डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ४
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी विचारात पडली. आयुष्याच्या अशा वळणावर येऊन ती थांबली होती की, जिथून पुढे जाणे तिला जमणार नव्हते आणि मागे फिरणेही आता शक्य नव्हते. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईबाबांचा केविलवाणा चेहरा फिरू लागला. दादाची दयनीय अवस्था दिसू लागली.
“आता जर रागाच्या भरात मी माझ्या घरी निघून गेले आणि आईबाबांना हे सगळं सांगितलं तर त्यांची काय अवस्था होईल? बाबा तर आधीच हार्ट पेशन्ट आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलीला घरी परत आलेलं पाहून त्यांना काय वाटेल? हा धक्का ते पचवू शकतील का? इभ्रतीच्या भीतीने देहातून आधीच प्राण गेल्यासारखं वाटेल त्यांना. माझ्या माहेरी जाण्याने चारचौघात त्यांची मान शरमेने खाली झुकेल. आणि दादा? तो तर आता कुठे त्याच्या बिझनेसमध्ये स्थिरावत चाललाय.. स्वतःच्या बळावर तो काहीतरी करू पाहतोय. त्याच्या बिझनेसमध्ये हे म्हणतायेत तसं सरपोतदार पार्टनर असतील आणि त्यांनी जर त्यांची भागीदारी काढून घेतली तर दादाचा बिझनेस? तो कोलमडून जाईल. किती नुकसान होईल त्याचं! आणि मंजिरी वहिनी, छोटी आराध्या.. अवघी दोन वर्षाची आहे.. त्यांचं काय होईल?”
तिच्याच प्रश्नांनी तिला घेराव घातला. घराच्यांच्या काळजीने तिचा जीव कासावीस झाला. काय करावं तिला समजेना. थरथरत्या हातांनी पलंगावर विखूरलेले ते घटस्फोटाचे पेपर गोळा केले. आणि स्वतःच्या डोळ्यांसमोर धरले. त्यावर तिचं नाव ‘नंदिनी स्वराज सरपोतदार’, त्याचं नाव ‘स्वराज माधवराव सरपोतदार’ विभक्त होण्याची मुदत सारा तपशील धुसर होत चालला होता. नंदिनीने स्वराजकडे पाहिलं. तिला वाटलं, त्याच्या नजरेत थोडासा तरी पश्चाताप, तिच्याबद्दल काळजी दिसेल. त्याच्या विचित्र वागण्याबद्दल तो माफी मागेल; पण तिचा भ्रमनिरास झाला. मनातली आशा मनातच मावळली. तो तसाच एखाद्या पाषाणासारखा उभा होता. त्याच्यावर कितीही डोकं आपटलं तरी दगडाला काही पाझर फुटणार नाही उलट आपलाच कपाळमोक्ष होईल.
“सही कर.”
त्याचा कठोर आवाज नंदिनीच्या कानी पडला. तिच्या श्वासात हुंदका मिसळला.
“आत्ता? याक्षणी?”
तो थेट नजरेला नजर मिळवत म्हणाला,
“हो. मला हे सगळं लगेच संपवायचंय.”
नंदिनीने थरथरत पेन उचलला. सही करण्यासाठी हात कागदावर नेताच ती थबकली. डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब अलगद पेपरवर पडला. आता खोलीतला फुलांचा सुगंध तिला बोचरा वाटू लागला. पहिल्या रात्रीची स्वप्नील शांतता तुटून पडली होती.
“मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता.”
ती स्वतःशीच पुटपुटली. स्वराजने मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल काळजीचा साधा लवलेशही नव्हता. नव्या आयुष्याच्या सुरुवातीलाच नियतीने तिचा घात केला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. सजवलेल्या त्या खोलीचं सौंदर्य आता तिच्यासाठी कैद झाल्यासारखं वाटू लागलं. नंदिनी तशीच हातात पेन धरून बसली होती.तिचा आवाज थरथरला,
“ठीक आहे. मी सही करायला तयार आहे; पण त्या आधी मला एक सांगाल का? तुमची आणि माझी या आधी साधी ओळखही नव्हती, मग माझ्याबद्दल तुमच्या मनात इतका राग का? माझा काय दोष आहे म्हणून तुम्ही मला घटस्फोट देताय?”
हाताची घडी घालत तिच्याकडे चेहरा वळवून तो म्हणाला,
“दोष तुझा नाही. पण माझा निर्णय पक्का आहे.”
तिने जवळजवळ रडतच त्याला विचारलं,
“बरं मग माझं मन, माझ्या भावना? माझं आयुष्य? माझं भविष्य?”
नंदिनीच्या प्रश्नावर स्वराज हलकेच पण खूप थंड आवाजात म्हणाला,
“तुला काय वाटतंय फक्त तू एकटीच अडकलीस? नाही.. मी पण अडकलोय.”
“तुमचं कोणावर प्रेम आहे? किंवा..”
तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला,
“हो. आहे कुणीतरी..”
त्या एका वाक्याने नंदिनीच्या शरीरातलं सारं अवसान गळून पडलं. तिच्या हातातला पेन नकळतपणे खाली पडला.
“आणि म्हणून?”
“आणि म्हणूनच हे लग्न माझ्यासाठी एक ‘समजुतीचा करार’ आहे. फक्त सहा महिने.. त्यानंतर तू मोकळी, मी मोकळा..”
तिचं बोलणं अर्धवट ठेवत स्वराजने उत्तर दिलं.
“आणि तोपर्यंत? मी काय? एक भार? एक त्रास?”
तिने हुंदका दाबत विचारलं. तो तसाच ताठ उभा होता. त्याला जणू कसलीच फिकीर नव्हती. कशाचं सोयरसुतक नव्हतं.
“आपलं लग्न झालंय म्हणून आपण फक्त एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्ती आहोत. लोकांना दाखवायला, वागायला आपण नवरा बायको आहोत. सुखी जोडप्यासारखं फक्त भासवायचं. त्यापलीकडे आपल्यात काहीच नाही.”
तिच्या आत काहीतरी मोडून पडत होतं. गालावर ओघळलेली आसवं पुसत तिने पुन्हा पेन उचलून हातात घेतला. हाताला कंप सुटला होता पण नजर मात्र स्थिर होती.
“ठीक आहे. मी सही करते; पण माझी एक अट आहे.”
तो पहिल्यांदा अस्वस्थ झाला.
“काय?”
त्याने तिच्याकडे पाहून प्रश्न केला.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा