Login

तुम दे ना साथ मेरा.. ५४

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ५४
©अनुप्रिया


मीराच्या डोळ्यांतून आसवं वाहू लागली. ती आसवं फक्त दुःखाची नव्हती तर तिच्या थकव्याची, मी ठीक आहे या सावरलेपणाच्या ओझ्याची होती. ‘मी सगळं सांभाळू शकते.’ या हट्टी भूमिकेची होती.

“आता मी खूप थकलेय रे..”

ती उदासपणे हळूच पुटपुटली. आज तिने पहिल्यांदाच स्वतःला ऐकवलं होतं. तीही थकू शकते हे कबूल केलं होतं. मीरा पलंगावरून उठून खिडकीजवळ आली तिने अलगद खिडकी उघडली. बाहेर रात्रीचं शांत आकाश पसरलं होतं. कुठेही गर्दी नाही, कुठेही गोंधळ नाही. त्या शांततेत उभी राहून तिला जाणवलं,

“आपण इतरांसाठी इतकी स्पष्ट असतो, ठामपणे निर्णय घेतो; पण मग स्वतःची वेळ येते तेव्हा आपण इतके गोंधळलेले का असतो?”

मीरा स्वतःशी प्रामाणिक व्हायचा प्रयत्न करत होती. तिला अधिराचं स्वतःसाठी उभी राहण्याचं, पुढे जाण्याचं धैर्य आवडलं होतं.

“तिने स्वतःचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कृतीही केली. ती गोंधळलेली नव्हती. तिच्या विचारात एक सुस्पष्टता होती. तिने स्वराजला सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे अंमलातही आणला. ग्रेट यार!”

मीराच्या मनात अधिराच्या धैर्याबरोबरच तिला एक हलकीशी भीतीही वाटत होती. कारण अधिरा पुढे गेली, तर नंदिनी आणि स्वराज एकत्र येतील. मग मीरा कुठे उरणार होती? नेहमी खंबीरपणे वावरणारी, चाणाक्ष, हट्टी, कट कारस्थानं रचणारी; इतरांना कमी लेखणारी, लोकांशी फटकून बोलणारी, स्वतःला केंद्रस्थानी ठेवणारी मीरा..

चेहऱ्यावर तिने एकावर एक चढवलेले हे मुखवटे आता हळूहळू गळून पडत होते आणि त्याखाली एक साधी, गोंधळलेली, थोडी घाबरलेली, थरथरत उभी असलेली एक मुलगी तिला दिसत होती, जिला फक्त इतकंच हवं होतं की, कुणीतरी तिलाही विचारावं,

“तू ठीक आहेस ना?”

मीराने दीर्घ श्वास घेतला. डोळ्यातलं पाणी पापण्यांच्या बांध फोडून वाहू लागलं. तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत नव्हती; पण पहिल्यांदाच तिला स्वतःचा प्रश्न स्पष्ट दिसत होता. आणि कदाचित हाच तिचा पहिला प्रामाणिक क्षण होता. ती किंचित हसली आणि मुखवट्याआड असलेली मीरा स्वतःशीच एक संकल्प करत म्हणाली,

“आता यापुढे मी स्वतःला विसरणार नाही.”

मीराने खोलीतले दिवे मालवून टाकले. आणि पलंगावर आडवी झाली; पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. डोळे मिटले की, स्वराजचा नंदिनीसाठी रडताना कोसळत असतानाचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. ‘नंदिनी माझा श्वास आहे.’ ह्या त्याच्या शब्दांनी तिला आतून हादरवलं होतं.

“स्वराजला इतका तुटलेला मी कधीच पाहिला नव्हता.”

ती स्वतःशीच पुटपुटली. आजपर्यंत तिला वाटत होतं,

“स्वराज थोडा गोंधळलेला आहे, परिस्थितीने अडकलेला आहे. योग्य वेळ मिळाला तर तो मागे वळेल. माझा स्वीकार करेल; पण आज त्याच्या डोळ्यांत फक्त एकच नाव दिसत होतं, नंदिनी…”

मीराला जाणवलं, हे त्याचं नंदिनींबद्दल आकर्षण नाही, ही सवय नाही. हे प्रेम आहे. खोल, शांत, न तुटणारं… ती पुन्हा उठून बसली. बाहेरचा दुधाळ चंद्रप्रकाश खिडकीतून आत येत होता आणि त्या तिला एक गोष्ट स्वच्छ दिसत होती. डोळ्यातलं पाणी पुसत ती स्वतःशीच पुटपुटली,

“स्वराजच्या आयुष्यात माझ्यासाठी जागा कधीच नव्हती आणि ती जागा कोणी हिरावून घेतलेली नव्हती तर ती आधीपासूनच नंदिनीची होती. मी तिला दोष देत राहिले; पण प्रत्यक्षात मी स्वतःपासून पळत होते.”

आज पहिल्यांदाच मीराने स्वतःशी प्रामाणिक संवाद साधला होता; पण तिच्या या प्रयत्नात ती स्वतःलाच जखमा देत रक्तबंबाळ होत होती. नंदिनी घरातून निघून गेली होती; पण स्वराज मात्र तिच्याच भोवती तिच्या आठवणींत, तिच्या काळजीत, तिच्या प्रेमात अडकून होता. ‘जो माणूस इतकं प्रेम करतो, तो कधीच दुसरीकडे वळत नाही.’ हे वास्तव स्वीकारताना मीराच्या डोळ्यांत पाणी आलं; पण त्यात राग नव्हता. ती खूप दमलेली होती.

“पुरे झालं, मीरा… आता थांब.. लाचारासारखं स्वराजच्या मागे धावणं बंद कर..”

तिनं स्वतःलाच हलकेच दटावलं. आरशासमोर उभी राहून तिनं स्वतःकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच त्या नजरेत स्पर्धा नव्हती, तक्रार नव्हती. फक्त एका सत्याचा स्वीकार होता.

“स्वराज नंदिनीचाच आहे आणि ते प्रेम माझ्यासाठी नाही.”

त्या वाक्याने तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं. तिला जाणवलं, कोणाला जिंकणं म्हणजे स्वतःला हरवणं असतं.
आणि आता तिला हरायचं नव्हतं. तीने खोल श्वास घेतला.
मनात एक निर्णय पक्का झाला.

“पुरे झालं आता.. इथून बाहेर पडायचं. मुव्ह ऑन करायचं.
नंदिनी परत आली किंवा नाही आली ह्याने मला काहीच फरक पडणार नाही. मला आता माझं स्वतःचं आयुष्य शोधायचं आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी..”

पहाटेच्या कुंद प्रकाशात मीरा शांत होत होती. थंड वाऱ्याच्या झुळुकेनं जणू तिच्या मनातला गुंता सुटू लागला होता.

“नवीन सुरुवात ही नेहमी आनंदाचीच असेल असं नाही पण कधी कधी ती स्वीकारातून जन्म घेते.”

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all