Login

तुम दे ना साथ मेरा.. १४

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १४
©अनुप्रिया

स्वराज नंदिनीच्या जाण्याच्या दिशेने पाहत होता. नंदिनीचा पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पाहत माधवराव मटकन खाली खुर्चीत बसले. क्षणभर शांतता पसरली.

“झालं तुमच्या मनासारखं? हेच होईल म्हणून मी घाबरत होतो डॅड.. आणि आता असं मुळीच म्हणू नका की, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी केलं. मी तयारच नव्हतो. काय वाईट झालं असतं मला सांगा डॅड, ती मुलगी जर लग्न करून या घरात आली असती? मी आनंदी झालो असतो. जिच्यावर प्रेम केलं, तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा विचार केला तर चुकलं का माझं?”

स्वराजने माधवरावांकडे रागाने पाहत विचारलं.

“राज, तुला समजत नाहीये, प्रेम फसवतं आपल्याला..”

माधवराव व्याकुळ होऊन म्हणाले.

“हो.. बरोबर आहे तुमचं.. पण प्रत्येकवेळी प्रेमात फसवणूकच होईल असं नाही ना? पण खोटं नेहमीच फसवतं. तुम्ही खोटं बोलून नंदिनीला या घरी आणलंत; पण ती फसली गेलीय याचं दुःख सतत तिच्या मनात राहील आता.. पाहिलंत डॅड, हे काय होऊन बसलंय ते?”

असं म्हणून तोही तिथून निघून गेला.

“राज, आम्ही जे काही केलं, तुझ्या भल्यासाठी केलं. आता तुला हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण कधीतरी तुलाही पटेल, नंदिनीसोबत तुझं लग्न लावून देण्याचा तुझ्या वडिलांचा निर्णय योग्यच होता. प्रेमाच्या या फसव्या मोहजालात अडकून किती जणांची आयुष्य उध्वस्त झालीत हे तुला माहीत नाही. त्या दुःखाच्या खाईत आम्हाला तुला ढकलून द्यायचं नव्हतं. एकदा का त्या दलदलीत अडकलो की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे बाळा.. ते भयानक आयुष्य खूप जवळून बघितलं आम्ही.. स्वतःच्याच सख्या भावाला आमच्याच कुशीत तडपून तडपून जीव सोडताना पाहिलंय आम्ही..”

माधवराव स्वतःशीच पुटपुटले. दिवाणखान्यात फेऱ्या मारून त्यांचे पाय दुखू लागले. माधवराव खुर्चीत बसले आणि डोळे मिटून घेतले. मनातलं वादळ घोंगावू लागलं. घरात इतकी गजबज असतानाही त्यांना एकटेपणा जाणवू लागला. आणि जुन्या आठवणी बोलू लागल्या. वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ डोळ्यांसमोर आला.

“दादा, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.”

माधवरावांचा धाकटा भाऊ प्रताप पोटतिडकीने म्हणाला.

“अरे पण आपल्या घरी हे चालणार नाही.”

“का नाही चालणार दादा? सुंदर आहे.. शिकलेली आहे. सुसंकृत आहे. वृंदा खूप चांगली मुलगी आहे अरे..”

“अरे पण.. आजवर आपल्या घरात कोणी असं केलंय का? प्रेमविवाह कोणाचाच झालेला नाही. आई आप्पा खूप रागावतील तुझ्यावर..”

माधवरावांनी प्रतापला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण तरीही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

“काय म्हणतोस दादा! फक्त ते मान्य करणार नाहीत म्हणून मी तिचा हात सोडून देऊ? हे पटतंय का तुला?”

“अरे प्रताप एक तर ती आपल्या तोलामोलाची नाही. त्यात ती दुसऱ्या जातीची आहे. ती लहान असतानाच तिचे आईवडील वारलेत. भावकीतल्या माणसांनी तिला लहानाची मोठी केली. शिकवली. तिच्यावर कसे संस्कार झालेत कोणास ठाऊक! आपले आप्पा कसे आहेत माहित आहे ना तुला?”

त्याच्या बोलण्यावर माधवराव पुन्हा म्हणाले.

“मला सगळं माहित आहे. पण फक्त घरातली माणसं म्हणजे माझं आयुष्य नाहीये दादा.. वृंदा माझ्यासोबत आहे तेवढंच माझ्यासाठी खूप आहे.”

प्रताप हसून म्हणाला. प्रताप वृंदाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. माधवरावांच्या समजवण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. घरच्यांच्या विरोधात जाऊन तो वृंदाच्या सोबत राहिला. अखेर नाईलाजाने प्रतापच्या प्रेमापोटी माधवराव आणि घरातल्या थोर मंडळींनी त्याच्या आणि वृंदाच्या लग्नाला परवानगी दिली. परजातीची असूनही वृंदाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीख ठरली. लग्नाची तयारी सुरू झाली. सर्वांना आमंत्रणे गेली. लग्नाचा बस्ता, दागिन्यांची खरेदी केली. घरात लगीनघाई सुरू झाली. माधवराव आणि शालिनीताई कंबर कसून कामाला लागले. घरातील शेवटचं लग्न असल्याने ते थाटातच होणार होतं. वृंदा अनाथ आहे. तिच्या हौशीमौजी कोण करणार या भाबड्या विचाराने लग्नाच्या आदल्या दिवशी शालिनीताईंनी नवरीच्या घरी लग्नाच्या साड्या, लग्नाचा शालू आणि तिचे दागिने पाठवून दिले.

लग्नाचा दिवस उजाडला. कामाची लगबग सुरू होती. सर्व मुलाकडचे नातेवाईक, मित्र मंडळी, पाहुणे मंडळी जमली. वाजंत्री मंडळी आली. सनई चौघड्याचे सूर कानावर पडू लागले. गुरुजी आले आणि विधीना सुरुवात करण्याची वेळ झाली. गुरुजींनी वधूला आणा म्हणून सांगितलं. मुहूर्ताची घटिका जवळ आली.


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”


0

🎭 Series Post

View all