Login

तुम दे ना साथ मेरा.. ३१

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३१
©अनुप्रिया


त्या रात्री नंदिनीला नीट झोप लागली नाही. वारंवार अर्पिताचं शांत, थोडंसं दूर गेलेलं वागणं डोळ्यांसमोर येत होतं. “सगळं ठीक आहे” असं स्वतःला सांगण्याचा ती प्रयत्न करत होती; पण मन मानत नव्हतं. काहीतरी बिनसलं होतं. रोज स्वयंपाकघरात तणावाचं वातावरण दिसू लागलं. अर्पिता आणि नंदिनीच्या नात्यात जणू तडा गेला होता. नंदिनीला चैन पडत नव्हतं. इतकं छान वागणाऱ्या अर्पिताताई अचानक कशा बदलल्या हेच तिला समजत नव्हतं. मग तिने अर्पिताशी बोलायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सार्थक आणि स्वराज कारखान्याच्या कामानिमित्त माधवरावांसमवेत बाहेर गेले होते. शालिनीताई त्यांच्या खोलीत आराम करत होत्या. सकाळची घाईची कामे उरकली असल्याने घरात थोडी निवांत शांतता होती. अर्पिता हॉलमध्ये बसून काही कागद चाळत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. डोळ्याखाली हलकं काळवंडलेपण होतं. नंदिनी चहा करून घेऊन आली. क्षणभर थांबून नेहमीप्रमाणे चहा ठेवून निघून जाण्याऐवजी तिने हळूच अर्पिताला विचारलं,

“ताई, चहा ठेवू का?”

अर्पिताने मान हलवली.

“ठेव.”

नंदिनी कप ठेवून तिथेच थांबली. क्षणभर शांतता पसरली. तीच शांतता… जी मागच्या काही दिवसांत घरात वाढत चालली होती. नंदिनीने धीर एकवटला आणि अर्पिताला विचारलं,

“ताई, एक विचारू का?”

अर्पिताने क्षणभर थांबून तिच्याकडे पाहिलं. हातातले कागद बाजूला ठेवले आणि म्हणाली,

“विचार.”

नंदिनीचा आवाज जरा कापरा झाला. तिने घाबरतच विचारलं,

“ताई, माझं काही चुकतंय का? म्हणजे तुम्हाला त्रास होईल असं काही माझ्याकडून झालंय का?”

हा प्रश्न ऐकून अर्पिताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छाया उमटली. क्षणभर तिने काहीच उत्तर दिलं नाही. नजर खाली झुकवली. नंदिनीला वाटलं कदाचित आपण जरा जास्तच विचारून गेलो. पण मग अर्पिता हळूच हसली. ते हसू खूप थकलेलं होतं.

“नाही गं नंदिनी… तू काहीच चुकलेली नाहीस.”

“मग? तुम्ही माझ्याशी पाहिल्यासारखं का बोलत नाही? ते म्हणजे.. तुमच्या चेहऱ्यावर नाराजी का?”

नंदिनीचा प्रश्न अपूर्णच राहिला. अर्पिताने खोल श्वास घेतला आणि बोलू लागली.

“कधी कधी माणूस स्वतःशीच अडखळत असतो आणि मग त्याची झळ समोरच्याला लागते. इतकंच..”

नंदिनी शांतपणे ऐकत होती. अर्पिता पुढे बोलू लागली,

“हे घर.. खूप वर्षं मी जसं चालवलं, जसं लावलं, तसं होतं. सवयी होत्या. अधिकार नव्हे पण ओळख होती. आणि तू आलीस. चांगली, समजूतदार, सगळ्यांची काळजी घेणारी.. नंदिनी, तुला खरं सांगते, कुणी माझी जागा घेतेय असं मला कधी वाटलं नाही; पण या घरातील माझं महत्त्व हळूहळू कमी होतंय का अशी एक भीती मनात डोकावली.”

हे शब्द अर्पिताच्या तोंडून बाहेर पडताच तिचे डोळे पाणावले. नंदिनी गोंधळून गेली.

“ताई, तुम्हाला असं कसं वाटू शकतं? तुमची जागा कोणीही घेऊच शकत नाही. तुमचं या घरातलं महत्व कधीच कमी होऊ शकणार नाही.”

अर्पिताने मान हलवली.

“मला माहीत आहे. बुद्धीला सगळं माहीत असतं. पण मन… मन वेगळंच वागतं. मला स्वतःलाच राग आला होता म्हणून मी शांत राहिले. कदाचित थोडी दुरावले.”

नंदिनी क्षणभर काहीच बोलली नाही. मग ती हळूच अर्पिताजवळ बसली आणि मृदू स्वरात म्हणाली,

“ताई, मी इथे तुमची जागा घ्यायला आलेच नाही. मी हे घर चालवायलाही आले नाही. तुमचं या घरातील स्थान कायम अबाधित आहे. ते असं कोणाच्या येण्याने डळमळीत होणार नाही. मी इथे तुमच्याशी कोणतीही स्पर्धा करायला आलेले नाही तर मी इथे या घरात सामील व्हायला आलेय. तुम्ही जशा आहात, तशाच राहाव्यात असंच मला वाटतं. मला काही कळत नसेल तर सांगा. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचंय, बदलायचं नाही.”

अर्पिताने नंदिनीकडे पाहिलं. त्या नजरेत पहिल्यांदाच परकं काहीच नव्हतं. फक्त थकवा आणि दिलासा होता.

“तू समजून घेतलंस गं… एवढंच पुरेसं आहे.”

नंदिनी हलकंसं हसली आणि म्हणाली

“मलाही समजायला वेळ लागतो ताई.. पण मनात साठवून ठेवण्यापेक्षा सगळं बोलून टाकलं की बरं वाटतं.”

अजून थोडा वेळ बोलून नंदिनी चहाचे रिकामे कप उचलून
स्वयंपाकघरात गेली; पण अर्पिता बराच वेळ तिथेच बसून राहिली. तिचं मन मात्र तिच्या हातातल्या कागदावर नव्हतं.

“मी का अशी वागले?”

हा प्रश्न तिला पुन्हा पुन्हा छळत होता. लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षांची आठवण डोळ्यांसमोर तरळून गेली. ते घर, घरातली माणसं, तिच्या जबाबदाऱ्या सगळं तिच्याभोवती फिरत होतं. घरात काय लागेल, कुणाला काय आवडतं, कुठली वस्तू कुठे ठेवायची हे सगळं तिच्या नकळत तिची ओळख बनलं होतं. कुणी तिला सांगितलं नव्हतं की, हे तिचं काम आहे; पण तिनेच ते आवडीने स्वीकारलं होतं. आणि मग नंदिनी धाकटी सुन बनून आली. हसरी. नीटनेटकी. सगळं पटकन शिकणारी. अर्पिताला जाणवलं, नंदिनी काहीही मुद्दाम करत नाहीये पण तरीही घरात एक नवी लय तयार होत होती. आणि त्या नव्या लयीमध्ये आपली भूमिका काय हा प्रश्न अर्पिताला स्वतःलाच विचारायला लागला होता.

“माझं काम संपलंय का? माझी गरज उरलेली नाही का?”

हे प्रश्न तिने कुणालाही विचारले नव्हते; पण तिच्या मनात ते बोचत राहिले.

दुपारी अर्पिता तिच्या खोलीत आली. कपाट उघडताना तिचा जागीच हात थांबला. नंदिनीने नीट घडी घालून ठेवलेले कपडे पाहून तिला क्षणभर समाधान वाटलं. आणि लगेच अपराधीपणाची भावनाही दाटून आली.

“तिला नीट जमायला लागलंय. आणि मग मला का एवढं अस्वस्थ वाटतंय?”

तिने पलंगावर बसून डोळे मिटले. पहिल्यांदाच तिने स्वतःला कबूल केलं होतं,

“ही भीती नंदिनीची नाही तर ही भीती माझी होती. नंदिनीच्या येण्याने माझ्या मनात असुरक्षितता निर्माण झाली. ती तर घरातली एक सदस्य बनून काम करत होती पण मलाच वाटलं, ती या घरातली माझी जागा घेऊ पाहतेय. माझाच गैरसमज झाला.”

अर्पिताला हळूहळू तिची चूक समजू लागली होती. संध्याकाळी अर्पिता स्वयंपाकघरात आली. नंदिनी भाजी चिरत होती. नेहमीसारखी शांत, कामात गुंतलेली.. अर्पिता थोडा वेळ तिला बघत राहिली. तिने नंदिनीला आवाज दिला.

“नंदिनी…”

नंदिनी वळून तिच्याकडे पाहिलं.

“काय ताई?”

“परात खालच्या कपाटातच ठेव. मला सवय आहे ती तिथेच ठेवायची. तीच तिची नेहमीची जागा आहे.”

नंदिनी क्षणभर थांबली. मग हसत म्हणाली,

“बरं. तुम्ही सांगाल तसं.”

त्या साध्या उत्तरात अर्पिताला हवी असलेली खात्री मिळाली. ती विचार करू लागली,

‘आपण अजूनही इथे आहोत. अनावश्यक नाही. बाजूला पडलेली नाही.’

त्या रात्री अर्पिताने स्वतःशीच ठरवलं,

‘घर शेअर करणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व गमावणं नसतं.
कधी कधी थोडी जागा दिली की नातं जास्त मोकळं श्वास घेतं.’

आणि पहिल्यांदाच तिने मनातून नंदिनीबद्दल असलेली कुरबूर बाजूला ठेवली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अर्पितानेच नंदिनीला हाक मारली.

“आज पोहे मी करते. तू जरा बस.”

नंदिनी आश्चर्याने पाहू लागली.

“ताई, मी करू का?”

“नको. कधी कधी घरातल्या सगळ्यांनी सारखं काम करू नये. काही वेळ फक्त तिथे असणंही महत्वाचं असतं.”

त्या वाक्यात अर्पिताची स्वीकाराची सुरुवात होती. नंदिनीला जाणवलं,

‘काही लोक दुखावलेले असतात म्हणून दूर जातात आणि काही लोक स्वतःला ओळखायला वेळ लागतो म्हणूनही दूर दूर राहतात. आपण हे स्वीकारलं पाहिजे.’

दोघी एकमेकींच्या समोर होत्या. आता प्रतिस्पर्धी नव्हत्या तर हळूहळू सहप्रवासी होत चालल्या होत्या. आता अर्पिता आणि नंदिनी एकमेकांशी हसून बोलू लागल्या. दोघींच्या हसण्या बोलण्याच्या स्वराने स्वयंपाकघर पुन्हा निनादू लागलं होतं.

नंदिनीच्या लक्षात आलं, आता परात परत खालच्या कपाटात होती. साखरेचा डबा नेहमीच्या जागी होता; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अर्पिताच्या वागण्यात पुन्हा एक आपुलकी होती. नंदिनीला आता उमगलं होतं,

‘काही गैरसमज शब्दांनी निर्माण होत नाहीत तर न बोलण्याने वाढतात. आणि काही नाती वाचवायला मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त समजून घेण्याची तयारी पुरेशी असते.’


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all