Login

तुम दे ना साथ मेरा.. ७

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


तुम दे ना साथ मेरा.. ७
©अनुप्रिया


नंदिनीच्या नाजूक चेहऱ्यावरचा रंग क्षणात उडून गेला. मनात भीती दाटून आली. मुलीची ती अवस्था सुमित्राच्या नजरेतून सुटली नाही. मात्र पाहुण्यांसमोर ती काही बोलू शकत नव्हती. तिने हळूच हात नंदिनीच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली,

“नंदू, उठ बाळा.. सर्वांना नमस्कार कर आणि आत जाऊन बस हं.. मी आलेच.”

आईच्या सांगण्यावरून नंदिनी जागेवरून उठली खरी; पण तिची पावलं मात्र जड झाली होती. मनात शंकेने शिरकाव केला होता. थोड्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर माधवराव उठून उभे राहिले आणि म्हणाले,

“दामोदरराव, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. ही सोयरीक व्हायला आमची काहीच हरकत नाही. तुम्ही तुमचा निर्णय सांगा.”

“माधवराव, आम्हाला तुमच्याशी नातं जोडायला मनापासून आवडेल. आमच्या सौभाग्यवतीनाही मान्य आहे. हो की नाही ओ?”

त्यांनी नंदिनीच्या आईला, सुमित्राला विचारलं. तिनेही हसून होकारार्थी मान डोलावली. आपल्या लेकीसाठी इतकं चांगलं स्थळ समोरून चालून आलं म्हटल्यावर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. नंदिनीचे बाबा पुढे बोलू लागले,

“माधवराव, माफ करा हं; पण मी थोडं स्पष्टच बोलतो. आमच्या घरातलं वातावरण तुमच्या घरातल्या वातावरणापेक्षा थोडं वेगळं आहे. आमच्या घरात मुलींचा विचार, त्यांचं मत, त्यांच्या आवडीनिवडीही विचारात घेतल्या जातात. आम्ही सर्वजण चर्चेनेच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचतो. इथे तर माझ्या नंदिनीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मग तिचं मत न विचारून कसं चालेल? माधवराव, माझी मुलगी नंदिनी माझा जीव की प्राण आहे. तिच्या मर्जीशिवाय आम्हाला काही ठरवता येणार नाही. मला एकदा नंदिनीशी बोलावं लागेल.”

खरंतर माधवरावांना ही गोष्ट रुचली नव्हती.

“मुलींचं ऐकून निर्णय घेणार? असं कुठं असतंय व्हय?”

ते स्वतःशीच पुटपुटले.

“दामोदरराव, साऱ्या पंचक्रोशीत ‘माधवराव सरपोतदारांच्या’ नावाचा काय दबदबा आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला हवं का? सरपोतदारांच्या मुलाला नकार देऊ शकेल तुमची मुलगी? एवढं चांगलं स्थळ नाकारण्याची हिंमत आहे तिच्यात?”

त्यांचा चेहरा उग्र झाला. ते रागात अजून काही बोलतील या भीतीने त्यांना मधेच थांबवत शालिनीताईच पुढे म्हणाल्या,

“ठीक आहे.. आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही तुमच्या नंदिनीला विचारा आणि कळवा. तिचा होकार असेल तर मग आपण लग्नाची तारीख काढायला सुरुवात करू. एक दोन दिवसांत आम्ही आमच्या स्वराजला इकडे गावाकडे घरी बोलवून घेणार आहोत. तो आला की, पुन्हा एकदा त्याला नंदिनीची भेट घालून देऊ.. मुलांचा होकार आला तरच तुमच्या परवानगीने साखरपुडा उरकून टाकू.. काय म्हणता? चालेल ना?”

माधवरावांना शालिनीताईंनी त्यांना असं मधेच थांबवलेलं आवडलं नव्हतं पण त्यांनी शांत राहून संयम दाखवण्याचं ठरवलं. नंदिनीच्या वडिलांनी आनंदाने होकारार्थी मान डोलावली. आपली लाडकी लेक सरपोतदारांची सुन होणार या कल्पनेनेच नंदिनीच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सर्वचजण खूप आनंदात होते. त्यांनी स्वराज आणि नंदिनीचे फोटो, मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले आणि थोड्याच वेळात माधवराव आणि शालिनीताईनी पुन्हा भेटू असं आश्वासन देत त्यांचा निरोप घेतला. नंदिनीच्या घरात आता आगळाच उत्साह संचारला होता. नंदिनीचं लग्न आता हा एकच विषय घरात चर्चेत होता; पण नंदिनी मात्र खिडकीजवळ उभी राहून शांतपणे बाहेर पाहत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की, काही दिवसांतच तिचं आयुष्य एकदमच बदलणार होतं. तिला असं विचारात गढलेलं पाहून सुमित्रा तिच्याजवळ आली. तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. तिच्या स्पर्शाने नंदिनी भानावर आली.

“काय झालं नंदू? कसला विचार करतेस? तुला हे स्थळ आवडलेलं नाहीये का?”

“तसं नाही गं.. तुम्ही विचार करताय म्हणजे चांगलंच स्थळ असेल. तुम्हाला आवडलं आहे म्हटल्यावर माझं काही म्हणणं नाही. पण त्यांच्या मुलाने मला पाहिलेलंही नाही. न पाहताच तो माझ्याशी लग्न करायला कसा तयार होईल? कदाचित काकांच्या दबावाला बळी पडून तर नाही ना? ही गोष्ट माझ्या मनाला खातेय बघ..”

नंदिनीने मनातली खंत बोलून दाखवली.

“अरेच्या! इतकंच ना? मला उगीच काहीतरी वेगळंच वाटलं. आम्ही मुलाला पाहिलंय.. गेल्याच वर्षी आपल्या गावच्या ग्रामदैवतेच्या पूजेचा मान सरपोतदारांच्या घराला होता. तेंव्हा मंदिरात पूजा करताना पाहिलं होतं. मुलगा खरंच छान आहे. एवढी संपत्ती असताना स्वतःचं करियर करण्यासाठी तो घराबाहेर पडला यावरून तो किती स्वाभिमानी आहे बघ.. आणि तरीही तुझ्या मनात शंका असेल तर एक दोन दिवसांत तो गावी येणारच आहे तेंव्हा बोलून घेऊया आपण.. मग तर झालं?”

सुमित्राच्या बोलण्याने नंदिनीला थोडा धीर आला आणि तिची कळी खुलली.

“वेडाबाई, तुझे बाबा असं थोडी कोणाशीही लग्न लावून देतील? चौकशी केल्याशिवाय, मुलाची पसंती विचारल्याशिवाय ते तुला बोहल्यावर चढवणार नाहीत. त्यांच्या काळजाचा तुकडा आहेस तू! समजलं?”

सुमित्राच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. ते पाहून नंदिनी पटकन तिच्या कुशीत शिरली.

दोन दिवसांनी माधवरावांनी दामोदररावांना फोन केला. मोबाईलवर स्क्रीनवर माधवरावांचं नाव झळकलं तसं त्यांनी पटकन कॉल घेतला. हॅलो म्हणताच माधवरावांनी बोलायला सुरुवात केली,

“दामोदरराव, आम्ही माधवराव बोलतोय.. आमचं आमच्या स्वराजशी बोलणं झालं. नंदिनीचा फोटोही पाठवला. त्याला मुलगी पसंत आहे. त्यानेच आम्हाला तारीख काढायला सांगितली आहे.”

“अरे व्वा! हे तर छानच झालं.. पण माधवराव, नंदिनीला न पाहताच स्वराजरावांनी कशी काय पसंती कळवली? आणि ते इकडे येणार होते ना?”

“अहो, तो येणारच होता पण महत्वाचं काम आलं त्याला आणि त्याचं येणं रहित झालं. पण तो म्हणाला, ‘तुम्ही मुलगी बघितलीत ना? तुम्हाला आवडली ना? झालं तर मग मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. आणि मला सारखं सारखं गावी यायला जमणार नाही. बघायला एकदा.. मग लग्नाला एकदा असं नाही करता येणार. तुम्ही सगळं ठरवून घ्या.. मी डायरेक्ट लग्नालाच येतो.’ दामोदरराव, आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आमचाच निर्णय अंतिम निर्णय असतो. तेंव्हा जवळचा मुहूर्त पाहून बार उडवून टाकूया..”

“पण.. माधवराव नंदिनी..”

“आता पण बिन काही नाही.. तुम्ही लग्नाची तयारी करा.. सगळं एकदमच उरकून टाकू. लग्नाची संपूर्ण जबाबदारी आमची.. तुम्हाला काहीच करायचं नाही. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको. फक्त एक नारळ आणि मुलगी द्या. इतकंच पुरेसं आहे.”

“पण माधवराव इतकी घाई कशासाठी?”

“आम्हाला तुमच्या लेकीला आमची सुन बनवून सरपोतदारांच्या घरी आणण्याची घाई झालीय.. समजून घ्या.. परत पोरगं शहरात जायचं म्हणतंय.. गावी आला की पटकन उरकून टाकलं म्हणजे कसं तो सुनबाईंना शहरात घेऊन जायला मोकळा..”

माधवराव हसून म्हणाले. दामोदररावांचा नाईलाज झाला आणि ते त्यांच्या बोलण्याला तयार झाले.

“ठीक आहे.. तुम्ही म्हणता तसं होऊन जाऊ द्या.. आम्ही घरच्यांशी बोलून घेतो.”

“आम्ही लवकरच आमच्या गुरुजींना विचारून जवळचा मुहूर्त काढून घेतो आणि तुम्हाला कळवतो..”

माधवरावांनी नंदिनीच्या वडिलांना पुढच्या काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि थोडंफार बोलून फोन ठेवून दिला. फोन कट करून दामोदरराव विचार करत उभेच होते, इतक्यात मागून नंदिनीचा आवाज त्यांच्या कानात निनादला.

“आबा.. हे काय केलंत तुम्ही? त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणार आहोत का आपण? मी आधीच सांगून ठेवते, मी काहीही झालं तरी स्वराजशी बोलल्याशिवाय लग्नाला उभंच राहणार नाही. बोहल्यावर चढणारच नाही. ”


क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all