Login

तुम दे ना साथ मेरा.. ९

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. ९
©अनुप्रिया


नंदिनीने कॉल घेतला. ती हॅलो म्हणताच समोरची व्यक्ती बोलू लागली.

“हॅलो, मी स्वराज.. ”

त्याचा आवाज थोडा वेगळा वाटला आणि तो घाईत बोलतोय असं तिला वाटलं. नंदिनीने हातवारे करत खुणेनेच तिच्या आईबाबांना स्वराजचा कॉल असल्याचं सांगितलं. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव पाहून दामोदरराव आणि सुमित्रा यांना थोडं हायसं वाटलं. एकतरी गोष्ट मुलीच्या मनासारखी घडतेय कदाचित याचंच त्यांना समाधान वाटलं असावं. नंदिनी आनंदाने धावत तिच्या खोलीत आली. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. स्वतःचा श्वास सांभाळत तिने बोलायला सुरुवात केली.

“हाय स्वराज, मी नंदिनी..”

“हं बोल.. तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. थोडं पटकन बोलशील का? मी थोडा कामात आहे.”

“बरं.. खरंतर मला तुम्हाला भेटून बोलायचं होतं. पण असो, थेट मुद्द्यावरच येते. मला असं विचारायचं, तुमचा या लग्नाला होकार आहे नं? कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे लग्न…”

तिने स्वराजला प्रश्न केला.

“तसं काही नाही. तू उगीच भलतेसलते विचार मनात आणू नकोस. मी माझ्या मर्जीने लग्नाला होकार दिलाय. आता कामामुळे मला गावी यायला जमत नाहीये; पण मी लग्नाला येतोय. तू जास्त विचार करू नकोस. शांत रहा. चल, माझे सिनियर बोलवताहेत. मी फोन ठेवतो आता. बाय..”

इतकंच बोलून स्वराजने कॉल कट केला. खरंतर नंदिनीला त्याचं बोलणं थोडं तुटक तुटक वाटलं होतं.

“थोडासा आखडू वाटतोय; पण हरकत नाही.”

ती हसून स्वतःशीच पुटपुटली. गालावर लाजेची लाली पसरली. त्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते.

“मी माझ्या मर्जीने लग्नाला होकार दिलाय. मी लग्नाला येतोय.”

नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने बाहेर येऊन तिच्या आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितला.

“आबा, स्वराजशी बोलणं झाल्यावर माझी खात्री पटलीय की, त्याच्या मर्जीने त्याने होकार दिलाय. तो लग्नाला तयार आहे. त्याच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाहीये.”

तिच्या प्रत्येक शब्दांत तिच्या आनंद झळकत होता.

“मग, आता लग्नासाठी उभं राहणार ना? बोहल्यावर चढशील ना? होकार कळवून टाकायचा?”

दामोदररावांनी मिश्किलपणे तिला विचारलं. नंदिनी लाजून आपल्या आईच्या कुशीत शिरली. याचाच अर्थ तिनेही लग्नाला संमती दिली. एक दोन दिवसांत माधवरावांनी लग्नाची तारीख काढली. दोन्ही घरची मंडळी लग्नाच्या तयारीला लागली. लग्नाचा बस्ता, दागदागिने खरेदीला सुरुवात झाली. हॉल, कॅटरिंग, मंडप लाइटिंग्स साऱ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली. लग्नाच्या दोन दिवस आधी नंदिनीच्या ऑफिसमधल्या तिच्या मैत्रिणी मेहंदी समारंभासाठी तिच्याकडे मुक्कामाला आल्या. सुमित्रा त्यांना घेऊन नंदिनीच्या खोलीत आली.

“नंदू, तुला मेहंदी काढायला कोण कोण आलंय बघ?”

नंदिनीने मागे वळून पाहिलं. सगळ्या मैत्रिणींना समोर पाहून नंदिनीला खूप आनंद झाला होता. सगळ्याजणी नंदिनीच्या गळ्यात पडून तिला शुभेच्छा देत होत्या आणि नंदिनीही हसून त्या शुभेच्छा स्वीकारत होती. इतक्यात सुमित्रा मिश्किलपणे म्हणाली,

“मुलींनो, आता माझ्या लेकीला जास्त त्रास द्यायचा नाही बरं का? आता आपली नंदू लवकरच लग्न करून सरपोतदारांची सुन बनून सासरी जाईल. तिला दुखवू नका प्लिज. तिच्या हातावर छान मेहंदी काढा बरं.. तिला छान सजवा..”

हे बोलताना सुमित्राचा गळा भरून आला होता. डोळे पाणावले होते.

“हो काकू, आम्ही तिला छान तयार करतो की नाही ते बघाच तुम्ही.. ”

“नंदूऽऽ! एकदम प्रिटी दिसतेस!”

सृष्टीने प्रेमाने तिला मिठी मारली.

“आणि हे काय! इतक्या फटाफट लग्न ठरवलंस. दोन दिवसांवर लग्न आलंय. कसं काय गं?”

श्रुतीने मिश्किलपणे विचारलं.

“अगं, एवढ्या अचानकपणे हे सगळं घडतंय, मीच किती कन्फ्युज आहे. काय सांगू तुला! माझं मलाच कळत नाहीये.”

ती हसून पुटपुटली. रिया तिला मिठीत घेत म्हणाली,

“पण नंदू, तुझ्या बाबांना त्यांच्यावर इतका विश्वास आहे म्हणजे घर चांगलं असणार.”

“हो खरंय तुझं..”

नंदिनी लाजत म्हणाली. इतक्यात मोनिका तिच्या जवळ येत म्हणाली,

“पण तो दिसतो तरी कसा? त्याचा एखादा फोटो तरी आहे का?”

नंदिनी हळूच म्हणाली,

“नाही, माझ्याकडे नाहीये. मीही त्याला अजून पाहिलेलं नाहीये.”

खिडकीतून मंद वाऱ्याची झुळूक आत आली आणि केसांची ती अवखळ बट तिच्या चेहऱ्यावर आली. तिने अलगद ती कानामागे नेली. नंदिनी विचारात पडली.,

“कसा असेल तो? शांत? गोड? की माझ्या स्वप्नांसारखा?”

तिला अजिबात ठाऊक नव्हतं की, ज्याच्यासाठी ती स्वप्नं रंगवत आहे, तोच तिच्या स्वप्नांना सुरुंग लावणार होता. दोघांचं आयुष्य त्यांच्या होकारांनी नाही तर दोन घरांच्या निर्णयांनी बांधलं जाणार होतं.

अखेर नंदिनी आणि स्वराजच्या लग्नाचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच घराच्या अंगणात लगबग सुरू झाली होती. गुलाबी, पिवळे, पारंपरिक मडक्यांचे दिवे आणि बोरांच्या फुलांच्या तोरणांनी सजलेला वावर… धूपाचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. पाहुण्यांची ये जा सुरू होती. कोण साडीची पाळं सांभाळत धावतंय, तर कोण काकूंना फुलांची गजरा लावून देतंय. नुसती धांदल उडाली होती.

लग्नाचा मंडप मात्र एकदम राजेशाही सजवला होता. सोनसळी कापडाची घडी, पांढऱ्या-लाल झेंडूच्या माळा, मधोमध तुळशीपत्रांनी सजलेलं वर-वधूचं आसन जणू दोन जीवांसाठी बनवलेलं छोटंसं स्वर्गाचं द्वारच होतं. ढोलपथकांच्या तालावर वातावरण दणाणून गेलं होतं. प्रत्येक तालासोबत पांघरुणातल्या आनंदकणांनी मंडप उजळत होता.

स्वराजला उटणं लावण्याचा समारंभ सुरू झाला. लहानपणीच्या मित्रांनी त्याला चिडवत चिडवत फुलांच्या वर्षावात मधोमध आणलं.

माधवराव जातीनं सर्व व्यवस्था पाहत होते. लग्नात काही गोंधळ होऊ नये म्हणून माधवराव स्वराजवर बारीक लक्ष ठेवून होते. भविष्याच्या काळजीपोटी त्यांनी आजचा वर्तमान पणाला लावला होता.

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all