Login

तुम दे ना साथ मेरा.. १९

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेम कहाणी

डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १९
©अनुप्रिया


शालिनीताई प्रभावतीबाईंना घेऊन त्यांच्या खोलीत गेली.

“वन्स.. तुम्ही फ्रेश व्हा.. मी तुमच्या नाष्ट्याचं पाहते.”

असं म्हणून त्या वळणार इतक्या प्रभावतीबाई म्हणाल्या,

“आमच्या नाष्ट्याचं निमित्त करून तुला कशासाठी किचनमध्ये जायचंय हे माहितीय मला.. त्याची काहीही गरज नाहीये. तुमचे डाव आमच्या लक्षात येत नाहीत असं वाटतंय का तुला? तुझ्या लाडक्या सुनेचा संपूर्ण स्वयंपाक होऊ देत मग जा.. शून्य मिनिटात निकाल लावतो की नाही बघ. आज कळलेच ती योग्य सुन आहे की माझी मीरा?”

प्रभावतीबाई करड्या स्वरात म्हणाल्या तसं शालिनीताई जागीच थांबल्या. मनात शंकेची पाल चुकचुकली.

“आता वन्स हे कसलं बीज मनात रोवताहेत? ईर्षा, मत्सर? दोघींच्या मध्ये तुलना करून त्यांच्यात स्पर्धा करताहेत?”

इकडे नंदिनी किचनमध्ये पाऊल टाकताच नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला.

“काय होतं हे? मीरा स्वराजचं लग्न ठरलं होतं? पण तो तर म्हणतोय त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं. मग काय आहे हे सगळं? त्याच्या मनातली मुलगी जर मीरा नाही तर मग दुसरी कोण आहे, जिच्यासाठी त्याने माझ्याकडून घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या घेतल्या? जाऊ देत ना यार.. ज्याला माझ्याशी संसारच करायचा नाहीये, त्याच्याबद्दल मी इतका विचार का करतेय?”

तिचा तिलाच प्रश्न पडला. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि संपूर्ण किचनभर नजर फिरवली.

ते फक्त किचन नव्हतंच तर ही नंदिनीची पहिली परीक्षा होती. भिंतीवरची चकचकीत कपाटं, कोपऱ्यात उभा असलेला फ्रिज, गॅसच्या वरच्या बाजूला लावलेली नवी पितळी भांडी… सगळंच अनोळखी. आईच्या घरचं किचन आठवलं. किचनमधल्या प्रत्येक वस्तूंवर तिचा मायेचा हात फिरलेला असायचा.

“किती मायेने शिकवायची आई! आईकडे चूक झाली तर हसून सोडवली जायची. आता इथे मात्र चूक म्हणजे अपयश तर नसेल ना? माझं चुकलं तर सांगायला कोण आहे?”

तिला शालिनीताईंचं बोलणं आठवलं,

“आत्याबाईंना आवडलं पाहिजे.”

शालिनीताईंचे शब्द कानात घुमत होते. नंदिनीने साडीचा पदर कंबरेला खोचला. हात धुतले. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत ती स्वतःशीच पुटपुटली,

“शांत रहा नंदिनी, बी काम.. टेक अ डीप ब्रीथ.. काहीतरी साधंच पण चवीला चांगलं असं काहीतरी करते म्हणजे लवकरही होईल आणि सर्वांना आवडेलही.”

तिने थोडा विचार केला. फ्रीज उघडून भाज्या कोणत्या शिल्लक आहेत ते पाहिलं. फ्रीजमधली भाजी काढून चिरायला घेतली. डाळ भिजत टाकली आणि गॅसवर वरण भाताचा कुकर लावला. तेवढ्यात मागून कोणाच्यातरी पावलांचा आवाज आला. नंदिनी चमकून मागे वळून पाहिलं. मीरा किचनच्या दारात उभी होती. हातात मोबाईल, चेहऱ्यावर तेच शांत आणि ओठांवर काहीतरी सुचवणारं हसू वातावरण रहस्यमय करत होतं.

“ओह… तू स्वयंपाक करतेयस?”

मीराने फोनमध्ये पाहतच जणू काही काहीच घडलंच नाही या आविर्भावात विचारलं.

“हो…”

नंदिनीचा आवाज थोडासा कापरा झाला होता. मीरा आत आली. आजूबाजूला नजर फिरवली.

“मम्मी खूप चोखंदळ आहेत हं… विशेषतः पहिल्या स्वयंपाकाबद्दल..”

फ्रीज उघडून त्यातली पाण्याची बॉटल बाहेर काढत मीरा म्हणाली. नंदिनीने भाजी चिरायचं थांबवलं आणि विचारलं,

“मम्मी म्हणजे शालिनीकाकू ना?”

“हो… शालिनीकाकू..”

मीराने हसून उत्तर दिलं पण त्या हसण्यातही छद्मीपणा जाणवत होता. एक टोचणी जाणवत होती.

“त्यांना तिखट कमी लागतं. मीठ जरा जास्त झालं तर लगेच जाणवतं त्यांना.”

ती जवळ आली. गॅसवरच्या भांड्याकडे पाहिलं.

“डाळ करत आहेस? छान आहे. पण माझ्या आईला, आत्याबाईंना आमटी आवडते. डाळ फार पातळ करू नकोस. नाहीतर ती म्हणेल, सरपोतदारांच्या सुनेचा हात फारच सैल आहे. आमटी केलीय की फुलुक पाणी? आमटीत डाळ शोधायची की अजून काही?”

नंदिनी काहीच बोलली नाही. तिने आमटीला फोडणी दिली. तिचे हात थरथरत होते. मीरा किचन ओट्याला टेकून उभी राहिली.

“तुला माहीत आहे का? स्वराजला माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं. अगदी बोटं चाटत सारं ताट संपवून टाकायचा. तो ऑफिसमधून थेट आमच्याकडे यायचा. ‘मीरा, आज काहीतरी खास कर’ असं म्हणायचा.”

खरंतर स्वराज असं काही कधीच म्हणलेला नव्हता; पण असं बोलून मीराला नंदिनीला जळवायचं होतं. तिला त्रास द्यायचा होता. नंदिनी तरीही शांत होती. मीरा अगदी शांतपणे पुढे म्हणाली,

“पण चालायचंच…आता त्याचं लग्न झालंय ना.. लग्न झाल्यावर सगळे बदलतात असं म्हणतात ना? पण मला खात्री आहे, स्वराज कधीच बदलणार नाही. त्याला माझ्याच हातचं जेवण आवडतं आणि त्यात जर नॉनव्हेज असेल तर विचारूच नकोस. पोट, मन तृप्त होईपर्यंत अन्नावर ताव मारायचा.”

ती नंदिनीच्या डोळ्यांत पाहून हसून म्हणाली,

“तू बघ हं..आज सगळं नीट झालं पाहिजे. कारण पहिला ठसा कायम सर्वांच्या लक्षात राहतो.”

मीरा तिथून निघून गेली. किचनमध्ये पुन्हा शांतता पसरली.
पण ती शांतता नंदिनीला बोचत होती. तिने डोळे मिटले. एक क्षण आईचा चेहरा डोळ्यांसमोर आला.

“घाबरायचं नाही बाळा… स्वयंपाकात हात नाही, मन असावं लागतं. आपला स्वभाव जेवणात उतरत जातो. शांतपणे कर सगळं.. ”

नंदिनीने डोळे उघडले. हात स्थिर केले.

“मीरा काहीही बोलेल; पण आज मात्र मी बनवलेल्या पक्वान्नाच्या ताटात मीरासाठी माझं उत्तर असणार आहे.”

स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. नंदिनीच्या मनात धडधड होती, पण ती शांत दिसत होती. डायनिंग टेबलवर पानं मांडली गेली. आत्याबाईं आणि मीरा जेवायला डायनिंग टेबलवर आल्या.

प्रभावतीबाई त्यांच्या खुर्चीत बसल्या. साडीचा पदर सावरला. त्यांच्या समोर वाढलेली भाजी, आमटी, भात, चपाती, शेवयांची खीर सगळं त्यांनी एक नजर टाकून न्याहाळलं.

नंदिनी थोडी बाजूला उभी राहिली. त्यांनी घेतलेला पहिला घास.. तोच क्षण तिच्या आयुष्याचा निकाल देणार होता.

प्रभावतीबाईंनी चपातीचा घास तोडला. आमटीत बुडवला.
हळूच तोंडात ठेवला. क्षणभर शांतता पसरली. नंदिनीचा श्वास अडकल्यासारखा झाला.

“हं…”

प्रभावतीबाईंनी नुसतंच इतकंच म्हटलं. त्या पुढचा घास घेत राहिल्या. शालिनीताई उत्सुकतेने म्हणाल्या,

“वन्स कसं झालं आहे जेवण?”

प्रभावतीबाईंनी वाटी बाजूला ठेवली.

“चव वाईट नाही.”

त्या थोडं थांबल्या.

“पण आमटी थोडी फिकी झालीय. आमच्या घरात थोडी झणझणीत आवडते.”

नंदिनीने मान हलकेच डोलावली. त्या पुन्हा म्हणाल्या.

“भाजी नीट शिजलीय; पण मीठ थोडं कमी वाटतंय.”

शालिनीताईंनी पटकन हस्तक्षेप केला.

“वन्स, आज तिचा पहिलाच दिवस आहे. हळूहळू सवय होईल.”

प्रभावतीबाई हसल्या.

“हो हो… सवय व्हायला वेळ लागतोच. प्रत्येक घराची चव वेगळी असते.”

मीरा शांतपणे हे सगळं पाहत होती. ओठांवर हलकंसं समाधानाचं हास्य होतं. प्रभावतीबाईंनी पाणी घेतलं. नंदिनीकडे थेट पाहिलं.

“सून घरात आली म्हणजे फक्त स्वयंपाक नाही तर घराची पद्धत, माणसं, मान-अपमान सगळं समजून घ्यायला लागतं.”

त्या शब्दांत इशारा होता. नंदिनीने थोडं पुढे येत नम्रपणे उत्तर दिलं,

“हो आत्याबाई. शिकेन हळूहळू.”

“शिकावंच लागतं.”

प्रभावतीबाईंनी ठामपणे म्हटलं.

“कारण इथे चुका चालत नाहीत.”

त्या उठल्या. नंदिनी तिथेच उभी राहिली. अपयशाची ठसठस मनात होती; पण ती पूर्णपणे हरली असंही नव्हतं. मीरा उठताना नंदिनीच्या कानाजवळ हलकेच म्हणाली,

“पास झालीस असं समजू नकोस. ही तर सुरुवात आहे.”

ती पुढे निघून गेली. नंदिनीने दोन्ही हात घट्ट आवळले. डोळ्यांत पाणी होतं; पण ते पडू दिलं नाही. ही एक परीक्षा होती. आणि आता तिची तयारी सुरू झाली होती.

क्रमशः
© अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”

0

🎭 Series Post

View all