Login

तुम दे ना साथ मेरा.. १८

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १८
©अनुप्रिया


प्रभावतीबाईंच्या बोलण्याने नंदिनी भीतीने थोडी मागे सरकली. त्यांचा आवाज ऐकून स्वराजही खोलीच्या बाहेर आला. इतक्यात घराच्या दाराकडे त्याचं लक्ष गेलं.

“मीरा..”

समोर एक पंचविशीची मुलगी उभी होती. उंच सडपातळ बांधा, गोरा रंग, घारे डोळे काळी जीन्स, त्यावर लेमन रंगाचा शॉर्ट टी-शर्ट, पायात उंच हिल्स, हातात सोन्याचं ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन, कानात हिऱ्यांचे लोंबते एरिंग्ज आणि शोल्डरवर लेदरची बॅग.. खांद्यापर्यंत रुळणारे तिचे मोहक कुरळे केस तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. ती मॉडर्न, आत्मविश्वासी वाटत असली तरी चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ती चालत पुढे आली. तिचं लक्ष स्वराजकडेच होतं. डोळ्यांतलं पाणी त्याच्यावरचा राग अंगार बनून बरसत होतं. थेट स्वराजच्या नजरेला नजर मिळवत तिने प्रश्न केला,

“माधव मामा, शालिनीमामी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय.. माझं आणि स्वराज लग्न लहानपणीच ठरवलं होतं, तर मग आता या मुलीशी त्याचं लग्न का लावून दिलंत? बोल स्वराज.. का असं केलंस?”

“डॅड, मॉम तुला या प्रश्नाचं उत्तर देतील. कारण त्यांनीच हे लग्न ठरवलं आणि मला हे लग्न..”

“स्वराज..”

शालिनीताई त्याच्यावर कडाडल्या. ते पाहून मीरा शालिनीताईंवरच कडाडून बरसली.

“त्याला कशाला रागवतेयस मामी? आम्ही तुमच्यासमोरच एकत्र वाढलो, खेळलो मोठे झालो. तुला माहित होतं ना? तुम्ही मोठ्यांनीच आम्हा दोघांचं आमच्या लहानपणी लग्न ठरवलंत.. तेच खरं मानून आम्ही एकत्र राहिलो. अगं भातुकलीच्या खेळातही कायम आम्ही दोघंच नवरा नवरी असायचो. मी खेळातसुद्धा कधी दुसऱ्या कोणाची बायको झाले नाही की इतर कोणाला स्वराजची बायको बनू दिलं नाही. भविष्यात मोठे झाल्यावर तुम्ही आमचं लग्न लावून द्याल. मी सरपोतदारांची सुन आणि स्वराज मुजुमदारांच्या जावई होईल हेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही एकमेकांवर प्रेम करत आलो. आणि तुम्ही आज चक्क त्याचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी त्याचं लग्न लावून दिलंत? माझ्या मनाचा जराही विचार केला नाहीत?”

“व्हॉट नॉनसेन्स मीरा! काहीही काय बोलतेयस तू? आपल्या दोघांचं प्रेम? डोकं बिकं फिरलंय का तुझं?”

स्वराज मधेच कडाडला. त्याचे शब्द ऐकून मीरा अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. स्वराज असं काही बोलेल याची तिला तसूभरही कल्पना नव्हती. थरथरत्या आवाजात तिने प्रश्न केला,

“म्हणजे? असं का बोलतोयस?”

“अगं माझं लग्न या मुलीशी मॉम डॅडनी ठरवलं हे जरी खरं असलं तरी माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, नाहीये आणि कधीच नसेल.”

नंदिनीकडे पाहत स्वराज संतापून म्हणाला.

स्वराज म्हणाला.

“स्वराज…..”

मीराला स्वर कातर झाला. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.

“हेच होतं आक्कासाहेब.. स्वराज मीराबद्दल कधीच काहीच बोलला नाही. आम्ही स्वतःहून त्याला मीराशी लग्न लावण्याबद्दल विचारलं होतं. तेंव्हा त्याने आता जे बोलला तेच सांगितलं होतं. जसं स्वराजच्या आवडीनिवडी बदलल्या तसं मीराच्याही बदलल्या असतील असं आम्हाला वाटलं. आणि तुमच्याकडूनही तसं काही आलं नाही. त्यामुळे मीरालाही स्वराजशी लग्न करायचं आहे की नाही याबद्दल काहीच माहित नव्हतं. आणि इथे तर त्याने नवीनच प्रकरण..”

माधवराव त्यांची बाजू मांडत असतानाच शालिनीताईंनी त्यांना अडवलं. स्वराजबद्दल फार चर्चा त्यांना नको होती. शेवटी आईच ती! मुलांचे अपराध पोटात घालणारच.. सगळ्यांना शांत करण्याच्या हेतूने त्या म्हणाल्या,

“आता मागच्या गोष्टींची चर्चा करून काही होणार आहे का? स्वराज आणि नंदिनीचं लग्न झालंय.. आज तिचा या घरातला दुसरा दिवस.. लग्नानंतरच्या सर्व विधी बाकी आहेत. अजून शेजारच्या बायकांना हळदीकुंकू सभारंभाला बोलायचं. नव्या नवरीच्या ओटी भरायची. अजून तिचा स्वयंपाक घरातला पहिला स्वयंपाक व्हायचाय. ते सगळं करायचं बाकी आहे आणि तुम्ही काय हा वाद घालत बसलात?”

“नाही.. शालिनी थांब.. आमच्या मुलीला जो त्रास झाला, त्याचं काय? तिचं प्रेम होतं स्वराजवर म्हणजे अजूनही आहे, मग तिने काय करावं? याचा आम्ही शून्य मिनिटात निकाल लावतो की नाही बघ. बोल स्वराज.. माधवा सांग आम्ही करायचं?”

प्रभावतीबाईंनी स्वराज आणि माधवराव यांच्याकडे रागाने पाहत प्रश्न केला.

“प्रभाआत्या, तू समजतेस तसं आमच्यात काही नाहीये. वुई आर जस्ट फ्रेंड्स.. नथिंग एल्स.. मीराला गैरसमज झालाय. ती मैत्रीला प्रेम समजून बसलीय. त्यात मी काय करू सांग? माझ्या मनात कधीच तसा विचार आला नाही.”

स्वराज प्रभावतीबाईंकडे पाहत म्हणाला. त्यांनी उलट प्रश्न केला.

“तू या लग्न करून आणलेल्या मुलीसाठी आमच्या मीराला नाकरतोयस ना?”

“तसं काही नाही प्रभाआत्या.. नंदिनी जरी नसती तरीसुद्धा मीराशी लग्न करण्याचा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नसता. त्यामुळे नंदिनीमुळे काही झालेलं नाही. मी तर नंदिनीशीही लग्न करायला…”

“पुन्हा तेच.. थांबवा बरं हे! वन्स.. चला तुम्ही आणि फ्रेश होऊन घ्या.. आताच प्रवासातून आलात. काहीतरी खाऊन घ्या.. नंदिनी.. जा बाळा यांच्यासाठी काहीतरी बनव पटकन.. आज तू पहिल्यांदा आपल्या घरात पक्वान बनवणार आहेस. बघ हं.. आत्याबाईंना आवडायला हवं.. तुझी परीक्षाच आहे असं समज.. आत्याबाईंना आवडलं की तू या परीक्षेत पास झाली असं समजू आम्ही.. चल आवरायला घे..”

शालिनीताईंनी पुन्हा परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश आलंही. नंदिनीने मान डोलावली आणि ती किचनच्या दिशेने चालू लागली. शालिनीताई आपल्या नणंदबाईना, प्रभावतीबाईना घेऊन त्यांच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागल्या. तेंव्हा कुठे त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.. स्वराज आणि माधवरावही तिथून निघून आपापल्या खोलीत गेले. मीरा मात्र एकटक नंदिनीकडे पाहत जागीच उभी होती. मनात मात्र एक वादळ घोंगावत होतं.

“नंदिनी, तू जी कोणी असशील ती.. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वराज माझा आहे, फक्त माझा.. तो आता जरी आमचं नातं नाकारत असला तरी एक दिवस मी त्याला माझा करूनच घेईन. स्वराजला माझं बनवणं आता हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि तुझी आताची निमित्तमात्र असलेली उपस्थितीही मी संपवून टाकेन. तुझ्या इथे असण्याला मी आव्हान मानते. मी तुझ्यापुढे हरणार नाही. तुला कसं नेस्तनाबूत करते ते बघच आता.. तुला त्याच्या आयुष्यातून हद्दपार नाही केलं तर नाव मीरा मुजुमदार सांगणार कधीच..”

ती छद्मी हसली. एक असुरी हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं.



क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all