Login

तुम दे ना साथ मेरा.. ३३

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेम कहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ३३
©अनुप्रिया


नंदिनी अर्पिताविषयी भरभरून बोलत होती आणि स्वराज तिला शांतपणे ऐकत होता. ती एकटीच बडबड करतेय हे तिच्या लक्षात आल्यावर ती पटकन तिची जीभ चावत म्हणाली,

“अरे हे काय! मी एकटीच बोलतेय..”

“अरे तू बोल, मी ऐकतोय..”

स्वराज हसून म्हणाला. तिचं बोलणं तो शांतपणे ऐकत होता. तिच्या मनातली कुटुंबाबद्दलची काळजी त्याला तिच्या डोळ्यांत दिसत होती. तिचं ऐकून झाल्यावर तो जागेवरून उठत म्हणाला,

“चल. आपण वहिनीला भेटू.. मी बोलतो तिच्याशी..”

“आता? सार्थकभावोजी येण्याची वेळ झालीय.”

“असू देत. आपण बोलून येऊ पटकन चल..”

असं म्हणत स्वराज आणि नंदिनी अंगणातून उठून आत अर्पिताच्य खोलीपाशी आले. अर्पिताच्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आत दिवा लागला होता. अर्पिता पलंगाच्या कडेला बसून काहीतरी शोधत असल्यासारखी कपाटाकडे पाहत होती. नंदिनी आणि स्वराज क्षणभर थांबले. अर्पिताच्या चेहऱ्यावरचं ते ओढवलेलं मौन पहिल्यांदाच इतकं स्पष्ट त्यांनी पाहिलं होतं.

“ताई…”

नंदिनीने हळूच हाक मारली. अर्पिता दचकली. पटकन उठली. चेहऱ्यावर तोच संयमाचा पडदा चढवला.

“अरे नंदिनी तू? आणि हे काय, स्वराज भावोजीही आलेत? या ना.. आत या..”

“हो आम्ही येतो; पण मला सांग तू ठीक आहेस ना?”

स्वराजचा हा प्रश्न फार साधा होता; पण अर्पिताच्या मनाला नेमका टोचून गेला. ‘ठीक’ हा शब्द आज तिला परका वाटला.

“हो… ठीकच आहे.”

तिला अजूनही त्या गोष्टीचं वाईट वाटलंय हे नंदिनीने ओळखलं होतं. काही क्षण शांततेत गेले. मग नंदिनी म्हणाली,

“ताई, मला काही विचारायचं होतं.”

नंदिनीने अर्पिताकडे पाहत विचारलं. अर्पिताने होकारार्थी मान हलवली.

“माणसं इतकं सहजपणे कसं बोलू शकतात?”

“म्हणजे? काय झालं?”

अर्पिताने विचारलं. नंदिनी काही उत्तर देणार इतक्यात स्वराज म्हणाला,

“आज यमुआत्या आली होती ना? ती तुला .. असं कसं म्हणू शकते? नातवंड, पाळणा, वंश… कधी कधी वाटतं तिला कळतंच नाही की, आपण काय बोलतोय?”

हे बोलताना स्वराजचा सूर तक्रारीचा नव्हता; तो समजुतीचा होता. अर्पिता क्षणभर गप्प राहिली. मग ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली,

“लोकांना काय फरक पडतो? बोलून जातात.”

“पण आपल्याला पडतो ना…”

पटकन नंदिनी बोलून गेली. हे वाक्य ऐकून अर्पिताच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिने पटकन नजर वळवली.

“नंदिनी… तू अजून नवीन आहेस. सवय होईल.”

“कदाचित…”

नंदिनी क्षणभर थांबली. मग स्पष्टपणे म्हणाली,

“पण सवय म्हणजे सहन करणं असं असेल, तर मला ती सवय नको.”

अर्पिता काही बोलणार इतक्यात स्वराज म्हणाला,

“बरोबर बोलतेय नंदिनी.. तुला काहीच सहन करण्याची गरज नाही. समजलं तुला?”

तो प्रश्न विचारताना त्याचा आवाज हलका होता; पण प्रश्न खरा होता. अर्पिता काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली,

“स्वराज, कधी कधी असं वाटतं की, घरात असूनही आपण थोडेसे बाहेरचे आहोत.”

स्वराजने काही बोलायच्या आत नंदिनी म्हणाली.

“नाही वहिनी. घरात कुणी बाहेरचं नसतं. फक्त कधी कधी आपण स्वतःच आपल्याला बाजूला ठेवतो.”

ती स्वतःच थांबली. तिला जाणवलं, हे वाक्य ती फक्त अर्पितासाठी नाही, तर स्वतःसाठीही बोलतेय. त्या क्षणी स्वराजला दोघींमधली ही शांत जवळीक जाणवली. त्याला पहिल्यांदाच असं वाटलं की, हे नातं फक्त ‘करार’ किंवा ‘जबाबदारी’ पलीकडे सरकतंय. त्याने मनातल्या मनात विचार केला,

“सहा महिने.. ही फक्त वेळ नाहीये. ते सगळ्यांच्याच मनावर आपापल्या खुणा सोडत आहेत.”

त्या रात्री झोपताना नंदिनीला सारखा अर्पिताचा चेहरा आठवत राहिला. स्वराजला नंदिनीची ती सहज ठाम वाक्यं आठवत राहिली आणि अर्पिताला कपाटातले ते छोटे कपडे आठवत राहिले; पण आज पहिल्यांदाच त्या आठवणींसोबत एक नवा विचारही होता. कदाचित मला विसरलं जाणार नाही पण मला माझं स्थान स्वतःलाच मान्य करावं लागेल .घर तसंच होतं. माणसंही तीच. पण त्या रात्री, तिघांच्याही मनात काहीतरी खळबळ माजली होती. शांतपणे, न बोलता आणि कायमचं मनावर कायमचं कोरलं गेलं होतं.

हळूहळू स्वराज आणि नंदिनी यांच्यात मैत्रीचं नातं फुलू लागलं होतं. एकमेकांशी गप्पा होऊ लागल्या. एकदा रात्री बेड वावरत असताना सोफ्यावर कुठलीशी कादंबरी वाचत बसलेल्या स्वराजकडे पाहून तिने सहज त्याला विचारलं.

“स्वराज, एक विचारू?”

“हां विचार..”

पुस्तकातून डोकं वर काढून तो म्हणाला.

“तुम्ही लग्नासाठी तयार नव्हतात ना?”

तिचा आवाज शांत होता. आरोप नव्हता. स्वराजने खोल श्वास घेतला.

“नव्हतो. आणि त्यामागचं कारणही तुला ठाऊक आहे.”

नंदिनीने होकारार्थी मान डोलावली.

“मग तरीही तू थांबलीस?”

त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.

“तुम्हीही थांबलात..”

“आपण दोघंही वेगवेगळ्या कारणांसाठी थांबलोय.”

तो हलकंसं हसला. पहिल्यांदाच ते हसू नैसर्गिक वाटलं.

“ठीक आहे. मी सहजच विचारलं.”

स्वराजने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत उत्सुकता नव्हती तर समजूत होती.

“तू वेगळी आहेस.”

तो नकळत म्हणाला. नंदिनी हसली नाही.

“मी वेगळी नाही. मी फक्त घाई करत नाही.”

पलंगावरची उशी नीट ठेवत नंदिनी म्हणाली.

“मग पुढे काय करायचं ठरवलंत?”

“म्हणजे?”

तिच्या प्रश्नावर चमकून त्याने विचारलं.

“अहो, म्हणजे पुढे जाऊन तिच्याशी लग्न वैगरे..”

स्वराजने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला,

“तिला माझं लग्न झालेलं माहीत नसावं कदाचित.”

“कशावरून?”

“एवढ्यात मला जाब विचारण्यासाठी तिचा कॉल आला असता.. तांडव केला असता तिने..”

त्याचा चेहरा दुःखाने भरून गेला. तिला स्वराजबद्दल कणव वाटू लागली. तो पुढे म्हणाला,

“पुढच्या आठवड्यात ऑफिस जॉइन करायचं आहे. तेंव्हा भेटून सांगेन.”

“काय सांगाल? माझ्याकडून सहा महिन्याचा अवधी मागून घेतलाय हे? सहा महिने झाले की, मी माझ्या बायकोला घटस्फोट देईन. आम्ही दोघे वेगळे होऊ आणि मग आपण लग्न करू. हेच ना?”

तिच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं. स्वराज शांत बसून होता.

“नंदिनी मला तुला त्रास द्यायचा नाहीये; पण माझा नाईलाज आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तिला फसवू शकत नाही.”

डोळ्यांत पाणी आणून तो पोटतिडकीने सांगत होता.

“माझं काही म्हणणं नाही. मी तुम्ही दिलेल्या पेपर्सवर साईन केलीय म्हटल्यावर तुम्हाला मला माझ्या बंधनातून मोकळं करावंचं लागेल. पर्याय नाही..”

“थँक्यू.. मला समजून घेतल्याबद्दल..”

स्वराज तिच्याकडे पाहत म्हणाला. नंदिनी खिडकीतून बाहेर आकाशात पाहत होती. मंद वारा सुटला होता. आणि दोघांच्याही मनात एक गोष्ट स्पष्ट होत चालली होती.

“हे नातं तुटलेलं नाहीये. ते फक्त थांबलेलं आहे.”


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all