Login

तुम दे ना साथ मेरा.. १०

तुम दे ना साथ मेरा.. हळुवारपणे फुलत जाणारी एक प्रेमकहाणी..
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

तुम दे ना साथ मेरा.. १०
©अनुप्रिया

दुसरीकडे नंदिनी लग्नासाठी मंडपात यायला निघाली होती. तिच्या कपाळावरील चंद्रकोर, हिरव्या पैठणीच्या काठावर सोन्याची झळाळीचं भरतकाम.. तिच्या गालांवरील लाजेने उमटलेलं हलकं हसू, केसांत माळलेले मोगऱ्याचे सुगंधी गजरे.. हातावरच्या मेंदीचा ओला गंध आणि मेहंदीने त्याच्या नावाची रेषा हातावर, मनावर खोलवर उमटली होती. जशी नंदिनी मंडपात आली तशी जणू आजची संध्याकाळ तिच्याचसाठी थांबली होती. सारेजण तिच्या सौन्दर्याचं कौतुक करत होते. देव-देवतांच्या, ब्राह्मणाच्या साक्षीने नंदिनी आणि स्वराज दोघे समोरासमोर आले. अंतर्मनात अनेक प्रश्न, शंका, स्वप्नं, आशा पण बाहेर फक्त एक शांत, सुंदर हास्य उमटलं होतं. त्यांना पाहून ‘लक्ष्मी नारायणाचा जोडा’ हेच शब्द प्रत्येकाच्या ओठांवर होते.

लग्नघटिका जवळ आली. धडधडत्या हृदयाने नंदिनीने लाजत पुढे होऊन फुलांची माळ त्याच्या गळ्यात टाकली. स्वराजनेही तिच्याकडे न पाहताच तिच्या गळ्यात माळ घातली. क्षणभर दोघांचे श्वास एकाच ठिकाणी मिसळल्याचा तिला भास झाला. मंत्रोच्चारांचा धीरगंभीर नाद सुरू झाला. होमकुंडातील ज्वाला उंचावल्या. सप्तपदीचे सात पाऊल टाकताना तांदळाच्या, मंगलाष्टकांच्या स्वरांनी वातावरण पवित्र झालं होतं. थोरामोठ्यांनी वरवधूवरांवर आशीर्वादांचा वर्षाव केला. जेवणाच्या पंगती उठल्या. पंगतीत स्वराजच्या हातून लाडवाचा घास घेताना नंदिनी मनोमन मोहरली होती. स्वराज आणि नंदिनीचा विवाह संपन्न झाला. पाहुणे मंडळी त्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतली.

आता नंदिनीला सासरी पाठवण्याची वेळ झाली. दोघां उभयत्यांनी दामोदरराव आणि सुमित्राला नमस्कार केला. प्रत्येक वधूपिता आणि आईच्या आयुष्यात एकदा तरी मुलीची पाठवणी हा अतिशय कठीण जीवघेणा प्रसंग येतोच. नंदिनी आई आबांच्या गळ्यात पडून रडू लागली. सुमित्रा तिला समजावत म्हणाली,

“नंदू.. तू सरपोतदारांच्या घरी सुन बनून जातेयस. नीट रहा.. तिथले सगळे रितीरिवाज शिकून घे. सर्वांना छान जप. त्यांचा मान ठेव. आपल्या घराण्याला, आईवडिलांच्या इभ्रतीला धक्का लागेल असं कोणतंच काम करायचं नाही. आता तुझी आईचीच सत्वपरीक्षा आहे असं समज. तिच्या संस्कारांना बोल लावू नकोस. तुझ्या आबांची प्रकृती जरा नाजूक असते. त्यांना टेन्शन येईल असं काही होऊ देऊ नकोस. ते हार्टपेशन्ट आहेत हे विसरू नकोस. त्यांच्या कानावर तुझ्या सासरहून कोणतीही तक्रार येता कामा नये. तुझ्या नंतर अजून आपल्या अधिराचंही लग्न व्हायचंय.. तेंव्हा समजुतीने वाग..”

“आई, तू काळजी करू नकोस.. मी नीट राहीन.. पण आई एक गोष्ट सारखीच त्रास देतेय. कायम टोचत राहील.”

“काय गं? काय झालं?”

“माधवकाकांनी लग्नाची इतकी घाई केली की, अवघ्या आठवड्याभरात लग्न उरकूनही टाकलं. आपल्या अधिराच्या परीक्षा सुरू होत्या. बिचारीला माझ्या लग्नाला येताच आलं नाही. ती लग्नात असती तर बरं झालं असतं..”

“हं खरंय.. पण काही हरकत नाही. तिची परीक्षा संपली की लगेच ती तुला भेटायला येईल असं म्हणाली. तू काळजी करू नकोस.”

नंदिनीच्या आईने तिची समजूत काढली. दामोदरराव आपल्या मुलीला कुशीत घेत म्हणाले,

“नंदू, काही झालं तरी हे विसरायचं नाही, तुझे आबा अजून जिवंत आहेत. काहीही झालं तरी आधी मला कळवायचं. तुझ्या आईचं आता वय झालंय. तब्येत नाजूक झालीय न तिची.. तिला नको काही सांगत जाऊस. ती लगेच टेन्शन घेते. पण मी आहे ना? माझ्या लेकीसाठी मी कधीही, कुठूनही धावत येईन. समजलं?”

नंदिनीच्या ओठांवर हसू उमललं. तिच्या आईवडिलांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून तिला भरून आलं. दोघेही एकमेकांची किती काळजी घेत होते! तिच्या मनात आलं.

“स्वराज आणि मी असंच एकमेकांना जपू.. एकमेकांची काळजी घेऊ.. सुखाने संसार करू..”

वाऱ्याच्या झुळकेने खिडकी उघडली आणि टेबलवरची फ्रेम खाली पडली तसं नंदिनी भूतकाळातून वर्तमानात आली. तिने वळून पाहिलं, स्वराज सोफ्यावर पुस्तक वाचत आडवा पडला होता. ती पुन्हा कूस बदलून बिछान्यात आडवी झाली. डोळे मिटून घेतले. आपोआप डोळ्यांतून पाणी झरू लागलं. एक आवाज कानी निनादला.

“मी माझ्या मर्जीने लग्नाला होकार दिलाय. मी लग्नाला येतोय. तू जास्त विचार करू नकोस. शांत रहा.”

नंदिनी पटकन उठून बसली. तिला तो कॉल आठवला. क्षणभर मनात विचार चमकून गेला.

“तो आवाज… खरंच स्वराजचा होता का?”

नंदिनी विचारात पडली. त्या कॉलला आठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या दिवशीच्या कॉलच्या दरम्यान छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी ती सूक्ष्मपणे बारकाईने पाहू लागली.

“त्या दिवशी स्वराजचा कॉल आला तेंव्हा मागे लहान मुलांचा आवाज आला. तो जर ऑफिसमध्ये होता तर मग तो मुलांचा आवाज? माधवकाका म्हणाले होते स्वराज खूप हळू आणि शांतपणे बोलतो पण त्या दिवशीचा कॉलवरचा आवाज जरा भारी आणि खूप वेगात बोलणारा वाटला. तो नक्की स्वराजच होता ना?”

नुसत्या विचारांनीच तिला दरदरून घाम फुटला. ती पटकन बेडवरून उठली आणि तिने दिवा लावला आणि स्वराजकडे पाहून थरथरत्या स्वरात विचारलं,

“एक विचारू? त्या दिवशी तुम्ही मला फोन केला होता ना? मी ‘हो’ म्हणण्याआधी?”

स्वराज एकदम थबकला,

“कॉल? कोणता कॉल?”

नंदिनीच्या अंगावर काटा आला.

“लग्नाच्या आधी… तुम्ही, तुम्ही म्हणालात ‘मी येतोय. चिंता करू नकोस.’”

स्वराज चिडून पण आश्चर्यचकित होऊन म्हणाला,

“मी तर तुझा नंबर सेव्हही केला नव्हता. मी तुला फोनच केला नाही.”

क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेने नंदिनीचा जीव गुदमरू लागला होता.

नंदिनी हळू आवाजात म्हणाली,

“ते तुम्ही नव्हतात तर मग… मग त्या दिवशी कॉलवर माझ्याशी कोण बोललं?”

क्रमशः
©अनुप्रिया


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”


0

🎭 Series Post

View all