डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ४७
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी रात्रभर त्याच्या उश्याशी बसून राहिली. केंव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला. रात्रीचा गडद अंधार दूर होऊन पहाटेचा गार वारा खोलीत शिरला. हळूहळू खिडकीतून कोवळं ऊन आत यायला लागलं, तेव्हा कुठेतरी दूर पक्ष्यांचा हलकासा किलबिलाट ऐकू येत होता. त्या आवाजाने स्वराजला जाग आली. स्वराजने हलकेच डोळे उघडले. रात्रीचा गडद अंधार नाहीसा झालेला असला तरी स्वराजच्या मनातली गडद रात्र अजून संपलेली नव्हती. इतक्यात त्याचं लक्ष त्याच्या शेजारी बसलेल्या नंदिनीकडे गेलं. ती तशीच डोळे मिटून पडली होती. मान थोडी एका बाजूला झुकलेली, हात अजूनही स्वराजच्या उशीजवळ होता. रात्रभर जागून थकवा आता तिच्या चेहऱ्यावर उतरला होता. कपाळावर आलेली बारीकशी आठी, डोळ्यांखालची काळसर रेषा सगळं तिच्या न झोपलेल्या रात्रीची साक्ष देत होतं. नुकताच तिला डोळा लागला असावा.
क्षणभर त्याला काहीच समजलं नाही. त्याला त्याचं डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. अंग प्रचंड थकल्यासारखं वाटत होतं. घशाला कोरड पडली होती. त्याला त्याच्या कपाळावर थंडगार ओलावा जाणवला. त्याने कसाबसा हात उचलून माथ्यावर नेला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं. माथ्यावर अजूनही ओलसर कापड ठेवलेलं होतं. तो क्षणभर गोंधळला.
“मी इथे?”
हळूहळू स्वराजला काल घडलेल्या गोष्टींचे तुकडे आठवायला लागले. अधिराच्या घरातून बाहेर पडणं त्याच्या घराचा दिवाणखाना.. त्याचं ओक्साबोक्शी रडणं. तुटलेला आवाज, हुंदके, स्वतःचं नियंत्रण सुटणं, तो कोसळलेला क्षण,“मला एकट्याला सोडू नकोस.” अशी तिच्याकडे केलेली आर्जव आणि त्याला सावरणारी नंदिनी… एकेक घटनाक्रम आठवू लागला. त्याने मान वळवून बाजूला पाहिलं. त्याच्या शेजारी बसलेली नंदिनी तशीच झोपलेली होती. तो स्तब्ध झाला.
“ही इथेच बसून राहिली?”
त्याला मनात कालवाकालव झाली. अपराधीपणाची धारदार जाणीव झाली. त्याने नजर तिच्या हातांकडे नेली.
“तिचे ते थकलेले हात, जे रात्री त्याच्या काळजीसाठी अखंड हलत असतील. पाण्याच्या पट्ट्या, घरगुती काढा, तिचं जागणं… तिने हे सारं माझ्यासाठी केलं. पण का? काल रात्री मी काय केलं होतं?”
स्वराजने डोळे मिटले. त्याचं त्यालाच स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटत होतं.
“मी नंदिनीच्या परवानगीशिवाय तिच्या गळ्यात पडून, तिच्या कुशीत शिरून रडलो. तिच्या आयुष्यावर माझ्या वेदनेचा भार टाकला. इतके दिवस, इतके महिने मी स्वतःला सावरत राहिलो. सगळ्यांसाठी मजबूत बनत राहिलो. माझ्यातल्या वेदनेची जाणीव मी कोणाला होऊ दिली नाही. एकटा सगळं सहन करत राहिलो. आणि जेव्हा कोसळलो, तेव्हा अशा व्यक्तीला माझ्या दुःखात ओढून घेतलं, ज्याचं आयुष्य आधीच गुंतागुंतीचं आहे. हे ठीक नव्हतं, स्वराज..”
स्वराज सरळ बसायचा प्रयत्न करू लागला.
“नंदिनी…”
त्याचा आवाज कातर होता. नंदिनी दचकून उठली.
“उठलात? कसं वाटतंय आता?”
नंदिनीच्या आवाजात काळजी होती. त्याने खुणेनेच ठीक असल्याचं सांगितलं. स्वराज क्षणभर काहीच बोलू शकला नाही. त्याने नजर खाली घातली. त्याला स्वतःकडे पाहवत नव्हतं. त्याच्या डोळ्यांत शरमेने पुन्हा पाणी दाटलं.
“मी… काल… खूप…”
तो अडखळत म्हणाला.
“काल तुम्ही खूप थकलेले होतात. आता ते आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका.”
नंदिनी शांतपणे म्हणाली; पण स्वराजला ते शक्य नव्हतं.
“मी तुला जबरदस्तीने माझ्या वेदनेत ओढलं. तुझ्या समोर मी असा तुटलो. मला वाटतं, मी ते करायला नको होतं.
तो हळू आवाजात म्हणाला. नंदिनी काही क्षण गप्प राहिली. मग ती हळूच म्हणाली,
“तुम्ही तुटलात, म्हणून मी उभी राहिले. यात कसलीच जबरदस्ती नव्हती.”
त्या वाक्याने त्याच्या मनात काहीतरी गलबलून आलं. पण अपराधी भावना मात्र तशीच होती. तो थकलेल्या स्वरात म्हणाला,
“तुला माहीत आहे का? मी आयुष्यभर मजबूत असल्याचा अभिनय करत आलोय. सगळ्यांसाठी उभा राहिलो; पण काल पहिल्यांदा मला जाणवलं, मी स्वतःसाठी कधीच उभा राहिलो नाही. आणि तरीसुद्धा आज माझ्या या अपयशाचं ओझंही तुझ्याच खांद्यावर पडलं.”
नंदिनी त्याच्याकडे वळून पाहिलं. तिच्या नजरेत राग नव्हता, तक्रार नव्हती. तिच्या वागण्यात फक्त समजूतदारपणा दिसत होता.
“स्वराज..”
आज पहिल्यांदाच त्याचं नाव तिच्या तोंडावर आलं होतं. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती हलक्या स्वरात म्हणाली,
“लग्न म्हणजे रोजचं परफेक्ट असणं नाही. कधी कधी एकमेकांना तुटलेलं पाहणं आणि त्याच्यासाठी तिथेच थांबणं, हेही लग्नाचाच भाग असतो.”
तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांत पुन्हा पाणी उभं राहिलं होतं.
“नंदिनी, मी प्रामाणिकपणे कबूल करतो, मला माहीत नाही पुढे काय होईल. माझ्या आयुष्यातले सगळे गुंते लगेच सुटतीलच असं नाही. पण काल रात्री तू ज्या पद्धतीने मला धरून ठेवलंस ना, त्या क्षणासाठी तरी मी तुझे आभार मानतो. मी स्वतःला पूर्णपणे हरवलेलं असताना तू मदतीचा हात पुढे केलास आणि मला सावरलंस. थँक्यू सो मच नंदिनी..”
त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल आदरयुक्त भाव दाटून आला होता. नंदिनी शांतपणे म्हणाली,
“तुम्ही काल काही चुकीचं केलं नाहीये.”
तो लगेच वर पाहू लागला.
“माणसालाही कधी कधी कोसळण्याचा अधिकार असतो. सगळं आयुष्य सावरण्यात गेलं की एखादा दिवस असा येतोच.”
ती क्षणभर थांबली आणि पुढे म्हणाली,
“काल तुम्ही माझ्याकडे नवरा म्हणून नाही आलात. माणूस म्हणून आलात. आणि त्या नात्याने तुम्हाला आधार देणं मला चुकीचं वाटत नाही.”
हे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
“ती इतकी सहज कसं म्हणू शकते? इतकं सगळं सहन करूनही?”
त्याला प्रश्न पडला.
“पण तू माझ्यासाठी रात्रभर जागलीस.”
तो हळू आवाजात म्हणाला.
“ते तर केव्हाही झालं असतं. आज तुम्ही अस्वस्थ होता. उद्या कदाचित मी असेन.”
ती सौम्य हसत म्हणाली. तिचे हे शब्द तसे साधे होते; पण स्वराजच्या मनावर खोलवर रुतले होतं. त्याला आज पहिल्यांदाच जाणवलं,
“नंदिनी माझ्याकडून काही मागत नाहीये. न प्रेम, न स्पष्टीकरण, न हक्क.. ती फक्त हे नातं निभावून नेतेय. आमचं नातं फार काळ टिकणारं नाहीये तरीही तिला त्या नात्यातली जबाबदारी कळतेय. आणि हेच माझ्यात गिल्ट निर्माण करतंय. मी यापुढे कधीही तिच्या या शांतपणाचा गैरफायदा घेणार नाही. तिच्या आयुष्यातली ही नितळता मी कलुषित करणार नाही.”
इतक्यात नंदिनी हलकेच हसली आणि म्हणाली,
“आधी तुम्ही उठून तोंड धुवून घ्या.. मग मी सूप आणते. आपण नंतर बोलुयात. बाकीचं सगळं हळूहळू होत राहील.”
सकाळची उन्हं आता थोडी तीव्र झाली होती. खिडकीतून येणारा प्रकाश दोघांवर पडत होता एकजण कालच्या वेदनेतून सावरत, आणि दुसरी त्या वेदनेला शब्द न देता धरून ठेवत होती. हा फक्त सकाळचा क्षण नव्हता. हा त्यांच्या नात्यातला एक न बोललेला वळणबिंदू होता.
ती त्याच्यासाठी सूप आणण्यासाठी खोलीबाहेर गेली. स्वराज तसाच पलंगावर बसून राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, कोसळल्यावर कुणीतरी उठवेल, याची खात्री असणं हीच खरी ताकद असते. आणि कदाचित हाच त्यांच्या संसाराचा खरा प्रारंभ होता.
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा