डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ५३
©अनुप्रिया
©अनुप्रिया
खोलीत येताच मीराने खोलीचं दार जोरात बंद केलं. दार जोरात आपटल्याचा आवाज साऱ्या घरभर घुमला; पण त्याची घरातल्या कोणीच दखल घेतली नाही आणि तेच तिला जास्त बोचत होतं. आरशासमोर उभी राहताच तिनं स्वतःकडे पाहिलं. चेहऱ्यावरचा तो नेहमीचा आत्मविश्वासाचा मुखवटा आता तडकायला लागला होता. ओठ घट्ट आवळले गेले आणि डोळ्यांत साठलेलं पाणी शेवटी ओघळलंच.
“सगळ्यांच्या नजरेत तीच योग्य तीच महान आणि मी?”
ती स्वतःशीच कुजबुजली. अर्पिताचं बोलणं कानात घुमत होतं,
“नंदिनीच स्वराजची परफेक्ट पार्टनर आहे.”
त्या एका वाक्यानं तिच्या हृदयात कुठेतरी खोल जखम केली होती.
“इतकं सगळं करूनही, इतकं खेळ रचूनही शेवटी नंदिनीच जिंकणार?”
तो विचार तिला अस्वस्थ करत होता. ती पलंगावर बसली. डोकं हातात घेतलं.
“मी फक्त जे आहे ते खरं सांगितलं त्यात माझं काय चुकलं?”
ती स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत होती; पण मन मात्र आतून बंड करून मोठमोठ्याने ओरडत होतं,
“नाही… तू सत्य सांगितलं नाहीस, तू योग्य वेळ निवडलीस. तू मुद्दाम जखम उघडलीस. तुला माहित होतं, नंदिनीला ही गोष्टी समजली तर ती एक क्षणही या घरात थांबणार नाही आणि तुला तेच हवं होतं. ती घर सोडून माहेरी निघून गेल्यावर तुझ्या रस्त्यातला काटा आपोआप दूर झाला असता आणि मग तुला स्वराजच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्याच्या आयुष्यात, या घरात प्रवेश करता आला असता. हो ना?”
तिच्या मनाने तिलाच प्रश्न केला. नंदिनीचं शांत, संयमी बोलणं तिला आठवलं. आजूबाजूच्या बायका अर्पिताला टोमणे मारून बोलत होत्या, तेंव्हा नंदिनीने अर्पिताचा हात धरून दिलेला तो आधार, तिचे ते शब्द ‘आईपण ही भावना आहे.’ सारं मीराला आठवत होतं. त्या आठवणी मीराला खूप अस्वस्थ करत होत्या. कारण नंदिनी कधीच कुणाचा तिरस्कार करत नव्हती. ती कुणाला हरवण्यासाठी जगत नव्हती. ती फक्त घरातल्या माणसांना सावरण्यासाठी उभी राहत होती.
“ती इतकी चांगली का आहे? सगळ्यांना आपलंसं करून घेण्याइतकी?”
मीराने आरशातल्या प्रतिमेला विचारलं. डोळ्यांतली जळजळ वाढत होती. राग, मत्सर, अपयश सगळं एकत्र दाटून आलं होतं. तिला स्वराजचं दुःख आठवलं. त्याच्या डोळ्यांतली ती वेदना क्षणभर तिला चटका देऊन गेली. त्याच्या डोळ्यांतलं नंदिनीबद्दल वाटणारं प्रेम तिला स्पष्ट दिसत होतं. तो तिच्यावर जिवापाड प्रेम करू लागला होता.
“मीरा, तू नेमकं काय मिळवलंस?”
तिने स्वतःलाच प्रश्न केला.
“स्वराजच्या नजरेत स्वतःबद्दल प्रेम दिसावं म्हणून मी किती प्रयत्न केले. आज त्याच्या नजरेत मला प्रेम तर दिसलं पण ते माझ्यासाठी नव्हतं तर ते त्या नंदिनीसाठी होतं. मी हरले का?”
तिचा मनात प्रश्न डोकावला; पण तिनं तो ताबडतोब झिडकारून टाकला आणि स्वतःच्या मनाला पुन्हा बजावून सांगितलं.
“नाही… मी कमजोर नाही. मी हरलेली नाही.”
मीरा उठून खिडकीजवळ गेली. तिच्या मनात पसरलेल्या अंधाराप्रमाणे बाहेर अंधार पसरत चालला होता. आज पहिल्यांदाच तिला जाणवलं,
“नंदिनी घरातून गेली असली तरी तिचं अस्तित्व इथून गेलेलं नाही. उलट तिच्या अनुपस्थितीतच तिचं महत्त्व अधिक ठळक झालं होतं. प्रत्येकाच्या मनात तिच्याविषयीच्या भावना स्पष्ट झाल्या. किती प्रेम करतात सगळेजण नंदिनीवर!”
मीरानं खोल श्वास घेतला. डोळ्यातलं पाणी पुसलं. पुन्हा एकदा चेहऱ्यावर तोच मुखवटा चढवला. थंड, निर्विकार. पण आत कुठेतरी भीती जन्म घेत होती.
“जर नंदिनी परत आली तर?”
हा विचारच मीराला हादरवून गेला. मीराने पुन्हा चेहऱ्यावर खंबीरपणाचा मुखवटा चढवला. मीरा नेहमीसारखीच दिसत होती. चेहऱ्यावर किंचित स्मितरेषा, डोळ्यांत आत्मविश्वास, चालण्यात तोच ठामपणा.. ती आरशात पाहून स्वतःशीच बोलू लागली,
”लोकांना नेहमी वाटायचं, ‘ही मुलगी मजबूत आहे.’ पण आजवर कुणीही माझ्याजवळ येऊन मला विचारलं नाही की, “तू ठीक आहेस ना?” कारण मी कधीच माझं दुःख कोणाला दिसू दिलं नाही आणि दिसलं तरच हे जग त्याची दखल घेते.”
मीराच्या डोळ्यांत पाणी होतं. दिवसभर खंबीरपणाची निभावलेली भूमिका आता अंगावरून उतरू लागली होती. आरशात स्वतःचं रूप न्याहाळताना तिला तिच्या चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास दिसला;पण आता तो आरसा खोटं बोलायला तयार नव्हता. डोळ्यांखालची थकवा रेषा, ओठांवरची घट्ट पकड सगळं उघड दिसत होतं. मीरा स्वतःलाच पाहत होती; आणि पहिल्यांदाच तिला हे मान्य करावं लागलं की, हा मुखवटा आता जड होत चालला आहे. तिने खुर्चीत बसताच डोकं मागे टेकवलं. मनाचे वारू मात्र न थांबता उलट्या दिशेने धावू लागले.
“अधिरा…”
त्या नावानं तिच्या मनात उलथापालथ सुरू झाली होती. डोक्यात पुन्हा विचारांचं वावटळ घुमू लागलं.
“मी अधिराला सल्ले देत होते. तिला वास्तव चित्र दाखवत होते, तिला “तू स्वतःसाठी उभी राहा” असं सांगत होते; पण हे सगळं सांगताना मी स्वतः कुठे उभी होते? हा प्रश्न मी नेहमी टाळला होता. कारण तो प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःची कमतरता मान्य करणं होतं.”
मीरा किंचित हसली. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी कोरडं आणि थोडंसं कटू होतं.
“‘मी मजबूत आहे.’ असं मी स्वतःलाच कितीतरी वेळा सांगितलं होतं; पण मजबूत असणं आणि भावनाशून्य असणं यात फरक असतो हे आज मला प्रकर्षानं जाणवत आहे. मी कायम परिस्थितीला समजून घेतलं. आज न उद्या स्वराज माझा स्वीकार करेल या विचाराने मी कायम स्वतःला दुय्यम ठेवलं. मनातल्या भावना स्वराजला आताच नको सांगायला. योग्य वेळ येईल तेंव्हा सांगू असा विचार करून कायम स्वतःचं आयुष्य मी पुढे ढकलत ठेवलं. आणि आता माझ्या लक्षात येतेय, हे आयुष्य पुढे ढकलता ढकलता मी स्वतःपासूनच दूर गेलेय.”
मीराने डोळे घट्ट मिटून घेतले. नकोशा आठवणी, काही न बोललेल्या अपेक्षा, काही अर्धवट राहिलेल्या गोष्टी, आणि काही निर्णय जे तिने घेतले नाहीत, पण ज्यांची किंमत तिला मोजावी लागली होती ते सारं तिला आठवत होतं. कळत्या वयापासून मीरा कधी फारशी रडली नव्हती कारण तिला रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण वाटायचं; पण आज मात्र तिचे डोळे आपसूकच वाहू लागले होते.
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा