विचारतोस?”
तिने अलगद विचारलं.
“कारण मला तसं वाटायला लागलंय.”
स्वराज प्रामाणिकपणे म्हणाला.
“आणि ते एकट्याचं वाटणं नसेल तरच मला पुढे जायचंय.”
“म्हणजे? जरा नीट समजावून सांगशील? तू काय बोलतोयस, मला काहीच कळत नाहीये.”
तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला प्रश्न पडला,
“नक्की हिला समजलं नाही की माझ्याकडून वदवून घ्यायचंय? रामेश्वरा! मनातलं प्रेम व्यक्त करायला किती हिंमत लागते हे हिला सांगून तरी पटेल का? पण असं शांत बसून चालणार नाही.. हिंमत तर करावीच लागेल. तिला आज सांगायलाच हवं.”
मनात पक्का निर्धार करून त्याने घसा साफ करून बोलायला सुरुवात केली. तीही शांतपणे त्याचं बोलणं ऐकू लागली,
“अधिरा, तुला आठवतंय! तू पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये आली होतीस आणि रिसेप्शनपाशी सलोनीशी बोलत होतीस. तुला माहितीये? त्याक्षणीच तू मला आवडली होतीस. पाहताक्षणी माझ्यावर जादू केली होतीस तू!”
तो बोलता बोलता क्षणभर थांबला. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. त्याच्या शब्दांनी ती अंगोपांगी मोहरली होती. लाजेची लाली साऱ्या चेहऱ्यावर पसरली. तो शब्दांची जुळवाजुळव करत पुढे म्हणाला,
“खरंतर त्याचक्षणी माझा तुझ्यावर जीव जडला होता. प्रेमात पडलो तुझ्या.. आय लव्ह यू अधिरा..”
स्वराजने एका दमात आपलं म्हणणं सांगून टाकलं. अधिरा स्तब्ध होऊन त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच बसली. काय बोलावं तिला समजेना. महिनाभराच्या एकत्र काम करण्याने तिलाही स्वराज आवडू लागला होता. पण तो असा काही प्रस्ताव ठेवेल असं तिला वाटलंच नव्हतं. ती काही क्षण गप्प राहिली. तिच्या मनात तोच स्वराज उभा होता, जो तिला ऐकून घेत होता. तिला कमी न लेखणारा, शांतपणे आधार देणारा स्वराज तिला प्रपोज करत होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण दुसऱ्या क्षणात तिचा चेहरा खाडकन उतरला.
“मला भीती वाटते स्वराज…”
ती हळूच म्हणाली.
“कसली?”
“मला भीती वाटतेय नात्यांची. त्यांच्या अपेक्षांची आणि नाती तुटण्याची..”
“मलाही.. पण आपण प्रामाणिकपणे ते नातं जगूया.. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करायचंय.. मला साथ देशील ना? माझी होशील ना?”
त्याने तिच्याकडे पाहत प्रेमाने विचारलं.
तिने डोळे मिटले. जसं खिडकीजवळ उभी राहून ती आज सकाळी भूतकाळात गेली होती तसंच काहीसं आता झालं होतं. तो प्रसंग जशाचा तसा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला होता. आठवणींनी मनाला व्यथित केलं होतं. ती डोळे उघडून कसनूसं हसली.
“राज, इतकं प्रेम होतं तर मग तू असं का वागलास? मी परीक्षेत बिझी झाले तर तू तुझं लग्न उरकून टाकलंस? आणि लग्न तर कोणाशी केलंस? माझ्याच मोठ्या बहिणीशी? का राज? असं का वागलास?”
तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. इतक्यात मीरा तिच्या खोलीत आली. अधिराने मीराला तिचे अश्रू दिसू नये म्हणून पटकन डोळ्यातलं पाणी ओढणीने टिपलं.
“हं.. बोल मीरा.. का आलीस?”
अधिरा अडखळत म्हणाली. मीराने अधिराकडे पाहिलं. तिचा चेहरा एकदम उतरला होता. तिचे डोळे रडून रडून सुजले होते.
“अधिरा.. कसला विचार करतेस? स्वराजचा? अगं त्याने जाताना साधं तुझ्या खोलीकडे पाहिलंही नाही. असा कसा गं तो? विश्वासघातकी? त्याला असं सहजासहजी सोडू नकोस..”
मीराने अधिराच्या मनात विष पेरायला सुरुवात केली होती.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा